बुधवार, ६ जून, २०१८

102 Not Out!


आम्ही अत्यंत भाग्यवान असल्याने अशा काळात जन्मलो जेव्हा अभ्यास, संशोधन आणि मनोरंजन सर्वकाही ‘वाचन’ होतं. गुगलबाबा आणि जीपीएसमावशींचा जन्म होण्याच्या आधीचा तो पुस्तकांचा सुवर्णकाळ. छापील शब्दांशी, चित्रांशी मैत्र जोडण्याचे मोरपंखी दिवस. केवळ दिवाणखान्याची शोभा वाढविण्यासाठी क्रॉसवर्ड किंवा ऐमेझोन वरून ढिगाने इंग्लिश पुस्तके खरेदी करण्याची समृद्धी तोवर सातासमुद्रापलीकडून भारताच्या सीमात घुसली नव्हती आणि ‘बेग-बॉरो-स्टील’ संस्कृतीमधील ‘बेग’ बापाला आणि ‘स्टील’ आईला चालण्यासारखे नसल्याने केवळ ‘बॉरो’च्या भरवशावर मिळेल ती पुस्तके वाचण्याची समज, आवड आणि सवड आमच्याकडे मुबलक होती. शिवाय, अगदी गुरुकुल-आश्रम नसल्या तरी आमच्या शाळांचे ठोकळे आणि शिक्षण इतकेही मोकळे-ढाकळे झालेले नव्हते कि विद्यार्थी ‘मिस’बरोबर आयटम सॉंग करतील आणि ‘सर’ विद्यार्थ्यांशी ‘बिग बॉस’ खेळतील. आमच्या त्या पठडीबाज आणि ज्ञानोपासक (करा गुगल आणि शोधा अर्थ!) शिक्षणाने आम्हाला ‘पैकेज’ नसेल दिले पण जो संस्कार दिला त्याची ‘सीटीसी’ कुठल्याही मल्टीनैशनलच्या अवाक्याबाहेरची आहे... अगदी अॅपल आणि मायक्रोसॉफ्टच्या देखील! ते असो, अशा लिखाणामुळे आपले वय झाले असल्याचे आणि आपण अगदीच कालबाह्य (आउट-डेटेड; सारखं सारखं काय गुगल?) झालो असल्याचे जाहीर प्रदर्शन होते हे सूज्ञांनी (आमच्या घरात दोनच सूज्ञ – आमचे कन्यारत्न आणि तिची जन्मदात्री! आपला काय अनुभव?) कानीकपाळी ओरडूनही भान रहात नाही... हेही वय झाल्याचेच लक्षण! त्यामुळे होते काय कि मुद्दा राहतो बाजूला आणि बाकीचाच फाफटपसारा... 

मुद्दा असा कि उपरोक्त पार्श्वभूमीमुळे वाचन हा आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता, आहे आणि जीवात जीव असेतो राहील... कितीही ऑडीओ बुक्स आणि व्हर्चुअल रीऐलीटी उपकरणं आली तरी. आणि शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वाचण्याला ‘अवांतर’ असे संबोधित असले तरी आम्ही अधिकाधिक तसे वाचन करावे जेणेकरून आमचे जगण्याचे भान आणि आकलन समृद्ध होण्यास मदत होईल अशा उद्दात विचाराने आम्हाला सार्वत्रिक अनुमोदनच नाही तर उत्तेजन होते. यामुळे वाचण्याची गोडी, चांगले निवडण्याची दृष्टी आणि वाचलेल्याचे चिंतन, मनन, रसास्वादन (समीक्षण नव्हे!) करण्याची वृत्ती अंगी बाणवली गेली.

या प्रवासात आम्हाला जसे आचार्य, गोनीदा, पु.ल., जी.ए. भेटले तसेच व.पु., सुशी, मिबो आणि शिक देखील. आचार्य, गोनीदांनी आम्हाला जगण्यातील भव्य-दिव्यत्वाची प्रचीती करून दिली, जीऐंनी गूढरम्यता दाखविली आणि पुलंनी जगप्रवासाच्या माध्यमातून विचक्षण निरीक्षणातील खट्याळ रसिकत्वाची ओळख करून दिली. व.पु. आमच्यासाठी ‘आपण सारे अर्जुन’ म्हणत ‘तप्तपदी’त आमचे ‘पार्टनर’होऊन समुपदेशन करणारे साक्षात पार्थसारथी झाले तर ‘येता-जाता’ आमच्यावर ‘बरसात चांदण्यांची’ करणाऱ्या सुशीने आपल्या विशेष ढंगात आम्हांला ‘तलखी’पासून वाचवून ‘दुनियादारी’ची ‘दास्तान’ ऐकवत आमची हसून हसून ‘लटकंती’ केली आणि आम्हाला चिरतरुण राहण्यासाठी ‘व्रतस्थ’ केले. त्यांनतर आमच्या आयुष्यात आलेल्या मिबो अर्थात मिलिंद बोकीलने आम्हाला आमचे बोट धरून कधी आमची प्राणप्रिय ‘शाळा’ दाखवली तर कधी ‘गवत्या’वर नेऊन सभोवतालच्या गराड्यात आपण कायमच ‘एकम’ असल्याची जाणीव करून दिली.

असे सारे ‘आहे मनोहर तरी...’ चित्र असतांना कशाची तरी नवरसातल्या कुठल्या तरी रसाची कमी होती आणि खमंग पुरणपोळीवर साजूक तुपाची धार पडावी तसे; चिकन करी आणि फिश करीला तोंडात बोटं घालायला लावील अशी ‘कणेकरी’ घेऊन आमच्या आयुष्यात आले शिरीष कणेकर! आजची ही संबध पोस्ट आत्ता कुठे समेवर आली...

शिरीष कणेकर हे आम्हाला वडिलांसारखे आहेत कारण त्यांचे वय आमच्या पिताश्रींइतके (खर तर अंमळ अधिकच) आहे. त्यामुळे तसे पाहता त्यांना ‘काका’ म्हणायला हवे, पण त्यांच्या आवडत्या प्रांतात ‘काका’ या नावाला वेगळेच (गडबडीत ‘भलतेच’ असे मनातले लिहून जाणार होतो!) वलय असल्याने आणि त्यांचे लिखाण हे दोस्ताशी नाक्यावर किंवा विशिष्ट ठिकाणी ‘बसून’ मारलेल्या गप्पांसारखे औपचारिकतेच्या कुठल्याही मर्यादांना डावलून (पुन्हा मनातला शब्द येऊ घातला होता...!) थेट उराउरी कडकडून भेटते आणि त्या तत्काळ तादाम्य पावण्याच्या अनुभूतीने वयाचेच काय सगळीच अंतरं (अगदी मुंबई-पुणे देखील!) गळून पडतात. शिवाय ‘काका’ या संबोधानला महाराष्ट्राच्या इतिहास आणि राजकरणाच्या संदर्भात निराळेच गूढगर्भ आयाम असल्याने, नकोच ते!

आज शिरीष कणेकर पंचाहत्तर वर्षांचे झाले असले तरी ‘...अवघे पाऊणशे वयमान...’ या ओळी, ज्या लोकांच्या अभिव्यक्तीत वयाचा अडसर होत नाही अशा, आशा (भोसले) आणि अमिताभ यांच्या पंक्तीत चपखल बसणाऱ्या कणेकरांना उद्देशूनच लिहिल्या असाव्यात. पहा: सामना मधील ‘अवघे पाऊणशे वयमान’ ही त्यांनी स्वत:च स्वत:ची घेतलेली मुलाखत. साहेबांना मुलाखतीच्या फार्ससाठी दुसऱ्याच्या पुतण्याची गरज लागली, कणेकरांना महाराष्ट्राचा लाडका मुलाखतकारही ‘गाड’ किंवा ‘गीळ’ म्हणू शकला नसता! पुलंनी त्यांच्या स्वरचित बायोडाटा अर्थात परिचय पत्रात आवडता पोषाख – चिलखत आणि अविस्मरणीय प्रसंग – पुण्यात लक्ष्मी रोडवर एक दुकानदार ‘या साहेब...’ असे म्हणाला तो – असे लिहून (विनोदी?) लेखकाचा बायोडाटा हा प्रकार अजरामर करून ठेवलाय. कणेकरांनी ‘लोकसत्ता’तील ‘चहाटळकी’ या सदरात, ‘चाहते हे ठेवलेल्या बाईसारखे असतात. मुळात गाठायला तितकेसे अवघड नसतात, पण सांभाळायला महाकठीण. स्त्रीच्या गालावरचा तीळ व पुरुषाच्या स्वभावातला पीळ शोभून दिसतो, पण तो दाखवण्याचा अट्टहास नको…’ असे लिहून वपुंची थोडी थट्टा केल्याची आठवण सांगतांना ‘मुलाखत’ हा प्रकार अजरामर करून टाकला.

आम्हाला कणेकर काय म्हणून आवडतात, त्यांच्या क्रिकेटवरील रनिंग कॉमेंट्रीसाठी, हिंदी सिनेमातील फिल्लमबाजीसाठी, ‘टिवल्या बावल्या’ या सदरात मोडणाऱ्या ‘चहाटळकी’साठी, पत्रकार म्हणून की एकपात्री कलाकार म्हणून...? अगदी खरं आणि मनापासून सांगायचं तर या सगळ्यापेक्षा आपल्या मानतील गोष्टी काहीही न लपवता बेधडक दिलखुलासपणे सांगणारा एक जवळचा मित्र म्हणून. ‘साहित्यिक’ वगैरे उपाधी कणेकरांना लावण्याच्या भानगडीत कुणी पडू नये असे आम्हाला आपले वाटते; ती त्यांना शोभणार तर नाहीच शिवाय त्या नामाधीनाच्या बोज्याने ते पुन्हा गंभीर होऊन स्वत:चाच सुधारित एपिटाफ लिहून मोकळे होतील अशी रास्त भीतीही वाटते. आर. के. लक्ष्मण यांनी जो कॉमन मैन भारताला दिला त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे शिरीष कणेकर अशी आमची भावना आहे. सर्व काही भोगून-उपभोगुन, निरनिराळ्या भूमिका निभावत आपल्याच चालीने चालणारा आणि स्वत:सह प्रत्येकाला आरसा दाखवत मार्मिकता या लक्षणाची पदोपदी आठवण करून देणारा आमचा मराठमोळा चार्ली चैपलीन!

अतुलने परवा सकाळ मध्ये ‘सर शिरीष कणेकर’ लिहून माझे अर्धे काम केलेचं होते आणि अजूनही मला जे खूप काही लिहायचे आहे ते मी सरांच्या नाबाद शतकाच्या मुहूर्तासाठी राखून ठेवतोय... फक्त तोपर्यंत माझीच विकेट गेली नाही म्हणजे मिळवली!

अलीकडे फ्लेक्स युद्धाच्या काळात रोज कुणाही सोम्या-गोम्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘जीवेत शरद: शतम’ लिहिलेले आढळते. आपलेच तुणतुणे वाजविण्याची कला आणि सिद्धी पैशाने येत असेलही पण आपल्या कामाने स्नेही – चाहते किंवा भक्त नव्हे – तयार करणे आणि कधीही प्रत्यक्ष न भेटताही सौहार्द्र जोपासणे हे ‘भाऊ’, ‘दादां’चे काम नव्हे. ज्यांनी खरच शतायुषी व्हावे अशी मन:पूर्वक इच्छा होते अशी कितीशी माणसे आज हयात आहेत... शिरीष कणेकर त्यातील एक!

सर, पंचाहत्तरीच्या मन:पूर्वक शुभेच्छा आणि नाबाद शतकासाठी मनोज्ञ शुभकामना! १०२ नॉट आउट बघितला असेलच... त्याबद्दल कधी लिहिताय...? वाट पहातोय...


आणि आजच्या मुहूर्तावर खास आपल्यासाठी रचलेली कविता...   

ध्यास ना वांझ माझा तो प्रसवेल सूर्यज्योती 
या कृष्ण सागरातूनच उपजतील शुभ्र मोती

त्यागला त्याला म्हणून नको धुंडाळू किनारे 
जलसमाधीतून त्याच्या उमलेल स्वप्न न्यारे 

गाव त्यांचा, न्यायाधीश ते अन तेच सवाली 
माझ्या निर्दोषत्वाचा निघाला प्रश्न निकाली 

प्रचीती माझ्या शब्दांची, जा विचार त्याला 
स्मिताआड रिचवला ज्याने विषाचा प्याला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा