मायावी जगाकडे पाठ फिरवून उंच टेकडीवर झोपडी बांधून विजनवासात जीवन कंठणाऱ्या तपस्व्याने, कातरवेळी वाटसरूची चाहूल लागताच त्याची अडचण ओळखली. टेकडी चढून श्वास फुललेल्या पाहुण्यास बसण्यास आसन, प्यायला माठातील पाणी दिले आणी काहीही न बोलता भोजनाची सिद्धता सुरू केली, 'पांथस्थाचे यथाशक्ती आतिथ्य करावे आणि उजाडल्यावर त्याला निरोप द्यावा' अशा विचाराने.
पाहुणा पहाटे उठला तो कर्कश्श आवाजाने. पाहतो तर साधू झोपडीत नाही पण मधोमध एक पिंजरा टांगला आहे आणि त्यातील पोपट न थांबता एकच शब्द सारखा किंचाळतो आहे... 'स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य...' ऐहिक जगातील मोहमायेचा त्याग करून नि:संग झालेल्या साधूने एका निरागस पक्षाची अशी कोंडी करावी याचे मुसाफिराला मोठे आश्चर्य वाटले. त्याने तातडीने त्या बंदिस्त जीवाला मुक्ती देण्याची मोहीम हाती घेतली.
वाटसरूने पिंजऱ्याच्या दाराची कडी काढली. दार सताड उघडले आणि तो पक्षाने बाहेर येण्याची वाट बघू लागला. काही वेळ झाला तरी पोपट पिंजऱ्यातून बाहेर येत नाही हे बघून पाहुण्याने आपल्या हाताने पोपटाला बाहेर काढायचे ठरवले आणि पिंजऱ्यात हात घातला. जेवढ्या वेगाने हात आत गेला त्याच्या दुप्पट वेगाने परतला कारण पोपटाने आपल्या बाकदार चोचीने त्यावर हल्ला केला!
या प्रकाराने स्तिमित झालेल्या पांथस्थाला काय करावे सुचेना. परंतु त्या अभागी जीवाला मुक्ती मिळवून देण्याचे सत्कार्य आपल्याच हातून पार पडले पाहीजे या दृढनिश्चयाने मनोनिग्रह करून त्याने आपली पक्षीमुक्तीमोहीम पुन्हा सुरू केली. थोडा वेळ झटापट करून तो पोपटाला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात यशस्वी झाला आणि त्याने पोपटाला मोकळ्या आकाशात उंच भिरकावून दिले. आपल्या सत्कर्माच्या स्वानंदात मुग्ध होऊ घातलेल्या मुसाफिराच्या लक्षात आले की मगाच्या झटापटीत त्याचा हात चांगलाच जायबंदी होऊन रक्तबंबाळ झाला आहे!
'नदीवर जाऊन शुचिर्भूत व्हावे, संन्याशाचा निरोप घ्यावा, जमलंच तर हाताच्या जखमेला मलमपट्टी करावी आणि पुढील प्रवासाला निघावे' असा विचार करून पाहुणा नदीवर आला. अन्हिक उरकून आपली पोटली घेण्यासाठी टेकडीवरील झोपडीत परतला. संन्याशाची तर काहीच चाहूल नाही पण जसजसे झोपडीजवळ जावे तसतसा एक चीरपरिचीत किनरा आवाज हळूहळू कर्कश्श होऊ लागला. झोपडीत पोहचून पाहतो तर, छिन्नविछिन्न झालेल्या, चहू बाजूने तारा लोंबून उघड्या पडलेल्या पिंजऱ्याच्या मोडकळीस आलेल्या दांडीवर बसून त्याने मोठ्या सायासाने मुक्त केलेला पोपट प्राणपणाने किंचाळतोय...
'स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य...!'
------------------------------------------------------------
आचाराची विचाराशी नाळ तुटलेली असली की उच्चार हा फक्त उपचार उरतो... पोपटपंची का म्हणानात! आपल्याच स्वप्रतिमेच्या सोनेरी पिंजऱ्यात कैद असलेल्या जीवास मुक्त विहारातील मौज कशी कळावी? कैद ही मनोवस्था आहे तर मुक्ती ही प्रवृत्ती. ती ज्याच्या ठायी वास करते तो मुक्तात्मा कुठल्याही परिस्थितीत स्वत:ला जखडून ठेवत नाही आणि जो मनाने बंदिवान तो कधीही मुक्त होऊ शकत नाही. मग लॉकडाऊन असो कि नसो!
'कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही,
पण गगनभरारीचे वेड रक्तातच असाव लागत.
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही...!'
- वपु
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा