शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

मूल्य...!

राजा पराक्रमी होता, अजेय होता, प्रजाहितदक्षही होता. एका मोठ्या ऐतिहासिक विजयानंतर राजाने महायज्ञ करायचे ठरविले. यज्ञात कर्मकांडाबरोबर दानधर्माचेही प्रयोजन होते आणि त्याचे स्वरूप भव्यदिव्य होते. सोने-चांदी, पशुधन-नाणी कशा कशाची कमतरता नव्हती. प्रजा येत होती, खाऊन-पिऊन-लेऊन-घेऊन तृप्त होत होती. राजाचे तोंडभरून गुणगान करून भरभरून आशीर्वाद देऊन सुखावत होती. चैतन्याचा, आनंदाचा उत्सवी पूर ओसंडून वाहत होता. कशाला म्हणून कमी नव्हती. राजाच्या चेहऱ्यावर अतीव समाधान दाटले होते. 

तेवढ्यात राजाची नजर एका मुंगूसावर गेली. हा काही वेगळाच दिसणारा मुंगूस दानासाठी रचून ठेवलेल्या साहित्यात लोळून पुन्हा वळून आपल्या शरीराकडे पहात होता. राजाला या शुभकार्यात विघ्न आणणाऱ्या मुंगुसाचा मनस्वी रागही आला आणि त्याच्या उपद्व्यापाबद्दल कुतुहुलही वाटले. सोन्याची शेपटी असलेल्या या मुंगुसाला राजाने थोडे दरडावूनच विचारले, ‘काय रे, काय चाललेय तुझे? तुला खायला काही हवे असेल असेल तर धान्यांची कोठारं उघडी आहेत, त्यातून हवे ते पोटभर खा, इथे यज्ञात का लुडबूड करतो आहेस?’

मुंगूस म्हणाला, ‘क्षमा असावी, महाराज ! मी काही उपद्रवमूल्य जोपासणारा व्यावसायिक लाभार्थी प्राणी नाही. एका रात्री एका गावात, काही खायला मिळते का बघावे म्हणून एका झोपडीत शिरलो. अगदीच अन्नान दशा झालेले कुटुंब त्या झोपडीत राहत होते. त्या घरातल्या माउलीने घरातील चार माणसांसाठी मोठ्या मुश्किलीने दोन भाकऱ्या थापल्या होत्या आणि पाण्याबरोबर अर्धी-अर्धी भाकरी गिळावी असा विचार करत असतांना झोपडीचे दार वाजले. दारात एक अभ्यागत उभा होता आणि चार दिवसांपासून उपाशी असलेल्या त्या अभ्यागताला, मिळालेच तर, दोन घास हवे होते.

घरच्या माउलीने विचार केला आपण अर्ध्याच्या जागी चतकोर खाऊ पण पाहुण्याला उपाशी नको ठेवायला. भुकेल्या पाहुण्याने अधाशीपणाने अर्धी भाकरी खाल्ली आणि आशेने पाहू लागला. पाहुणचारात कमी नको, आपण आणखी एक दिवसाने काही मरत नाही असा विचार करून घरधन्याने उरलेली अर्धी भाकरी पाहुण्याला देऊ केली. पाहुण्याने तातडीने ती देखील फस्त केली आणि लोटाभर पाणी पिऊन चालता झाला.

इकडे कुटुंबातील चौघांनी रात्रभर भुकेने तडफडून प्राण सोडले. ‘आता इथे खायला काय मिळणार?’ अशा विषण्ण विचाराने मी झोपडीतून बाहेर पडतांना माझे शेपूट चुलीजवळ रेंगाळले. माउलीने भाकरी थापतांना त्या पिठाचे काही कण तिथे चुलीजवळ सांडले होते. त्या कणांच्या स्पर्शाने माझे संपूर्ण शेपूट सोन्याचे झाले.

आता अशा शरीर मूंगूसाचे आणि शेपटी सोन्याची अवस्थेचे काय करावे, त्यापेक्षा सगळे शरीरच सोन्याचे करून घ्यावे म्हणून मी जिथे कुठे यज्ञयाग, दानधर्म चालला आहे असे समजते तिथे जाऊन पाहतो. तिथल्या दानवस्तूत लोळून पाहतो. वाटते, कणभर पीठाने जे साधले ते हिरे-मौक्तिक, सोने-नाण्याने कसे साधणार नाही? पण कसे कुणास ठाऊक, कितीही भव्यदिव्य, झगमगता, खैरातींची लयलूट असलेला लाख मोलाचा दानधर्म चालला असला तरी माझ्या शरीराचा एक केसही काही सोन्याचा होत नाही.

असे का होत असावे, महाराज…?’

-----------------------------------------------------

‘दि अल्केमिस्ट’, ‘व्हेरोनिका डिसाईड्स टू डाय’, ‘ब्रिडा’ च्या निमित्ताने, परिचय आणि सख्य एकदमच झालेल्या, ‘पावलो कोएलो’ यांच्या पूर्वी, ब्राझील आम्हाला माहित होता तो अलौकिक, एकमेवाद्वितीय आणि लिजेंड असलेल्या ‘पेले’ यांच्यामुळे. त्यांना श्रद्धांजलीच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल बरेच काही लिहून आले, बरेच काही नव्याने समजले. 

बहुतेकांना माहित नसलेली आणि आजही कुठेही वाचण्यात न आलेली पेलेंबद्दलची एक आठवण: पेले जेव्हा पहिल्यांदाच व्यावसायिक फुटबॉल सामना खेळले तेव्हा त्याबद्दल त्याना मानधनाचा चेक देण्यात आला. चकित होऊन तो स्वीकारतांना पेले लहान मुलाच्या औत्सुक्याने आणि आश्चर्यमिश्रित आनंदाने उद्गारले, ‘...म्हणजे मला याचे पैसे देखील मिळतील?’ [मला यातून जो आनंद आणि आत्मिक समाधान मिळते तेच पुरेसे होते!]

-----------------------------------------------------------------------------


वरील दोन्ही गोष्टीतून काही बोध वैगरे घेण्याची काहीही सक्ती नाही. वर्षाअखेरी काही वेगळे कानावर पडले तर नववर्षाच्या मुहूर्तावर त्या दिशेने निदान विचार तरी सुरु करता येईल, एव्हढेच…


बाकी सगळे सुरु, बंद करण्यासाठी नववर्ष संकल्प आहेतच, त्यासाठी मनापासून शुभेच्छा… !


शुभम् भवतु !

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

मौनाध्याय...!



लिहावे म्हटले काही
तर नेमके सुचत नाही,
मन रमवावे म्हटले जरा
काही काही रुचत नाही

'मना'ची घालमेल अन्
शब्दांचे हे मौनाध्याय,
सुचावा याला कधीतरी
असा ही काही पर्याय

मेघदूत सुचो वा गीताई,
कुंठीत मती मुक्त व्हावी
एक ओवी जगण्यासाठी
मुक्तीची वस्त्रे ल्यावी...!

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

‘उपयोग ...?’


विंदांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून २४ ऑगस्ट २०१७ ते २३ ऑगस्ट २०१८ या वर्षात,  विंदांची 'रोज एक कविता' असा उपक्रम राबवितांना मला फक्त १०० च कविता सादर करता आल्या. उर्वरित २६५ कवितांपैकी, ही हृदयात घर करून बसलेली कविता आज काळ-वेळ न बघता कोंब फुटावा तशी उफाळून वर आली असावी...!

कवितेच्या बाबतीत, 'केल्याने होत आहे रे...'  हे समर्थवचन जसे गैरलागू तसेच, सोंग किंवा आव आणून करण्याचीही ती गोष्ट नव्हे. निखळ प्रचिती, प्रच्छन्न उपरती आणि प्राणांतिक अनुभूती या शिवाय कविता साधणे (आणि लाभणे!) अशक्य. आज अशाच काही प्रत्ययांमुळे ही 'मना'च्या कोपऱ्यात दडी मारून बसलेली कविता ठसठसलीं असावी.

असो. विंदांच्या अगदी साध्या शब्दातल्या या निखळ 'प्रापंचिक' अभिव्यक्तीच्या आणि आपल्या अनुभूतीच्या मध्ये फार जागा न अडवता सादर आहे,,,

‘उपयोग काय त्याचा ?’

शब्दांत भाव नाही, ना वेध अनुभवाचा ; 
रचना सुरेख झाली ! उपयोग काय त्याचा ?

व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले ;
नवरी पळून गेली ! उपयोग काय त्याचा ?

सुगरण रांधणारी, सुग्रास अन्न झाले ;
अरसिक जेवणारे, उपयोग काय त्याचा ?

जमली महान सेना, शस्त्रे सुसज्ज झाली ;
नेता कचखाऊ निघाला, उपयोग काय त्याचा ?

ऐश्वर्य प्राप्त झाले, झाली दिगंत कीर्ती ;
स्नेही न एक लाभे ! उपयोग काय त्याचा ?

सर्वांस स्वास्थ्य आले, सगळीकडे सुबत्ता ;
स्वातंत्र्य फक्त नुरले ! उपयोग काय त्याचा ?

केले गुरु अनेक, यात्रा कित्त्येक केल्या ;
शांती न प्राप्त होता, उपयोग काय त्याचा ?

विंदा करंदीकर

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

अभ्यंग...!

गंध दरवळता आसमंती

सुरमई पहाट सोनपिवळी

अभ्यंगाचा स्पर्श मखमली 

देई नात्या नवी झळाळी !

शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२

पुरुषोत्तम वैगरे...

२२. अति तिथं माती

(चक्रमादित्य महाराजांचा दरबार. महाराज प्रवेश करतात.)
सेवक : समशेरबहाद्दर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जयजयकार असो’ 
(सर्वजण जयजयकार करतात.) आस्ते कदम महाराज... आस्ते कदम... 
महाराज : (सिंहासनावर बसून) बसा मंडळी, बसा. (प्रधानास) काय प्रधानजी, 
कशी काय आहे राज्याची हालहवाल ?
प्रधानजी : (हात जोडून) आपल्या कृपेने उत्तम आहे. गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत.
श्रीमंत लोक सुखात आहेत.
महाराज : छान ! उत्कृष्ट ! बरं, चोरीमारी वगैरे ?
प्रधानजी :  छे ! कोणी चोरी करत नाही. फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत.
महाराज : फारच छान. बरं, रोगराई वगैरे ?
प्रधानजी : बिलकुल नाही ! चार-दोन साथीचे रोग आले. त्यांत शे-पाचशे माणसे गेली.
बाकी सगळे जिवंत आहेत.
महाराज : वा ! वा ! प्रधानजी, आमच्या राज्याची हालहवाल एकूण उत्तम आहे म्हणायची !
बर. आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता ?
प्रधानजी : एक उत्तम गाणारे बुवा आलेले आहेत. त्यांच गाण ऐकावं सरकार. 
महाराज : त्यांच नाव काय म्हणालात ?
प्रधानजी : गानसेन.
महाराज : बरं बरं, बोलवा त्यांना. 
(गवईबुवा येतात. नमस्कार करतात.)
गवई : महाराजांचा विजय असो !
महाराज : गवईबुवा, तुम्हांला काय येतं ? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता ?
नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा.
गवई : महाराज, मी वादक नाही. गवई आहे. संगीत गातो.
महाराज : बरं बरं, म्हणा काहीतरी.
(गवईबुवा मांडी घालून बसतात. हातवारे करून बेसूर आवाजात एक गाणे म्हणतात. महाराज खूश होतात)
महाराज : वा ! गवईबुवा, तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे. बोला, तुम्हाला काय बक्षीस
पाहिजे ?
गवई : महाराज, मला स्वतःला काही एक नको. सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत.
संगीतकलेसाठी काहीतरी करा.
महाराज : अवश्य, अवश्य ! काय बरं करावं? (विचार करतात. मग टाळी वाजवून)
हां, कल्पना सुचली, प्रधानजी-
प्रधानजी : आज्ञा महाराज.
महाराज : संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे.आत्ताच्या आत्ता दवंडी पिटवा –
आजपासून आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं. कुणीही साधं बोलायचं नाही.
सगळं गातगातच बोललं पाहिजे.
प्रधानजी : ठीक आहे, सरकार.
महाराज : जो कुणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा. पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा.
मग हत्तीच्या पायी देऊन नंतर त्याचा कडेलोट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून
लिहून घ्या.
प्रधानजी : आत्ताच दवंडी दयायची व्यवस्था करतो.
(हळूहळू रंगमंचावर अंधार होतो. त्या अंधारातच प्रथम दवंडीचा आवाज व नंतर दवंडीवाल्याचे गाण्यात
ओरडणे ऐकू येऊ लागते.)
दवंडीवाला : (गाण्याच्या चालीवर)
ऐका हो तुम्हि ऐका !
ऐका हो ऐका !!
आजपासुनी सर्व बोलणे,
 व्हावे केवळ गाणे गाणे.
 केवळ गाणे आणि तराणे,
 चालणार नच इतर फलाणे.
 राजाज्ञा जो मोडिल कोणी,
 देउ सुळावर त्यास तत्क्षणी.
 ऐका हो तुम्हि ऐका !!
 (दवंडी संपते. रंगमंचावरील प्रकाशात दोन पहारेकरी हातांत भाले घेऊन एकमेकांशी बोलत येतात.)
पहिला : (हसत) छे छे ! हसून हसून आपलं तर पोट दुखायची वेळ आली बुवा !
जिकडे बघावं तिकडे लोक नुसतं गाताहेत. साध बोलणं नाहीच कुठे.
दुसरा : महाराजांची आज्ञा आहे ना ! कोण मोडणार ?
पहिला : काय एकेकाचे आवाज भसाडे आहेत रे । त्यांनीसुद्धा गायचं म्हणजे काय हे !
दुसरा : लोक अगदी त्रासून गेले आहेत.
पहिला : शू
 ! कुणी गद्य बोललं, तर त्याला पकडायचं हे आपलं काम आपणसुद्धा नाही बोलायचं, 
(गात) गद्य कोण बोलतो, 
त्यास मी पकडतो 
अन् सुळावरी चढवतो.
दुसरा : ए, ते बघ, ती दोघ नवरा-बायको भांडत इकडेच येत आहेत. बाजूला उभं राहून ऐकूया.
साधी भांडताहेत की गाण्यातच ?
पहिला : चल तर लवकर.
(दोघे बाजूला उभे राहतात. नवरा घाईघाईने येतो. मागून बायको येऊन त्याचा हात धरते. 
दोघेही गाण्यातच बोलतात.)
बायको : तेल संपले, तूप संपले, मीठ संपले; 
स्वयंपाक आता मी करू कशाचा?
नवरा : (रागावून) ए माझे आई, नकोस खिंकाळू !
हा चाललो बाजाराला,
आणून देतो माल तुला.
बायको : (हातात पिशवी देत) अन् येताना शेर-दोन शेर, 
तुम्ही वांगी आणा छान सुरेख.
नवरा : (बायको गेल्यावर स्वतःशीच गुणगुणत)
आणितो मी तेल, तूप, मीठ, वांगी.
आणखी ती काय सांगी ?
(आठवत आठवत नवरा जातो. दोघेही पहारेकरी हसत हसत पुढे येतात.)
पहिला :  कमाल आहे बुवा ! भांडणसुद्धा गाण्यात करायचं !
दुसरा : आता है नवरोजी गेले बाजारात. तिथे ही गर्दी माणसांची ! प्रत्येकजण गाण्यातच बोलतोय !
पहिला : खरच, बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल नाही ?
दुसरा : अरे, गंमत म्हणजे काय? नुसती मजा चाललीय मजा ! समज तू दुकानदार अन 
मी गिन्हाईक. मग मी विचारायच – 
(गात) दुकानदारदादा, अहो दुकानदारदादा, तुम्ही कसा दिला कांदा ?
पहिला : (दुकानदाराची नक्कल करत, गात) रुपयास चार शेर रावसाहेब, रुपयास चार शेर..
दुसरा : (गात) दया तर आम्हा एकच शेर, घालू नका हो कचराकेर.
पहिला : (गात) माल अमुचा पांढराफेक, कांदे किती हे स्वच्छ सुरेख !
दुसरा : (गात) चार आणे नाहीत फार, मांडून ठेवा आज उधार.
पहिला :  (गात) नाही नाही, नाही चालणार, आज रोख उद्या उधार.
(दोघेही खूप हसतात. मग नेहमीच्या आवाजात बोलतात.)
पहिला :  कारे, बाजारात ही गंमत! मग राजवाड्यात किती मौज उडाली असेल ?
दुसरा : राजवाड्यात? अरे, तिथे तर साधं गाणं नाही, शास्त्रीय संगीत! सगळं रागदारीत चाललंय.
पहिला :  चल, तिथली गंमत प्रत्यक्षच बघितली पाहिजे. चल, चल लवकर. 
(‘गद्य कोण बोलतो’ हे गाणे म्हणत दोघेही जातात. रंगभूमीवर थोडा वेळ अंधार. मग राजवाडा दिसतो.
लोक महाराजांचा गाण्यात जयजयकार करत आहेत- जयजयकार महान, आपुला जयजयकार महान.)
महाराज :  (गाणे म्हणत प्रवेश करतात.) आलो आलो मी. राणी कुठे आमची ?
राणी : (गात) ही इथे महाराज मी.
महाराज : (गात) आज तुझे तोंड सुकले कशाने ?
राणी : (गात) या पडशाने मज गांजियले.
(सटासट शिंकते.)
महाराज : (गात गात आज्ञा करतात.) जा जा जा झणी घेऊन या वैद्या.
(एक सेवक ‘महाराज, महाराज’ अशा गाण्यातील हाका ऐकू येतात.)
महाराज : (घाबरून गातात) अरेऽऽ काय झालेऽऽ ?
सेवक : (गडबडीने प्रवेश करून गातो.) महाराजऽऽऽ प्रधानजी
महाराज : (गात) अरेऽऽ, काय झालं ? बोल लवकरी.
सेवक : (गात व ताना घेत) महाराजऽऽ
महाराज : (गात) अरे बोल ना झडकरी
सेवक : (गात) महाराज, आपुला प्रिय राजवाडाऽऽ
महाराज : (गात) पुढे बोल गद्ध्याऽऽ
सेवक : (ताना घेत तीच ती ओळ घोळून घोळून म्हणतो) महाराज, आपुला प्रिय राजवाडाऽऽ
महाराज : (चिडून नेहमीच्या सुरात) आता बोलतोस लवकर का मुंडकं उडवू तुझं ?
सेवक : (गातगातच) आपुला प्रिय राजवाडा, जळुनि खाक झाला.
महाराज : (घाबरून) काय ? माझा राजवाडा जळला? मेलो, ठार मेलो मी, अन् मूर्खा,
तू हे आता सांगतोस ?
सेवक : (नेहमीच्या आवाजात) क्षमा करावी महाराज, पण आपलीच आज्ञा होती ना सगळं
गाण्यात सांगायचं म्हणून. 
महाराज : खड्ड्यात गेली ती आज्ञा. प्रधानजी - (प्रधानजी समोर येतात.) प्रधानजी, लोकांना
म्हणावं नेहमीप्रमाणे बोला.
प्रधानजी : जशी आज्ञा सरकार राजवाडा सुखरूप आहे आपला. थोडक्यात वाचला.
आग विझवली.
महाराज : फारच छान, उत्कृष्ट ! आमच्या आज्ञेनं हा सगळा घोटाळा झाला. 
हे पाहा, आता जो कोणी गाईल त्याला सुळावर चढवण्यात येईल, अशी दवंडी लगेच पिटवा.
प्रधानजी : हां हां महाराज, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय खरा । क्षमा असावी. 
महाराज, आपण ही आज्ञा परत घेतलीत तर उपकार होतील. नाहीतर अति तिथं माती होईल.
महाराज : शाबास प्रधानजी, पटल आम्हांला रद्द केली आम्ही आमची आज्ञा, खरं आहे तुमचं, 
अति तिथं माती आहे… कुणी बरं म्हटलंय ?
प्रधानजी : पण आज्ञा रद्द झाली ना ?
महाराज : झाली म्हणजे काय? झालीच !
– द. मा. मिरासदार

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

आवाहन...!

खेड्यामधले घर कौलारू...! गौरी देखावा: वैभव पुराणिक, नासिक

अंगणी तुडुंब विहीर, दारी तुळशीवृंदावन हवे
जगण्याच्या उर्मीला पडावे दररोज स्वप्न नवे...!

परसाच्या आंब्याचे तोरण प्रवेशद्वारी सजू दे
स्वागताच्या रांगोळीची संस्कृती मनी रुजू दे...!

गणगोत सारा भेटो पुन्हा एकाच हाके सरशी
झुलो लगडून झोपाळा बसण्या थंडगार फरशी...!

असू दे जगणे आधुनिक पण सुटू नये गाव
सापडू दे माणसां पुन्हा आत दडलेला भाव...!

'व्हॉट्सॲप'वाल्या पिढीला शुभंकरोती शिकव
'थ्री बीएचके विथ टेरेस' आईबापासह टिकव...!

माणसाला माणूस कधीही होऊ नये पारखा
शेजार लाभो सर्वां जीवाभावाच्या मित्रासारखा...!

नेत्यांना सुबुद्धी दे करण्या समाजकारणाचा गजर
दिशा कितीही दाटल्या तरी स्वच्छ राहू दे नजर...!

द्वेष सरो, स्नेह ऊरो, हीन सारे जळू दे
जगण्याचे मर्म खरे माणसांला कळू दे...!

एवढीच तुज विनवणी अन् एवढेच तू दान दे
उद्यामागे धावणाऱ्यां थोडे आजचे भान दे...!

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

संचित...!

 चित्र:  वैभव  पुराणिक, नासिक

श्वासावर लक्ष असो
जगण्याचा वाटो सण
परतूनी येत नाही
आला क्षण गेला क्षण

चष्मा एका प्रतलाचा
रंग अनेक अदृष्य
भान राखून मितींचे
मौनातून व्हावे भाष्य

काय देणे काय घेणे
हिशोबाची वही बंद
संचिताच्या मार्गावर
चालण्याचा उरो छंद

चोरवाटा आडवाटा
विसरुनी हेवेदावे
संवेदना जागवून
स्वत:कडे परतावे

मन आत्मा की शरीर
कोठे शोधावे मीपण ?
अज्ञाताच्या वाटेवर
सारे प्रवासी आपण

श्वासावर लक्ष असो
जगण्याचा वाटो सण
परतूनी येत नाही
आला क्षण गेला क्षण

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

 शब्द: दिनेश चंद्रात्रे, धुळे

वाढदिवसाचे औचित्य साधून आपापल्या भावनांना चित्राक्षरांचा साज चढविणाऱ्या
सन्मित्रांच्या या भावगर्भ, अर्थगर्भ, सूचक तथा समर्पक अभिव्यक्तींनी
माझा अर्धशतकोत्तर प्रथम वाढदिवस अधिकच समृद्ध आणि सुफल झाला नसता तरच नवल...!
बालमित्रांच्या 'आभाराचा भार कशाला...?' नाही का गुरुजी ?

सादर प्रणाम !

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

कृष्णसखा...!

चित्र सौजन्य: वैभव पुराणिक, नासिक 

पंचेंद्रियरुपी पांडवांना
षडरिपूंच्या कौरवांशी लढतांना
सगळ्यात अवघड युद्ध
लढावे लागते ते कर्णाशी
कारण...
कायम उपेक्षल्याने
आत्म्याच्या अतृप्त वासनांना
आणि मनस्वी दुखावल्याने
मैत्रीच्या कोंदणात
विखार जोपासणाऱ्या
धुरंधराला जिंकणे सोपे नसते,
विवेकी सारथ्याशिवाय !
म्हणूनच...
विकार सांभाळायला
आणि कर्णाचा अर्जुन व्हायला,
सख्याच्या रुपातला
कृष्ण भेटायला हवा,
कृष्ण भेटायलाच हवा...!

जन्माष्टमीच्या शुभेच्छा...!

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

प्रतिज्ञा...?


कडक उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील तळ्याचे पाणी संपत चालले होते. तळ्यातील पाणीही आटले. हत्तीचा कळप पाण्याच्या शोधात होता . पाणी कोठेच मिळत नव्हते. हत्तीच्या कळपाचा राजा म्हणाला, मला दुसऱ्या जंगलातील सर्वात मोठे तळे माहित आहे आपण तिकडे जाऊयात. हत्तींना पिण्यासाठी पाणी हवेच होते. सगळे दुसऱ्या जंगलाकडे निघाले. तीन रात्री प्रवास केल्यानंतर हत्तीचा कळप त्या सर्वात मोठ्या तळ्याजवळ आले.

त्या सर्वात मोठ्या तळ्याच्या परिसरात ससे निवास करीत होते. तळ्याच्या आसपास मातीत बिळे करून ते राहत होते. तीन रात्रीचा प्रवास करून आलेल्या हत्तींना पाणी बघताच पाण्याच्या दिशेने धाव घेतली. आपल्यामुळे सशांची घरे नष्ट होत आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. हत्तीच्या पहिल्या फेरीत खूप ससे मारले गेले रोजच हत्ती पाणी पायायला येऊ लागले आणि सशांची हानी होवू लागली. सशांना या परिस्थितीवर उपाय शोधणे भाग होते.

सशांच्या कळपातील एक हुशार ससा हत्तींच्या राजाला भेटायला गेला.
ससा म्हणला, 'महाराज आमचे थोर राजे चंद्रमहाराज यांनी आपणास तळ्यातील पाणी पिण्यास मनाई केली आहे.'
तेव्हा हत्तींच्या कळपाच्या राजाने त्याला विचारले, 'कोठे आहे तुमचा राजा?'
तेव्हा ससा म्हणाला, 'चला मी तुम्हाला त्यांच्या कडे घेऊन जातो.'

सशाने लांबच्या रस्त्याने हत्तीला तळ्यापर्यंत नेले. ते पोहोचेपर्यंत चंद्र आकाशात आला. तळ्यात चंद्राचे प्रतिबिंब पडले होते.
त्याकडे बोट दाखवून ससा म्हणाला, 'ते बघा आमचे महाराज रागाने थरथरत आहेत.'

हत्ती हे दृश्य पाहून घाबरला. पाण्यात हलणारे प्रतिबिंब पाहून हत्तीने सशाची क्षमा मागितली. सर्व हत्तींना घेऊन त्यांचा राजा जंगलाबाहेर पडला ससे आता आनंदाने तळ्याभोवती राहू लागले.

बुद्धिर्यस्य बलं तस्य निर्बुद्धेश्च कुतो बलम् ।
वने सिंहो यदोन्मत्तः मशकेन निपातितः ॥

'भाषण' (साभार: भाडीपा) आणखीन गोष्ट (साभार: पंचतंत्र) दोन्ही पूर्णपणे अराजकीय आहेत.

भारत मेरा देश है।
सभी भारतीय मेरे भाई-बहन हैं।
मैं अपने देश से प्यार करता हूं और मुझे इसकी समृद्ध और विविध विरासत पर गर्व है।
मैं हमेशा इसके योग्य बनने का प्रयास करूंगा।
मैं अपने माता-पिता, शिक्षकों और सभी बड़ों का सम्मान करूंगा और सभी के साथ शिष्टाचार का व्यवहार करूंगा।
मैं सभी जानवरों का सम्मान करता हूं और अपने देश और अपने लोगों के लिए, मैं अपनी भक्ति की प्रतिज्ञा करता हूं।
उनकी भलाई और समृद्धि में ही मेरी खुशी है।
जय हिन्द!


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा !

रविवार, २४ जुलै, २०२२

डिस्टोपियेन...?


एकचालकानुवर्ती व्यवस्थेमध्ये भविष्यातील भयावह तथा दूरगामी परिणामांची दडलेली सूक्ष्मरूपी बीजे उघड करून दाखविणे हे डिस्टोपियेन प्रकटनाचे अत्यंत मोलाचे योगदान. समाजातील, व्यवस्थेतील त्रुटी दाखवून, त्यांच्या गंभीर परिणामांपासून वाचण्याचे 'लोकशाहीप्रणित समाजवाद' सारखे उपाय सुचवणाऱ्या पर्यायी व्यवस्थेची कल्पना मांडणे, ही वर्तमानाच्या तथाकथित 'टीकाकारांची' आणि निर्भीड भविष्यवेधी भाष्य करणाऱ्या विवेकदक्ष लेखकांची भूमिका. समाज सजग, सतर्क आणि संवेदनशील राहण्यास अशा लेखकांची आणि त्यांच्या परखड लेखनाची नितांत गरज असते. कारण, मुळात स्थितीगमनी आणि सुस्त समाजमन हे बदलास अनुकूल नसते आणि जे बदल सुखवस्तू, सुखासीन तथा लब्धप्रतिष्ठित वर्गास गैरसोयीचे असतील त्यांना केवळ दुर्लक्षून मारणे हे त्यातल्या त्यात 'सभ्यते'चे लक्षण. आणि निषेधाची, विरोधाची, अगदी हमरीतुमरीची वेळ आलीच तर (स)माजमाध्यमे आहेतच दिमतीला ! 'अगा जे घडलेची नाही...' हे बकध्यान फारच सोयीचे आणि 'ध्यान'स्वरूप असल्याने त्याला लाभणारी अध्यात्मिक किनारही भरजरी !

तथापि, बहुसंख्यांनी डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरीचे सोंग घेतले आणि तारस्वरात, 'ऑल इज वेल...' अशी बोंब ठोकली तरी, दुधाची राखण करण्यासाठी सदैव दक्ष राहण्याचा वसा घेतलेल्या विवेकबुद्धीला झोपेचे सोंग घेता येत नाही. मग अशी तर्कनिष्ठ विवेकबुद्धी कधी बुद्धाच्या, 'अप्प दीपो भव:...' या स्वयंभू मार्गदर्शनातून, कधी तुक्याच्या, 'बुडतां हे जन, न देखवे डोळां...' अशा मायाळू कळवळ्यातून, तर कधी समर्थांच्या, 'मूर्खांची लक्षणे...' या प्रच्छन्न उपदेशातून व्यक्त होते तर कधी जॉर्ज ऑर्वेलच्या, 'बिग ब्रदर इज वॉचिंग यू ...' आणि दिलीप कुलकर्णींच्या, 'नो एनर्जी इज ग्रीन (ऑर 'क्लीन', फॉर दॅट मॅटर!) एनर्जी !' अशा चेतावणीतून डोळ्यात झणझणीत अंजन घालते. 

बहुतांनी या साऱ्याकडे, आपल्या क्षुद्र, क्षणिक आणि दांभिक स्वार्थासाठी दुर्लक्ष केले आणि, आज कोंबडा झाकून ठेवायचा प्रयत्न केला तरी 'उद्या' सूर्य उगविल्याशिवाय रहायचा नाही...! सृष्टी सर्वतोपरी आहे आणि तिच्या चक्राला बाधा आणणाऱ्या प्रजातींचा योग्य तो समाचार घेण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी नसते तर तिने मुळात जीवसृष्टी निर्माणच केली नसती. मुद्दा (आणि प्रश्न!) आहे तो आपल्या अस्तित्वाचा. आणि अजूनही आपण, 'ही व्यवस्था काही मी तयार केली नाही, मी एकटा त्यात काय करू शकणार आहे...?' असा मध्यममार्गीय, कातडीबचाऊ पवित्रा घेणार असू, तर एवढेच सांगावेसे वाटते कि... 

निदान भौगोलिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीचे किमान भान येण्यासाठी, तिच्या नजीकच्या भविष्यात होऊ घातलेल्या पर्यवसनाची जाण होण्यासाठी; सो कॉल्ड बेस्ट सेलर्स, बिकाऊ मीडिया आणि पकाऊ व्हॉट्सअँप फॉर्वर्ड याशिवाय, आपल्याशी, आपल्या पुढच्या पिढ्यांशी थेट निगडित असे काही तर्कशुद्ध, विवेकी, समर्पक वाचण्याची सवय लावून घेऊ या...

आज हे सारे नव्याने उगाळण्याचे कारण म्हणजे, काल 'अनंत यशवंत' उर्फ 'नंदा खरे' यांचे झालेले निधन. ज्या नावाने 'गुगल सर्च'वर एक प्रतिमा देखील मिळणे अवघड, त्याची दखल 'डिजिटल' प्रगत महाराष्ट्राने का घ्यावी हा प्रश्नही रास्तच. मुळात संत-महंत, सुधारक-वैज्ञानिक, विद्वान-विचारवंत, लेखक-साहित्यिक अशा महानुभावांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अशा नावाची लेखिका(?) पण होती हे आम्हाला ठाऊक असण्याचे कारणच काय, आमच्या कधी ऐकण्यात सुद्धा नाही आले असे काही नाव ! प्रसिद्धीपरांग्मुखता अनसोशल ठरल्याने तो मोठाच व्यक्तीदोष असण्याच्या काळात समाजविन्मुख राहणे हे पापच...  मान्य, अगदीच मान्य. स्थापत्य अभियंत्याचे शिक्षण आणि व्यवसाय असणाऱ्या नागपूरच्या कोणा एका गृहस्थाने, पुणेरी प्राध्यापकीय अभिनिवेशाने चिंतन आणि लेखन करणे हे महाराष्ट्राच्या सहजी पचनी पडण्यासारखे नाही, अगदीच मान्य ! त्यामुळे प्रस्थापित वर्तमानपत्रांनी खरे सरांच्या निधनाची घेतलेली छोटीशी का होईना दखल 'मना'ला स्पर्शून गेली. 

आता तुम्हाला या नावाची ओळख झाली आहेच तर खरे सरांच्या न चुकता वाचाव्या अशा पाच पुस्तकांची नावे सांगून तुमचे गुगलण्याचे कष्ट वाचवतो... 
१. कहाणी मानवप्राण्याची
२. अंताजीची बखर
३. बाजार
४. ऐवजी
५. उद्या

शिवाय यामुळे उत्सुकता वाढलीच, तर समग्र नंदा खरे साहित्य येथे पहा... 
https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=4930282049228319742 

माणसे आणि व्यक्ती येतात आणि जातात, विचार आणि वृत्ती चिरकाल राहतात. तेंव्हा खरे सरांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली वगैरे म्हणण्याचा किंवा सरांना श्रद्धांजली वगैरे वाहण्याचा प्रश्नच नाही, त्यांच्या विचाराचा शक्य होईल तेवढा प्रचार आणि प्रसार हीच त्यांची स्मृती जपणारी आदरांजली...!

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि...!

रविवार, १७ जुलै, २०२२

अ-शोक...!


गडगडले सारे स्तंभ I वनराज होई मुखस्तंभ I
उरला केवळ दंभ I लोकशाही II

घोडे चौफेर उधळता I बाजारास ये उधाण I
सांडास अवताण I त्राही त्राही II  

प्रतिके अन प्रतिमान I सारेच बदलून वेष I
पोसती प्रच्छन्न द्वेष I बारमाही II

सामर्थ्याचे प्रतिक I वैराग्य घेई ओढून I
राज्य सत्ता सोडून I शोक नाही II

अनिर्बंध सत्ताकांक्षा I नाही रोक टोक I  
हतबुद्ध अ-शोक I भारवाही II

नावे त्याच्या प्रतिमा I कारुण्यमूर्ती राजस I
होता स्पर्श तामस I रौद्र दाही II

दर्शनी क्रुद्ध भाव I भयप्रद त्रिमिती I
अदृश्य चौथी मिती I ठोकशाही II

तरी सारे आलबेल I म्हणे हेच रामराज्य 
बाकी सारे सारे त्याज्य I लवलाही II

रविवार, १० जुलै, २०२२

नाविक...!

चित्र: राम खरटमल

विठ्ठल रंग
विठ्ठल संग
विठ्ठल प्रीत
विठ्ठल गीत

विठ्ठल डोह
विठ्ठल मोह
विठ्ठल श्वास
विठ्ठल ध्यास

विठ्ठल नाव 
विठ्ठल भाव
आम्ही भाविक
विठ्ठल नाविक 

नामाचा महिमा
भक्तीचा महापूर 
होडी चढता बिनघोर
दिसो लागे पैलतीर...!

रविवार, ३ जुलै, २०२२

'...हम नहीं तोडेंगे?'

अडीच वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१९ मध्ये लिहिलेल्या 'ये दोस्ती...' चा उत्तरार्ध लिहावा लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते... इतक्या अनाकलनीय, अनैसर्गिक आणि अकल्पित घडामोडींने स्व(?)रुपास आलेल्या आघाडीत बिघाडी करण्याची बहुतांची मनीषा लपून राहिली नसली तरी तिचे पर्यवसन त्याहूनही अधिक वैचित्र्यपूर्ण आणि विस्मयकारक असावे हे मात्र नवलच.

शोलेच्याच रुपकातून सांगायचे तर हे म्हणजे - 

...गब्बरने ठाकूरचा काटा काढून मित्रशोकात पिऊन बेधुंद झालेल्या वीरूला बसंतीच्या मौसीला पुन्हा एकदा इमोशनल ब्लॅकमेल करून, बसंतीचे लग्न हिराशी लावून देतांना सांबाला कन्यादान करायला लावले. यामुळे हताश झालेल्या रामलाल, इमामचाचा आणि राधा यांनी आपल्या आधीच हतबल असलेल्या आयुष्याला आणखीनच डागण्या मिळालेल्या पाहून हवेलीला कुलुप लावून, चाव्या कमरेला खोचून काही दिवस गाव सोडायचा निर्णय घेतला म्हणून कालिया खुश झाला...

...असा काहीसा क्लायमॅक्स तोही दोनदा (अबब!) घडला.. भूमिका आणि पात्रे पुन्हा एकदा आपण आपली निवडून घ्यावी... आपला नाव घ्यायचा काम नाय... आणि ते लोकशाही बिकशाही बकवास करून डोक्याची मंडई करायचा तर मुळीच काम नाय, कळ्ळा का...? कुठेही नेऊन ठेवला असला तरी 'जय महाराष्ट्र' माझा...!  


...आणि तो प्रामाणिकपणामुळे तिन्ही कुऱ्हाडी मिळवणारा लाकूडतोड्या, 'कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ...' म्हणजे नेमकं काय हे विचारत का फिरतोय, कुणास ठाऊक?

कुणी जाल का... सांगाल का...?

रविवार, २६ जून, २०२२

परतवारी...!


दिसावा असा उंबरा
जेथे टेकवावा माथा
लोकगंगा तारेल ती
लिहिता यावी गाथा...!

त्याच्या सावळ्याशा
रंगात रंगूनी जावे...
कान्ह्याची ती बासरी
मीरेचे घुंगरू व्हावे...!

मन व्हावे मुक्त असे
नको खेद नको हर्ष
एकातरी उद्गाराला
होवो तुक्याचा स्पर्श...!

गजर पडता कानी
हरीनाम मुखी यावे
भक्तीच्या रिंगणात
पावली नाचून गावे...!

दरवर्षी सुख पहावे
अशी घडावी वारी
तिच्या तोलामोलाची
साधावी परतवारी...!

वैष्णवांचा लाभो वसा
देहात पंचप्राण ल्यावे
पाऊली चाल चालता
जगण्याचे सोने व्हावे...!

सन्मित्र दिनेशला एकावन्नाव्या वाढदिवसाच्या अध्यात्मिक शुभेच्छा ...!

बुधवार, २२ जून, २०२२

शनिवार, ४ जून, २०२२

श्रद्धेय...?


साऱ्याच दिव्यांच्या नशिबी
लख्ख पेटती वात नाही...
अन् एकदाच भोगून संपेल
अशी कुठलीच जात नाही...!

वाऱ्यास ना लाभे विसावा
वेळेस धरण्या हात नाही...
पाण्यास वाहणे निरंतर
साचण्यात ती बात नाही...!

पालवी पानगळीची ग्वाही
पक्षी ऋतुविना गात नाही...
चवबदल करण्यास काही
साप टाकीत कात नाही...!

सोहळे आवाजी मोठे
न्यूनावर मात नाही...
गोंधळ बाहेर घातला
पण संवाद आत नाही...!

शास्त्रार्थात बद्ध महाबळी
स्वयंभू तोही जन्मजात नाही
सक्ती असेल साधूमहंतांस
श्रद्धेय असे काही यात नाही...!

शनिवार, १४ मे, २०२२

आवाज कुणाचा...?


मुल्ला नसिरुद्दीन तातडीच्या कामासाठी गावातून चालला होता. वाटेत मासळी बाजार लागला. तिथे ही तोबा गर्दी. नुसती झुंबड उडालेली. जिकडे तिकडे आरडाओरड. सगळेच तारस्वरात बोलतायत. कुणाचा कुणाला पत्ता नाही. अन अशा गदारोळात मुल्ला अचानक खाली बसला आणि अंथरायला काही मिळतंय का शोधू लागला.

त्याच्या आजूबाजूची माणसं चक्रावली. या बाबाला काय झालं म्हणून विचारू लागली.
तर मुल्ला म्हणाला,
'नमाज का वक्त हो चला है, उसीका इंतजाम कर रहा हूँ!'
'आपको कैसे पता चला नमाजका वक्त हो रहा है?'
'क्यूँ? मस्जिदसे अजानकी आवाज नहीं सुनाई पडी?'
'मुल्लाजी, यहाँ अपने बाजूवाला क्या बोल रहा है सुन नहीं सकते इतना शोरगुल है, आपको कोसो दूर मस्जिदकी अजान कहाँसे सुनाई दी?'

मुल्ला उठून उभा राहिला. खिशातून एक नाणे काढले. टॉस करावे तसे हवेत उंच उडविले. बाजाराच्या थंडगार दगडी फरशीवर नाणे टणकन आपटले आणि त्याचा खणखणीत आवाज सगळीकडे घुमला. रणधुमाळी माजलीये असं वाटणाऱ्या बाजारात क्षणात स्मशानशांतता पसरली. साऱ्या माना आवाजाच्या दिशेने वळल्या. सगळेच आपापले खिसे चाचपून बघत भिरभिरत्या नजरेने पडलेल्या नाण्याचा शोध घेऊ लागले.   

...आणि या अचानक स्तब्ध झालेल्या बाजारात मुल्लाने दिलेले उत्तर बराच वेळ रेंगाळत राहिले... 

'बेटा, आवाज वोही सुनाई देती है जहाँ ध्यान लगा हो...!' 

-------------------------------------------------------

गोंगाटाला नसतोच धर्म
चिथावणीचा कुठला रंग,
कायद्याचा होवो न होवो
समरसतेचा होतोच भंग !

संवेदना जाणीवा हव्या
नको वेगळे सायलेन्स झोन्स,
शांततेला हवे सूज्ञ अन्
नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्स !

आतला आवाज ऐकण्यास
गोंगाट करायला हवा म्यूट,
समजून घ्यावे अर्थकारण
बाकी 'राज'कारण सारे झूट !

रविवार, ३ एप्रिल, २०२२

अनमास्क...!

माणसाने विषाणूच्या सावटाखाली जगण्यास आज दोन वर्षे पूर्ण झाली आणि दोन वर्षांपूर्वी २५ मार्च २०२०च्या चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्यास लिहिलेल्या उमेद या पोस्टमध्ये, 'कास्ट अवे' सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या माध्यमातून व्यक्त केलेली 'तुझे आहे तुजपाशी...' ही शहाणीव आणि 'हेही दिवस जातील...' हा आशावाद आज फलद्रुप होतांना दिसतो आहे. 'शुरुआतका कोई अंत नहीं...' या उमेदीने पुन्हा नव्याने सुरवात करतांना, 'मास्क'चे निर्बंध हटविलेच आहेत तर मोकळ्या हवेत भरभरून श्वास घेताना आणि करोनाने मोह-मायेचे क्षणभंगुरत्व सिद्धच करून दाखवले आहे तर या नव्या अंतर्ज्ञानाच्या प्रकाशात सारेच मुखवटे टाकून द्यायला जमतेय का बघू या...?

निदान प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे मी म्हणतो...
जमेलही हळू हळू कुणी सांगावे... काय..?


उदंड झाले रे सोस
माणूस थकला जीव
शिकला धडा मोलाचा
पिंडीत शोधतो शीव...

आता आणि मोह नको 
नको मायेचा पसारा 
जमवले गमवले
कोरा झाला पट सारा... 

भय भेद भ्रम भ्रांत
सारेच लयास जावो
आराधना हो सफल 
आराध्य साऱ्यांना पावो... 

प्रश्नांच्या गर्तेस मिळो
उजळ मार्गाचा फाटा
फिटो जाळे निबिडाचे
दिसू दे प्रकाशवाटा... 

नवी आशा नव्या दिशा
स्वप्ने पाहू पुन्हा नवी
चिंतामुक्त जगण्यास
फक्त नवी उर्मी हवी...!

रविवार, १३ मार्च, २०२२

जयाजयौ...?


पराकोटीची लालसा 
स्वार्थाची परिसीमा
भेदाभेद पवित्र
एकाएकी... 
 
मायावी लौंदांची
रोजच सुंदोपसुंदी 
माणुसकीची हार  
पदोपदी...  
 
व्यक्तिपूजा साकार
जयघोष नामाचा  
नामाचा गजर
सर्वभरी...  
 
बळी तो कान पिळी 
सत्तेपुढे सचोटीची   
तत्व अन् मूल्ये
धारातीर्थी... 
 
कुणा हाती झाडू 
कुठे दाती तृण  
विवेक विचार 
त्यागलागी... 
 
बुडतां हे जन  देखवे डोळां
'तुका म्हणेहेच सत्य 
बाकी सत्योत्तर 
मनमानी !