रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

मुक्त...!


माझ्या कालच्या दुर्दम्य आशावादाची त्वरित दखल घेऊन कविवर्य सन्मित्र दिनेशने 'स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग' ची मराठी आवृत्ती केवळ प्रसवली नाही तर तिच्यावर अत्यंत लयबद्ध अष्टाक्षरी संस्कार करण्याची किमया सुद्धा साधली याबद्दल त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच! 

या प्रकटनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ रूपांतरण किंवा निव्वळ अनुवाद नव्हे तर, मूळ बीजकल्पनेशी नाते सांगणारी संपूर्ण स्वतंत्र आणि स्व-छंद अभिव्यक्ती आहे कारण, यात डोकावणारी अनामिका रॉबर्ट फ्रॉस्ट यांना अभिप्रेत होती काय हे खात्रीने सांगता येणार नाही. 

ही कविता पाठयपुस्तकात 'धडा' म्हणून असल्याने, तो 'शिकविण्या'च्या उद्देशाने जे संदर्भ आढळतात त्यात, कवितेतील घर हे त्या जंगलाच्या मालकाचे(?) फार्म हाऊस(??) असल्याचे विवरण येते. शिवाय फ्रॉस्ट यांनीही 'हिज' असे पुरुषवचनी संबोधन वापरले आहे, त्याचाही संदर्भ या विवेचनास असावा असे वाटते.

तथापि, सन्मित्र दिनेशच्या कवितेचा आत्मा हा नेहमीच प्रेयसीच्या एका विरह-विव्हल प्रियकराचा राहिल्याने त्याला ते घर तिचे असावे असे वाटणे जेवढे स्वाभाविक तेवढेच रोमँटिक! त्या निमित्ताने एक वेगळाच 'ठहराव' बघायला मिळाल्याने रसिकांच्या आनंदानुभूतीत भरच पडेल यात शंका नाही! 

दिनेशच्या कवितेच्या आत्म्याला नेहमीच एक अध्यात्मिक किनारही अनुभवता येत असल्याने, त्याने त्याच्या आवृत्तीचा समारोप अध्यात्मिक पद्धतीने करणे क्रमप्राप्तच होते. फ्रॉस्टना ते देखील तसे म्हणायचे नसावे असे वाटते. फ्रॉस्टच्या, सामान्य माणसाला नित्य तोंड द्याव्या लागणाऱ्या व्यावहारिक, धोरणी द्वंद्वाला दिनेशने कर्म-धर्म-संयोगाचे एक वेगळेच परिमाण दिले, तेही कौतुकास्पद!

कार्यबाहुल्यामुळे इतर कवी मित्रांना अजून यावर प्रकटता आले नसावे असे मानून, यथावकाश आणखीनही काही आवृत्त्या अनुभवयास मिळतील ही अपेक्षा. पण तूर्तास आस्वाद घेऊ या सन्मित्र दिनेशच्या या खास अष्टाक्षरी अभिव्यक्तीचा...       

झाडी दाट ही कुणाची
आहे मलाही ठाऊक
घर गावात तिचे ते
उबदार अन् भावूक

थबकलो इथे असा
निरखत अश्या क्षणी
गोठलेले रान गार
नसेलही तिच्या मनी

घोडा अबलख माझा
थरारला तो ही खास
असा का थांबलो येथे
नसे घर आसपास

गोठलेला तलाव हा
अन् झाडी घनदाट
सांजवेळ कातर शी
पाही ती कुणाची वाट

चूक ना उमजे त्यास
करी घंटानाद मंद
घोंघावतो वारा फक्त
आणि बर्फवृष्टी कुंद

आहे सुंदर जंगल
घनदाट खोल जरी
काही शपथा जुन्या
सांभाळतो मी ही उरी

दूरवर चालणे माझे
कर्म हे कर्तव्ययुक्त
भोग सारे संपवून
व्हावे अखेर मी मुक्त!

- दिनेश चंद्रात्रे, धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा