गुरुवार, १७ सप्टेंबर, २०१५

"ऎकतोयस ना…?"

ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे । कविं कवीनां उपमश्रवस्तमम् । 
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः । शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ॥


"बाप्पा, आलास खरा पण मनाची तयारी केली आहेस ना…! 
आता १० दिवस हे मोठे लोक तुझे काय काय करतील माहितेय? 
दागिने वस्त्रे फुलं घालून तुझा श्वास कोंडतील, 
नाका-सोंडेत कशा कशाचा धूर सोडतील, 
तुला नैवेद्य म्हणून काय काय आणतील आणि स्वत:च फस्त करून तुला बनवतील, 
सकाळ संध्याकाळ तुझ्या आरतीच्या नावाने आणि एरवी उत्सवाच्या नावाने ढोल बडवून, सिनेमाच्या गाण्यांच्या गोंगाटाने उच्छाद मांडतील, 
त्यातून तुझे हे सुपाएवढे कान… बघ बाबा कसं सहन करायचं ते…! 
आणि हो बाप्पा, आम्हां मुलांना तुझ्याकडून काहीच नको. 
धम्माल करायला आणि मोदक खायला मिळतात ते बास आहे. 
परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास करायला लागतो, 
तो आम्ही करूच आणि छान मार्कांनी पासही होऊ… 
तुझा आशीर्वाद असतोच याची आम्हाला खात्री आहे. 
पण बाप्पा एक सांगू, तू ना या वर्षी जातांना या मोठ्या लोकांना जरा सुबुद्धी देवून जा.
नाही, तुम्हाला आवडतात आणि परवडतात म्हणून हव्या त्या वस्तू वापरा म्हणावं…
आणि कमवता तर खर्चही करा म्हणावं… चंगळ म्हणून का असेना…
पण याबरोबरच थोडासा विवेकही वापरा म्हणावं… 
लहान तोंडी मोठा घास… पण ही वेळ आणलीच मुळी या मोठ्या माणसांनी
भूक लागली की खाणे ही प्रकृती… भूक नसतांना खाणे ही विकृती आणि 
आपल्यातली अर्धी भाकरी उपाशी माणसाला देणे ही संस्कृती… 
हीच खरी संस्कृती… हा असा धांगडधिंगा म्हणजे संस्कृती नव्हे…
हे सांग त्यांना जरा समजावून… सांगशील ना…?
आम्ही तर बोलूच शकत नाही… आम्हाला काय कळतय? बच्चे आहोत ना आम्ही…!
पण तुझं तर ऎकतील. बाप्पा आहेस ना तू…?
ऎकतोयस ना…?"

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०१५

बाप्पा रे …!


जमविल्या मायेचा सोडून मोह
देशांतरा धावती सारे सान थोर,
प्रवास जिकिरीचा, मुक्काम गूढ
मरण्याहून जीवा, जगण्याचा घोर...

'बाप्पा येणार बाप्पा येणार'
ओरडती सारे दांभिक जन,
भक्ती सरली सक्ती उरली
वर्गणी-खंडणीचे करती धन...

बळीराजा उपाशी म्हणून
'बाप्पा' ना खुश, ना राजी,
'मरणारे मरती आपल्या मरणे'
उत्सवे नाचती निर्ल्लज पाजी...

प्रत्येकाला हवी 'स्पेस' आणि
करमणुकीचे साधन स्वतंत्र,
आस्वादण्या आधी काहीही
'शेअर' करण्याचे अजब तंत्र…

माणसांच्या बेटांत हल्ली
नाही मने जोडणारे सेतू,
संभावित 'विवेकी'ही बघती
पत्रिकेतले मंगळ, राहू-केतू...

विकासाच्या विनाशकारी गप्पात
माणूसपण काय शिल्लक राहील,
मढविलेल्या सालंकृत बाप्पात
नवी पिढी कुठले 'मूल्य' पाहील…?

शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

सिंहस्थ...!




व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर
संतांचे पुकार, वांझ झाले...

रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग, तुडुंबला...

बँड वाजविती, सैंयामिया धून
गजांचे आसन, महंता‌सी...

आले खड्ग हाती, नाचती गोसावी
वाट या पुसावी, अध्यात्माची?

कोणी एक उभा, एका पायावरी
कोणास पथारी, कंटकांची...

असे जपीतपी, प्रेक्षकांची आस
रुपयांची रास, पडे पुढे...

जटा कौपिनांची, क्रीडा साहे जळ
त्यात हो तुंबळ, भाविकांची...

क्रमांकात होता, गफलत काही
जुंपते लढाई, गोसव्यांची...

साधू नाहतात, साधू जेवतात
साधू विष्ठतात, रस्त्यावरी...

येथे येती ट्रक, तूप साखरेचे
टँकर दुधाचे, रिक्त तेथे...

यांच्या लंगोटीला, झालर मोत्याची
चिलीम सोन्याची, त्याच्यापाशी...

येथे शंभराला, लाभतो प्रवेश
तेथे लक्षाधीश, फक्त जातो...

अशी झाली सारी, कौतुकाची मात
गांजाची आयात, टनावारी...

तुज म्हणे ऐसे, मायेचे माइंद
त्यापाशी गोविंद, नाही नाही...!

- कुसुमाग्रज

बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५

दिवस असे की...!

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये,
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये...

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार,
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे,
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...

शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये सर्दी फार,
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...

कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव,
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...

कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ,
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...


असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये...!
- संदीप खरे

बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

नागपंचमी...!


माटी का एक नाग बनाके,
पुजे लोग लुगाया...
जिंदा नाग जब घर मे निकले,
ले लाठी धमकाया...!

जिंदा बाप कोई न पुजे,
मरे बाद पुजवाये...
मुठ्ठी भर चावल लेके,
कौवे को बाप बनाय...!

पाथर पूजे हरी मिले,
तो मै पूजू पहाड़...
घर की चक्की कोई न पूजे,
जाको पीस खाए संसार...!

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५

ठिकरी...!



एका रिकाम्या रविवारी...
जुने कपाट आवरायला घेतले तर…
अवचित येऊन बिलगले माझे बालपण...!

सापडला एका काचेच्या बरणीत
बंद असलेला खजिना…
काही टवके उडालेल्या गोट्या,
थोडे चिंचोके आणि
कसल्या कसल्या बिया...
एक ठिकरी आट्यापाट्यांची,
चुकीच्या घरात पडल्यासारखी…

…आणि सापडली एक खाकी वही
निळ्या निळ्या रेघांची...!
काही निळी ओळखीची अक्षरे सुद्धा
आता पुसट झालेली…

एक इवलासा पेन्सिलचा तुकडा होता...
शार्पनर मध्ये अडकलेला,
श्वास अडकवा तसा…


एक चेंडूही होता...
अजूनही अंगावर अंगणातली माती वागवणारा
बरोबर खेळून खेळून सोलली गेलेली बॅटही होती…
लहानपणीचे अंगणच भेटले जणू…!

खूपश्या रिकाम्या आगपेट्या,
आगगाडीच्या सुटलेल्या डब्यांसारख्या...
आणि सापडले एक वर्षानुवर्ष वापरलेले
शाळेचे पांढरे स्वेटर,
आता विरलेले आणि जुनाट झालेले…
माझ्यासाखेच...!

होता एक कचकड्याचा चष्मा, 
यात्रेत घेतलेला…
खूपशी रिकामी पाकिटं…
तिकिटांसाठी जमवलेली...
अजूनही वेगळे पाकीट होते,
पोस्ट करण्याची वाट पहाणारे…

एक सापडले जुने बंद घड्याळ,
हट्टाने बाबांकडून घेतलेले...
आजोबांचे ढापलेले फाउंटन पेन,
आता निब तुटलेले…
आणि आजीने बारश्याला दिलेले
वाळेही होते, आता काळे पडलेले!

आज जाणवले असे कि
जगण्याचा तोल सांभाळतांना…
वर्षांचा हिशोब आटोपला
निरागस 'मी'पण हरवतांना…

किती दिवसांनी भेटले बालपण,
सुखावून गेले जातांना…
नात्यांच्या तडजोडी निमाल्या
मिठीत त्याच्या विसावतांना…!


गुलजार सरांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या 
'आज मुझे उस बुढी अलमारी के अंदर…' रचनेचा
करुणा गोविंद कुलकर्णी यांनी लिहिण्याच्या पहिल्याच प्रयत्नात केलेला भावस्पर्शी मुक्त भावानुवाद…!

शुक्रवार, १७ जुलै, २०१५

बायोस्कोप… आमचाही!


आज 'बायोस्कोप - चार दिग्दर्शक, चार कवी, एक चित्रपट' हा मराठीतला अशा प्रकारचा पहिलाच आणि त्या कल्पनेइतकाच काव्यात्म, भावगर्भ आणि 'गुलजार' दृश्यानुभव मराठी 'कवी-मना'ला भुरळ घालून गेला. त्या निमित्ताने बऱ्याच आधी लिहून ठेवलेल्या चार अनवट रचना 'इत्यादी' वर पोस्ट कराव्याशा वाटल्या. का… कुणास ठाऊक? उत्तरचं तर शोधतोय…


हे कबीरा…!

लाभ हो जाये लोभ
राग का होता रोग
जोड दिया गर भाग में
तो बन जाता भोग I

आस बन जाये ओस
बाल कहने लगे बोल
जुट जाये जब आमसे
तो कहलाता ओम I

एक मात्रा का खेल है
अर्थ दिये पलटाये I
छोटीसी लकीर दे
रामको रोम में मिलाये II


मना रे…!

मनाला न कळे मना काय हवे
शोधू जाता हाती रोज विश्व नवे …

मनाचे ओझे मनाचाच भार
रोजच्या द्वंद्वात नित्य जीत हार…

मनाच्या महाली मनाचीच सभा
नितिसवे पहाऱ्या विवेकही उभा…

मनाची प्रज्ञा मनाचेच खूळ
मायेच्या साऱ्या हेच एक मूळ…

मनाच्या आभाळात मनाचीच झेप
अनादी अनंतात उगाच एक खेप…

मनाच्या समाधाना मनाची कविता
कधी मेघदूत कधी भगवद्गीता…!


पावसाचे गाणे

पावसाच्या सरी
पावसाचे गाणे…
भुई-नभाचे जणू
माय-लेकाचे नाते I

पाऊस चिंब ओला
पाऊस थेंब-थेंबी…
सृष्टी ओली-हिरवी
पावसाचे गीत गाते I

पाऊस ग गारुडी
पाऊस धुंद-फुंद…
तन-मन निथळता
वय लया जाते…!


गझल

क्षण गोठून रहाता दिवस निघून गेले
दु:खाची भरली पिंपे, सुख रिचून गेले  IIधृ II

सांगेन म्हणे मी कथा माझ्या व्यथांची
पण ओठांवरती का शब्द थिजून गेले  II१ II

मी विणतो रोज ठिगळे ज्या गोधडीची
उसवल्या धाग्यांचे ते वस्त्र विरून गेले  II२ II

मलाच ना उमगली का रीत जगण्याची
त्यांच्या पटावर फासे अन फिरून गेले  II३ II

मरणाची माझ्या पसरली ती अफवाच होती
तरीही जे माझे होते, डोळे भिजून गेले  II४ II

भेटतो जो जो तिला तो परतून येत नाही
अशा मुक्तीच्या वाटेवर जगणे शिणून गेले  II५ II

सुखाचीच होती बाधा जणू जीवाला
दु:ख आपले होते, रंध्री भिनून गेले  II६ II

बुध्दी-विवेकाचे हरघडी द्वंद्व विचाराशी
मन ओढाळ होते म्हणूनी रिझून गेले  II७ II

रविवार, २१ जून, २०१५

तो... मी!

प्रिय बंडूकाका अर्थात गोपाळ बापू पुराणिक, जळगाव यांना  
एकसष्ठीच्या शुभेच्छा अन ही छोटीशी अक्षर-भेट…! 


दुनिया पुढे पुढे जाता तो गीत आळवीत होता
ठिगळांची त्याची जीर्ण गोधडी वाळवीत होता…

तो एकटाच आत उभा निर्गुण बापुडवाणा
अन तांडा बडव्यांचा त्यासं खिजवीत होता… 

मी धुंडाळीत होतो शकले भंगल्या स्वप्नांची
तेंव्हा चंद्र चांदण्यांना हलके निजवित होता… 

मला तमा नव्हती कधीच क्षुद्र लौकिकांची
काळ निरव पावलांनी मज भिववित होता… 

जाहलो सज्ज मी अन जेव्हा कधी लढाया
कुणी योद्धा म्हणूनी उगाच मिरवीत होता… 

नशेने हार मानता इथे जहर का प्यावे आता
धुंद डोळा मिटतांना पापणी भिजवीत होता… 

नात्यांच्या गुंत्यात जणू श्वास घुसमटलेला
गंध ओळखीचा पण मज निववीत होता… 

शिकल्या साऱ्या बुकांची सजली चिता तरीही
लेखी त्यांच्या मात्र तो धुळाक्षरे गिरवीत होता…

दुनिया पुढे पुढे जाता तो गीत आळवीत होता
ठिगळांची त्याची जीर्ण गोधडी वाळवीत होता...!

रविवार, ७ जून, २०१५

ध्यास...!


दांभिक सज्जनांच्या
नशिबी हा भोग नाही…
एकदाच भोगून संपेल
अन असा हा रोग नाही…!

शुक्रवार, ५ जून, २०१५

सोयरी...!


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षी सुस्वरे आळविती || ध्रु ||

येणे सूखे रुचे एकांताचा वास
नहीं गुणदोष अंगा येत || १ ||

आकाश मंडप पृथ्वी आसन
रमे तेथे मन क्रीडा करी || २ ||

कथा कमण्डलु परवडी विस्तार
करोनी प्रकार सेवु रूचि || ३ ||

हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥

तुका म्हणे होय मनासी संवाद
अपुलाची वाद आपणासी || ४ ||