पृथ्वीतलावरील समस्त मनुष्य जातीस वेठीस धरणाऱ्या 'करोनो' विषाणूमुळे स्वत:च्याच घरात कैद करणाऱ्या 'लॉकडाऊन'चे पाचवे आवर्तन उद्यापासून सुरु होईल. या पाचव्या आवृत्तीमुळे, करोना आता आपल्या पाचवीलाच पुजलाय अशा धारणेने लोक 'सरपे कफन'च्या चालीवर, 'मुहंपे मास्क' बांधून त्याच्याशी लढायला तयार झालेत. 'करोना' नामशेष होणे नजीकच्या भविष्यात तरी शक्य नाही असे जैव वैज्ञानिक सांगत आहेत. तेव्हा, 'त्याला घाबरून किती काळ लपून बसणार, त्यापेक्षा शक्य ती खबरदारी घेऊन जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणणे उचित!' यावर सर्वच धुरिणांचे एकमत झालेले दिसते. तेव्हा तूर्तास तरी आपण या वळणावर न विसावता पुढील मार्गक्रमण टप्प्याटप्प्याने का होईना चालू करणार आहोत असे (शुभ?) संकेत मिळत आहेत.
लॉकडाऊनच्या या संपूर्ण काळात सगळ्यांना निवांत वेळ असेल आणि अंतर्मुख होण्यासारखी परिस्थिती आणि तेवढी सवड देखील असेल असे गृहीत धरून मंगळवार, दि. २४ मार्चला लिहिलेल्या ‘इष्टापत्ती’ने सुरवात करून मी त्यानंतरच्या प्रत्येक शनिवार-रविवारी ‘इनफीजम’चा प्रचार आणि प्रसार करणारे लेखन करण्याचा प्रयत्न केला जेणे करून, ‘याजसाठीं केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा...!’ ही तुकोबांची वाणी सार्थ ठरावी. आज मी या विषयाचा समारोप करण्यासाठी एक कविता सादर करतोय जिची प्रेरणा पुन्हा एकदा मला सन्मित्र दिनेशकडून मिळाली. यापुढेही माझ्या लिखाणाचा आशय-विषय आणि बाणा-बाज बदलणार नसला तरी यापुढे त्यावर करोनाचे आणि लॉकडाऊनचे सावट नसेल ही अपेक्षा!
स्वामी
तिन्ही जगांचा
स्वत:स
समजे जणू
नामोहरम
करण्या
पुरला
एक विषाणू...
निसर्गाचे
चक्र अव्याहत
मोहर पहिल्या
सारखा
आपल्याच
कर्माने मात्र
माणूस
माणसा पारखा...
हेही
दिवस जातील
तशी संपेल
भ्रांत ही
धडा मात्र
विसरू नये
अन कर्म-सिद्धांतही...
सांभाळावी
सुबुद्धी
अन
संवेदनाही
अन्यथा
फिरुनी
भेटेल
वेदना ही...
कष्टकरीही भागीदार
विसर
तयांचा न पडो
पुन्हा
एकल्या वाटेवर
प्रवास
त्यांचा न घडो...
मृत्युसमोर सारे एक
सद्गुणी आणि भ्रष्ट
समतेची गुढी उभारू
विषमता करण्या नष्ट...
विवेक बसू दे रक्षिण्या
विकार सारे भंगू दे,
प्रज्ञेचा जागर होता
सौहार्द्र हृदयी रंगू दे...!
सौहार्द्र हृदयी रंगू दे...!
जळूनी
दंभ सारा
माणसास
भान यावे
नवेन्मेशातून त्याने
निसर्गाचे गान गावे...!
नवेन्मेशातून त्याने
निसर्गाचे गान गावे...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा