राजा होता एक. दोन राण्या, गुणी प्रजा, सुपीक जमिनी, दुभती जनावरं आणि शब्द झेलायला आतुर दरबारी. राण्यासुद्धा अगदी बहिणी-बहिणींसारख्या एकोप्याने नांदणाऱ्या आणि प्रजासुद्धा सगळे कायदेकानून पाळणारी. शेजारी राज्यांशी मैत्रीपूर्ण सबंध आणि अडीअडचणीला धावून येणारे जीवलग.
दृष्ट लागावी असे सुखचित्र सारे. पण असे असूनही राजाला सुख समाधान म्हणून नाही, सतत चिंता आणि निद्रानाश. बरं चिंता करावी असे काही नाही पण, ‘आज सगळे ठीक चाललेय... उद्या?’ याला काय उत्तर? ना स्तवन गाणाऱ्या भाटांकडे, ना राजवैद्यांकडे, ना प्रकांड पंडितांकडे ना चतुर प्रधानजींकडे!
या राजाच्या पदरी एक सेवक. काम काय तर महालाची साफसफाई करणे, निगा राखणे. गावकुसावर एका छोट्याशा झोपडीत आपल्या पत्नीसोबत सुखाने संसार करणे. हा सेवक बघावे तेव्हा आनंदात, मस्तपैकी गाणी गुणगुणत मन लावून आपले काम करतोय. जणू कुणी कलाकारच चित्र रंगवतोय की मूर्ती घडवतोय!
राजाला मोठे आश्चर्य वाटे. तस बघितलं तर हा खरतर दरिद्री, जेमतेम खाऊन-पिऊन सुखी. याच्याकडे न पैसा-अडका, न जमीन-जुमला, न धन-संपत्ती, हा नेमका कशामुळे एवढा आनंदात राहतो? माझ्यासारख्या एका सार्वभौम, दिग्विजयी आणि श्रीमंत राजाला साध्य नाही असे कोणते सुख याला साधले आहे...?
राजा असला तरी मनुष्यच असल्याने, दुसऱ्याच्या दु:खाने विव्हल होण्यापेक्षा आपल्याला दुष्प्राप्य असणाऱ्या दुसऱ्याच्या छोट्याशाही सुखाने विदग्ध होणे त्यालाही चुकले नव्हते. तेव्हा हा आपला य:कश्चित सेवक नेमका आनंदी तरी कसा राहतो याचे कारण शोधून काढण्याचे काम त्याने आपल्या चतुर, हिकमती आणि करामती प्रधानावर सोपवले.
जन्मत:च चतुर आणि विचक्षण असणाऱ्या प्रधानाला, फळ्यावरील रेषा न खोडता लहान कशी करायची चांगलेच ठाऊक होते. आपला धनी, आपले महाराज हेच आपले पोशिंदे असल्याने त्यांची मर्जी राखणे, त्यांना खुश करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे याची प्रधानजींना पूर्ण कल्पना होती. राजाला समाधान लाभत नसले तर दुसरा तोडगा होता...
प्रधानजींनी सेवकाच्या दाराशी सुवर्णमुद्रांनी भरलेली थैली ठेवण्याची व्यवस्था केली. सेवक घरी पोहचला. पाहतो तर दारात थैली पडलेली. उचलून आत आणली आणि उघडून पाहतो तर डोळे विस्फारले. ‘माझं नशीब उघडलं, आजवरच्या कष्टांचं चीज झालं, मला धनलाभ झाला... अगं ऐकलस का?’ म्हणत हर्षाने नाचू लागला.
चुलीपाशी कामात असलेली बायको पदराला हात पुसत बाहेर येऊन पाहते तो नवरा आनंदाने बेभान होऊन नाचत सुटलेला. त्याच्या हातात थैली आणि त्यात सुवर्णमुद्रा! सेवकाच्या बायकोच्या आनंदालाही पारावार उरला नाही पण तेवढ्यात सावध होऊन ती अंगभूत व्यवहारचातुर्याने म्हणाली, ’अहो, नाचत काय बसलात? किती आहेत मोजल्यात का?’
बायकोकडे कौतुकाने पहात सेवक म्हणाला, ‘खरंच की, आनंदाच्या भरात सुख नेमकं किती आहे तेच मोजायला विसरलो!’ सुवर्णमुद्रा जमिनीवर ओतल्या आणि नवरा-बायको उत्कंठेने मोजू लागली. ९९! ‘अहो, असं कसं होईल, थांबा मी मोजते!’ बायकोने मोजल्या... ९९! ‘तू ना वेंधळीच आहेस, थांब, मी नीट मोजतो!’ ९९!
नवरा-बायकोने एकेकट्याने, आलटून-पालटून, एकत्र, राशी बनवून सुवर्णमुद्रा किमान शंभरवेळा मोजल्या... ९९! ‘थैलीला कुठे भोक पडलंय का बघ, एखादी बाहेर कुठे पडली असेल तर मी बघून येतो...’ म्हणत सेवक त्याच्या झोपडीबाहेरचा जवळ-जवळ सगळा रस्ता धुंडाळून आला, पण कुठेही सुवर्णमुद्रा पडलेली नाही, थैलीला भोकही नाही!
रात्र झाली, दिवेलागणीची वेळ झाली. जेवायची वेळ टळून गेली तरी दोघांना भूक लागली नाही. न जेवता, फक्त पाणी पिऊन दोघे अंथरुणावर पडले पण झोपेचा पत्ता नाही. एरवी जमिनीला पाठ लागताच घोरू लागणारा सेवक आणि त्याची बायको डोळे मिटून झोपेशिवाय तळमळताय, मनात सारखा एकच विचार, ‘एक सुवर्णमुद्रा कुठे गहाळ झाली?’
दुसऱ्या दिवशी सकाळी बायको प्रथम भानावर आली आणि म्हणाली, ‘अहो, ऐकलत का? नाहीतरी त्या सुवर्णमुद्रा आपल्याला विनासायास मिळाल्या आहेत. म्हणजे भगवंताची या मागे काहीतरी योजना असली पाहिजे. आपण एक सुवर्णमुद्रा कमी आहे, ती कुठे गेली याचा विचार करण्यापेक्षा मेहनतीने ती कमवू आणि शंभर पूर्ण करू!’
मनी विचार करता सेवकाला व्यवहारी बायकोचे म्हणणे पटले आणि ती म्हणतेय तसे आपण कष्ट करून, काटकसरीने जगून, आणखी एक सुवर्णमुद्रा कमवू आणि आपल्या ९९ सुवर्णमुद्रांची शंभरी पूर्ण करु असा निश्चय करून तो कामावर निघाला. राजवाड्यात रोजच्या कामाला लागतांना त्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हते आणि ओठांवर गाणे नव्हते...
चेहऱ्यावर संभ्रम, देहबोलीत तणाव आणि कामात लक्ष नाही अशा अवस्थेतील सेवकाला बघून राजा मनोमन थोडासा सुखावला पण त्याहून अधिक चक्रावला. वर्षानुवर्षे ज्या सेवकाला त्याने अत्यंत मनापासून, आनंद घेऊन, गाणी गुणगुणत काम करतांना बघितले त्याला असे बघणे राजाला साहवेना. त्याने प्रधानजींना सेवकाच्या या अवस्थेचे कारण विचारले.
‘विशेष काही नाही, महाराज, त्याला कालपासून ९९ मंडळाचं सभासद करून घेतलं आहे, आता तो असाच दिसणार!’ राजा अधिकच संभ्रमित झाला, ‘प्रधानजी, ’९९ मंडळ’ हा काय प्रकार आहे?’
‘ते होय, ते एका विशिष्ट प्रकारच्या माणसांचं मंडळ आहे, महाराज...’ गालात जीभ घोळवत प्रधानजी उत्तरले,
‘आज सुखासमाधानाने जगण्यासाठी जे हवे आहे ते सारे यथास्थित मिळालेले असतांनाही, ‘उद्याचं काय...?’ या लोभात, आपल्याला किंचित अधिक मिळालं तर आपण याहून जास्त आणि आजपेक्षा उद्या अधिक सुखी होऊ अशा कल्पनेने जी माणसं मुळात त्यांची नसलेली आणि त्यामुळे न हरवलेली शंभरावी सुवर्णमुद्रा शोधण्यात जगणं विसरतात त्याचं मंडळ!’
राजाने यातून काय बोध घेतला आणि त्याला मन:शांती मिळाली की नाही माहित नाही... सेवकाची झोप मात्र उडाली ती कायमची...!
-----------------------------------------------------------------
एका अत्यंत लोकप्रिय नागरी दंतकथेनुसार, भारतीय तरूण परदेशात, विशेषत: अमेरिकेत, जातो, स्थिर-स्थावर होतो. त्याला तिथल्या स्वतंत्र, मुक्त, सुखासीन जीवनाची भुरळ पडते. नव्याची नवलाई ओसरली की ते जीवनमानही अंगवळणी पडते. साधारण चाळीशी ओलांडली की या मूळच्या भारतीय संस्कारातील मुलाला आपल्या पौगंडावस्थेतील मुलांवर होऊ घातलेल्या पाश्चात्य संस्कारांची काळजी वाटून, 'आता पुरे झाले, गड्या आपला गाव बरा! आ, अब लौट चाले...' असे वाटू लागते.
बापाच्या मनाला ही काळजी असली तरी आता ग्रीन कार्ड होल्डर असलेल्या सुखवस्तू नागरिकाचा अमेरिकन भुलभुलैयाचा मोह सुटत नाही म्हणून तो स्वत:ची समजूत घालतो... 'अजून फक्त एक वर्ष! तेवढं झालं की कायमच जाऊ या की परत 'जन गण मन...' म्हणायला!'
...आणि हे मग दर वर्षी असच घडत राहतं! याला म्हणतात एक्स + १ सिंड्रोम - एक विकार प्रवृत्ती... ही त्या '९९ मंडळा'ची लहानपणी यात्रेत हरवलेली जुळी बहिण...!
पण या दोन्ही भावंडांना टाळण शक्य आहे...
मुळात राजाच सुखी-समाधानी झाला तर...
प्रधानजी राजाला खुश करण्याऐवजी राजाला समजावू शकला तर...
सेवकाने दाराबाहेर पडलेली थैली स्वीकारलीच नाही तर...
उणीवेच्या जाणीवेने मन:स्वास्थ्य हिरावून घेण्याआधी शहाणीव भेटली तर...?
हे शक्य होईल...?
निदान या सक्तीच्या निवांतपणात स्वतंत्र, स्वयंभू आणि समग्र विचार करायला वेळ आहे तोवर...? अगदी लगेच आजच नाही, पण...
...उद्या?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा