‘हर घडी बदल रही है रूप ज़िंदगी…’ अशा भयाकारी वेगाने बदलणाऱ्या जगात नव्याचे जुने व्हायला हल्ली फार काळ लागत नाही. कळीचे फूल होऊन देवाच्या चरणस्पर्शाने त्याचे निर्माल्य व्हायला जेवढा काळ लागतो त्याहूनही कमी वेळात ‘नव्या’ गोष्टी ‘जुन्या’ होत चालल्यात, फक्त ‘देव’ (आणि 'भाव') तेवढे बदलले आहेत.
बरं, यात फक्त अन्नपदार्थ, कपडेलत्ते, खेळ-मनोरंजन, संस्कृती-उपक्रम, साधन-उपकरणेच नाही तर गाडी-घोडे, स्थावर-जंगम, सोयी-सुविधा यांच्यासह आवडी-निवडी, आचार-विचार, सखे-सोबती, सगे-सोयरे आणि मूल्य-तत्वे सारेच बुलेट ट्रेनच्या वेगाने आऊट डेटेड होतांना दिसते.
पूर्वी 'टूथ' हा फक्त विस्डम संदर्भातच असे त्यामुळे त्याच्याशी निगडित विस्डमही शाबूत होते. आता त्याची जागा 'ब्ल्यू' टूथ ने घेतल्याने त्याच्या उठवळ धरसोडपणाचे वैशिष्ट्यपूर्ण आणि बहुपयोगी लक्षण त्याच्या वापरकर्त्यात आढळले तर, ‘वाण नाही पण गुण लागला’ म्हणायचं. शिवाय सारे काही (प्र)दर्शनीय झाल्याने स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात ‘दिसेल ते’ कैद करण्याची चढाओढ पाहता, क्षणांचे अनुभव संवेदनेत रुजून त्यांच्या जोपासनेने जाणिवा समृद्ध होण्यासाठी आवश्यक तो संयम, ती स्थिरता, तो ठहराव, ते भान अभावानेच दिसते.
या भयावह वेगामुळे जे अपघात संभवतात त्यांचे दूरगामी परिणाम अधिक धोकादायक आहेत. 'पागल, ये मत सोच की जिंदगीमें कितने पल है, ये देख हर पलमें कितनी जिंदगी है...!' ही मुन्नाभाई फिलॉसॉफी सांगणारी उत्तान नाच करणारी नर्तकी असली तरी त्यामुळे त्यातले तत्व मुळीच हीन ठरत नाही, किंबहुना हे समजावून सांगायला तिच्याइतकी अधिकारी व्यक्ती दुसरी नाही असाही एक दृष्टिकोन असू शकतो. पण त्या एका क्षणात असलेली जिंदगी बघायची, आस्वादायची वृत्ती मात्र ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, कुठेच एक्सप्रेस डिलिव्हरीसाठी ऑर्डर करता येत नाही; ती जोजवावी, जोपासावीच लागते.
सौंदर्याचे, भव्यतेचे, उदात्ततेचे आस्वादन करण्यासाठी लागणारी रसिकता जगण्याच्या गरजांमध्ये कशी घुसमटते याचे क्लासिक उदाहरण असलेली रॉबर्ट फ्रॉस्ट यांची, आख्यायिका बनून उरलेली कविता 'स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग' १०२ वर्षांची झाली तरी आजही तेवढीच, किंबहुना अधिकच समर्पक आहे. आज जगण्याच्या धबडग्यातून वेळ काढून तिचे रसास्वादन करावे आणि जमेल तसा मुक्त भावानुवाद करावा म्हणून हा खटाटोप. आता हे प्रकटन राष्ट्रभाषेत का मातृभाषेत का नाही या मागे काही मोठी वैचारिक/तात्विक/'राज'कीय भूमिका वैगरे नाही तर या कवितेचा एकूण बाज पहाता तिला मातृभाषेत आणायला अधिक प्रतिभा, योग्यता आणि अभ्यास पाहिजे असे जाणवल्याने ही सोईस्कर पळवाट का म्हणानात! इतर कवी मित्रांनी या कामी मदत केली तर तेही लवकरच साधेल... हा दुर्दम्य आशावाद!
या कवितेची जन्मकथा थोडी रंजक असल्याने इथे सांगणे उचित ठरावे. रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी जून १९२२ मध्ये, 'न्यू हॅम्पशायर' या कवितासंग्रहासाठी, त्याच नावाची दीर्घ कविता रात्रभर जागून लिहून काढली. कविता संपत आली तेंव्हा उजाडू लागले होते आणि त्या पहाटवाऱ्यात सूर्योदयाचा आनंद घ्यायला घराबाहेर उभे असतांना पूर्णपणे मुक्त, ताणविरहित (तुरिया?) अवस्थेत रॉबर्टना ही कविता सुचली आणि जणू काही झपाटल्यासारखी त्यांनी ती एकहाती लिहून काढली. म्हणजे विल्यम वर्ड्स्वर्थ यांच्या कवितेच्या व्याख्येत चपखल बसणाऱ्या आणि कवीची उदात्त निर्मितीनंतरची उत्कट भावावस्था तंतोतंत मांडणाऱ्या या कवितेने इतिहास रचणे विधिलिखितच होते...!
रॉबर्ट फ्रॉस्ट हे अमेरिकेचे एक अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्याबरोबरच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूं यांचे अत्यंत आवडते कवी होते. पंडित नेहरूंच्या शेवटच्या काळात त्यांच्या पलंगाच्या बाजूच्या मेजावर रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे एक पुस्तक पडलेले असे आणि त्यातील या कवितेचे पान उघडे असे ज्यातील शेवटच्या चार ओळी त्यांनी अधोरेखित केलेल्या होत्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा