मंगळवार, २५ जुलै, २०२३

शिरिषासन...!

बरोब्बर ५ वर्षांपूर्वी ६ जून २०१८ ला शिरीष कणेकर सरांना याच ठिकाणी त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या, त्यांच्याबद्दल इतक्या लवकर असं काही लिहावं लागेल असं दु:स्वप्नातही वाटलं नव्हतं. अर्थात कालाय तस्मै नमः म्हणून साऱ्याच गोष्टी पचवाव्याच लागतात. अलीकडेच लिहिले तसे, घेतलेला श्वास सुद्धा धरून ठेवता येत नाही, आवडत्या गोष्टीही त्यागाव्या लागतात, एवढेच काय, प्राणपणाने जपलेल्या आणि साऱ्यांचा रोष पत्करून घट्ट धरून ठेवलेल्या तत्त्वांना देखील मुरड घालावी लागते तर आवडती माणसं कशी धरून ठेवता येणार...?

ज्या माणसांनी आपलं आयुष्य केवळ सुसह्यच नाही तर समृद्ध केलं आणि आपल्या नेहमीच्या 'पाणक्या'च्या जगण्याला काही क्षण का होईना 'चाणक्या'च्या अविर्भावाची झळाळी दिली त्यांच्या जाण्याचा त्रास होणे स्वाभाविक असले तरी, त्यांनी आपल्या आयुष्यात येऊन अजरामर करून ठेवलेल्या क्षणांचे आणि केव्हाही त्यांच्या सहवासाचा लाभ घेता येईल अशा शब्दरूपी खजिन्याचे सान्निध्य-सौख्य नाकारून कसे चालेल?

कणेकर सरांबद्दल लिहिण्यासारखे अजूनही खुप काही असले तरी, त्यांच्या एकूणच मिश्किल, खोडसाळ, 'लगाव बत्ती' म्हणत 'चहाटळकी' करणाऱ्या लिखाणात त्यांनी कधीतरी असे जे गंभीर, आत्मचिंतनपर लिहिले ते 'मना'ला जास्तच भिडले. आता ते 'ये हृदयीचे ते हृदयी...' या तादाम्यामुळे की त्यातील 'करुणे'च्या स्पर्शाने ते सांगता नाही येणार! 

'डॉ. कणेकरांचा मुलगा'मध्ये त्यांनी आठवण सांगितली की त्यांचे वडील त्यांना म्हणायचे, 'मिस्टर शिरिष, एवढं लिहिता तुम्ही, पण वाचतं का कुणी?' याच आत्मकथनात त्यांनी लिहून ठेवलयं - 'डॉ. कणेकरांचा मुलगा एवढीच माझी आयुष्यभर ओळख राहिली आणि एवढी ओळख मला एका आयुष्याला पुरली देखील...!' 

आयुष्यात भेटलेल्या माणसांबद्दल, मित्रांबद्दल ते लिहितात, ‘देवानं नामी नग जन्माला घातलेत. मला त्यांचा आणि त्यांना माझा सहवास घडवून देवानं आमच्यावर अनंत उपकार केलेत. आम्ही सगळे मिळून जगात धुमाकूळ घालीत असू. देवाच्या सर्कशीतले आम्ही विदूषक आहोत. आम्ही हसवतो. आम्हांला हसतात. आम्ही अश्रूंना पापण्यांवर रोखून धरतो. घुसखोरी करू देत नाही. आम्हांला इरसाल म्हणा, वाह्यात म्हणा, नग म्हणा... आयुष्याचं ओझं वाहण्यासाठी असे साथीदार हवेत.’      

आणि शेवटी, जिवंतपणी आपल्या मृत्युलेखाची कल्पना करणारा हा अवलिया लिहून ठेवतो...

"माझा एपिटाफ लिहायचा झालाच तर लिहा की प्रत्यक्ष मरण येण्यापूर्वी हा माणूस खुप आधीच मेला होता, फक्त ही गोष्ट त्याने जगापासून लपवून ठेवली..."  

शिरीष कणेकरांना श्रद्धांजली वैगरे लिहिणे फारच अवघड वाटते तेंव्हा, '...तुझिया जातीचा मिळो आम्हां कुणी...' आणि 'तुमचा वसा आम्हां मिळो, सांभाळता येवो...' या प्रार्थनेपलीकडे फार काही लिहवत नाही...

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः। 
न चैनं क्लेदयन्त्यापो 
न शोषयति मारुतः।I

शिरीष कणेकर सरांबद्दल आंतरजालावरील काही दुवे :  

https://www.saamana.com/author-journalist-shirish-kanekar-80th-birthday-on-6-june/
https://eetyadee.blogspot.com/2018/06/102-not-out.html
https://www.esakal.com/saptarang/atul-parchure-write-article-saptarang-121107
https://prahaar.in/the-name-shirish-kanekar-is-enough/
https://www.esakal.com/saptarang/miliind-ghangrekar-wrtie-article-saptarang-121095
https://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118327.html?1161380086
http://shireeshkanekar.blogspot.com/
https://en.wikipedia.org/wiki/Shirish_Kanekar

गुरुवार, २० जुलै, २०२३

'सुशि'...!




११ जुलै ला 'सुशि'ला जाऊन २० वर्षे झाली. 

काल 'दुनियादारी' या संजय जाधव यांच्या मराठी चित्रपटाला १० वर्षे झाली. 

'वाढत्या' वयामुळे काळ फारच भरभर सरकतो आणि 'रात ढल जाये पर दिन ना जाये...' अशी परतवारीची प्रचिती प्रबळ होत राहते. अगदी कालच लिहिल्यासारखी वाटणारी 'दुनियादारी' ही पोस्ट आज दहा वर्षांची झाली. ही पोस्ट लिहिण्याचे निमित्त ठरलेल्या दिपक दादा आणि, आज याची आठवण करून देऊन 'इगो-वाईज'वरील या पोस्टचा दुवा 'इत्यादी'वर देण्याचे निमित्त ठरलेले सहकारी डॉ. नितीन जाधव, यांचे 'मना'पासून आभार ! 

खरं तर सुशिच्या 'समांतर'वर वेबसेरीज बनविण्याचा सतीश राजवाडेंचा धाडसी प्रयोग कसा 'सम अंतर'च राहिला आणि प्रेक्षकांशी सोडा, कथेशीही तादात्म्य कसा पावू शकला नाही या वरही एक पोस्ट लिखना बनता है. पण असे प्रयोग, ज्यांना 'सुशि' नावाचे गारुड काय आहे याची कल्पनाही नाही त्यांना 'सुशि'ची निदान तोंडओळख होण्यासाठी 'निमित्तमात्र' ठरतेय म्हणतांना अशा धाडशांचे (खलाशांच्या धर्तीवर) स्वागतच करायला हवे.  

समग्र 'सुशि' समजणे येरागबाळ्याचे काम नोहे आणि ते 'जाता... येता' इतके सहजसाध्यही नव्हे, नुसतीच 'लटकंती' व्हायची ! तरी 'सुशि'च्या रेंजची साधारण 'झलक' मिळण्यासाठी वाचायची पुस्तके:
१. दुनियादारी (उपरोल्लेखित चित्रपट पाहणे हा पर्याय नाही!)
२. समांतर (पहा: वरील सूचना, वेब सिरीज नव्हे!)
३. तलखी 
४. कल्पांत 
५. लटकंती 
६. दास्तान
७. वास्तविक       

'सुशि'ला लौकिकार्थाने ऐहिक जगातून जाऊन २० वर्षे झाली असली तरी त्याचे निकट सान्निध्य जाणवून देतो तो त्याने मागे ठेवलेला 'खजिना'. मनावर 'क्रमशः' 'बरसात चांदण्याची' करीत 'क्षण क्षण आयुष्या'तले 'मूड्स' आणि 'शेड्स' सांभाळीत 'असीम' 'अंमल' करणाऱ्या आणि कठीणातल्या कठीण प्रसंगीही 'हाSत तिच्या' 'एवरीथिंग... सोSसिम्पल' वाटेल असा 'माहौल' बनविणाऱ्या 'उस्ताद' सुशि नावाच्या 'मानवाय तस्मे नमः' असाच भाव 'सुशि'च्या चाहत्यांच्या 'मना'त 'कणा कणाने' फुलत राहतो...

किशोरदा, अमिताभ पासून नवाज, सचिन पर्यंत, जे 'आपले' वाटतात त्यांचाबद्दलच्या स्नेहादरात कुठेही कसर न करताही ज्यांचा, मानभावी आदरपूर्वक उल्लेख टाळून, सहजभावाने एकेरी उल्लेख होतो त्या यादीत 'सुशि'चे स्थान केवळ उच्चच नाही तर अढळ ! 'आदरणीय सुहास शिरवळकर' असे म्हणणे म्हणजे, बायकोला 'हर हायनेस' किंवा 'माय लॉर्ड' संबोधीत वेडावून दाखविल्यासारखे कर्णकटू वाटते. किशोर जसा आपला, सचिन जसा आपला तसा 'सुशि'ही आपलाच. या लोकांचे आपल्या मनातील स्थान आणि वय दोन्ही अबाधीत, जणू गोठवून (आणि साठवूनही) ठेवलेले... कालजयी !

तेंव्हा 'सुशि'चा मुलगा असला तरी श्री. सम्राट सुहास शिरवळकर यांचा नुकताच झालेला परिचय हा त्यांना थेट अरेतुरे करण्याइतपत मुरलेला नसल्याने तिथे संस्कार आडवे येतात. यांवर खुद्द 'सुशि' काय म्हणाला असता यावरचे कट्टामंथन उद्बोधक ठरावे. तेही 'सुशिप्रेमेच्छा बलीयसी...!' या लघुसूक्तानुसार लवकरच घडेल ही अपेक्षा !

सुशिच्या संपूर्ण लेखनसूचीसाठी हा ब्लॉग पहा:
http://suhasshirvalkar.blogspot.com/

रविवार, ९ जुलै, २०२३

चातक...?


इष्क-विष्क, दिल-मोहोब्बत, प्यार-व्यार आणि ह्रदय पिळवटणारी वेदना यांच्या खालोखाल (किंवा बरोबरीने), 'पाऊस' हा संवेदनशील कविमनांचा कदाचित सर्वात लाडका विषय असावा. शिवाय या भावनांचा ओलावा रसिकाच्या थेट काळजाला भिडण्यासाठी पावसाचा जो मुक्तहस्ते वापर होतो, तो जमेस धरता, काव्यप्रेरणेच्या विषयात पावसाने पहिला नंबर काढायला हरकत नसावी. सन्माननीय, प्रथितयश कवीश्रेष्ठांपासून, प्रत्येक पहिल्या पावसात कावळ्याच्या छत्री टाईप उगवणाऱ्या, 'कवी काय म्हणतो...' अशा अविर्भावाच्या हौशी कवींपर्यंत, पावसाला विषयवस्तू बनविण्याचा मोह कुणालाही टाळता आलेला नाही. या साऱ्या कवितांची नोंद घ्यायची म्हटली तर खंड-काव्य-सूची करायला लागेल आणि त्या प्रबंधासाठी ही जागा आणि व्यासंग दोन्ही अपुरे पडतील.

अलीकडे साऱ्याच गोष्टी बेभरवशाच्या, अनियमित आणि तऱ्हेवाईक झाल्या असल्याने पावसालाही त्याची लागण झाल्यास नवल नाही. 'नेमेचि येतो मग पावसाळा...' हे 'सृष्टीचे कौतुक' आता केवळ छापील ओळीतूनच शिल्लक असल्याने आणि 'बाळा'ने आपले वेगळ्याच विषयातील कुतूहल शमविण्यासाठी भलत्याच मार्गांची निवड केली असल्याने त्याला कसलेच कौतुक वाटणे कधीच बंद झाले आहे. त्याला आता फक्त 'वॉव मोमेंटचे क्रेव्हिंग' असते, यु नो !

अशा परिस्थितीत, कितीही पारंपरिक, संस्कृतीजन्य आणि 'अभिजात' असले तरी, 'ये रे ये रे पावसा...' ला रिटायर होण्याशिवाय पर्याय नाही. पण त्यामुळे पोकळी वैगरे तयार होण्याचे कारण नाही, आजच्या अत्याधुनिक जीवनशैलीत, लोकल-मेट्रो-बस पासून मंदिर-शाळा-हॉटेल साऱ्या ठिकाणी पुढच्याला हुसकावून आपला नंबर लावण्याची इतकी 'चढा'-'ओढ' आहे की शहरात कुठेही ब्रिथिंग स्पेसही शिल्लक नाही याचा प्रत्यय पदोपदी येतो. बऱ्याच अर्बनाईट्सना तर पाऊस ही अनावश्यक कटकट वाटते, बघा: सौमित्रची कविता - 'त्याला पाऊस आवडत नाही...'

तर मुद्दा असा की प्रत्येक पावसाळ्यात पाऊस या विषयावर कवितांचा अक्षरश: पाऊस पडतो पण सगळ्याच कविता 'मना'ला भिडतात, पापणी भिजवतात किंवा हृदय ओलावतात असे नाही. सवडीने निवड करू म्हटलं तर ऋतू बदलून गुलाबी थंडीच्या कवितांचा सिझन उगवायचा ! पण सन्मित्र प्रसादने पाठविलेल्या या कवितेने काही घाव ताजे केले आणि बऱ्याच जुन्या जखमा नव्याने भळभळू लागल्या. 'गेले ते दिन गेले...' ची आर्त जाणीव अधिक गहिरी करणाऱ्या आणि दाहक वर्तमानाच्या वास्तव चित्रणाबरोबर, भविष्यातील धोक्यांचे सूचन करणारी ही कविता.

अत्यंत बारकाईने शोध घेऊनही, सदर कवितेमागील भावना आणि तिचे प्रत्ययकारी सृजन करणाऱ्या दार्शनिक कविमनाचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. एक अगदीच क्षीण दुवा सापडला तो फेसबुकावर Unofficial: Poetry या पेजवर पण तिथेही विश्वासार्ह, सप्रमाण नामोल्लेख आढळत नाही. प्रत्येक कलाकाराला त्याच्या कलाकृतीच्या श्रेयसौजन्याचं भाग्य लाभतच असं नाही आणि त्यामुळे त्या कलाकृतीच्या रसास्वादनात काही उणीव राहते असंही नाही, पण त्या काव्यानुभवात चिंब झाल्यावर मनाच्या तळाशी राहते ती, ...मऊ पिसांच्या सात थरांच्या गादीवर झोपतांना, त्याच्या तळाशी असलेला इवलासा मोती टोचणाऱ्या राजकन्येच्या टोचणीसारखी... त्या अदृश्य निर्मात्याला जाणून घेण्याची हुरहूर ! 

काही समजले तर जरूर कळवा, चातकाप्रमाणे वाट पाहतोय...! 

पाऊस

चोचीने कोरले नखांनी ऊकरले
तरी जमिनीत झरा लागत असे,
व्याकुळलेल्या जिवांची पूर्वी
सहज तहान भागत असे !

'येरे येरे...' म्हणताच
पाऊस येत असे मोठा,
त्यालाही ठाऊक असे
पैसा आहे खोटा !

पैसा खोटा होता तरी
माणूस मात्र खरा होता,
प्रत्येकाच्या काळजात
जिव्हाळ्याचा झरा होता !

'ये गं ...ये गं' म्हणताच
सर यायची धावून,
चिमुकल्यांच्या मडक्याला
तीही न्यायची वाहून !

एकदा पाऊस आला की
मुक्कामी राहत असे,
निघून जा म्हटलं तरी;
मुद्दाम जात नसे !

हल्ली 'येरे येरे...' म्हटलं तरी
पाऊस साद देत नाही,
ख-या पैशालाही
मुळीच दाद देत नाही !

कत्तल केली जंगलांची
पशू-पक्षी राहिले नाही,
जमिनीला भोसकताना
मागेपुढे पाहिले नाही !

हौद हरवले गुरांचे
पाणपोई दिसत नाही,
बाजार मांडलाय पाण्याचा
ह्यावर विश्वास बसत नाही !

कॅन, बाॅटल, टँकर आले
मडके केंव्हाच फुटले,
कशी येणार सर धावून
नाते आपुलकीचे तुटले !

कुठे राहिली ओढ्याला
सांग बरं ओढ ?
कितीही प्रगती केली विज्ञानाने
पाऊस होतो का डाऊनलोड ?

तुझ्या स्वार्थासाठी
पाऊस येईल तरी कशाला ?
तुझ्यामुळेच कोरड पडली
नदी-विहिरीच्या घशाला !

तूच भोग तुझी फळे
फेड तुझे तूच पातक,
बघ कसा शाप देतोय
तहानलेला चातक !

- अनामिक

रविवार, २ जुलै, २०२३

उष:काल होता होता...?


बरोब्बर एक वर्षांपूर्वी लिहिलेल्या '...हम नहीं तोडेंगे?' या 'ये दोस्ती...?' च्या उत्तरार्धाचा तिसरा अंक लिहिण्याची वेळ इतक्या लवकर येईल अशी कुशंकाही 'मना'ला आली नव्हती. 'वर्षभरात मूलबाळ झालं नाही म्हणून तुमची मुलगी नांदवत नाही...' असं म्हणणाऱ्या पारंपरिक खाष्ट आणि नेमस्त आक्रस्ताळ्या सासवा हल्ली सीरियलमध्ये सुद्धा न दाखविण्याइतका महाराष्ट्र नक्कीच पुरोगामी झालाय. त्यामुळे, आधी नाकारलेल्या गर्लफ्रेंडशी मुलाचे लगोलग दुसरे लग्न लावून, अजून संसारात नीटशा न रुळलेल्या सुनेला सवत आणण्याचा खटाटोप तर विचारांनी गतानुगतिक आणि जीवनशैलीत अत्याधुनिक अशा सोशलमिडिऑकर सासवा देखील करणार नाहीत... अगदी मालिकांमध्ये सुद्धा ! तशी केवळ कल्पनाच नाही तर लगे हातो कृती देखील करून मोकळ्या झालेल्या महाराष्ट्र शासनाला आता कुणीही, 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...?' विचारण्याचे धाडस करू नये. याहून अधिक झोपमोडीचे, स्वप्नभंगाचे आणि कुठंही पोहचण्याचे भोग समृद्ध, प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या नशिबी असू नये.

कहानीमें ट्विस्ट असा आहे की या लोकांनी केवळ कथा, पात्र आणि विषयच नाही तर अख्खा सिनेमाच बदलून टाकलाना राव ! आम्ही हिंदी 'शोले' म्हणून जो समजून घेण्याचा अटोकाट प्रयत्न करत होतो तो यांनी रविवारच्या भर दुपारी मराठी 'सिंहासन' करून टाकला ! चव्वेचाळीस वर्षांपूर्वी अरुण साधू यांच्या 'मुंबई दिनांक' व 'सिंहासन' या कादंबऱ्यावर आधारित विजय तेंडुलकरांनी लिहिलेला आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला 'सिंहासन' हा चित्रपट केवळ अभिजातच नाही तर अजरामर आहे आणि यातील 'दिगू' हा सप्तचिरंजीवांनंतर जन्मलेला आठवा चिरंजीव आहे हे आज महाराष्ट्राच्या राजकारणाने सिद्ध केलं !

या निमीत्ताने रुमीची एक गोष्ट आठवली...

काहीच कारण नसतांना उंटाची आणि कोल्ह्याची दोस्ती जमली. दोघे आता पोटापाण्यासाठी सोबतच हिंडू लागले. जंगलात भटकतांना आपापल्या आहारानुसार आणि पचविण्याची ताकदीनुसार अन्न शोधू लागले. एकदा उंटाने मन वर करून बघितले तर त्याला नदीच्या पलीकडे उंचच उंच उगवलेले उसाचे शेत दिसले. ऊस दोघांना अतिप्रिय असल्याने त्यांनी पलीकडे जाऊन मेजवानी झोडाण्याचा बेत आखला.

कोल्ह्याला पोहता येत नसल्याने त्याने उंटाला विनंती केली की उंटाने त्याला पाठीवर घेऊन नदी पार करून द्यावी. दोस्तीखातर एवढे करणे काही फार मोठे काम नसल्याने उंटाने सहज कोल्ह्याला पाठीवर बसवले आणि नदी ओलांडली. दोघे उसाच्या शेतात शिरले आणि मनसोक्त चरले. पोटभर ऊस खाऊन झाल्यावर कोल्ह्याला कोल्हेकुई करण्याची हुक्की आली. त्याने सुरवात करताच काकुळतीला येऊन उंट म्हणाला, 'मित्रा, तू हे काय करतोयस...? अशाने उसाच्या मालकाला जाग येईल आणि तो आपल्याला बदडून काढेल !'

कोल्हा आपल्याच तंद्रीत असल्याने उंटाला म्हणाला, 'जेवण झाल्यावर कोल्हेकुई करण्याची माझी सवय आहे त्याला मी काय करू? तसे केल्याशिवाय माझा जेवणाचा आनंद पुरा होत नाही...!' आणि त्याने सूर लावला. त्याच्या आवाजाने शेतकरी लाठ्या-काठ्या घेऊन धावत आले. त्यांना बघून कोल्ह्याने पळ काढला आणि झुडपांमध्ये लपून बसलं.. उंटाला न पळणे शक्य होते न लपणे. शेतकऱ्यांनी उंटाला चांगला चोप दिला आणि शेतातून हुसकावून लावले.

संध्याकाळ होत आली तशी जंगलाकडे परतण्याची वेळ झाली. आता कोल्ह्याला उंटाची विनवणी करण्याशिवाय पर्याय नव्हता. तो खजील चेहऱ्याने उंटाला म्हणाला, 'मित्रा, माझ्याकडून चूक झाली खरी, पण आपली दोस्ती सच्ची असली तर तू मोठ्या मनाने मला नक्कीच माफ करशील आणि मला आपल्या पाठीवरून नदी पार करून जंगलात परत नेशील, हो ना?'

मोठ्या मनाचा उंट म्हणाला, 'हो तर! आपण पक्के मित्र आहोत, मी तुला असा एकटाच सोडीन होय? चल बैस माझ्या पाठीवर !' आणि दोघे जंगलाकडे परत निघाले. नदीच्या प्रवाहाच्या मधोमध आल्यावर उंट अचानक खाली बसू लागला आणि कोल्ह्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले आणि तो गटांगळ्या खाऊ लागला. कसाबसा जीव मुठीत धरून तो उंटाला म्हणाला, 'मित्रा, तू हे काय करतोयस? अशाने माझा जीव जाईल ना !'

उंट म्हणाला, 'माफ कर, मित्रा, मी तुला सांगायचे विसरलो, जेवण झाल्यावर पाण्यात डुंबायची मला सवय आहे, तसे केल्याशिवाय मला जेवल्याचे समाधान मिळत नाही...!'

----------------------------------------------------------------------------------------------------

उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला, महाराष्ट्राने रविवारच्या दुपारच्या झोपेचे खोबरे करून घेऊन एका अजब सोहळ्यात 'गुरुची विद्या गुरूला...' याची याची देही याची डोळा प्रचिती घेतली एवढाच काय तो या साऱ्या जांगडगुत्त्याचा अन्वयार्थ...

छत्रपती ते बाळासाहेब, साऱ्यांच्या आत्म्यांस शांती लाभो...
---------------------------------------------------------------------------------------------------