शुक्रवार, २२ जून, २०१८

अस्वीकृती...!


माझ्या या ब्लॉगवर प्रकाशित करून फेसबुकवर शेअर केलेल्या कवितांना गेल्या काही दिवसात मिळालेला प्रतिसाद हा अत्यंत सुखद असला तरी, केवळ खाली स्वाक्षरी अथवा नामनिर्देश नसल्याने त्या रचनांवरील माझ्या मालकी हक्काबाबत संभ्रम निर्माण झाला.

मला मुळातच 'मालकी'ची भावना कायमच अतिशय 'हलकी' वाटत असल्याने, कशावरही असे 'नाव टाकणे' वगैरे माझ्या प्रकृतीला मानवत नाही. आता 'नाव टाकणे' या संकल्पनेलाही अनेक निराळे 'विभक्ती प्रत्यय' असले तरी आत्ता त्याचा उहापोह करण्यात विषयांतर होऊन माझ्या (असतील नसतील त्या) वाचकांनी माझेच नाव टाकले असे व्हायला नको! परवाच एक मित्र, त्याच्या बायकोने कुणालातरी भेट म्हणून द्यायच्या तीर्थाच्या वाटीवर आपले नाव, तारीख, निमित्त टाकून आणावे म्हणून धरलेल्या स्त्रीसुलभ अशा राजहट्टाने (याला साध्या सोप्या रोजच्या वापरातल्या आणि खाजगीतल्या भाषेत 'भुणभुण' असे म्हणण्याचा 'प्रघात' आहे पण तो कठीण समयी 'घात' करू शकतो म्हणून छापील भाषेत न वापरण्याचा 'दंडक' आहे!) वैतागला होता, ते असो!

मुद्दा असा कि केवळ कशावरही आपले नाव टाकल्याने त्यावर आपले स्वामित्व सिद्ध होते या 'बीज-क्षेत्र-न्याय' संकल्पनेस माझा तत्वत: विरोध आहे कारण मला 'स्वयमेव मृगेंद्रता' अधिक भावते. तथापि अशा जगावेगळ्या धारणांनीं माझे जे भौतिक नुकसान होते ते निदान लौकिकाचे तरी होऊ नये म्हणून हे प्रकटन (हे टाईप करतांना त्याचे 'प्राक्तन' झाले... आजच्या ट्रोलिंगच्या काळात किती समर्पक... 'तुमचे प्रकटन तुमचे प्राक्तन!') आवश्यक ठरते...

हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल सामान्यज्ञान कमी असलेला कुणी (असतात हो असेही लोक, सगळेच 'भाई'चे 'जान' कसे असतील?) केवळ शारीरिक उंची आणि आवाजातील बेस हे प्रमाण मानून 'अर्जुन रामपाल'ला 'अमिताभ बच्चन' समजला तर अर्जुन रामपालची 'बसल्या' जागी 'अहिल्या' होईल पण अमिताभच्या आयुष्यभर संवर्धन केलेल्या प्रतिमेचे आणि पुण्याईचे काय? हे 'रूपक' वापरतांना माझा कुणालाही दुखवण्याचा हेतू नाही (पक्षी: अर्जुन रामपालचे चाहते(?), कारण अर्जुन रामपाल माझा ब्लॉग [किंवा, फॉर दॅट मॅटर, काहीही] वाचत असेल असे मला तरी वाटत नाही... आणि अमिताभ त्याचा स्वतःचा लिहिण्यापूर्वी माझा वाचतोच हा माझा आत्मविश्वास आहे!)

मुद्दा काय कि, केवळ रचनेच्या तळाशी माझी स्वाक्षरी नसल्याने एखादी कविता कुणाला विंदांची वाटणे तर एखादी गझल कुणाला सुरेश भटांची वाटणे हे कितीही स्वप्नवत, भयंकर सुखावह आणि 'मना'ला गुदगुल्या करणारे असले तरी सत्य नोहे! माझ्या कवित्वाचा अगदी सुरवातीच्या काळात (याला 'उमेदवारीच्या' असे म्हणण्याची पद्धत आहे पण अलीकडे या क्षेत्रात 'दावेदारी'च अधिक आढळून येत असल्याने नकोच ते! शिवाय या क्षेत्रात उमेदवारी अभावानेच होते, 'ट' ला' ट' भिडवता आला की 'कट्ट्या'वरून थेट 'गादी'वर!),
'...स्वाभिमानशून्य या जगात
फक्त लाचारीला मुभा आहे
पंगूंच्या चक्रव्यूहात पुन्हा
एक अभिमन्यू उभा आहे...'
या माझ्या चारोळीला सुरेश भटांच्या गझलेतील मत्ला (कि मक्ता?) समजून, एका, दोनेकशे कवितासंग्रह (पाडतात हो लोक एवढ्या कविता, प्रत्येक बाबतीत काय कुशंका?) नावावर असलेल्या सुस्थापित, आकाशवाणीस्टार कविवर्यांनी माझी झोप आणि सुरेश भटांची प्रतिष्ठा एकाच फटक्यात उडवली होती, तेही असो!

आणखीनच भलतीकडे भरकटण्यापूर्वी, बोल्ड टाइपातला अंडरलाईन मुद्दा एवढाच की सदर (म्हणजे 'इत्यादी' हा) ब्लॉग माझ्या आविष्काराचे साधन म्हणून चालविलेला माझा वैयक्तिक ब्लॉग असून यावरील सर्व प्रकटन हे माझे स्वतःचे वैयक्तिक प्राक्तन असून यावरील सर्व गद्य, पद्य व इतर लिखाण हे माझ्या सुपीक मेंदूला आलेले रचनात्मक फळ आहे... जे माझे नाही त्याचा उल्लेख हा यथोचित नामनिर्देश व श्रेय-सौजन्यासह वेळोवेळी केला जातो कारण तसे न करण्याइतकी वैचारिक [किंवा सामाजिक] उंची मी अजून कुठल्याही क्षेत्रात गाठलेली नाही! तेव्हा ज्या ज्या प्रकटनाच्या तळाशी नामोल्लेख अथवा श्रेय-सौजन्य टीप नसेल ते अस्मादिकांच्या आत्मिक अनुभूतीच्या मौलिक आविष्काराचे प्रतिपादन आहे व त्याच्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी ब्लॉगकाराची अर्थात माझीच आहे व राहील!

याला इंग्रजीत डिस्क्लेमर आणि मराठीत अस्वीकृती म्हणता येईल का यावर तज्ञांची मसलत अपेक्षित आहे! तेही एक असो...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा