शनिवार, ११ एप्रिल, २०२०

माया...?



नारदमुनींनी एकदा कृष्णाला विचारले, प्रभूमाया म्हणजे हो काय...?’
सुहास्यवदन कृष्ण प्रश्न टाळून हलकेसे स्मित करता झाला.
याला मायावी म्हणतात ते उगीच नाही!’नारद मनी म्हणाले.

काही दिवस गेले आणि नारदांना कृष्णाकडून वनविहारचे आमंत्रण आलेप्रत्यक्ष कृष्णाच्या आमंत्रणाने हरखून गेलेल्या नारदमुनींच्या मनात कुठलाही संदेह उमटला नाहीमोठ्या उत्साहात नारद श्रीकृष्णासोबत प्रसन्न चित्ताने वनविहाराला निघाले

बघता बघता नगर मागे पडले आणि घनदाट जंगल सुरू झालेसूर्य माथ्यावर आलाकृष्ण एका झाडाखाली विसावला आणि श्रमाने दमल्या आवाजात म्हणाला,
नारदाउष्मा खूपच वाढलाय आणि माझ्या घशाला कोरड पडली आहेकुठे पाणी मिळते का बघतोस?’
देवातुम्ही इथे विश्राम कराजवळच झऱ्याचा आवाज येतोयमी पळभरात पाणी घेऊन हा आलोच.’
आणि नारद आवाजाच्या रोखाने झऱ्याच्या शोधात निघाले.

जवळच भासणारा आवाज हळूहळू लांब जाऊ लागला आणि चालण्याचा वेग वाढवून नारद जंगल तुडवत धावू लागलेबराच वेळ धावल्यावर नारदांचा श्वास फुलला आणि आता अधिक धावणे शक्य नाही असे त्यांना वाटते न वाटते तोच निबीड वाटणारे अरण्य अचानक संपले आणि एक छोटेसे टुमदार गांव लागलेगावातल्या पहिल्याच घरच्या दारावर नारद थांबले आणि तहानेने कासावीस झालेल्या जीवाला शांत करण्यासाठी पाणी मागावे म्हणून दारावर थाप मारून दार उघडण्याची प्रतीक्षा करू लागले.

थोड्याच वेळात एक अत्यंत रूपवती तरुणीने दार उघडले आणि हा कोण अभ्यागत अशा विचारात ती कमरेवर हात ठेऊन उभी राहिलीतिच्या त्या लावण्याने आणि मोहक विभ्रमांनी संमोहित झालेल्या नारदांना आपल्या तहानेचा पूर्ण विसर पडला आणि ते त्या युवतीशी बोलण्यात मश्गुल झाले.

उन्हं कललीदिवस सरला आणि शेतावर गेलेला तरुणीचा बाप घरी परतलापाहतो तर कुणा वाटसरुशी मुलगी बोलत उभी आहेबापाने पाहुण्याला घरात बोलावलेविचारपूस केली आणि आता अंधाराचे पुढे जाणे ठीक नाही म्हणून दोन घास खाऊन रात्रीला मुक्काम ठेऊन सकाळी उजाडल्यावर मार्गक्रमण करण्याची सूचना केलीनारदांना ही कल्पना फारच आवडल्याने त्यांनी तत्काळ स्वीकारली.

दुसरे दिवशी भल्या पहाटे उठूनप्रातर्विधी आटोपून शेतकरी आपल्या शेतावर गेला आणि नदीवर स्नानसंध्येला गेलेले नारद सर्व आटोपून शेतकऱ्याच्या घरी येऊन पुन्हा मुलीशी गुलूगुलू बोलत बसलेहाच दीनक्रम दोन-तीन दिवस चालला आणि पाहुणा हलण्याचे नाव घेत नाही म्हटल्यावर चार पावसाळे पाहिलेला शेतकरी काय ते उमजला.
माझी एकुलती एक मुलगीतिला जन्माचा जोडीदार मिळाला तर मला तरी आणखी काय हवेतुमचे लग्न लावून देतोरहा इथेच घरजावई म्हणून आणि माझं ओझं हलकं करा.’ म्हणाला.

नारदांना आपल्या कानांवर विश्वास बसेनाअगदी हर्षवायूच व्हायचा बाकी राहीला आणि शेतकऱ्याचा इरादा बदलण्याअगोदर नारद गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर उभे राहिले आणि त्यांचा सुखाचा संसार सुरू झालासासरेबुवांबरोबर रोज शेतावर जावेते सांगतील ते काम शिकावेकरावे आणि थकून घरी यावेजेवण झाल्यावर बायकोशी सुखदु:खाच्या चार गोष्टी करीत झोपी जावे असे सुखासीन आयुष्य चालले.

कालगतीनुसार संसरेबुवांना देवाज्ञा झाली आणि दरम्यान पाठीला पाठ लावून आलेली चार चिल्लीपील्ली अंगणात खेळू लागलीअशा सगळ्या सुखा-समाधानाच्या दिवसात २४ वर्षे उलटली.

...आणि एक दिवस सारे गाव रात्री झोपेत असतांना अचानक मोठा हल्लकल्लोळ माजलासारे वाट फुटेल तिकडे सैरावैरा धावू लागले. नदीला पूर आलानदीला पूर आला... धावाधावाजीव वाचवा...’ असा आरडाओरडा चहू बाजूंनी ऐकू येऊ लागलानारदांची सुखनिद्रा भंग झाली आणि भानावर येत त्यांनी हाती लागेल ते द्रव्यधान्यकपडेलत्तेदाग-दागिने गाठोडयात भरून बायको आणि चारही मुलांना घराबाहेर काढले आणि तेही इतरांसारखे जीवाच्या आकांताने धावू लागले.

बघता बघता पाणी वाढू लागले आणि हात धरलेला मोठा मुलगा हात सुटून पाण्याच्या प्रवाहात ओढला गेलात्याला वाचवायला म्हणून पाण्यात पाय टाकलेल्या बायकोच्या हातातला हात सुटून दुसरा मुलगाही एक मोठ्या लोंढयाने ओढून नेलाडोळ्यासमोर दोन मुलांना जलसमाधी मिळालेली बघूनबायकोचा हात अधिकच घट्ट धरून नारदांनी तिला बाजूला ओढले तर त्या हिसक्याने बायकोच्या कडेवरचे मूल पाण्यात पडले आणि प्रवाहाला लागलेया सर्व प्रकाराने हतबुद्ध झालेल्या नारदांनी एका झाडाच्या बुंध्याचा आधार घ्यावा म्हणून पाय टाकला तर तो नेमका खोलात पडून त्यांच्या कडेवरील मुलंही निसटले आणि तोल जाऊन भेलकांडत पुढे तोंडावर पडल्याने नारदांच्या हातून बायकोचा हातही सुटलानवऱ्याच्या आधारावर विसंबून बेसावध असलेल्या बायकोला खळाळत्या पाण्यात तोल सांभाळणे अवघड होत असतांनाच मागून आलेल्या लोंढयाच्या रेट्याने नारदांच्या बायकोला त्यांच्या डोळ्यासमोर प्रवाहात ओढून नेले!

या सगळ्या प्रकाराने भयचकित झालेल्या आणि दु:स्वप्नाप्रमाणे भासणाऱ्या या साऱ्या गोष्टींची संगती लावण्याच्या प्रयत्नातभकास चेहऱ्याने विमनस्क अवस्थेत कमरेपर्यंत पाण्यात उभ्या असलेल्या नारदांच्या कानी मृदू आवाजातले स्निग्ध शब्द पडले,

वत्सापाणी आणतोयस नाएक पळ की रे झाला...!’
-------------------------------------------------------------------------------------------

नारदांना माया म्हणजे काय हे दाखविणारा कृष्णकलियुगात आपल्याला तो वस्तुपाठ द्यायला करोनाच्या रूपाने आलाय कायया निमित्ताने मुळात जंगल तुडवत आपण हा प्रवास काकुठून आणि कशासाठी सुरू केला होता हे एकदा निवांतपणे तपासून पाहू या का...? आणि होमोहमाया त्यागूनअंगाला राख फासून वैराग्य वगैरे सामान्य माणसांचे काम नव्हे आणि संसारी माणसासाठी ते उचितही नव्हेतेव्हा दुसरे टोक गाठायची काहीच गरज नाहीगदिमांनी संत गोरा कुंभाराच्या रुपकातून दिलेला मोलाचा सल्ला मानला तरी पुष्कळ आहे... काय म्हणतात गदिमा?

तुझे रूप चित्ती राहोमुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दाससुखे करो काम!

लौकिक अर्थाने ऐहिकातून वानप्रस्थाला जाण्याची मुळी गरजच नाहीमायामोहाबद्दलची आसक्ती हळूहळू कमी करीत निरासक्त मनाने संसारातील विहित कर्म करित राहणे हाच वानप्रस्थाश्रमहे साधले तर नित्यकर्मही साधनेपेक्षा वेगळे नाही आणि अशा निर्विकार जगण्यातून क्षणोक्षणी मिळणारा आनंद हा मोक्षाहून निराळा नाही!

बघाआता करोनाच्या निमित्ताने तरी निर्विकार होणं पटतंय का…!

मंगळवार, २४ मार्च, २०२०

इष्टापत्ती...?


‘मिलॅनियम इयर’चा मान मिळालेलं २००० साल अनेक अर्थाने विलक्षण, वैशिष्ट्यपूर्ण आणि म्हणून संस्मरणीय ठरलं. या सहस्त्रकाच्या अंतिम वर्षाने ‘इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी’ अर्थात माहितीजालाच्या क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडवली आणि एका नव्या, माणसांस पूर्णपणे अज्ञात असलेल्या, वेगळ्याच विश्वाची दारे उघडून 'ग्लोबल व्हिलेज'ची झलक दाखवली आणि आधुनिक माणूस अधिकच बहिर्मुख झाला. याच वर्षी हॉलीवूडने जगाला एक नितांत सुंदर चित्रपट दिला – 'कास्ट अवे'. या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवले आणि ‘बेस्ट इनअॅनिमेट ऑब्जेक्ट’ (सर्वोत्तम अचल वस्तू) या, यापूर्वी कधीही न बघितलेल्या, श्रेणीचा पुरस्कारात अंतर्भाव करायला भाग पाडून इतिहास घडवला. या पुरस्काराचा पहिला, एकमेव आणि शेवटचा (अद्याप तरी!) मानकरी होण्याचे भाग्य लाभलेलं ‘विल्सन’ हे पात्र (?) समजून घेण्यासाठी 'कास्ट अवे' बघायलाच हवा. पण मुद्दा तो नाही, ‘कास्ट अवे’बद्दल बोलण्या-लिहिण्यासारखं खूप काही असलं तरी इथे त्याचा संदर्भ द्यायचा आहे तो माणसाने कालौघात हरविलेल्या अंतर्मुखतेसाठी.

‘कास्ट अवे’ची थोडक्यात कथा अशी की ‘फेडेक्स’ या जगविख्यात कुरियर कंपनीचे एक विमान पॅसिफिक समुद्रात कोसळते आणि फेडेक्सचा त्या विमानातील एक अधिकारी ‘चक नोलॅण्ड’ एका तराफ्याच्या आधार मिळाल्याने समुद्रात बुडून जलसमाधी मिळण्यापासून वाचतो आणि एका निर्जन बेटावर पोहोचतो. अस्वीकार – संताप – तडजोड – हतबलता – स्वीकार या मनोवस्थांच्या चक्रात अनादी अनंत भासणाऱ्या काळासाठी अडकलेल्या 'चक'च्या, वेळोवेळी बदलणाऱ्या मनस्थितीचे चित्रण, माणसांस ग्रासणारे षडरिपू आणि मोहविणाऱ्या नवरसांची अनुभूती देऊन जाते. त्या अर्थाने ही कलाकृती अभिजात आहे हे निर्विवादच, पण केवळ इतकेच नाही.

आजवर मी जितक्या वेळा हा चित्रपट बघतो त्या प्रत्येक वेळी मला नवीन काही समजते, उमजते. आणि कितीही वेळा बघितला तरी आणखीन एकदा पाहण्याची उर्मी जरा देखील कमी होत नाही. असे दुसऱ्या कुठल्याही चित्रपटाच्या बाबतीत सहसा घडत नाही. मग 'कास्ट अवे' मध्ये नेमके असे काय आहे?

हॉलीवूडच्या चित्रपटांच्या मानाने बरीच अधिक, साधारणपणे भारतीय चित्रपटांची असते तेवढी, म्हणजे अडीच तास लांबी असूनही हा चित्रपट लांबलेला तर वाटत नाहीच उलट, कुठलेही फाजील अंगविक्षेप आणि लिंगबदल केलेली हिडीस पात्रे यांच्या माध्यमातून विनोदनिर्मितीचा केलेला किळसवाणा प्रयत्न, भडक, उत्तान आणि कर्णकर्कश्श 'आयटम नंबर्स' आणि ‘लास्टची फाईट’ यांच्या भडिमाराशिवाय देखील एवढा वेळ कसा गेला याचा पत्ताही लागत नाही. याचे कारण आशयाचा आवाका, विषयाचा विस्तार आणि सादरीकरणातला प्रामाणिकपणा! पण याहूनही महत्वाची आणि विलक्षण गोष्ट म्हणजे त्यात सांगितलेल्या गोष्टीचा गाभा आणि विवेचनाचा अन्वयार्थ!

२० वर्षांपूर्वी प्रथम आणि गेल्या २० वर्षात असंख्य वेळा बघितलेल्या या चित्रपटाबद्दल मला नेहमीच असे वाटते की मनुष्य प्राणी अर्थात होमो सेपियन या सजीवाच्या ‘उगम, विकास आणि स्थिती’ची इतकी समर्पक, इतकी मर्मग्राही आणि तितकीच निरुपणात्मक कहाणी दुसरी असू शकत नाही. मॅश्लोने सुचविलेल्या माणसाच्या गरजांच्या मनोऱ्याचे इतके प्रत्ययकारी चित्रण आणि नाट्यरूपांतरण माझ्या पाहण्यात तरी दुसरे नाही. स्ट्रगल फॉर एग्सिस्टन्स अर्थात जगण्यासाठीची धडपड, जीवंत रहाण्याची अहमहिका ते अस्तित्वाचे प्रयोजन शोधण्याची जिज्ञासा या माणसाच्या आयुष्याच्या प्रवासाचे आदिम प्रेरणा ते आध्यात्मिक तितिक्षा असे अत्यंत प्रभावशाली आणि प्रबोधनकारी चित्रण म्हणजे 'कास्ट अवे'!

याच नवीन सहस्त्रकाच्या आरंभीच्या वर्षाने म्हणजे २००० सालाने प्रगत आणि संगणक साक्षर माणसाला एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले – सोशल मिडिया अर्थात समाज माध्यम! तसा १९९७ पासूनच ‘सिक्स डिग्रीज’च्या माध्यमातून सुरु झालेला हा प्रवास ओपन डायरी (१९९८), मायस्पेस/फ्रेंडस्टर/लिंक्डइन (२००३), ऑर्कुट (२००४) या मार्गाने २००५ साली ‘फेसबुक’च्या रूपाने प्रस्थापित झाला. आजच्या तारखेला अक्षरश: शेकड्याने असलेल्या समाज माध्यमांनी वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन अशा पारंपारिक माध्यमांना केवळ स्पर्धा दिली आहे असे नाही तर त्यांचा अवकाश संकुचित करण्यास सुरवात केली आहे. आज कुठलीही बातमी दुसऱ्या कुठल्याही माध्यमास समजण्यापूर्वी समाजमाध्यमावर दाखल होते आणि अक्षरश: निमिषार्धात व्हायरल होऊन लाखो, करोडो लोकांच्या हाती पडते.

व्हॉटस्अॅप या समाजमाध्यमाने फेसबुक या सर्वाधिक वापराच्या समाजमाध्यमाशी हातमिळवणी करून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे आणि आज प्रत्येक स्मार्टफोनधारकाकडे हे आयुध असणे क्रमप्राप्त झाले आहे. जनमानसातील या साधनाची लोकप्रियता आणि लोकांचे त्यावरील अवलंबित्व याची उपयुक्तता अत्यंत चाणाक्षपणे हेरून त्याचा ‘योग्य तो’ उपयोग करण्यात दोन समाजघटकांनी तत्परता दाखवली – जाहीरातदार विक्रेते आणि धूर्त राजकारणी! अर्थात नवमूल्यव्यवस्थेत आणि आधुनिक समाजरचनेत एकूणच (मूल्य?)व्यवस्था याच दोन ‘समाजधुरीणां’च्या हाती असल्याने या नव्याने सापडलेल्या सोयीस्कर आणि प्रभावी माध्यमाचे ‘उपयोजन’ त्यांनी ‘यथोचित’ पद्धतीने केले नसते तरच नवल!

मुळात सोशल नेट्वर्किंग अर्थात समाजातील व्यक्तींनी विविक्षित प्रेरणांनी, विशिष्ट उद्देशांनी आणि काही एक धोरणाने एकत्र येण्यासाठीचे एक व्यासपीठ आणि त्यातून घडणाऱ्या सामाजिक अभिसरणातून समाजाला काही उपयुक्त मूल्ये, सेवा मिळाव्या अशा समन्वयी विचाराने सुरु झालेला हा प्रवास आज ज्या अवस्थेत आहे ते केवळ चिंतनीयच नाही तर अत्यंत शोचनीय आहे. काही सन्मानीय अपवाद वगळता या माध्यमाचा उपयोग विधायक कारणांसाठी, लोकहिताच्या कार्यांसाठी, सकलजनहितार्थ तर राहू दे, निदान एका समाजाच्या, एका वर्गाच्या, एका व्यक्तीच्या का होईना भल्यासाठी केला जातो आहे असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरावे. एकमेकावर कुरघोडी करण्याची चढाओढ, युयुत्सु वृत्तीने केलेली स्पर्धा, सवंग लोकप्रियतेच्या नादाने आपल्या सुमार अभिव्यक्तीचे निलाजरे प्रदर्शन आणि या सगळ्यावर मात करणारे गलिच्छ राजकारण या पलीकडे या, अन्यथा अत्यंत प्रभावशाली, माध्यमाचा सदुपयोग क्वचितच होतांना दिसतो.

उण्यापुऱ्या २० वर्षांच्या आयुष्यात समाजमाध्यम या एका अतिशय प्रत्ययकारी ठरू शकणाऱ्या साधनाची संधीसाधूंनी जी अवस्था केली आणि त्याच्या मूळ उद्देशालाच केवळ हरताळ फासला एव्हढेच नाही तर त्याची ‘उपयुक्तता’ ज्या मार्गांनी आणि ज्या उद्देशांसाठी वापरली त्याने साधन-शुचिता तर विन्मुख झालीच पण अनेक विवेकी आणि सत्शील व्यक्तींना ‘सोशल मिडिया सुईसाईड’ अर्थात ‘समाजमाध्यम आत्महत्या’ करून या लोकाभिमुख व्यासपीठाकडे पाठ फिरवण्यास भाग पाडले. ‘कोण होतास तू, काय झालास तू...?’, ‘याजसाठी केला होता अट्टाहास...?’ आणि ‘नरेची केला किती हीन हा नर!’ असे सारे ज्यांच्याबद्दल एकाच वेळी वाटावे असे माध्यम(कु)कर्मी या, अन्यथा लोकशाहीस पोषक ठरू शकणाऱ्या, अत्यंत उपयोगी साधनाची जेवढी हानी करतात तेवढी दुसरे कुणीही ठरवून सुद्धा करू शकणार नाही. प्रगत अवस्थेतील माणसाने काय करू नये याचा वस्तुपाठ म्हणजे आजच्या अविवेकी समाजमाध्यमींची लाजिरवाणी अवस्था!अर्थात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गौरविल्या जाणाऱ्या मुख्य प्रवाहातील माध्यमींची अवस्था फार भूषणवाह किंवा कौतुकास्पद आहे असे मुळीच नव्हे पण तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे, तो असू दे...!

आज ‘कास्ट अवे’ आणि सोशल मिडीयाचा उदय-विकास-स्थिती या दोहोंचा एकत्र उहापोह करण्याचे प्रयोजन – करोना! जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या या विषाणूने दोन गोष्टी पुन्हा एकदा सिद्ध केल्या – फक्त निसर्गाने भाग पाडल्यास आणि केवळ मृत्युभयानेच माणूस ‘रॅट-रेस’मधून तात्पुरता पॉज घेतो आणि सदोदित ‘बाहेर’ भिरभिरणारी नजर ‘आत’ वळवून थोडा अंतर्मुखही होतो, हे एक. दुसरे म्हणजे ‘डेथ इज अ ग्रेट इक्विलायझर’ म्हणजे मृत्यु दारात उभा राहिल्यावर स्त्री-पुरुष, काळे-गोरे, उच्च-नीच, जाती-धर्म, गरीब-श्रीमंत, शोषित-शोषक, राजा-प्रजा सारे सारे भेद गळून पडतात आणि माणूस अत्यंत मुलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून अनावश्यक गोष्टींवर काट मारायला शिकतो. या दरम्यान, किती गोष्टी खरोखरच निकडीच्या आहेत आणि आपण किती अनावश्यक गोष्टींच्या मागे धावतो, त्या जमा करून आपल्याच गरजा विनाकारण किती वाढवून ठेवतो याचे त्याला जे क्षणिक भान आणि (दांभिक का असेना) विरक्ती येते, तो बोनस किंवा... बोधी!

या शिवाय आपल्या खऱ्या-खुऱ्या सुखाच्या जागा सापडायला मदत होते ते समाधान निराळे आणि... आत्मिक! या निमित्ताने, धूळ खात पडलेल्या पुस्तकांवरची धूळ झटकली जाते आणि आपला तरुणपणीचा फेव्हरीट लेखक नव्याने भेटतो... लहानपणी जे वाद्य वाजवतांना तहानभूक हरपून तंद्री लागायची त्यावरची गवसणी काढली जाते आणि ‘सूर तेचि छेडीता, गीत उमटले नवे...’ ची अनुभूती मनाला प्रसन्न करून जाते... कॉलेजमधील कवितांची वही आणि तिच्यातील खुण करून ठेवलेले पान मनावर मोरपीस फिरवून जाते तर वाळून गेलेल्या रंगपेटीत पाणी घालून रंगांना जीवंत करण्यात आणि नव्याने निसर्गचित्र रंगविण्यात वेगळीच समाधी लागते... पुरुषांना घरकाम करण्याचा, आपले पाककौशल्य दाखविण्याचा आणि स्त्रियांना वाचन-लिखाणाचा अवसर मिळतो.. आपल्या जिवलगांना मनसोक्त वेळ देता येतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरील निखळ आनंदाने आपलेच मन फुलून येते... एक ना दोन!

करोना व्हायरस जीवघेणा ठरू शकतो आणि त्याच्या विरुद्ध लढायला हवेच. या विषाणूला हद्दपार करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वास्थ्यकर्मींना त्यांच्या कामात शक्य ती मदत करणे, प्रोत्साहन देणे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्यच आहे आणि ते आपण जरूर करू या... फक्त एक विनंती आहे – त्या निमित्ताने मिळालेल्या निवांतपणाचा सदुपयोग करण्यासाठी ‘ये कहां आ गये हम...’ याचा विचार जरूर करावा आणि ‘ये वो मंजिल तो नहीं...’ असे, मनाच्या कुठल्याशा अंधाऱ्या कोपऱ्यात, जरी वाटले तरी त्या ‘मंजिल’चा, त्यासाठी ज्या मार्गावर चालतोय त्या मार्गाचा आणि त्यामागील अंत:प्रेरणेचा एकदाच, फक्त एकदाच फेरविचार जरूर करा... मी म्हणतोय म्हणून नव्हे, तुम्ही स्वत:ला तेवढे देणे नक्कीच लागता म्हणून. कारण आपण आपले मार्ग बदलले नाही तर निसर्ग सर्वशक्तिमान आहे आणि तो त्याचे निर्णय घ्यायला मुखत्यार आहे हे आपण पाहतो आहोतच...

अरे हो, एक सांगायचं राहीलच, ‘कास्ट अवे’ ज्याच्या कल्पनेतून जन्मला आणि जो त्यातील ‘चक नोलॅण्ड’च पात्र अक्षरश: जगला तो 'टॉम हॅन्क्स' आणि त्याची पत्नी 'रिटा विल्सन' करोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत आणि आत्ता ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यात सुधारणा होते आहे...! आणि हो, आता हाताशी वेळ आहेच तर या करोनाला इष्टापत्ती समजून टॉम हॅन्क्सचा ‘कास्ट अवे’ बघाल तेव्हा जमलच तर ‘जेम्स कॅमेरून’चा ‘द अॅबीज’ ही बघून टाका... मनात आणलं तर निसर्ग काय करू शकतो याची आणखी एक झलक...!

बाय द वे, २ जी, ३ जी, ४ जी या मालिकेतील ‘५ जी’च्या आगमनाचा करोनाशी संबंध आहे असेही एक गृहीतक मांडले जात आहे! नेचर्स वेज आर नेचर्स वेज...

शुभम भवतु!

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

राजनीती...?



दिल्ली विधानसभा २०२० निवडणुकांच्या ऐतिहासिक निर्णयाचे राजकीय अभ्यासकांचे विश्लेषण जे काही असेल ते असो, एक शांतीप्रिय, विवेकी, सुबुद्ध आणि जबाबदार नागरिक (याला आम आदमी म्हणावे असा आग्रह नाही!) या सर्व घटनाक्रमाकडे कसा बघतो आणि त्याचे या विषयीचे काय आकलन आहे हे पक्षीय राजकारणापलीकडे पाहू गेल्यास जे उमजते ते असे

१. समाजव्यवस्था विकसित झाल्यानंतर एका लोकाभिमुख शासन-प्रशासनाची जी गरज निर्माण झाली त्या गरजेचे मूळ हे किमान सोयीसुविधा पुरविणारी जीवनशैली, यथोचित आरोग्य सुविधा, चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि सार्वजनिक पातळीवरील सामान्य जीवनमान अर्थात सामाजिक सुरक्षा याहून अधिक नव्हते. शासनाकडून या आणि इतक्याच मूलभूत गोष्टींची पूर्तता व्हावी अशी जनसामान्यांची अपेक्षा असते. या बरोबर फारतर रोजगार निर्मिती, समान संधी, परस्पर पूरक बाजारपेठ आणि समायोजनी, जबाबदार प्रशासन यांची अपेक्षा असू शकते. या पलीकडे सामान्य माणसाला अधिक अपेक्षा नसतात त्यामुळेच तो प्रासंगिक प्रलोभनांना फार काळ भुलत नाही.

२. जगाला लोकशाहीची एक सुसूत्र आणि सटीक व्याख्या देणाऱ्या अब्राहम लिंकनच्या मते, तुम्ही सर्व लोकांना काही काळ बुद्दू बनवू शकता आणि काही लोकांना पूर्णवेळ फसवू शकता, पण सर्व लोकांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही. सामान्य माणसाच्या ज्या मूलभूत शहाणीवेवर गांधीजींचा आत्यंतिक विश्वास होता आणि ज्या विश्वासाच्या बळावर त्यांनी व्हॉट्सऐप, फेसबुक शिवाय एक प्रचंड नेटवर्क, केवळ उभचं नाही तर प्रवाही आणि कार्यरत केलं, त्याच समग्र आणि एकसंध शहाणीवेचा हुंकार म्हणजे लोकशाही... ती विजयी झाली. 

३. लोकशाही व्यवस्था हि निश्चितच एक परिपूर्ण परिसंस्था आहे आणि तिच्या गुणसूत्रांमध्ये सामान्य 'जन' किंवा सर्वसाधारण 'लोक' यांची स्पंदने जिवंत ठेवण्याची आणि टिपून घेण्याची एक अंतःस्थ शक्ती आहे. अतिरेकी, अविवेकी प्रचार, मतांचे जातीनिहाय, धर्माधिष्ठित ध्रुवीकरण, जनमानसाशी विपरीत अशा अतार्किक तथा असंबद्ध मुद्द्यांचा गाजावाजा आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेतील, मते विकत घेण्यापासून मते चोरण्यापर्यंतचे, गैरप्रकार या सगळ्यांना पुरून उरण्याची धुगधुगी लोकशाही व्यवस्थेत अद्यपी शिल्लक आहे याची या निमित्ताने आलेली प्रचिती हा मोठाच दिलासा. प्रजासत्ताकाच्या ७० वर्षांनंतरही देशाच्या साक्षात राजधानीमध्येही ६२.५९% एवढेच मतदान होणे हे चिंतनीय असले तरी निदान तेवढे तरी लोक मतदानासाठी उशिरापर्यंत रांगेत उभे राहतात आणि कुठल्याही भुलाव्याला, आमिषाला बळी न पडता आणि अत्यंत विपरीत परिस्थितीतसुद्धा आपल्या सद्सदविवेक बुद्धीला जागून मतदान करतात हेही नसे थोडके.

४. ‘लोकांना सर्व काही मोफत हवे असते आणि ते जो पुरवितो त्यास अनुमोदन देणे स्वाभाविकच आहे असाही एक विचार प्रवाह या निमित्ताने उमटतांना दिसला. हा केवळ हेत्वारोप म्हणून सोडूनही देता येईल पण त्याचे दूरगामी परिणाम आणि गांभीर्य बघता त्याचा प्रतिवाद करणे क्रमप्राप्त ठरते. या संदर्भात तूर्तास एवढेच प्रतिपादन पुरेसे ठरावे की मोफत देणारा जर जे ‘वाटायचे’ ते राजरोस वाटत असेल आणि त्यातील प्रत्येक पैशाचा हिशोब दाखविण्यास कचरत नसेल तर त्यात काहीही गैर (‘भ्रष्टाचार’?) आहे असे म्हणणे हा केवळ द्वेषमूलक पोटशूळ ठरावा, दूरदर्शी द्रष्टेपणा नव्हे. ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो’ अशी कळकळ दाखवणाऱ्यांनी, व्यापक जनहितासाठी स्वातंत्र्योत्तर काळात कुणी काय केले आणि त्याचे कालौघात काय झाले याचा जरूर धांडोळा घ्यावा.

५. लोकनेत्याचा मूळ विचार जर विधायक, सर्वव्यापी, आणि धारणाक्षम (शाश्वत नव्हे!) असेल, त्याचे धोरण जर सर्वसमावेशक, संतुलित आणि निष्पक्ष विकासाचे असेल आणि त्याला अभियांत्रिकी तथा व्यवस्थापनातील उच्च शिक्षणाचा आधार असेल तर सुशासनाचे एक प्रारूप केवळ शब्दात न रंगविता प्रत्यक्षात कसे राबविता येऊ शकते याचा वस्तुपाठ या निमित्ताने बघायला मिळाला. तो एकमेव किंवा बरोबरच असेल असे नाही आणि सदा सर्वकाळ योग्यच ठरेल असाही दावा नाही, परंतु तसाही विकल्प असू शकतो याचा उत्तम नमुना निश्चितच आहे.

शेवटी, वचननामा, जाहीरनामा, संकल्पपत्र आणि अशा इतर अनेक ‘आश्वासक’ शब्दांचे बुडबुडे हवेत उडविणाऱ्या आणि साम-दाम-दंड-भेद यापैकी कुठल्याही आणि प्रसंगी साऱ्याच कुटनीतीचा वापर करून ‘जिंकण्याची पात्रता’ या एकमेव निकषावर उमेदवारीच्या तिकीटांची खिरापत वाटत निवडणुकांभोवती केंद्रित झालेल्या राजकारणाला निडरपणे पण सभ्यतेची, सुशिक्षिततेची आणि सुसंस्कृततेची कुठलीही मर्यादा न ओलांडता प्रश्न विचारीत कुणी जर, ‘राजनीती बदलने आये है, जी!’ म्हणत ते वारंवार सप्रमाण सिद्धही करत असेल तर या सकारात्मक बदलाबद्दल, सर्व पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन, त्याचे अभिनंदन करणे हे देखील जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही व्यवस्थेतील स्वतंत्र देशाच्या सजग आणि जबाबदार नागरिकाचे कर्तव्यच आहे... नाही का?

राजधानीने घालून दिलेला धडा समजून घेऊन या खंडप्राय देशातील इतर राज्ये आणि त्या योगे संपूर्ण राष्ट्र तिचा कित्ता गिरवतील आणि लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी, निवडणूका जशा आणि ज्या मुद्यांवर लढवायला हव्यात तशा लढवतील ही अपेक्षा आणि आशा.

शुभम भवतु!

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

पक्षी...!



उडून जाता चित्रातील रंग
उरावी मागे धुरकट नक्षी...
काळाच्या फांदीवर तसे
आपण सारे क्षणांचे पक्षी...!

रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

हे मना...



हे वेड्या मना...
किती स्वप्ने अन किती कामना
शोध घेशी तू आपुलाच का मना?

भरकटणारी वाळवंटी रेंगाळते वाट अशी,
आपुल्याच दरियातली तृषार्त लाट जशी!
गूढ कसले आहे अन दुविधा ही कसली,
वाटते सावली आहे उभी समोर ठाकली...

अंत ओढवल्यागत काय काळजी वाटली,
सांग या रितेपणी कुणाची ओढ दाटली?
जगणे हरवलेले आणि जाणीव दु:ख काढते,
सारं शांत भोवती हृदयी धडधड का वाढते?


साऱ्याच वाटांवर काटे, 
अन स्वप्नील हृदयी वेदना...
व्याकूळ सारेच भोवताली 
तू का एकला मना...?

हे वेड्या मना...
किती स्वप्ने अन किती कामना
शोध घेशी तू आपुलाच का मना?

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

सन्मान...!


२७ जानेवारी, १६ ऑगस्ट आणि ३ ऑक्टोबर या तीन दिवसात काय साम्य आहे? या तीनही दिवशी वर्तमानपत्र नसल्याने आणि इतर कधी चुकून उशीर झालाच तरच आपल्याला पेपरवाल्याकाकांची आठवण होते आणि त्यांचा नंबर शोधावा लागतो. एरवी महिन्यातून फक्त एकदा बिलाच्या निमित्ताने त्यांची ओझरती भेट होते. त्यशिवाय हा, आपल्या अस्तित्वाची फारशी चाहूलही लागू न देणारा, समाजबांधव पहाटेच्या धुक्यात मूकपणे आपले कर्तव्य आत्यंतिक निष्ठेने पार पाडीत असतो...!


वृत्तपत्र विक्री हा उद्योग कुठल्याही पारंपारिक व्यवसायाच्या चाकोरीत न बसणारा, नोकरी या सदरात मोडू न शकणारा आणि समाजसेवा म्हणून मान्य न होणारा असल्याने; अन्यथा अत्यंत सुसंघटीत असलेल्या या कामगारांना असंघटीत कामगारांसाठीच्या तरतुदी, कायदे आणि योजनांच्या निकषात बसविणे हे तसेही अप्रस्तुतच ठरावे. सिक्स सिग्मा कार्यप्रणालीच्या निकषांवर गौरविल्या गेलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांपेक्षा आणि तातडीच्या सेवा, म्हणजे अग्निशमन दल, पोलीस दल, रुग्णालय किंवा केंद्र शासनाच्या डाक विभाग यांच्या अहर्निशं सेवामहेया ब्रीदात कणभरही कमी नसलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सामाजिक योगदानाची यथायोग्य दखल घेतली जातेच असे नाही. 


माझ्या क्षमता विकसनाच्या एका कार्यशाळेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा परिचय झाला आणि या संघटन-कुशल, हाडाच्या कार्यकर्त्यांनी लवकरच त्या परिचयाचे स्नेहात रूपांतर केले आणि आमचा स्नेहबंध दृढ होत गेला. वृत्तपत्र विक्रेत्यांना ज्या विपरीत परीस्थितीत आणि अपुऱ्या संसाधनांसह काम करावे लागते त्याची माझी अल्प जाणीव या निमित्ताने समृद्ध झाली. शासनाने या समाजबांधवांच्या सामाजिक सुरक्षेच्या मागण्यांच्या अभ्यासासाठी नेमलेल्या अभ्यास समितीने अहवाल सादर करावा असा शासन निर्णय झाला. सदर अहवालाचे लेखन, संकलन आणि संपादन करण्याच्या निमित्ताने मला या समाजघटकाचा अगदी जवळून परिचय झाला आणि त्यांच्या मुलभूत समस्यांनी समाजरचनेचे एक वेगळेच आकलन दिले. खरतर हा अहवाल लिहिण्याच्या निमित्ताने मला आधीच खूप काही शिकता आले, जाणता आले.

ते माझे श्रेयस...

तेवढे पुरेसे वाटले नाही म्हणून की काय, संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. सुनील पाटणकर, सचिव श्री. बालाजी पवार आणि स्वत: वार्ताहर, वितरक असलेले संघटनेचे उपाध्यक्ष आणि या वर्षी सांगलीला पार पडलेल्या राज्यव्यापी प्रतीवार्षिक अधिवेशनाचे आयोजक आणि निमंत्रक श्री. विकास सूर्यवंशी यांनी त्या अधिवेशनात माझ्या सन्मानाचा घाट घातला. हे तिघे आणि, आपल्या निरपेक्ष स्नेहाने भारावून टाकणारे, संघटनेचे इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या अत्यंत कुशल नियोजनात पार पडलेल्या २७ जानेवारीच्या या अधिवेशनात, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांसाठी सतत आग्रही राहिलेले आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे, ठाण्याचे आमदार श्री. संजय केळकर यांच्या हस्ते आणि सांगलीचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ आणि पुढारीवर्तमानपत्राचे संस्थापक, मालक, संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांच्या उपस्थितीत एका हृद्य सोहळ्यात माझा असा फेटा घालून सत्कार करण्यात आला. मी अशा आदर-सत्कारास आणि मान-सन्मानास पात्र आहे की नाही मला ठाऊक नाही, पण इतक्या सुहृदांची माझ्या कुटुंबात भर पडली आणि सुमारे ३ लाख समाजबांधवांच्या आवाजाला शब्दबद्ध करून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याची संधी मिळाली...

हे माझे प्रेयस! 

...मुंबईची तुंबई झालेली असतांना रोजच्या वेळेवर आणि कोरडे वर्तमानपत्र पोहचविणाऱ्या ज्या व्रतस्थ समाजसेवकांना, या प्रजासात्तक दिनी पद्मभूषण पुरस्काराने गौरविलेल्या उद्योगपती आनंद महिद्रांनी अनसंग हिरोजसंबोधले त्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या, एरवी बेदखल रहाणाऱ्या कार्याची या निमित्ताने यथोचित दखल घेतली जावो आणि त्यांच्या अत्यंत वाजवी अशा मागण्या मान्य होवोत ही अपेक्षा, सदिच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना...

शुभम भवतु!

शनिवार, २५ जानेवारी, २०२०

गुजारीशे...!



पत्थरकी दिवारोंसे
टकराई मेरी गुजारीशे
सुननेवालोंमें काश 
कोई इन्सा भी होता...!

रविवार, १२ जानेवारी, २०२०

युवा...!



आज १२ जानेवारी, स्वामी विवेकानंदांची जयंती. १९८४ साली भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि १९८५ पासून आपण सारे भारतीय हा दिवस युवा दिन म्हणून साजरा करतोय. विवेकांनदांनी तरुणांच्या ठायी असलेल्या असीम ऊर्जेचे प्रवाहीकरण करण्याचे आणि युवकांचे निरंतर सत्याचा शोध घेण्याचे अथक प्रयत्न फलद्रुप होण्याचे जे उदात्त स्वप्न बघितले त्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने 'राष्ट्रीय युवा दिना'ची या तेजस्वी राष्ट्रभक्तास दिलेली ही अत्यंत समर्पक अशी मानवंदना ठरावी...!

आजच्या 'राष्ट्रीय युवा दिना'च्या प्रसंगी 'युवा' या संकल्पनेची माझी व्याख्या...      

ज्याला बदल हवा आहे,
तो प्रत्येक जण युवा आहे...!

वयाचा तारुण्याशी संबंध नाही
माणूस शिरविहीन कबंध नाही,
ज्याला रोजचा दिन नवा आहे,
तो प्रत्येक जण युवा आहे...!

जोश आहे अन आहे होशही
गुणांबरोबर असतील दोषही
मित्रांचा सोबत थवा आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!

कुठल्याही अन्यायाने व्यथित होतो
भावनावेगाने कधी स्तिमित होतो
वर्तनी विवेक तरी ज्याला हवा आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!

डोन्ट बी सायलेंट हे जसे जाणतो   
तसे डोन्ट बी व्हॉयलेंटही म्हणतो
समाजाला जोडणारा जो दुवा आहे 
तो प्रत्येक जण युवा आहे...!

सुखद भावनांचा मनी नाचता मोर
होतो थोडा गेय अन भाव-विभोर,
कधी रणवीर तर कधी बुवा आहे 
तो प्रत्येक जण युवा आहे...!

उभा जो इतिहासाच्या खांद्यावर
म्हणूनच बघू शकतो खूप दूरवर,
‘ग’ची न ज्याला बाधा देवा आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!

सजग आहे, सतर्क आहे, स्वतंत्र आहे
काव्य-शास्त्र-विनोदाचा स्वमंत्र आहे
जगन्मित्र दोस्त आपला भावा आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!

स्वातंत्र्याची ओढ आहे
जाणीवेची जोड आहे...
संस्कृती ज्याचा ठेवा आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!