शनिवार, १ एप्रिल, २०२३

अमर...?


'ही कविता मरत नाही' - या २२ जून २०२२ च्या पोस्टमध्ये विंदांनी त्यांच्या 'सब घोडे बारा टक्के...' या कवितेच्या सादरीकरणात त्या कवितेतील परिस्थती काही केल्या बदलत नसल्याने ती कविता मरत नसल्याची खंत व्यक्त केली होती. कवितेच्या भलत्याच अमरत्वाचे दु:ख विंदांनी मांडले.

कवी हा मर्त्य मानवच असल्याने त्याला मृत्यू अटळ आहे. पण विचार, फिलॉसॉफी आणि इंटेंशन कालातीत असल्याने ते व्यक्तीच्या मृत्यूनंतरही भूत बनून मानगुटीवर बसू शकतात. मग  आयुष्यभर सचोटीने जगलेल्या आणि व्यवस्थेत सुधार करण्याची जिद्द न सोडणाऱ्या 'आझाद'चा असा 'भूतनाथ' होतो आणि त्याला, '...जिसके पास डेसिग्नेशन है उसके पास इंटेंशन नहीं और जिसके पास सजेशन है उसके पास पोझिशन नहीं...' याचा विषाद वाटतो.

तथापि, मेल्यावरही समाजसेवेचा वसा सोडू न शकणाऱ्या अशा सजग नागरिकाची संभावना, 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद मिरवणारा व्यवस्थेचा अग्रीम प्रतिनिधी, "xxxxx याचं काही होत नाही, इसको मरनेके बादभी अकल नही आयी...!" अशी करतो... 

हेच अंतिम (आणि कालातीत ?) सत्य, बाकी जगत मिथ्या !

चालायचंच...?

बुधवार, २२ मार्च, २०२३

'गुढी उभारनी'


दोन वर्षांपूर्वीच्या
'कानूस...?' या बहिणाबाईंच्या बोलगीतांवरील पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे, कुठल्याही प्रकारचे प्रमाणीत डॉक्युमेंटेशन उपलब्ध नसल्याने, तुक्याची गाथा जशी लोकगंगेने तारली तशा बहिणाबाईंच्या रचना खान्देशाने आपल्या श्रुती-स्मृतींमध्ये जिवंत ठेवल्याने त्यांच्याबद्दल खात्रीने काही दावा करता येणे अवघड असले तरी त्यातील अस्सल माणूसपण आणि समृद्ध जाणिवां या निश्चित वैश्विक असल्याने त्यांच्या अभिजाततेबद्दल दुमत नसावे.

आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने बहिणाबाईंची, शुभेच्छांसोबत दरडावणारी आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही रचना, आजच्या - जाणिवा बोथट आणि भलत्याच संवेदना नको तेवढ्या टोकदार झालेल्या - काळात करण्याचे धारिष्ट्य कुणी करेलसे वाटत नाही. शिवाय, आपल्याच पोटच्या अपत्यांना, पाल्यांना देखील ओरडायची चोरी असणाऱ्या अधुनिक जीवनशैलीत, थेट समाजालाच चार गोष्टी ऐकवण्यासाठी (नीतिमत्ता, नैतिक अधिकार असली थेरं कालबाह्य झाल्याने) जी 'पुण्याई' लागते ती कमावलेला 'ऐसा कौन माईका लाल होगा...?'

तेव्हा आपल्याच भावना बहिणाबाईंनी १०० वर्षांपूर्वी व्यक्त केल्यात असे मानून म्हणू या...

आरंभ होई चैत्रमासीचा
गुढ्या-तोरणे सण उत्साहाचा

गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी

गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा

अरे, उठा झाडा आंग
गुढीपाडव्याचा सन
आतां आंगन झाडूनी
गेली राधी महारीन

कसे पडले घोरत
असे निस्सयेलावानी
हां हां म्हनतां गेला रे
रामपहार निंघूनी

आतां पोथारा हे घर
सुधारा रे पडझडी
करीसन सारवन
दारीं उभारा रे गुढी

चैत्राच्या या उन्हामधीं
जीव व्हये कासाईस
रामनाम घ्या रे आतां
रामनवमीचा दीस

पडी जातो तो 'पाडवा'
करा माझी सुधारनी
आतां गुढीपाडव्याले
म्हना 'गुढी उभारनी'

काय लोकाचीबी तर्‍हा
कसे भांग घोटा पेल्हे
उभा जमीनीच्या मधीं
आड म्हनती उभ्याले

आस म्हनूं नही कधीं
जसं उभ्याले आडवा
गुढी उभारतो त्याले
कसं म्हनती पाडवा ?

~ बहिणाबाई चौधरी

सोमवार, २० मार्च, २०२३

चिवचिवाट...?

चित्र: वैभव पुराणिक, नासिक 

चार वर्षांपूर्वी आजच्या जागतिक चिमणी दिवशी लिहिलेल्या 'चिऊताई...!' या पोस्टची आठवण झाली ती सन्मित्र शामने चिमण्यांची ठवण करून दिलेल्या इंद्रजित भालेराव यांच्या या हृद्य कवितेने...

बाप म्हणायचा काढलेली नखं
दारात कधीच नयेत टाकू
दाणे समजून खातात चिमण्या
आणि मरतात आतडी फाटू फाटू

सुगी संपली की बाप
देवळात नेऊन कणसं बांधायचा
सुगीत हाकललेल्या चिमण्यांसाठी
पाण्याचं मडकं बांधून पुण्य सांधायचा

पाखरं असल्या तरी ओळखायच्या
बापाच्या मनीचा भाव
तेव्हा सुगी संपली तरीही
चिमण्या सोडीत नसायच्या गाव 

अंगणातले दाणे टिपायला आता चिमण्या येत नाहीत कारण (प्र)गतीशील माणसाला ना अंगण उरलं ना त्यात बागडणाऱ्या चिमण्या. अलिकडे बाळाला घास भरवायला, जोजवायाला चिऊ-काऊची गरजच उरली नाही, मोबाईलवर क्लिक केलं की हव्या तेवढ्या चिमण्या आणि हवा तेवढा चिवचिवाट... असा आभासी संस्कार पिढी घडवेल...?

आजच्या 'मटा गोल्ड'मध्ये खुद्द चिमणीनेच 'काय चाल्लंय काय...' हा माणसाला पत्रातून विचारलेला प्रश्न ऐकून थोडतरी अंतर्मुख व्हायला होत का बघा...!

रविवार, १९ मार्च, २०२३

अप्रूप…!


माणूस संपर्कात येतो. व्यावहारिक कारणांनी परिचय होतो.
काही सामाईक गोष्टींनी ओळख वाढते. हळूहळू स्नेह जुळतो.
मग कधीतरी कुठल्यातरी विशिष्ट आवडीचे धागे जुळतात.
ती आवड अभिव्यक्तीशी निगडित असेल तर गुंतणे सुखावह वाटते.
आणि अभिव्यक्ती काव्यरूप असेल तर त्या नात्याचे वेगळेच अप्रूप…!

वय वाढत जाते तशी संवेदनशीलता वाढणे, मन हुळहुळे होणे, जाणीवा अलवार होणे स्वाभाविकच. पण वाढत्या वयात मनोव्यापारांच्या अभिव्यक्तीचे साधन नित्य जोपासणे सहजसाध्य नव्हे.
कारण उमेद, उन्मेष, उत्साह, ऊर्जा… सहसा तरुणाईशी संदर्भित अशी ही लक्षणे.
ज्येष्ठांच्या ठायी ती आढळली की वाटते ते अप्रूप…!

स्वतःच्या पंचाहत्तरीला स्वरचित ९५ कवितांचे सचित्र पुस्तक, अत्यंत कल्पक तथा समर्पक नामकरणासह, केवळ खाजगी वितरणासाठी प्रकाशित करून स्नेह्यांना ते कॅनव्हासच्या लिफाफ्यात कुरियरने धाडण्याची कल्पना केवळ कवीमनालाच सुचू शकते.
यासाठी लागणारी चिकाटी, शिस्तप्रियता, नियोजन कौशल्य आणि संयम हे अप्रूप…!

अशा आनंदयात्रीच्या स्नेह्यांच्या यादीत आपली वर्णी लागणे, एव्हढेच नव्हे तर, प्रस्तावना लिहिण्याच्या प्रस्तावाला, आपला वकूब आणि मर्यादा ओळखून दिलेल्या सविनय नकाराची व्यथा देखील एका कवितेतून व्यक्त करून, मनी कुठला सल न बाळगता, आता पुस्तकावरील अभिप्रायाची प्रतिक्षा देखील कवितेतून व्यक्त करणे याचे अप्रूप…!

आजकाल काहीही, कधीही, कुठेही आणि कसही साजरं करण्याचं सर्वत्र फोफावलेलं फॅड आणि ‘रीएलिटी’चाही ‘शो’ करणाऱ्या प्रच्छन्न दिखाऊ जगात, कुणीतरी काही विशिष्ट क्षण संस्मरणीय करण्यासाठी करत असलेला प्रामाणिक आटापिटा आणि तो 'लाईव्ह' अथवा 'व्हायरल' न करता निवडक स्नेह्यांसोबत, हितगुज करावा तसा, साजरा करण्याची कल्पना याचे अप्रूप…!

‘अविनाश भोसेकर सर’ या आमच्या, ‘सुमंत्रच्या विनयाताईंचे यजमान’ या रूपाने परिचित आणि यथावकाश सुपरिचित झालेल्या चिरतरुण स्नेह्यांनी त्यांच्या पंचाहत्तरी निमित्त संकलित, संपादित आणि प्रकाशित करून आम्हाला सप्रेम भेट केलेले त्यांचे चित्ररूप ‘अविनाशी कवितांकुर...' हे आजचे खरेखुरे अप्रूप…!

यातील सर्व कवितांचे रसास्वादन करून त्यावर एक स्वतंत्र पोस्ट लिहिण्याचा मानस आहेच. आज, आपण उपभोगत असलेल्या सुख-सुविधांच्या महिन्याच्या बिलांव्यतिरिक्त आणि आपणच ऑनलाईन ऑर्डर केलेल्या सामानाशिवाय, काहीतरी अनपेक्षित, आपल्या ताजेपणाने ‘मना’ला प्रफुल्लित करणारे आणि निर्व्याज सुखावणारे पार्सल डिलिव्हर झाले याचा जेव्हढा आनंद तेवढेच… अप्रूप !

सरांना अखंड 'कवितांकुरा'साठी प्रवाही प्रतिभेच्या आणि निरोगी दीर्घायुष्याचा 'अविनाशी' शुभेच्छा !

शुभम भवतु !

रविवार, ५ मार्च, २०२३

अगतिक...!


असंगाशी संग I प्राणाशी गाठ I
भरला काठोकाठ I पापकुंभ II

येई तारण्या I म्हणे युगंधर I
तो ही धुरंधर I संभ्रमित II

स्वार्थांध सत्ता I हेच एक सत्य I
ओशाळते नित्य I माणुसकी II

अधर्मी धर्म I राहतो उदास I
त्याचा अदमास I कुणालागी II

सारेच संत I सदाच दसरा I
चेहरा हसरा I अगतिक II

वाढो मानव्य I विवेकी जागृत I
प्रवाही पण मृत I दैवगती II

रंगात रंगूनी I ठोकली हाळी I
आली आली होळी I धूळधाण II

उन्हां कधी लाभो I भाग्य सावलीचे I
आर्त माऊलीचे I ऐकावे गा II

रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

भावगर्भ...!


उद्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र वैभव, मराठी भूषण, वि. वा. उर्फ तात्याराव शिरवाडकर अर्थात महाराष्ट्राचे ऋषितुल्य कविवर्य कुसुमाग्रज यांचा १११ वा जन्मदिवस आणि त्या औचित्याने साजरा होणार मराठी भाषा दिन. या निमित्ताने यापूर्वी इत्यादीवर ३ वेळा प्रकटन झाले आहे - मीच...! (२७ फेब्रुवारी २०१७)एक तरी ओवी अनुभवावी...! (२७ फेब्रुवारी २०१८) आणि गाभारा...! (२७ फेब्रुवारी २०२२).

आजही भावना त्याच, तेवढ्याच, किंबहुना वयोमानानुसार अधिकच उत्कट असल्या तरी या लिखाणाचे प्रयोजन (खरं तर उर्मी... की उबळ?) मिळाले ते आमचे धुळ्याचे आणखी एक रसिकोत्तम सन्मित्र शाम वाघ यांनी या निमित्ते पाठवलेल्या, ‘हिरवळ आणिक पाणी, तेथे मजला सुचती गाणी...’ म्हणणाऱ्या भावकवी बाकीबाब अर्थात कविश्रेष्ठ बा.भ. बोरकर यांच्या अत्यंत सटीक, समर्पक आणि समुचित कवितेचे !

आता ही कविता, भावगर्भतेचे प्रमाण असलेल्या बाकीबाब यांनी, संतांच्या मांदियाळीचा पाया रचत, 'विश्वाचे आर्त माझ्या मनी  प्रकाशले...' म्हणणाऱ्या आणि अवघ्या जगास 'भावार्थदीपिके'च्या माध्यमातून प्रकाशित करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानियांचा राजाच्या वियोगाच्या विवशतेतून लिहिली असतांना, त्यावर आपल्या अल्पमतीने एवढ्या विवेचनाची गरज नाही हे शामने सूचित करून देखील, 'त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना...!'

'भाषेची अवस्था' हा फावल्या वेळातील चर्वितचर्वणासाठी एक खमंग विषय असतो आणि 'अभिजातता' यावर देखील बराच खल निरंतर चालूच असतो. अशा निमित्ताने तर मोसमी भाषाभिमान्यांच्या प्रतिभेला अधिकच धुमारे फुटतात. त्या साऱ्यांना मराठी भाषेची महती कळावी आणि, ज्या कलाकृतीने कंठ दाटून येतो आणि डोळ्यांच्या कडा पाणवतात ती 'अभिजात' हे आकळावे म्हणून बाकीबाब यांची 'ज्ञानदेव गेले तेव्हा...' ही अत्यंत भावस्पर्शी रचना आणि, विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त चालविलेल्या, 'रोज एक कविता' उपक्रमादरम्यान आम्हाला गवसू न शकलेली दुसरी विंदांची कविता - 'तेथून दूर जावे...'  दोन्ही रचना सन्मित्र शामच्या सौजन्याने साभार !

ज्ञानदेव गेले तेव्हा

ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली भिंत।
वेद झाले रानभरी, गोंधळले संत ।।

ज्ञानदेव गेले तेव्हा, आटे इंद्रायणी ।
मराठीच्या वडातळीं, जळूं लागे पाणी।।

ज्ञानदेव गेले तेव्हा, ढळला निवृत्ती ।
आसवांच्या डोही, झाली विझू विझू ज्योती।।

ज्ञानदेव गेले तेव्हा, तडा विटे गेला ।
बाप रखमा देविवरु, कटीत वाकला ।।

ज्ञानदेव गेले तेव्हा , बापुडला नामा।
लागोपाठ भावंडें, तीं गेली निजधामा।।

माझ्या ज्ञानराजा, तें रे कळों आले आज।
भरदुपारीं ही तशी, झाली तीनसांज।।

तेव्हांच्यासारखा, पुन्हा बावला मोगरा।
भुईभर झाल्या कळ्या, तुटला आसरा।।

इथे आळंदीत , आतां ऊर फाटे।
पंढरीच्या वाटेंतही, बाभळीचे काटें।।

कळ्यांचाहि वास जिवा, जाहलासे फांस।
एकाकीं प्रवास आतां, उदास उदास।।

- बा. भ. बोरकर

तेथून दूर जावे

सर्वस्व अर्पिती जे, त्यांचेच गीत गावे;
त्याची घडे टवाळी, तेथून दूर जावे.

नसता विनोद काही हसतात, लोक सारे;
चाले असा तमाशा, तेथून दूर जावे.

संगीत ज्या ठिकाणी, रसहीन चाललेले;
बुद्धीस खाजवाया, तेथून दूर जावे.

विद्वान कल्पनांचा, काढीत कीस जेथे,
सामान्य माणसांनी, तेथून दूर जावे.

जनतेस नागवूनी, बनतात जे पुढारी,
त्यांचा झडे नगारा, तेथून दूर जावे.

बागेत हिंडताना, कुंजात लाडकीशी,
कुजबुज कानि येता, तेथून दूर जावे.

मोहान्ध होऊनिया, जे दार गाठलेले,
ते उघडण्याच पूर्वी, तेथून दूर जावे!

- विंदा करंदीकर

मराठी भाषा गौरव 'दिना'च्या 'मना'पासून शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन !

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

स्मरणगाथा...!



कुणी विचारलं काय आवडेल, आठवणी की साठवणी तर शहाणीव म्हणेल ‘आठवणींच्या साठवणी…!’

विस्मृती हे वरदान वाटावे अशा घटनांचे, जाणिवांचे, अनुभवांचे प्राबल्य वाढले तरी स्मृतींची ओढ आगळीच. अन्यथा, एका मनोवैज्ञानिक प्रयोगात, स्मृतीशिवाय आनंदयात्रेवर जाऊन हवी ती मजा करायला बहुतांनी, अगदी संधिसाधूंनीही, साफ नकार देण्याचे कारण नव्हते. जे अनुभवले ते आठवणीच्या रूपाने जाणिवेत राहणार नसेल तर क्षणभंगुर आनंदही नाकारण्याचा सूज्ञपणा दाखवणारा तो खरा होमो सेपियन… द वाईज मॅन !

अलीकडे सर्वत्र बोकाळलेले सेल्फीचे फॅड आणि कुठल्याही सादरीकरणामध्ये मोमेण्ट क्रिएट करण्याचे वाढलेले स्तोम हे ठसठशीतपणे एकाच गोष्टीचे समर्थन करते… माणसाचे आठवणीत रमण्याचे वेड. अलीकडे तर बऱ्याचदा तो मोमेण्ट, ते क्षण जगून हर्षित होण्यापेक्षा तो गोठवून प्रदर्शित करण्याकडे वाढलेला कल पाहता सारा अट्टाहास केवळ दिखाव्यासाठीच आहे की काय अशी शंका यावी.

ते काही असले तरी आठवणींच्या बाबतीत आपल्याला सिलेक्टिव्ह, चोखंदळ होता येत नाही हे खरेच. वपुंच्या शब्दात सांगायचे तर, ‘सौख्याचा कोणता क्षण चिरंजीव झालाय? फक्त आठवणींच्या राज्यातच तो अमर. आणि आठवणी कधीच सुखद नसतात. त्या दुःखाच्या असोत वा आनंदाच्या. दुःखाच्या असतील तर त्यापायी वाया गेलेल्या भूतकाळ आठवतो, आणि त्या आठवणी सुखाच्या असतील तर ते क्षण निसटले, म्हणून त्रास.’

पण वपुंच्याच ‘पार्टनर’चा सल्ला शिरोधार्य मानायचा तर, ‘देअर इज नॉट अ सिंगल एक्साम्पल ऑफ अ हॅपी फिलॉसॉफर!’ मग नेहमीच एवढं निराशावादी तत्वचिंतक होण्याचं कारण नाही कारण आठवणी हे नाशवंत दुनियेतील एकमेव चिरंतन सत्य. आठवणींना वार्धक्य नसतं, ययातीसारखं दिवसेंदिवस तरुण होत जाण्याचं भाग्य फक्त आठवणींच्याच नशिबी. उदबत्ती लावल्यावर आसमंत सुगंधाने भरून जावा, अत्तराच्या स्पर्शाने पुलकित व्हावे तशा आठवणी हवेत तरतात आणि हळूच मनात उतरतात.

चंद्रमोहन कुळकर्णींची ‘बिट्वीन द लाईन्स’ असो, लक्ष्मीबाई टिळकांची ‘स्मृतिचित्रे’ असो, की सुनीताबाईंचे ‘आहे मनोहर तरी’ सारा अस्पर्श जाणिवांचा आणि अव्यक्त संवेदनांचा आठवणींच्या माध्यमातून घेतलेला धांडोळा. तेव्हा, स्मृती या आवडत्या असू शकतात, नावडत्या असू शकतात पण अटळ कधीच नसतात. आणि कुणाच्याही आठवणींनी साकार होऊ शकते एकेक स्मरणगाथा… आजचा विषय आणि एवढे पाल्हाळ लावण्याचे निमित्त

आमचे धुळ्याचे सन्मित्र, उमद्या कविमनाचे सर्जक वैद्यविशारद डॉ. सचिन चिंगरे यांची एक ताजी, हळुवार आणि हृद्य रचना सादर करण्यासाठी नमनाला एवढे घडाभर तेल… आता वैद्यराजांना मोठ्या मनाने, ‘कविता आपलीच समजा’ अशा दिलदारपणाने दिलेल्या अनुमतीचा मनस्वी पश्चाताप होण्यापूर्वी आणि वाचकाने कंटाळून निघून जातांना आमची अवस्था, ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे’ अशी शोचनीय करण्यापूर्वी, फाफटपसारा आवरून मूळ प्रयोजन सादर करावे हे उचित. बऱ्याच काळानंतर, एका प्रदीर्घ अभिजात उर्मीतून साकारलेली डॉक्टरांची ही भावविभोर गज़ल...

स्मरणगाथा

झाडांसम आठवणी शहाण्या, महापुरे मोठ्या वाहून गेल्या 
वेड्या होत्या लहान लव्हाळी, वाचल्या, मागे राहून गेल्या I

तीव्र वाढला ग्रीष्म भोवताली, पाझरली आत शीतल वर्षा
गोड आठवणी उष्णजलात खाऱ्या सचैल नाहून गेल्या I

परक्या होऊन पार पाडला काहींनी पुनर्भेटीचा तो उपचार 
माहेरवाशीण लेकी, आठवणी लाडक्या, काही अंमळ राहून गेल्या I

फूल काही आठवणी ताज्या, दरवळल्या अत्तर होऊन आता
राख मानून उचलाया गेलो, होत्या निखारा, दाहून गेल्या I

कुरुप, नकोशा म्हणून होतो विसरलो मी स्वार्थासाठी ज्यांना 
अबोल प्रीतीसम आठवणी त्याच नेमक्या निर्मळ मोहून गेल्या I

सिनेतारका नखरेल काही, राहिल्या दूरातच स्वप्ननभी 
सोज्वळ गृहिणीसम काही आठवणी आजन्म लाहून गेल्या I

सांत्वन केले आठवणींनी, दिला दिलासा, मी दु:खार्त तळमळताना
अंतर राखून नुसत्या काही दुरुन कोरडेच पाहून गेल्या I

काळ इंद्रायणीडोही बुडवली, तरीही तरली सनातन स्मरणगाथा 
आहेत आठवणी आणखीही, कविते, सांगणे राहून गेल्या I

डॉ सचिन

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

विराम...!


जगण्याची सक्ती
सक्तीची भक्ती
भक्ती विकारी
साराच अनर्थ...!

फळाची अपेक्षा
अपेक्षेची उपेक्षा
उपेक्षाचा भारा
निव्वळ स्वार्थ...!

अव्यक्त भाव
भावाचा डाव
डावावर घाव
मांडणे व्यर्थ...!

रविवार, २२ जानेवारी, २०२३

सुखेनैव...!


जाणीव लाभली जन्मजात तशी
संवेदनेची झुलू लागली डहाळी
प्रयासे नित्य जोजवली संवेदना
लाभण्या कल्पनेस मूर्त झळाळी

अमूर्त भासे जे अशक्यही कधी
साकारेल खचित हा ध्यास हवा
लांघण्या वेस मर्यादेची, केवळ
श्वास नको अढळ विश्वास हवा

स्वप्ने लाभो मनुष्या अन सामर्थ्यही
साकारण्या रोमांचक सुखचित्र नवे
अन प्रगती'शील' माणसा आकळो
सुखेनैव जगण्यास नेमके काय हवे.

रविवार, १५ जानेवारी, २०२३

कणभर तीळ...!


वाटाणा , फुटाणा , शेंगदाणा
उडत चालले टणाटणा !
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण !

तीळ चालला भरभर
थांबत नाही कुठे पळभर !
"तिळा , तिळा , कसली रे गडबड ?"
"थांबायला वेळ नाही .
सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं, मला नाही सवड !"
"ऐक तर जरा , पहा तर खरा ,
"बघा तरी थाट ! सोडा माझी वाट !"
"बघू या गंमत , करू या जंमत !
चला रे जाऊ याच्याबरोबर ."

तीळ चालला भराभर.
वाटेत लागले ताईचे घर .
तीळ शिरला आत, थेट सैपाकघरात.
ताईच्या हातात छोटीशी परात
हलवा करायला तीळ नाही घरात !
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,
"घाल मला पाकात, हलवा कर झोकात."

ताईने टाकला तीळ परातीत.
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,
इकडून तिकडे बसली हालवीत .
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा , फुटाणा , शेंगदाणा गेले घाबरून!
पण तीळ पाहा कसा ?
हाय नाही , हुय नाही , हासे फसफसा !
पाकाने खुलतोय , काट्याने फुलतोय !
कणभर तिळाचा मणभर नखरा !"

अरे , पण हे काय ? तीळ कुठे गेला ?
काटेरी , पांढरा हलवा कुठून आला ?
"वाटाण्या , फुटाण्या , शेंगदाण्या,
पाहिलीत गंमत ?
कणभर तिळाची मणभर करामत !
एवढासा म्हणून हसलात मला,
खुलवीन मी तर सर्व जगाला !

- लीलावती भागवत 
(आठवणीतील कविता)