रविवार, ४ जुलै, २०२१
कौशल्य...!
शनिवार, २६ जून, २०२१
गोधडी...!
प्रिय दिना,
चपळपण मनाचें मोडितां मोडवेना ।
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा ।
म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥
ज्याला हे समजते, उमजते आणखीन साधते तोचि एक समर्थ बाकी सगळेच असमर्थ! जगात असे काय आहे ज्याला समर्थ-स्पर्श झालेला नाही…?तरीदेखील आपल्या अल्पबुद्धीनुसार या अनंत अनाकलनीय पसाऱ्याचा अर्थ लावतांना कधी कधी विपर्यास होणार तर कधी बुद्धिभेद… हेतू प्रामाणिक आहे आणि प्रयत्नात खोट नाही तोवर सारेच क्षम्य आणि स्वीकारणीय देखील… तेव्हा अप्रिय निसर्गक्रमाची फार विषादात्मक उजळणी नको आणि तपशिलांची अतिचिकित्साही. न पेक्षा चिंतन आणि प्रकटनाचे अधिष्ठान इतरत्र हलवावे आणि चपळ मनास अन्य विषयी गुंतवावे…
सध्या एका प्रदर्शनानिमित्त सौ. स्वाती, आदित्य आणि काकूंसह पुण्यास वास्तव्यास आहे आणि त्यांचा मुक्काम १८ पर्यंत असेल असे 'विश्वसनीय' सूत्रांकडून समजते. कुमार काका स्वत:हून अशा सुवर्ण संधीचा लाभ घेतील व ती साजरी करण्यास मित्रांना आमंत्रित करतील अशी अपेक्षा करणे म्हणजे 'मी शाकाहारी आहे म्हणून सिंह मला खाणार नाही' अशा आत्यंतिक भाबडेपणाच्या कल्पनारंजनासारखे ठरावे. तेव्हा आपल्या अति महत्वाकांक्षी सवंगड्यांकडून अधिक अपेक्षा न करता आपण स्वत:हून नासिक वारी करावी काय असा विचार होतोय… आपली काय भूमिका…?
बदलेल्या विषयाच्या उत्तरार्थ 'वेगळ्या' प्रतिसादाच्या अपेक्षेत…
मनीष
उपरोक्त
पत्राच्या मायन्यातील दिना म्हणजे आमचा जीवलग, प्राणसखा, परममित्र दिनेश मनोहर चंद्रात्रे
जो आज पन्नाशीचा होतोय! (त्याच्या नावाआधी लावलेल्या प्रत्येक विशेषणाला एक वेगळा,
सघन आणि हृद्य संदर्भ आहे, त्यांचे प्रयोजन साहित्यिक सौंदर्यापेक्षा आत्मिक
अनुभूतीशी जवळीक सांगणारे असल्याने साऱ्यांनाच त्यांची स्पंदने जाणवतीलच असे नाही
आणि म्हणूनच तशी अपेक्षाही नाही!) आमच्या जवळपास चाळीस वर्षांच्या मैत्रीच्या
सप्तरंगी गोधडीत सगळ्यात ठसठशीत रंग असेल तर तो निरंतर (अक्षरश:!) संवादाचा आणि
साऱ्या तुकड्यांना घट्ट धरून ठेवणारा धागा असेल तर तो निर्हेतुक (तंतोतंत!)
स्नेहाचा... बंधुसखा कुमार, दिना आणि मी हे त्रिकूट शालेय जीवनापासून एकत्र होते
आणि आज कुमार आणि मी आपापल्या प्राक्तनाने (की कर्माने?) धुळ्याच्या विरहात इतरत्र
स्थायिक असतांनाही दिना, त्याच्या धारणांवर असतो तसाच, धुळ्यात ठाम आहे! मी
नव्वदच्या सुमारास पुण्यास आल्यापासून आमचा पत्रसंवाद सुरु झाला आणि आज गेली तीन
दशके तो शेकडो पत्रांच्या माध्यमातून निरंतर सुरु आहे आणि... राहील! वरील पत्र हे
त्याच मर्मबंधातल्या ठेवीतील एक मोरपीस...
कुमारला
जन्मत:च कलेची अलौकिक दैवी देणगी लाभल्याने त्याला अविष्कारांसाठी साधनांची कधीच
कमतरता नव्हती... नाही, आम्हां दोघांचे तसे नव्हते. शाळेत निबंध लिहिण्याची आवड
आणि वक्तृत्व, रंगमंचीय अविष्कार यातील गोडी यामुळे माझी हाती लेखणी आली आणि मी अखंड
बोलू आणि मनसोक्त लिहू लागलो. दिनाने यथावकाश या दोन्ही माध्यमात मुशाफिरी केली
आणि त्याच्या काही स्केचेस आणि विशिष्ट कवितांनी कुमारला आणि मलाही भुरळ घातली.
दिनाच्या अत्यंत संवेदनशील मनाची तेवढीच आर्त ही एक अभिव्यक्ती बघा...
दोन शब्द बोलण्यास येथे त्यांना उसंत नाही
माझी ही कहाणी कुणास ही पसंत नाही
सुई धाग्याने विणू म्हटले नात्यांचे वस्त्र
टोचून घेण्यास माझ्या, जरा ही अंत नाही
पानगळ, झळांची मला झाली पुरती सवय;
ऋतुचक्रात माझ्या आता उरला वसंत नाही
परिघाकडून केंद्राकडे प्रवास हा अटळ
सहनशील क्षितिज माझे अनंत नाही
कर्म-भोग घेऊन शिरी, जरी चालतो एकला;
क्रुसावर हासणारा, मी मुळीच संत नाही!
या बरोबरच दिनाने मला लिहिलेली असंख्य पत्रे हा मराठी भाषा समृद्ध करणारा वस्तुपाठ ठरावा. कविता आणि पत्रे याबरोबर दिनाने काही ललित लिहिण्याचा प्रयत्न केला आणि तो समृद्धी अर्थात ‘समू’साठी असल्याने जेवढा भावविभोर तितकाच उत्कट आणि संवादी झाला नसता तरच नवल...
लयाची खंत नको
मागे
उत्पत्ती उभी
सूर्य
अस्तास जाता
नवी
चंद्रकोर नभी...!
ओहोटी
अन पानगळ
ऋतुचक्र
अक्षत राहे
भरतीचा
वसंत येता
चैतन्य
भरून वाहे...!
काही
लयास जाते तसे
उगवते
रोज नवे काही
शून्यातून
उमलते
शून्यातले
अर्थवाही...!
दिना, आज
सकाळच्या संदेशात म्हटले तसे...
“पन्नासाव्या
वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि
नाबाद
शतकासाठी मन:पूर्वक शुभेच्छा...!”
नेहमीप्रमाणे... अजून बरेच बोलायचे, लिहायचे, सांगायचे, ऐकायचे आहे...
पुन्हा कधीतरी...
रविवार, ६ जून, २०२१
म्होरक्या...!
शरद ऋतूचा काळ होता. आदिवासी आपल्या म्होरक्याकडे गेले. ‘या वेळी हेमंत आणि शिशिरात थंडी कशी पडेल – कडक, सौम्य की नेहमीसारखीच’, विचारायला. म्होरक्या मूळचा आदिवासीच असला तरी आधुनिकतेची झळ बसल्याने, निसर्गाशी नाळ अगदीच तुटली नसली तरी पूर्वीसारखी घट्टही राहिली नव्हती. त्यामुळे आकाशाकडे बघून, मातीला नाक, कान लावून आणि वाऱ्याच्या स्पर्शातून पूर्वी जसे वातावरणाचा अंदाज बांधता येई तसा अलीकडे येईनासा झाला असल्याने म्होरक्याला स्वत:चीच खात्री वाटेनाशी झाली होती !
परंतु तो म्होरक्या असल्याने लोक त्याच्याकडे आशेने बघताय म्हणतांना त्याला भाकीत वर्तवणे क्रमप्राप्तच होते. तेव्हा त्याने, हुशारी आणि सतर्कता या आपल्या नेतृत्वगुणांच्या आधारे, लोकांना सांगितले, ‘या वर्षी थंडीचा कडाका चांगलाच असणार आहे तेव्हा तुम्ही सारे आतापासून लाकडे गोळा करून ठेवाल तर बरे !’
आपल्या लोकांना असे सांगितले तर खरे पण आपणही खात्री करून घ्यावी म्हणून म्होरक्याने जवळच्या गावातल्या पोस्टात जाऊन वेधशाळेला दूरध्वनी केला आणि ‘या वर्षी हिवाळा कसा असणार आहे ?’, विचारले. वेधशाळेने सांगितले, ‘या वर्षी हिवाळा कडक असणार असे दिसतंय !’
म्होरक्या आपल्या लोकात परतला आणि त्यांना आणखीन लाकडं गोळा करण्याच्या सूचना दिल्या.
एका आठवड्याने म्होरक्या पुन्हा पोस्टात गेला आणि वेधशाळेशी संपर्क करून म्हणाला, ‘यावेळी कडाक्याची थंडी पडणार आहे असेच आपली यंत्रणा सांगतेय ना ?’ वेधशाळा म्हणाली, ‘अलबत ! या वर्षीचा हिवाळा मोठा कठीण असणार आहे !’
म्होरक्या पाड्यावर परतला आणि आपल्या माणसांना म्हणाला, ‘मित्रांनो, अगदी बारकाईने शोध घ्या आणि लाकडाचा एक एक तुकडा, झाडाचे खोड, ढलपी, फांदी, काडी-कचरा, जे मिळेल ते जमवून ठेवा !'
सुमारे दोन आठवड्यांनी म्होरक्या पुन्हा पोस्टात गेला आणि वेधशाळेशी संपर्क करून म्हणाला, ‘तुम्हाला नक्की खात्री आहे ना की यावर्षी फारच कडाक्याची थंडी पडणार आहे ?’ वेधशाळा म्हणाली, ‘आता तर प्रश्नच उरला नाही, या वर्षी कदाचित शतकातली सर्वाधिक गोठवणारी थंडी पडणार असे दिसतेय !’
‘तुम्हाला एवढी खात्री कशामुळे वाटतेय...?’ म्होरक्याने विचारले.
वेधशाळा म्हणाली, ‘आदिवासी वेड्यासारखे लाकडं गोळा करताहेत...!’
पोस्ट पूर्णपणे अराजकीय असून केवळ कार्यकारणभाव समजून घेण्याचा वस्तुपाठ म्हणून सांगितली आहे. फारतर कालच्या विश्व पर्यावरण दिवसाचा ‘उपसंहार’ (आजच्या प्रच्छन्न चंगळवादी काळात किती समर्पक !) समजायला हरकत नाही.
तथापि या निमित्ताने तीन गोष्टींचा उहापोह करायला हरकत नसावी -
- समूहांच्या नियोजनातील माणसाची अक्षम्य धोरणशून्यता आणि कमालीचे परस्परावलंबित्व.
- नैसर्गिक परिसंस्थेचा अतिसामान्य (खरतर नगण्य!) घटक असूनही तीवर स्वामित्व गाजविण्याची माणसाची राक्षसी लालसा.
रविवार, ३० मे, २०२१
गॉसिप...!
रविवार, २३ मे, २०२१
या चिमण्यांनो...
'बर झालं गरुडदादा तू भेटलास. अरे, एक भलामोठा काळा पक्षी केव्हापासून माझ्या मागे लागलाय आणि, 'हे कसे शक्य आहे, हे कसे शक्य आहे...' असे म्हणून मला घाबरवतोय...'
'काळजी करु नकोस, मी तुला लांब त्या उंच डोंगरकपारीत नेऊन ठेवतो. तू तिथे विश्रांती घे, तोपर्यंत तो पक्षीही तू सापडत नाहीस म्हणून कंटाळून निघून जाईल. मग तू सावकाश खाली उतर आणि जा आपल्या घरट्यात परत. चल, बस माझ्या पाठीवर, मी आत्ता पोहोचवतो तुला उंच डोंगरात...'
'पक्षीराज, मी स्वतःच्या इच्छेने काही करत नसतो, मी फक्त आज्ञापालन करतो!' काळा पक्षी उत्तरला.
'म्हणजे ? मी समजलो नाही !' गरुडाने विस्मयाने विचारले.
'अहो, पक्षीराज मी काळदूत आहे, माझा मालक काळ जेव्हा सांगेल तेव्हा, जिथे सांगेल तिथे आणि ज्यांचे सांगेल त्यांचे प्राण हरण करणे हेच माझे काम !'
अजूनही निटसा उलगडा न झालेला गरुडाने विचारले, 'पण मग त्यासाठी चिऊताईला घाबरवायची काय गरज...?'
शनिवार, २२ मे, २०२१
वि-भक्त...!
![]() |
| https://ibpf.org/seclusion-being-on-the-other-side-of-the-door/ |
आता मी माझा नाही
पण म्हणून तुमचा आहे असेही नाही
दिंडीत नाचलो म्हणून वारकरी झालो नाही
पिंडीत साचलो म्हणून धारकरी झालो नाही
याच्या विनोदाला हसतो म्हणून उजवा होत नाही
त्याच्या मांडणीला फसतो म्हणून डावाही होत नाही
माझ्या असण्याचे वाटप लशीइतके स्वस्त नाही आणि
माझे नसणे पोकळी निर्माण करण्याएवढे ध्वस्त नाही
मला गृहीत धरून चालणे ही असू शकेल त्यांची भूक
किंवा निर्णयाच्या क्षणी अवसानघात करेल अशी चूक...?
कळपांना वळण लावून थेट करता येते सरळ
बुद्धिभेद करून ओकायला लावता येते गरळ
सारेच प्राणी-मात्र आज्ञा मानतीलच असे नाही
काही मूर्खांना वाटते असावे आपले मत काही
तुमच्यात बसतो-हसतो म्हणून माझा कणा मोडत नाही
गारूड्याचे दुध प्यायला म्हणून नाग फणा सोडत नाही
रचणाऱ्यांना जेव्हा जडेल अपौरुषाची व्याधी
उतावळा अभिमन्यूच भेदेल चक्रव्यूह कधी
हल्ली माझ्यात मी नसेनही
पण म्हणून मी तुमच्यातलाही होत नाही...!
रविवार, १६ मे, २०२१
अग अग लशी...
शनिवार, ८ मे, २०२१
शीर्षकगीत...!
भारताचा ५००० वर्षांचा इतिहास एका ग्रंथात सामाविणे
हीच मुळात थोर कामगिरी. हे शिवधनुष्य पेलले पंडित जवाहरलाल नेहरू या स्वतंत्र भारताच्या
पहिल्या पंतप्रधानांनी –
‘डिस्कव्हरी
ऑफ इंडिया’
अशा अत्यंत सूचक
व समर्पक ग्रंथाच्या रूपाने! कुठल्याही परंपरेचा बडेजाव किंवा सांस्कृतिक अभिनिवेषाशिवाय
भारताचा भूतकाळ अत्यंत साक्षेपी पद्धतीने मांडण्याच्या आणि तो भारताच्या आजबरोबरच उद्याशीही
जोडून देण्याच्या त्यांच्या या द्रष्टया प्रयत्नाला सोन्याचे कोंदण दिले ते श्याम बेनेगल
या अत्यंत प्रतिभावंत, मर्मग्राही आणि विचक्षण दिग्दर्शकाने! आणि, आम्हाला आमच्या संस्कारक्षम
वयात अतिशय प्रगल्भ अशा संस्कारांनी मूल्यशिक्षणाची जी पर्वणी लाभली तिच्यात एक अमूल्य
भर पडली –
‘भारत एक
खोज!’ उण्यापुऱ्या ५२ भागांच्या
या मालिकेने आमचे शालेय जीवन तर
समृद्ध केलेच पण आम्हाला आपल्या स्वत:च्या संपृक्त इतिहासाची जाणीव करून देवून आमचे
जगण्याचे भान विस्तारले, आम्हाला शोध घेण्याची, स्वतंत्र, वेगळा विचार करण्याची सवयही लावली
आणि गोडीही!
मुळातच संहितेपासून सादरीकरणापर्यंत
अगदीच विलक्षण असलेल्या (आपादमस्तक निळ्या रंगात रंगविलेला कृष्ण – सलीम घोस, नसीरउद्दीन
शाह यांनी साकारलेले शिवाजी महाराज आणि ओम पुरींनी जीवंत केलेला औरंगजेब, हे आजच्या
भारतीय सामाजिक अवकाशाच्या संदर्भात निषेधार्य ठरणारच नाही असे नाही!) या प्रयोगातून
आमची साहित्यिक-सांस्कृतिक वाढ तर झालीच पण त्यानिमित्ताने आम्हाला दृकश्राव्य माध्यमाची
एक वेगळीच जाण विकसित व्हायला मदत झाली. अत्यंत मर्यादित साधन-सुविधांच्या आधारे, एका
अभ्यासपूर्ण संहितेची विवेकी हाताळणी करून काहीतरी अभिजात घडवता येते याचा वस्तुपाठ
आम्हाला ज्या अनेक उपक्रमातून मिळाला त्यात ‘भारत एक खोज’चे नाव नेहमीच अग्रभागी राहील.
आणि हे नमनाला घडाभर तेल ज्यासाठी घातले ते ‘भारत एक खोज’चे शीर्षक गीत अर्थात टायटल
सॉन्ग...
एवढ्या सशक्त रचनेला, तत्कालीन भारतीय
मनाला पटेल, पचेल आणि रुचेल असे नाट्यरूपांतरण करणे हेच अत्यंत अद्भुत, उल्लेखनीय आणि
वंदनीय कार्य, त्याला चार चाँद लागले ते त्याच्या शीर्षक गीताने. ब्रह्मांडच्या निर्मितीचा
ऊहापोह करणाऱ्या, ऋग्वेदातील नासदीय सूक्ताच्या एका ऋचेची यासाठी योजना करण्याची कल्पना
ज्याला सुचली त्या निर्मात्याच्या संवेदनशील प्रज्ञेची केवळ कल्पनाच करता येईल आणि
तिला शतश: नमन करता येईल! सृष्टीचा कर्ता कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारी ही
ऋचा खऱ्या अर्थाने आदिम – आद्या, आत्मरूपा, स्वसंवेद्या आणि वेदप्रतिपाद्या ठरावी.
शब्दांनीच गारुड करावे अशी ही रचना पण तिची मोहिनी अधिकच गर्द गहीरी केली ती तिला लाभलेल्या
अक्षरश: स्वर्गीय स्वरसाजाने! ही किमया साधली ती अलौकिक प्रतिभेचा धनी असलेल्या अवलिया
संगीतकार वनराज भाटीया यांनी... काल वयाच्या
९३ व्या वर्षी या किमायागाराने या जगाचा निरोप घेतला आणि त्या निमित्ताने, लहानपणी
एका वर्षात ५२ वेळा ऐकलेला आणि संगणकावर हवे ते बघण्याची, ऐकण्याची युक्ती सापडल्यावर
आम्ही प्रभातगीतांची जी सूची बनवली त्यात मानाचे स्थान मिळवल्याने, गेली सुमारे १२-१५
वर्षे जवळपास रोज सकाळी कानावर पडणाऱ्या या फिलॉसॉफिकल लीरिक्स आणि फिनॉमिनल मेलडीनीने
आठवणींचा आणि ‘मना’चाही तळ ढवळून काढला...
जे आमच्या भावनांशी तादात्म्य पावू
शकतील त्यांच्यासाठी निखळ आनंदाचा पुन:प्रत्यय म्हणून आणि ज्यांना अद्याप या विषयाची
ओळखही नाही त्यांच्यासाठी एका अमूल्य खजिन्याची चावी म्हणून, भारत एक खोज चे संपूर्ण शीर्षक
गीत इथे देत आहे... त्याचा शब्द अन् शब्द आणि स्वर अन् स्वर रंध्री भरून घेणे हीच त्या
अगाध प्रतिभेच्या संगीतकाराला स्वरांजली...
सृष्टी से पहले सत् नहीं था
असत् भी नहीं
अन्तरिक्ष भी नहीं
आकाश भी नहीं था
छिपा था क्या?
कहाँ? किसने
ढका था?
उस पल तो अगम अतल जल भी कहाँ था?
रविवार, २ मे, २०२१
कानूस...?
साक्षर म्हणजे सुशिक्षित नव्हे. सुशिक्षित म्हणजे सज्ञान असे नाही. सज्ञान व्यक्ती सुसंस्कृत असेलच असे नाही आणि सुसंस्कृत म्हणजे सूज्ञ नव्हे. सूज्ञ असूनही संवेदनशील असणे जसे वेगळे तसेच संवेदनशील असून सजग असणे महत्वाचे. शिवाय केवळ सजग असणे पुरेसे नाही तर सक्रीय असणे अधिक श्रेयस्कर!
तद्वतच निरक्षर म्हणजे अडाणी नव्हे आणि अशिक्षित म्हणजे अनभिज्ञ किंवा अविवेकी नव्हे. याच कारणाने ‘सखाराम बाईंडर’ मधली चंद्राची भूमिका, ती साकारणाऱ्या लालन सारंग यांना समजावून सांगतांना तेंडूलकर म्हणाले, ‘पुस्तकी ज्ञान नसेल पण चंद्राची जगण्याची जाण आणि भान मोठे आहे...!’
आमच्या खान्देशी बहिणाबाई निरक्षर आणि अशिक्षित जरूर होत्या पण त्यांचे जगण्याचे भान असीम तर होतेच पण त्यांची ‘माणसा’ची जाण किती अलौकिक आणि कालातीत होती हे, आजच्या दाहक वास्तवावर परखड भाष्य करणाऱ्या, त्यांनी १०० वर्षांपूर्वी केलेल्या तंतोतंत कवितांवरून निर्विवाद सिद्ध होते.
‘टिळक गेल्यानंतर, ज्याला समोरून येतांना बघून हातातली विडी टाकून द्यावी असा माणूस पुण्यात उरला नाही...’ अशी ‘खंत’ व्यक्त करणारे एकमेवाद्वितीय आचार्य अत्रे, बहिणाबाईंची प्रतिभा बघून, ‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे हे बावनकशी सोने आहे...!’ असे म्हणतात यावरून बहिणाबाईंच्या रचनांचा दर्जा लक्षात यावा.
बहिणाबाई ‘निरक्षर’ असल्याने त्यांनी स्वत: यातले काहीही लिहून काढले नाही, त्या सुचेल तसे गात गेल्या आणि ऐकणाऱ्यांनी जमेल तसे उतरवून घेतले त्यामुळे बहिणाबाईंची कविता जशी ‘आधी कळस मग पाया...’च्या धर्तीवर ‘आधी गीत मग कविता’ असा अध्यात्मिक (उलटा?) प्रवास करते तसेच तुकोबांची गाथा जशी लोकगंगेने तारली (इति: पुलं) तशीच केवळ त्यांच्या तोंडून निघणारा शब्द उतरवून पुढल्या पिढ्यांवर उपकार करणाऱ्यांचे ऋणही मानायलाच हवे !
आणखी एक - खान्देशी ‘अशिक्षित’ असल्याने बहिणाबाई आपल्या मायबोली अर्थात ‘माझी माय सरसोती’च्या भाषेत म्हणजे आमच्या अहिराणीत गात असल्याने, मराठीचाच एक अवतार असला तरी, यातील काही शब्द समजणार नाहीत, पण भाव जाणून घेतला तर अर्थ लागायला हरकत नसावी. शिवाय, कानाला अतिशय गोड वाटणाऱ्या आमच्या अहिराणीचा, त्यानिमित्त अभ्यास केलात तर मराठी भाषा मुळातच किती समृद्ध आहे आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या विनंत्या करण्यापेक्षा तिचा स्वाभिमानी बाज समजावून घेऊन व्यवहारात वापर वाढवला तर ही जनसामान्यांची आणि छत्रपतींची भाषा कधीही कुणाची मिंधी होणार नाही... असो! तो एक वेगळाच विषय आहे...
साऱ्याच सर्वसामान्य व्यक्तींनीही माणूस म्हणून सूज्ञ, सुसंस्कृत, संवेदनशील आणि सक्रीय असण्याची अपेक्षा असेल तर समाजधुरीण, धोरणकर्ते आणि उच्चपदस्थ यांच्याकडून ही अपेक्षा शतपटीने वाढल्यास नवल नाही. सर्वच आलबेल असतांना आणि परिस्थिती अनुकूल असतांना धोरणीपणाचा, नेतृत्वाचा कस लागेलच असे नाही पण आणीबाणीच्या प्रसंगी शीर्षस्थ व्यक्ती किती सर्वसमावेशक विचार करू शकते आणि आपल्या धोरण-निर्णयांचा साधक-बाधक विचार करतांना किती संवेदनशीलता दाखवते यावरून नेतृत्वगुणांचा कस तर लागतोच पण या निमित्ताने त्या माणसाच्या व्यक्तित्वाचा पोत आणि दर्जा जसा दिसून येतो तसे ‘जगण्या’ची जाण आणि भानही समजते.
आजच्या अत्यंत बिकट परिस्थितीत, जगण्यासाठी धडपडणाऱ्या अगतिक बहुसंख्यांची विवंचना एकीकडे आणि अशाही परिस्थितीत, मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या आपमतलबी अविवेकी संधिसाधूंची वखवख दुसरीकडे, अशा विदारक परिस्थितीत बहिणाबाईंच्या या दोन रचना कसा प्रकाश टाकतात बघा. बहिणाबाईंनी कुठल्याही रचनेचं बारसं केलं असण्याची शक्यता नसल्याने, त्यांची ही दोन ‘गाणी’ त्यांच्याच शब्दात...
१









