मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

(अ)विराम(चिन्हे)


खर तर बोलायचे नव्हतेच काही
पण सांगण्याची तुला इतकी घाई

काय दाखवायचे होते नवीन असे
माझ्या स्वप्नांच्या वाटेवर तुझे ठसे

जगलो होतोच कधी लौकिकासाठी
जमविले उन्मनी क्षणच तेवढे गाठी

गेलेल्या क्षणांची कोण ठेवतो याद
जगल्या सुखांचीही नको मोजदाद

भविष्याच्या भुताला कधी ना भ्यालो
प्याला त्या क्षणाचाच हरघडी प्यालो

जगावे असे की मृत्यूला भ्रम पडावा
मरावे असे की सृष्टीस विरह घडावा

रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

भगवानके घर...?


बुद्धिबळाच्या खेळात प्यादी मरण्यासाठी असतात आणि हत्ती-घोडे-उंट लढण्यासाठी मात्र वजीर राजाला वाचविण्यासाठी असतो कारण राजा स्थानबद्ध असला तरी पटावरचा सर्वोच्च पदाधिकारी असतो. वजीराचे काम बहुआयामी असल्याने त्याची प्रतिभाही बहुमुखी असते आणि धूर्तपणा, मुत्सद्देगिरी आणि चलाखी हे त्याचे स्थायीभाव असणे क्रमप्राप्तच असते. एवंगुणविशिष्ट व्यक्तित्व हे विचारी आणि विखारी असणे नीतीला धरूनच असल्याने ते जसे रणनीती आखून शत्रूचा पाडाव महालात बसून करू शकते तसेच प्रसंगी राजसत्ता देखील पलटवू शकते हे ध्यानात ठेवणे उचित. बुद्धिबळात जिंकण्यासाठी वजीराला नामोहरम करून राजाला चेकमेट करावे लागते, हत्ती मारूनही फारसे काही हाती लागत नाही तिथे एकदोन प्याद्यांची काय पत्रास? एक चाल पुढे सरकल्याने, अभेद्य वाटणाऱ्या शत्रूच्या भिंतीला त्यानिमित्ताने भगदाड तर पडले एवढ्या माफक यशाचे सीमित समाधान मानणे अवाजवी नसले तरी ‘दिल्ली अभी बहुत दूर है...!’ याचे सतत भान बाळगणे जास्त आवश्यक आहे...


डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या (गुन्हा अजून सिद्ध व्हायचा असल्याने – संशयीत) मारेकऱ्यांना अटक हे वृत्त वाचले आणि डॉक्टरांच्या हत्येच्या केसचा तपास कासवगतीने का होईना सुरु आहे आणि पाच वर्षांनी का असेना मारेकरी सापडले याचे समाधान असले तरी प्याद्यांनीच पाच वर्षे खिंड लढवली असेल तर वजीर कधी हाती लागणार ही बाब चिंतनीय खरीच! अर्थात राज्यघटनेच्या चौकटीत राहून संपूर्णत: संवैधानिक मार्गाने न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा आणि त्यातील दिरंगाईचा शांततापूर्वक निषेध करण्याचा मुलभूत हक्क घटनेनेच दिला असल्याने अंधश्रद्धेचे भूत उतरविण्यासाठी प्रयत्नशील राहण्यास ना कुठल्या मांत्रिकाची गरज आहे ना मंत्र-तंत्राची, स्वतंत्र भारताचा स्वयं-प्रज्ञ नागरिक असणे आणि आपल्या सामाजिक कर्तव्यांसह मुलभूत हक्कांचीही जाणीव असणे पुरेसे आहे.     

डॉक्टरांच्या हत्येला २ वर्षे पूर्ण होऊनही तपासात काहीच प्रगती नव्हती तेव्हा मी माझ्या इंग्रजी ब्लॉगवर लिहिलेली पोस्ट इथे वाचू शकता - Justice.

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

श्रद्धांजली...!



दिखाव्याच्या झगमगाटात
अंगणातील पणती निजली I

निर्वैर विरोधाच्या स्मृतीत
देवघरातील समई विझली I

लोकशाहीस श्रद्धांजली देत
पापणीही हलकेच भिजली I

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

कागदी गाई आणि मोठी परीक्षा


एकदम लहानपणच आठवलं...
जून महिना, नवी ईयत्ता,
नवी पुस्तकं, त्यांचा तो नवाकोरा वास...
पहिल्या पावसातल्या मृद्-गंधाइतकाच विशिष्ट

आणि पिढीजात संस्कारी आप्तवाक्य...
पुस्तक म्हणजे विद्या, सरस्वती.
तरळलं डोळ्यापुढे सरस्वती – विद्याचिन्ह...
फुलल्या, नृत्यमान मोरपिसासाऱ्यासारखं.

आणि आता, एकदम स्वप्नातून पुन्हा वास्तवात...
परीक्षा हॉलमध्ये आवाज येताहेत.
असह्य..., टराटरा पानं फाडल्याचे...
जणू गाईचं आर्त हंबरणं,
अगदी शेवटचं... सरस्वतीच्या दरबारात
की विद्यारणमैदानात?

आणि जरा पहा इकडे...
हॉलच्या खिडकीखाली, पॅसेजमध्ये,
आणि मुतारीमध्ये सुद्धा...
कत्तलखान्यात रक्तमांसाचा चिखल व्हावा,
तशी पडलीत कागदी ज्ञानाची पानं, इतस्तत:
एकतर नागमोडी, लंगडी घालत, जपत,
किंवा बेदरकारपणे चिरडत चालावं लागणार!

काय गंमत आहे ना, बघा...
पवित्र कागदी गाईंना कोणीच नाहीयेत...!
ना सेवक, ना रक्षक, ना पूजक, ना भक्त.
ज्ञानपोलीस सामील मारेकऱ्यांना?
हतबल?... की पगारतृप्त?

तसं साऱ्यांना सारं ठाऊकच असतं आजकाल.
सारे होतात आंधळे – बहिरे – मुके
सारेच रहातात खुश.

पण हे व्यवहार्य चुलीत उदरभरणार्थ
बड्या घरचे पोकळ वासे घालणं आहे?
की चंगळवेदोक्त असुरी अर्थकामेष्टी यज्ञात
कागदी गाईंचा बळी दिला जातोय? 

हा प्रश्न कठीण, ही परीक्षा मोठी आहे!
-----------------------------------------
डॉ. सचिन चिंगरे, धुळे 
९४२१० ७६१४०
-----------------------------------------
आपल्या संपृक्त विश्लेषणात्मक अभिप्रायाने 'अभिजातता' विषयावरील चर्चेत घसघशीत भर घालणारे आमचे सन्मित्र डॉ. सचिन चिंगरे यांची ही आणखीन एक अभिजात रचना. माणसाने मोठे होतांना आपल्यातील मूल जपावे म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण असणारे डॉक्टरसाहेब, निरंतर कुठ्ल्या ना कुठल्या विषयाचा अभ्यास आणि परीक्षा यात व्यग्र असतातच, शिवाय 'शालेय' संवेदना केवळ जपतच नाही तर खुपलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या विशिष्ट शैलीत खरपूस समाचारही घेतात. ग्रेस, जी.ए., नेमाडे गुरुजी यांनी जशी आपली स्वत:ची असामान्य शैली घडवली आणि जाणीवपूर्वक जोपासली तद्वतच आमचे मित्र आधीच समृद्ध असलेल्या मराठी भाषेला आपल्या अलौकिक प्रतिभेने नवनवीन पैलू पाडतात. 

अन्यथा 'आप्तवाक्य', 'नृत्यमान', 'विद्यारणमैदान', 'ज्ञानपोलीस', 'पगारतृप्त', 'चंगळवेदोक्त' किंवा 'अर्थकामेष्टी' असल्या 'उत्क्रांत' विशेषणांचा 'समास' सोडविण्याची 'संधी' रसिकांना मिळती ना...!

अजूनही आपल्या संवेदना आणि विवेक जागी असणारी आणि आपल्या भावना अत्यंत समर्थ शब्दात व्यक्त करणारी माणसे भवती असणं हे नशीब आणि ते आपले सखे सवंगडी असणं यापरते 'पुरुषस्य भाग्यं' ते काय... नाही का?

रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

मैतर...!


आपण कुठे, कसे आणि कुणाच्या पोटी जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं.
जन्मामुळे आपल्याला अनेक संदर्भ चिकटतात... आणि काही नाती देखील!
यातली काही आपल्याला भावतात काही आपण निभावतो... पर्याय नसल्याने.
आपला जन्म आणि त्याबरोबर येणारे अटळ वास्तव नाही बदलू शकत आपण...

पण...
आपण कसे जगावे, कोण व्हावे, काय करावे, काय टाळावे हे नक्कीच ठरवू शकतो.
शाळा, कॉलेज पालकांनी निवडले तरी तिथे काय शिकायचे हा चॉईस असतोच.
पॅकेज कंपनीने ठरवले तरी ते स्वीकारण्या इतकाच नाकारण्याचा हक्क नसतो का?
सहचरणी ही भार्यालक्षणांमध्ये बसणारी हवी की ‘सखी’ ही निवड ‘करू’च शकतो.

मग...
आपण इथे का आहोत आणि जे करतोय ते कशासाठी हे प्रश्न उत्तरार्धातच पडावे?
जगणे एवढे गुंतागुंतीचे व्हावे की काय कमवतोय नी काय गमवतोय समजूच नये?
आपण समाधानी आहोत हे वास्तव आहे की आपणच आपली घातलेली समजूत?
बघता बघता निरोप घेण्याची वेळ येईल तेव्हा काहीच करायचे राहिलेले नसेल?

आणि...
आपली ‘शाश्वत’ मूल्ये, चिरंतन निष्ठा आणि प्राथमिकता एवढ्या कशा बदलल्या?
नात्यांचा ‘इव्हेंट’ करून साजरेपणाचे हे सोंग आणि ढोंग का लागते आपल्याला?
आयुष्याची इतिकर्तव्यता 'इएमआय' आणि त्याला पुरून उरणारे 'पॅकेज' एवढीच?
आणि मग तारुण्यात यंव करू अन त्यंव करू म्हणून मारलेल्या डिंग्या समाधिस्थ?

बघा...
आयुष्य मिळाले आहे विनासायास पण जगायचे आहे प्रयासाने, श्रेयस कमविण्यासाठी.
मनुष्य जन्म अति दुर्लभ: हे शास्त्र वचन खोटे ठरविण्यासाठी पशुतुल्य जगणे सार्थक आहे?
मी-माझे-मला या दुष्टचक्रात भिरभिरण्याने स्वत:च गर्तेत ओढणारा भोवरा तयार होतो.
ज्ञानेंद्रिये सजग आणि संवेदना जाग्या ठेवल्या म्हणजे स्वत:पलीकडचे जगही दिसू शकते.

तेव्हा...
जगण्याचे मोल कळण्यासाठी आणि करण्यासाठी जरा काचा खाली करून बाहेर बघू या...
पावसाच्या आणि तृषार्त जमिनीच्या प्रेमालापाने हिरवा शालू नेसून नटलेल्या रानवाटा...
मन उल्हसित करणारी चित्र, काव्य, गीत, संगीत किंवा कांदाभजी आणि कडक चहासुद्धा!
आणि या सगळ्याचा आनंद शतपटीने वाढविण्यासाठी आपण स्वेच्छेने निवडलेले मैतर...

अरे,
आज तो शिंचा ‘फ्रेंडशिप डे’ का काय म्हणतात तो आहे नाही का...? विसरलोच होतो की...
हे वरचे सगळे बिनकामाचे चऱ्हाट राहू दया, बघू म्हणे पुन्हा कधीतरी, नेहमीप्रमाणे...
ते ‘फ्रेंडशिप डे’चे मेसेज मात्र आठवणीने पाठवा हो... मला नको, ज्यांना ‘उमजतात’ त्यांना!
मी माणूस शोधणारा निरुप‘योगी’ माणूस, त्या शब्दबंबाळ हृदयस्पर्शी भावनांचे मला काय?

असो...
आपापल्या स्वीकारलेल्या आयुष्याच्या सोनेरी चौकटीत सुखी रहा आणि व्हॉटसप्प, फेसबुकवर दिसत रहा...
डिजिटल युगातील सुपरफास्ट लेनमध्ये स्क्रीनवर भेटण्याच्या काळात ‘फ्रेन्डशिप डे’च्या व्हर्च्यूअल  शुभेच्छा...!

रविवार, २९ जुलै, २०१८

हसऱ्या रेषा...!

गूढ-गंभीर विसंगती दर्शविणारा आशय असो कि चि. वी. जोशी, पु. ल. देशपांडे यांचा निर्मळ विनोद असो, त्याला आपल्या बोलक्या, हसऱ्या चित्रांनी एक निराळाच आयाम प्राप्त करून दिला तो शि. द. फडणीस या महाराष्ट्राच्या जागतिक कीर्ती मिळविणाऱ्या व्यंगचित्रकाराने! व्यंगचित्र हे टीकात्मक, कुणाला तरी दूषण देणारे अथवा कुठल्यातरी शारीरिक व्यंगावर व्यक्तिश: आक्रमण करणारे असते हा समज खोटा ठरवला तो शिदंच्या अत्यंत लोभस, निरागस, निर्विष अशा, सामान्य माणसांच्या आयुष्यातील सामान्य घटनांच्या एका मार्मिक पद्धतीने केलेल्या निरीक्षणाने!
मग कधी ते गाण्याचा रियाज करणारी आपली आई का रडतेय हे न उमजून तिला शांत करण्यासाठी आपली खेळणी देवू करणारे निरागस बालक असेल, कधी मालकीण झोपलीय त्यामुळे आपली उपासमार नको म्हणून स्वत:च दुधाचे भांडे दुधवाल्यापुढे धरणारी मनीमाऊ असेल, पाय लांब करण्यात निपुण असलेला एक भक्त देवदर्शनाचे वेळी आपल्या चपला एका पायाने सांभाळीत असेल तर दुसरा पोलीस शिपाई दोन्ही हात पिशव्यांमध्ये गुंतलेले असल्याने साहेब समोर दिसताच एका पायानेच सलाम ठोकत औचित्यभंग होणार नाही याची दक्षता घेत असलेला दिसेल. किंवा ‘बकरी पाला खाते’ या अत्यंत आदिम, साध्या सोप्या सामान्यज्ञानातून साधलेला तरीही, तत्वचिंतक जे हजार शब्दातून सांगू शकणार नाही असे एक विसंगतीपूर्ण जागतिक सत्य, केवळ एका छोट्याशा, कुठेही घडू शकणाऱ्या, वरवर विनोदी वाटणाऱ्या पण मूलत: तात्विक असणाऱ्या प्रसंगातून दृग्गोचर होते. 
आज शि. द. सरांचा ९३वा वाढदिवस म्हणजे सरांच्या शतकाला अवघ्या ७ धावा हव्या आहेत. अर्थात सरांची ही अवखळ अर्कचित्रे शतकोत्तरही पहायला मिळावी ही अपेक्षा आहेच. कारण एक वर्ष उलटतांना ज्यांची खरोखर वाढ होते आणि समाजाला आनंदी, समाधानी, सर्वसमावेशक आणि वर्धिष्णू राहण्यासाठी ज्यांच्या विवेकी अभिव्यक्तींची निरंतर गरज आहे अशा संस्कृती समृद्ध करणाऱ्या प्रतीभावंतांनाच...
‘जीवेम शरदः शतम्
बुध्येम शरदः शतम् ।। 

अर्थात 'आपल्याला शंभर वर्षे (तरी) निरामय आयुष्य लाभो आणि शंभर वर्षे बुद्धी शाबित राहो आणि ज्ञानार्जन सुरु राहो’ ही प्रार्थना शोभते आणि लाभते देखील; त्यासाठी कुठल्याही अनुयायाची, चेल्याची अथवा ‘शुभचिंतका’ने फ्लेक्स लावायची गरज नाही...!

सर, आम्हाला अजून खूप समज यायची आहे, खूप शिकायचे आहे आणि माणूस म्हणून उत्क्रांत होतांना सम्यक संवेदनशीलता वाढवणे फार गरजेचे आहे. तेव्हा आपल्या बोलक्या आणि हसऱ्या रेषा आम्हांला अजून खूप काळ लागणार आहेत... त्या आपण समाजमनावर उमटवत रहाव्या ही प्रार्थना आणि सदिच्छा...!

शुक्रवार, २७ जुलै, २०१८

लाखो इथले गुरू...

आज आषाढ पौर्णिमा. महर्षी व्यास - ज्यांना हिंदू धर्माचे आद्य गुरु मानले जाते आणि ज्यांनी ४ वेद, १८ पुराणे, महाभारत आणि भगवद्गीता रचली अशी मान्यता आहे अशा व्यासमहर्षींची पौर्णिमा - अर्थात गुरु पौर्णिमा!

अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् ।

तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥

श्री गुरु दत्ताने २४ गुरु केले हे आपण वाचले. मनुष्यही कशाकशापासून कायकाय शिकू शकतो हेही आपण बघितले. कला क्षेत्रातील विविध अविष्कार जसे कविता, गायन, नृत्य, अभिनय यांतील गुरु हे एका अर्थाने विश्वगुरुच असतात कारण हे अविष्कार जेवढे अभिजात तेवढेच सर्वंकष, सर्वव्यापी असतात. शब्दांमागील भाव आणि सुरांमधील मार्दव हे रंग-रूप, राहणीमान, भाषा, प्रांत, संस्कृती या सगळ्याच्या पलीकडे जाऊन केवळ मानवी भावविश्वाशी तादात्म्य पावणारे असते. म्हणूनच या द्वारे मानवी संस्कृतीस समृद्ध करणारे योगदान हे विश्वरूप ठरते.

मराठी ही मुळातच अत्यंत समृद्ध आणि अमृताशी पैजा जिंकणारी सुमधुर भाषा! साक्षात ज्ञानदेव माऊलींपासून आजच्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिभावंत नवकविंपर्यंत सर्व रचनाकारांनी मराठीच्या मुळच्या वैभवात भरच घातली. यापैकी एक गुरुतुल्य लेखक, कवि, गीतकार म्हणजे ग. दि. माडगुळकर. त्यांची रचना 'बिन भिंतींची उघडी शाळा' ही मुलांना हसत खेळत काही शिकविण्याबरोबरच शाळा कशी असावी आणि ज्ञानोपासक 'विद्यार्थी' कसे व्हावे याचा उत्तम धडा देते. गदिमांनी हे गीत रचले आणि त्याला स्वरसाज चढविला दुसऱ्या गुरुतुल्य गायक-संगीतकार बाबुजींनी!

'बाबूजी' अर्थात सुधीर फडके या स्वर्गीय प्रतिभेचे लेणे लाभलेल्या आणि एकापेक्षा एक सुमधुर आणि अविस्मरणीय गाणी मराठी भावजगतास देणाऱ्या स्वरांच्या बादशहाचे जन्मशताब्दीवर्ष दोनच दिवसांपूर्वी सुरु झाले. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांना ठिकठकाणी होणारी तुडुंब गर्दी ही जेवढी मराठी रसिकत्वाची साक्ष देते तेवढीच 'बाबूजी' या नावाचे गारुड इतक्या वर्षात तसूभरही कमी झालेले नाही, उलट वाढतेच आहे, हेही सिद्ध करते.

या दोन ऋषितुल्य शब्द-स्वर-गुरूंच्या स्पर्शाने समृद्ध झालेले हे निसर्गाचे ज्ञानगीत, गुरूपौर्णिमेनिमित्त...!


बिन भिंतीची शाळा... 

बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू
झाडे, वेली, पशु, पाखरे
यांशी गोष्टी करू...

बघू बंगला या मुंग्यांचा,
सूर ऐकुया या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवील
फिरते फुलपाखरू
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू...

सुगरण बांधी उलटा वाडा,
पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिन पायांचे
बेडकिचे लेकरू
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू...

कसा जोंधळा रानी रुजतो,
उंदीरमामा कोठे निजतो
खबदाडातील खजिना त्याचा
फस्त खाऊनी करू
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू...

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ,
कड्या दुपारी पऱ्ह्यात पोहू
मिळेल तेथून घेउन विद्या
अखंड साठा करु
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू...!

गुरुवार, २६ जुलै, २०१८

सजा...!

"किसी दुसरें शायरका कलाम सुनाईये.
एक शायरको इससे जादा खूबसूरत सजा क्या हो सकती हैं...!"
सलाम...!

सोमवार, २३ जुलै, २०१८

आमचाही 'कणा'...!


काल धुळ्याला आपल्या लाडक्या दाबके सरांचा सन्मान सोहळा अतिशय उत्साहात, आनंदात आणि कृतार्थ भावाने संपन्न झाला. बालवाडीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत 'शत प्रतिशत हजेरी'मध्ये गुण मिळविणारा मी या समारंभास हजर राहू शकलो नाही याची खंत आहे आणि विषादही! दाबके सरांचे विद्यार्थी अक्षरश: जगभर विखुरलेले असल्याने आणखीनही बऱ्याच जणांना काल हजेरी लावता आली नसेल. अशा सगळ्या, 'नाईलाजाने अनुपस्थित' विद्यार्थ्यांच्या अव्यक्त भावना अनुल्लेखित राहू नये म्हणून हे मनोगत...


"सर, आम्हाला या कौतुक सोहळ्याचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायला यायला जमले नसले तरी वारकऱ्याच्या हृदयात पांडुरंग जसा नित्य वास करतो तसे तुम्ही आमच्या ध्यानीमनी सदोदित असता. आमची शाळा आणि आपल्यासारख्या गुरुमाऊलींनी दिलेले बाळकडू यामुळेच आम्ही आजच्या गळेकापू स्पर्धेच्या विधिनिषेधशून्य जगात मूल्ये टिकवून आहोत. जगात आम्ही कुठेही असलो तरी आषाढीच्या मुहूर्तावर आम्हाला आमच्या पंढरीचे – धुळ्याचे – वेध लागलेले असतात. या वर्षी मुख्यमंत्र्यांप्रमाणे आम्हालाही पंढरीची वारी घडू शकली नसली तरी आम्ही देखील आमच्या देवघरात आमचा विठ्ठल पुजला आणि आहोत तेथून त्याला साष्टांग दंडवत घातला... तो पोचला म्हणून आशीर्वाद द्यावा आणि आम्ही कायमच आपले शिष्य होतो, आहोत व राहू म्हणून मार्गदर्शन करावे. आपल्याकडून आमच्यासारखे अजून अनेक विद्यार्थी (परीक्षार्थी नव्हे!) घडायचे आहेत म्हणून आपल्या निरामय शतकोत्तर आयुष्यासाठी पांडुरंग चरणी मन:पूर्वक प्रार्थना!


गुरु-शिष्याच्या अजोड, अनन्य आणि अलौकिक भावबंधावर कुसुमाग्रजांनी ‘कणा’ हा अजरामर काव्याविष्कार करून ठेवला आहे. आजच्या या हृदयस्पर्शी प्रसंगी कविश्रेष्ठांची क्षमा मागून आमचाही ‘कणा’...

विसरला नाहीत न सर आम्हाला येवू न शकलो आम्ही
कशामुळे ते आम्ही सांगू नये, विचारणार नाहीच तुम्ही

क्षणभरच का होईना झाली असती हृद्य भेट पुन्हा
अपराध असेल आमचा हा पण केला नाही गुन्हा

दिवसभर मन होते सैरभैर डोके नव्हते ताळ्यावर
लक्ष वारकऱ्याचे सारे विठूमाउलीच्या हिंदोळ्यावर

खंत वाटली, विषाद दाटला, चित्त भिरभिरे झाले
पापणी भिजली अलगद अन टोचले व्यथेचे भाले 

विहिरीतून जगरहाटीच्या मडके आपले भरतो आहे
जगणे समजून घेतांना जिंकण्यात रोजच हरतो आहे

माऊसकडे हात जाताच हसत हसत उठला
‘लाईक’ नको सर, जरासा एकटेपणा वाटला

मिळवले बाहेर सगळे तरी आत रितेपणा साठला
'शेअर’ करावे वाटले म्हणून तळ मनाचा गाठला

फार काही नकोय सर, टिकवलाय ताठ कणा...
कान पिळून मार्दवाने 'आत्मसन्मान जप' म्हणा!


पोस्टमधील सर्व छायाचित्रे व सरांच्या मनोगताची ध्वनिचित्रफित सन्मित्र दिनेश चंद्रात्रे यांच्या सौजन्याने... आभार!

गुरुवार, १९ जुलै, २०१८

'भलत्या' उंचीचे खडाष्टक!


छायाचित्रे - मिलिंद क्षीरसागर, संस्थापक, शिवाजी ट्रेल, पुणे

उंची न गाठू आम्ही बसूनी
इतिहासाच्या खांद्यावरही
मिरवू खुजेपणाच आमचा
         वटवृक्षाच्या फांद्यांवरही  II १ II

आम्ही सेवक, दास आम्ही
श्रेयाच्या सुंदोपसुंदित मग्न
संस्कृती आमची शान असे
          भले उरली छिन्न विच्छिन्न  II २ II

आबाळ बळीराजाची होता
पीके नासली दूध ते सांडले
धनिकांची वाढे संपत्ती अन
         खड्ड्यांनी बहुतांस कांडले II ३ II

कोण राजे नी कोण महात्मा
आम्हां त्यांची कशास पत्रास
जातीपातीचे आम्ही सत्तार्थी
         घेतो संख्याबळाचा अदमास II ४ II

जाणता आमचा राजा तो अन
गुरु आमचा असे तथागत बुद्ध
स्थाने मैदाने रस्ते नावाजू भले
          पुकारित आम्ही आपसात युद्ध  II ५ II

आज्ञापत्रे आम्हांस न उमजती
विसरलो मूर्ख लक्षणे कधीची
दुर्योधनाचे वारस आम्ही अन
         ऋषीचे कूळ आमच्या दधीचि II ६ II

मुलुखमैदान म्हणुनी मिरवल्या
तोफांचा आज उपयोग अक्षम्य
आभाळाएवढे दुर्गवैभव पोरके
         वाद ‘भलत्याच’ उंचीचे अगम्य II ७ II

असामान्य राजा रयतेचा
'दुर्गवैभव' त्याची परंपरा
जपू या ‘आज्ञे’ने त्याच्या
         पुतळ्याची उंची विसरा II ८ II