रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

गाभारा...!


(स)माजमाध्यमाने चांगलीच सोय करून दिल्याने स्वतः:ला लेखक अथवा त्याहून सुलभ म्हणजे कवी समजणाऱ्यांचे अक्षरश: पेव फुटलेले असतांना भाषेच्या भवितव्याबद्दल एवढी तळमळ, कळकळ आणखीन हळहळ व्यक्त करणारे मान्यवर व्यवहार कुठल्या भाषेतून करतात याचा धांडोळा घेतल्यास बरेच जावईशोध लागल्यामुळे भोवळ आल्याशिवाय राहणार नाही.

वरील प्रकटनातील भाषाविशिष्ट स्वर-व्यंजन,  उपरोध आणि त्यांच्या उपयोजनाचे प्रयोजन अर्ध्या जरी प्रस्तुत भाषाभिमान्यांस समजले, उमजले तरी, अमृताशी पैजा जिंकणाऱ्या माऊलींच्या आणि छत्रपतींच्या प्राकृत भाषेचे प्राक्तन बदलल्याशिवाय राहणार नाही आणि 'अभिजातते'च्या नावाने गळे काढण्याची कदापि गरज पडणार नाही.

याबाबतीत अल्लामा इकबाल यांचा 'खुदीको कर बुलंद इतना...' सल्ला शिरोधार्य मानायलाच हवा. वापर नसलेल्या गोष्टी कालौघात नामशेष होतात हे सांगायला आजच्या ब्ल्यू टूथ आणि ओटीपीच्या काळात डार्विनची गरज नसावी. वापर हा सवयीतून येतो आणि सवय संस्कारातून येते. संस्कारासाठी अध्ययन, चिंतन, मनन, प्रकटन यांचा परिपाठ असावा लागतो. अन्यथा, तथाकथित भाषाभिमान्यांचे अरुण्यरुदन हे आज महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय शिमग्याइतकेच निंदनीय तथा शोचनीय ठरल्यास नवल नाही.  असो!

'शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस...'

असा वस्तुनिष्ठ सल्ला देणाऱ्या आत्मनिष्ठ, समाजनिष्ठ जाणिवांचा धनी आणि शब्दरत्नाकराचा महामेरू, वि. वा. उर्फ तात्याराव शिरवाडकर अर्थात महाराष्ट्राचे वैभव कुसुमाग्रज यांचा आज ११० वा जन्मदिवस. या निमित्ताचे औचित्य साधून हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करणे अभिमानास्पदच पण केवळ सोहळ्यांच्या परंपरेने संस्कृती विकास पावत नसते, त्यासाठी काही तत्वांचा, मूल्यांचा, संस्कारांचा वसा घ्यावा लागतो. कथनी आणि करणी मधला फरक राजकारण्यांना शोभत असला तरी रयतेने तरी त्या वाटेने जाऊ नये. अन्यथा 'यथा राजा तथा प्रजा' या न्यायाने समाजात दांभिकता बोकाळण्यास वेळ लागत नाही. 

आजच्या निमित्ताने, ज्यांच्या नावाने हा जयघोष चालला आहे त्या कुसुमाग्रजांनी समाजव्यवस्थेतील  दोषांवर आणि दांभिकतेवर कोरडे ओढण्याची एकही संधी कधी हातची जाऊ दिली नाही. त्यासाठी त्यांच्या अखेर कमाईस्वातंत्र्यदेवीची विनवणीसहानभूतीसिंहस्थ या कविता जरूर वाचाव्या मात्र आजच्या परिस्थितीला अगदीच समर्पक असणारी कुसुमाग्रजांची ही कविता... सामाजिक-राजकीय उद्बोधनासाठी.

गाभारा

दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाहीगाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्‍यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.
- कुसुमाग्रज

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

तेजोनिधी..!


डॉक्टर सचिन चिंगरे ! जुन्या शाळूसोबत्याची प्रौढपणी, कळत्या(?) वयात नव्याने झालेली हीच खरी ओळख. सचिन आणि मी इयत्ता दहावीपर्यंत एकाच वर्गात शिकलो असलो तरी शाळेतला सचिन मला फारसा आठवत नाही. आम्हा लिंबूटिंबू मुलांच्या मानाने किंचित मोठा दिसणारा आणि पौरुषाच्या खुणा पौगंडावस्थेपासून बाळगणारा सचिन माझ्या मैत्र परिघात (आजच्या भाषेत रेंजमध्ये!) असणे शक्यच नव्हते आणि त्यामुळे आमच्या बालमैत्रीचे योग नसल्याने त्याचे त्या वयातले अनेक भोग टळले ! (शंका असल्यास जाणकारांस विचारा !) पण राशीला असलेले ग्रह सहसा पिच्छा सोडत नाहीत तद्वत मी त्याच्या राशीला बसणे हे त्याचे भागधेयच होते आणि माझे पुरुषस्य भाग्यमं !

अत्यंत व्यावहारिक (व्यावसाईक म्हणणे सिर्फ बेवकुफीही नहीं, बे(ई)मानी होगी ! आठवा: ‘नाजायज प्रिस्क्रिप्शन’!) कारणाने सुमारे ३० वर्षांच्या खंडानंतर आम्ही सन्मित्र दिनेशच्या सदिच्छेने भेटलो त्याला आज सुमारे ७ वर्षे लोटली. माझ्या नेहमीच हुळहुळणाऱ्या हृदयाच्या निमित्ताने २०१५ च्या दिवाळीत मी सचिनला खऱ्या अर्थाने ‘भेटलो’ आणि आजवर केवळ ऐकलेले आणि सहसा पहिल्याच भेटीत जवळपास अशक्य असणारे ‘हृदया हृदय येक जाले। ये हृदयीचे ते हृदयी घातले। द्वैत न मोडता केले। आपणा ऐसे अर्जुना।’ अनुभवले... तंतोतंत! असे होण्यामागे – सौख्य, आनंद आणि उन्मेष बहुरंगी, बहुढंगी असले तरी सद्भाव, आर्त आणि विवेक एकरंगी असतात (मोनोटोनोस का म्हणानात) – हे एक कारण असावे का ? ते काहीही असले तरी चिंगरेंच्या सौख्यपंचकाला भेटल्यावर लगोलग मला जे सुचले ते असे...   

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५
सर्वव्याधिप्रमोचकं I
परिस्थितीची सम्यक जाण
सहजीवनाचा निकोप वसा
बहुतांच्या स्वास्थ्यावर दोघे
सोडत जाती निरामय ठसा…!

वैद्यकव्यवसायाप्रती माझ्या अस्वस्थ जाणिवांमध्ये वैद्यकशास्त्रायोगे मुलभूत परिवर्तनास कारणीभूत ठरलेल्या धुळ्याच्या डॉ. सचिन व डॉ. सौख्या चिंगरे (नावात अर्थाबरोबरच सौ. देखील अनुस्यूत असणे किती विलक्षण!) या सुविद्य वैद्यक दंपतीस सस्नेह. माझ्या शतायुषाच्या संकल्पास दृढ करणारा सचिन आपला वर्गमित्र आहे याचा अवर्णनीय आनंद आणि सार्थ अभिमान येथे प्रकट करणे प्रस्तुत ठरावे. शुभम भवतु…I

येथून सुरू झालेला प्रवास कवितेच्या माध्यमातून नित्य नवी वळणे घेत काव्य-शास्त्र-विनोदाच्या मार्गाने मैत्र जुळवून गेला आणि फोनवर तासंतास बोलणाऱ्या माझ्या मित्रमंडळात आणखी एक मूल्यवर्धक भर पडली. आम्हाला चर्चेसाठी कुठलाही विषय वर्ज्य नसल्याने, स्कुल ऑफ थॉट भिन्न असल्या तरी मानवी आयुष्याच्या मूलभूत धारणा आणि कवीमनाला शाप असणाऱ्या संवेदनशील जाणिवा समांतर असल्याने आमच्या सहवेदना एकरूप होत राहिल्या... राहतील !

आज डॉक्टरला वाढदिवसाच्या निमित्ताने काही काव्यात्म शुभेच्छा द्याव्या अशी उर्मी खूप होती पण सूर्याला  काजवे दाखविण्यात काय हशील या विचाराने आणि 'कविता विचारप्रधान की भावनेचे प्रकटन...?' या आमच्या दिनाच्या घरी रंगलेल्या चर्चेत भावनाविवशतेला माझा कौल मिळाल्याने मला डॉक्टरबद्दल उचंबळून आलेल्या साऱ्याच भावना आज, आत्ता ताबडतोब व्यक्त करायला जमेल असे नाही... त्यासाठी लागणारी प्रतिभा काही वेगळीच असते !

तेव्हा 'गेले द्यायचे राहूनी...' ही खंत उराशी बाळगून, या पोस्टचे शीर्षक सार्थ ठरवणारा, डॉक्टरने मला दिलेला  मित्रत्वाचा प्रेमळ सल्ला... 


इत्यादीवर डॉक्टरचे इत्यादी     

अभिजातता...!'मी सावरकर'

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

संस्कार...!


काल आमच्या विवाहसंस्काराला २५ वर्षे पूर्ण झाली, सिल्व्हर ज्युबिली अर्थात रौप्य महोत्सव का म्हणानात ! तब्बल २५ वर्षे म्हणजे दोन तपांहून अधिक काळ... दोघांच्या तपश्चर्येची दोन आवर्तने झाली की... बघता बघता ! आणि या सहप्रवासात जगाला दाखवण्यासारखी लौकिक जमापुंजी फारशी नसली तरी मर्मबंधात जपण्यासारखी उपलब्धी अक्षरश: अगणित ठरावी. मात्र आम्हाला अभिमान आणि समाधान वाटावे अशी दृष्य प्राप्ती म्हणजे आमचे कन्यारत्न - मैत्रेयी ! 

डोळ्यांचे ऑपरेशन झालेले असतांना, डोळ्यांवर काळा गॉगल चढवून मुलीने आमच्या मैरेजच्या ट्वेन्टी फिफ्थ एनिवर्सरीचा जो नेत्रदीपक सोहळा ऑर्गनाईज केला तो अगदीच संस्मरणीय झाला - एकदम एपिक, यु नो ! व्हेन्यूच्या निवडीपासून मेन्यूच्या संयोजनातील केवळ टेस्टच नाही तर विवेक-विचारही आम्हाला स्पर्शून गेला. त्यातून, आमच्या २५ वर्षांच्या सहप्रवासाच्या क्षणचित्रांचे कोलाज, त्याला रोमँटिक फील देणारी सजावट आणि गुलाबपाकळ्यांच्या वृष्टीपासून, २५ दिव्यांचे औक्षण आणि २५चा फ्रूटकेक असा दोन्ही संस्कृतींचा संगम केवळ समर्पकच नाही तर आत्यंतिक मनोहारी ठरला. या सर्व संयोजनात तिला तिचे दोघे भाऊ आणि दोन्ही मावशांची मोलाची साथ लाभली.

२८ वर्षांपूर्वी आईपपांच्या लग्नाला २५ वर्षे झाली तेव्हा, धुळ्याच्या घरातच आमच्या वकुबानुसार आम्ही एक छोटेखानी रौप्य महोत्सव साजरा केला होता. काल मुलीने असाच कार्यक्रम अतिशय कलात्मक आणि आधुनिक पद्धतीने साजरा केल्याने एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे अतीव समाधान तर आहेच शिवाय यथोचित संस्कार संक्रमित झाल्याचा मन:पूर्वक आंनद !

असाच सुवर्ण, अमृत आणि हिरक महोत्सवही साजरा करण्याचे बळ आणि संधी मिळो हीच प्रार्थना ! 

शुभम भवतु !

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

पंचविशी...!


त्याला उपयोगितेचे महत्वच उमजले नाही कधी
वस्तू-व्यक्ती, भावना-कल्पना यांना 'वापरता' येते
इतके साधे-सोपे सोईस्कर 'सत्य' गमलेच नाही त्याला
'अर्थ' आणि 'कारण' दोघांना पारखाच होता तो नेहमी
करायचा निरुपयोगी उद्योग, निर्हेतुक निर्ममपणाने...
म्हणायचा वेळ फार जातो 'उत्पादक' काम करण्यात
होणार नव्हतेच त्याचे काही, नाहीच झाले या मर्त्य जगात !

पण चित्रगुप्ताच्या गफलतीने पोहचला कर्मचाऱ्यांच्या स्वर्गात,
जिथे ज्याला बघावे तो व्यस्त, 'उपयोगी' कामात सतत व्यग्र.
हा हिंडायचा, कायम गडबडीत असणाऱ्या गर्दीचे धक्के खात
किंवा पहुडायचा हिरव्यागर्द माळरानावर निळ्याशार आकाशाखाली
प्राणी-पक्ष्यांच्या जोडीने निसर्गाच्या नाद-रस-रंग-गंधाची किमया अनुभवत 
उमटायच्या त्या जाणीवा चित्र-शिल्प-शब्द-सुरांतून... अभिनिवेशाशिवाय !

ओढ्यावरून पाणी भरायच्या कामात गर्क तिने पाहिले एकदा याला
कर्मचाऱ्यांच्या स्वर्गात एवढा रिकामटेकडा बघून अचंबा वाटला तिला
म्हणाली काम देऊ तुला, माझा एक हंडा देऊ पाणी भरून आणायला?
हा म्हणाला, हंडा दे पण असे उत्पादक उद्योग करायला वेळ नाही मला...
हंडा घेतला आणि उभा-आडवा रंगवून दिला निरर्थक रंग-रेषांनी...
तिला कळेचना याचे काय करावे... पण काहीतरी नवीन जाणीव जागी झाली

यथावकाश त्याने तिचे इतस्ततः उडणारे केस बांधायला रंगीबेरंगी रिबीनी बनवल्या
त्या रिबिनींनी केस बांधून स्वतःला निरखण्यात तिचा कामाचा वेळ वाया जाऊ लागला
केवळ तीच नाही तर आणखीनही काही लोक याच्या नादी लागून कलाकृती करू लागले
आता मात्र धुरिणांना आपल्या स्वर्गात हे निरर्थक लोण पसरणे धोक्याचे वाटू लागले आणि...
त्यांनी याला कर्मचाऱ्यांच्या स्वर्गातून हाकलून लावण्याचे ठरवले, एवढ्यात चित्रगुप्त प्रकटला!

म्हणाला याला चुकूनच इकडे आणले होते, योग्य ठिकाणी नेऊन सोडतो, काळजी नसावी.
त्याला खूपच बरे वाटले, सुटका झाल्यासारखे... इथे कुणाला कशासाठी वेळच नाही म्हणे !
तो निघाला तर... आजवर कधीही ऐकले, बघितले तर काय कल्पिले देखील नाही
असे अघटित त्या दिवशी त्या कर्मचाऱ्यांच्या स्वर्गाने बघितले.
ती चक्क त्याच्या सोबत निघाली, तो जाईल तिथे जायला... 
आणि आणखीनही काही निघाले.
कर्मचाऱ्यांच्या स्वर्गातल्या समस्त ज्येष्ठ-श्रेष्ठ अनुभवी विद्वानांना
त्यांच्या त्या निरुपयोगी निर्णयाचा न हेतू समजला न अर्थ... कधीही !

-----------------------------------------------------------------------------------------

असो, आज ही कथा आठवण्याचे कारण म्हणजे तिने तो निरर्थक, निरुपयोगी, निर्हेतुक निर्णय घेतला त्याला आज २५ वर्षे झाली... बाकी काही नाही ! 

...आणि, पन्नाशीनिमित्त माझ्या अकर्माचे डॉक्टरांनी केलेले मार्मिक निरूपण हे या रूपकाची प्रेरणा असल्याने, त्यांचे मन:पूर्वक आभार !

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

ओवी-गीता


आमचे आजोबा अण्णा अर्थात बापू केशव पुराणिक यांच्या केशवतनय या उपनामाने केलेल्या प्रकाशित, अप्रकाशित लेखनाचे टंकलेखन करून आंतरजालावर सर्वांच्या संदर्भासाठी जतन करण्याच्या आमच्या उपक्रमास व्यापक जनाधार मिळेल तेव्हा मिळो, तूर्तास त्यास ‘विद्या’धार मिळाल्याने अण्णांची तिसरी लोकप्रिय रचना ‘ओवी-गीता’ आज माऊलीचरणी समर्पित करण्याची संधी मिळत आहे !

ज्ञात मानवी इतिहासात, देवाचे मानवीकरण आणि मानवाचे दैवीकरण जेथे एकत्रित पाहता येते आणि षड्-रिपुग्रस्त मानवी आयुष्याचे कालातीत तत्वज्ञान जेथे सहज सुगम भाषेत प्रत्ययास येते असा महाभारत हा एक अद्भुत ग्रंथ ! यातील ‘गीतासार’ हा अलौकिक मूलमंत्र जो जगभर प्रचलित आहे. अनेकांच्या आयुष्याची धारणा आणि धर्माचा आधार असलेली गीता साध्या-सोप्या मराठीत ओवीबद्ध करून नित्यपठणासाठी सार्थ करण्यासाठीचा हा प्रयत्न त्याच्या सद्हेतुसह समजून घ्यायला हवा म्हणून लेखकाचे मनोगत समाविष्ट केले आहे, ते जरूर वाचावे. 

या रचनेच्या टंकलेखनाची संपूर्ण जबाबदारी स्वयंप्रेरणेने स्वीकारून अत्यंत निष्ठापूर्वक पार पाडल्याबद्दल अण्णांची ज्येष्ठ नात सौ. विद्या मदन कुलकर्णी [पूर्वाश्रमीची विद्या  शामकांत पुराणिक] म्हणजेच आमची विद्याताई आणि तिचे यजमान आणि आमचे जावई-कम-स्नेही श्री. मदनराव कुलकर्णी या उभयतांचे आम्ही ऋणी आहोत तसेच त्यांना तांत्रिक बाबींमध्ये मोलाची मदत करणारे त्यांचे सुपुत्र हर्षद कुलकर्णी याचेही मन:पूर्वक आभार ! कुलकर्णी परिवाराने सश्रद्धतेने केलेल्या कामाच्या तपासणीची चोख जबाबदारी पुराणिकांकडून पुन्हा एकदा अण्णांचे नाशिकस्थित नातू श्री. वैभव शामकांत पुराणिक व सौ. स्वाती या उभयतांनी निगुतीने पार पाडली. 

विद्याताईच्या आध्यात्मिक ओढीची अशी आत्मिक अनुभूती आमचे मनोबल उंचावणारी आणि आमच्या या उपक्रम-निश्चयांस अधिकच दृढता देणारी ठरली. गीतज्ञानेश्वरच्या निवेदनातील ताईची उत्स्फूर्तता यावेळी तिच्या टंकलेखनाच्या कौशल्यातही प्रतीत झाल्याने सदर टंकलेखनाच्या तपासणीचे काम सुकर झाल्याचा अनुभव आहे. अर्थात या कामातील आमचा वाटा आता खारीचाही नसल्याने ‘मुंगी होऊन साखर खाणे…’ म्हणजे काय याची आम्ही सदेह प्रचिती घेत आहोत. श्रीमदभगवद्गीतेचे रसाळ आणि सुबोध निरूपण करणाऱ्या माऊलीच्या चरित्रांस ‘मुंगी ऊडाली आकाशी…’ संबोधण्यामागची प्रेरणा अशीच असावी का…?

असो. तूर्तास तरी विषयांतर नको, याबद्दल पुन्हा कधीतरी… 

ओवी-गीतेच्या पीडीएफ प्रतीचा दुवा -

शुभम भवतु !

संवत्सर प्लव, शके १९४३, पौष संकष्टी चतुर्थी शुक्रवार, २१ जानेवारी २०२२.

शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

संक्रमण

 
त्रास सारे ठरूनी तीळमात्र 
'मना' लाभो गोड विसावा...
आकांक्षांना फुटुनी धुमारे,
पतंग हा गगनी भिडावा...!

सर्वांना मकर संक्रमणातून उत्तरायणात प्रवेशणाऱ्या तेजपर्वाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

रविवार, २ जानेवारी, २०२२

संकल्प...!

विविध संस्कृतींमध्ये नववर्ष वेगवेगळ्या वेळी आणि निरनिराळ्या पद्धतीने साजरे होत असले तरी सध्या सर्वत्र प्रचलित असलेल्या ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार १ जानेवारीला सुरु होणाऱ्या नवीन वर्षाचे वारे वाहू लागले की, त्या संस्कृतींच्या अंधानुकरणाने आपल्या मानसिक गुलामगिरीचे प्रच्छन्न दुर्दर्शन घडवीत न चुकता(?) करायची पहिली गोष्ट म्हणजे थर्स्टी फर्स्टची पार्टी आणि दरवर्षी न पाळण्यासाठी करण्याची दुसरी गोष्ट म्हणजे तेच ते संकल्प... शिळ्या कढीला नव्याने उकळी आणावी तसे! (बाय द वे, 'संकल्प' हे करतांनाच 'सोडा' असे म्हणतात याला काय म्हणावे?) आपल्या संस्कृतीमध्ये नित्योपासनेचे महत्व अनुभवसिद्ध असल्याने, वर्षाच्या सुरवातीला आरंभशूरपणे संकल्प करून, सकाळी बोललेले दुपारी विसरण्याची राजकीय सोय अंगी बाणवल्याप्रमाणे, ते सिद्धीस नेण्याऐवजी स्वत:ची वृद्धी सांभाळण्याची स्वकेंद्री वृत्ती बळावण्याचे खर तर काहीच कारण नाही... पण लक्षात कोण घेतो?

कालच, 'काय म्हणतोय तुमचा नवीन वर्षाचा संकल्प?' या उत्सुक प्रश्नाचे उत्तर देतांना आम्ही ज्या 'फोमो'च्या प्रादुर्भावाचा उल्लेख केला त्याचेच एक लक्षण म्हणजे अशा अयोग्य, अस्थानी आणि अनिष्ट 'शिष्टा'चारांच्या  चालीरीती होणे. काय सांगता, 'करोना' आणखीन 'ओमायक्रॉन' मलेरियाचे डास ठरावे एवढ्या वेगाने फैलावणाऱ्या आणि अनेक दुर्धर मानसिक आजारांचे केंद्र असलेला 'फोमो' तुम्हाला माहीत नाही? अहो, 'फिअर ऑफ मिसिंग आऊट'! आणि याची चाचणी अगदी मोफत आणि सुलभ आहे. शिवाय चाचणी हाच उपचार असलेला हा माणसाच्या ज्ञात इतिहासातला एकमेव विकार असावा. तुम्हाला 'फोमो'ची लक्षणं आहेत का हे तपासून पाहण्यासाठी एवढेच करा... सुमारे ३० मिनिटे कुठल्याही प्रकारच्या समाजमाध्यमापासून दूर रहा... श्वास जड झाला, हातापायाला कंप सुटला, घशाला कोरड पडली, जीव घाबरा झाला, घाम फुटला तर घाबरून जाऊ  नका, फोन हातात घ्या. आराम पडल्यास अभिनंदन! तुम्हाला बीपी, शुगर, थायरॉईड कसलाही त्रास नाही... फक्त 'फोमो' आहे.

असो, वर्षाची सुरवात (तरी) टीकेच्या भडिमाराने नको, उगाच लोकांच्या संकल्पात मोडता घातल्याचे पाप  लागायचे... इट्समायसीन म्हटल्यासारखे ! तर मुद्दा होता संकल्पाचा ! मूळ विषयाला बगल देऊन भलत्याच विषयाचे चऱ्हाट लावायला जे मार्केटिंग (की सेलिंग?) स्किल्स  लागतात ते या जन्मात तरी जमणे नाही, तेव्हा आपल्या नेहमीच्या आत्मघातकी 'एक घाव दोन तुकडे' स्टाईलने विषय संपवावा हे उत्तम... गेल्या सुमारे ३० वर्षांपासून ('जबसे होश संभाला है...' म्हणायची सोय नाही, कुठे सांभाळता येतोय अजून तरी?) आमचे संकल्प आमच्या कवितांतून वेळोवेळी जाहीर झाले आहेत आणि बहुतांना ते अगदी स्वप्नील, बाळबोध किंवा थेट वेडगळही वाटले आहेतच. त्यामुळे आज हा दोष स्वतः:कडे न घेता एका अज्ञात कवीने आमच्याच संकल्परुपी भावना अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीने मांडल्या आहेत, त्याच आमचा आजीवन संकल्प म्हणून सादर करतोय... मुळात दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून प्रसारित झालेल्या या प्रेरणादायी आणि विलक्षण महत्वाकांक्षी रचनेमागील संवेदनशील मनाचा आम्हाला अद्याप शोध लागू शकलेला नाही. आपणापैकी कुणाकडे याबद्दल काही सप्रमाण माहिती असल्यास कृपया कळवावी म्हणजे ज्याचे/जिचे श्रेय त्याला/तिला सन्मानपूर्वक देता येईल.     

संपू दे अंधार सारा

उजळू दे आकाश तारे

गंधाळल्या पहाटेस येथे

वाहू दे आनंद वारे….


जाग यावी सृष्टीला की

होऊ दे माणूस जागा

भ्रष्ट सारे नष्ट व्हावे

घट्ट व्हावा प्रेम धागा…


स्वच्छ सारे मार्ग व्हावे

अन् मने ही साफ व्हावी

मोकळ्या श्वासात येथे

जीवसृष्टी जन्म घ्यावी…


स्पंदनांचा अर्थ येथे

एकमेकांना कळावा

ही सकाळ रोज यावी

*माणसाचा देव व्हावा…

*देव झालेल्यांचे / ठरविले गेलेल्यांचे पायही कसे मातीचेच आहेत अन विकारही किती (अ)मानवी आहेत हा ताजा इतिहास बघता शेवटच्या ओळीत फक्त थोडा बदल सुचवासा वाटतो...

'अन् पशूचा माणूस व्हावा...!'

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

सहचर्य...!

आमचे कवीमनाचे सन्मित्र दिनेश हे किती रोमॅंटिक आहेत याचा दाखला देण्यासाठी त्यांनी स्वत:च्या विवाहासाठी निवडलेली तारीख पुरेशी ठरावी – २१ डिसेंबर – वर्षातील सगळ्यात मोठी रात्र असलेला दिवस !

काल त्यांच्या यशस्वी सहचर्याची तब्बल २२ वर्षे पूर्ण झाली. या सूज्ञ, समंजस आणि समन्वयी सहजीवनाने त्यांना काय दिले याचा सुंदर आलेख अर्थातच एका उत्कट व भावविभोर काव्यपुष्पातून ऋतुचक्राच्या रुपकाद्वारे त्यांनी मांडला.

एरवी बहुदा वैयक्तिक वेदनेच्या स्वमग्नतेत गुरफटलेली त्यांची अभिव्यक्ती या निमित्ताने मोकळा श्वास घेऊन, त्यांच्याच ‘वय...’ या आणखी एका अभिजात कवितेच्या तोडीची रसभरीत आणि साक्षात्कारी अनुभूती ठरली.

या निमित्ताने सौ. वहिनींचे अर्थात शिल्पा मॅडमचे अनेक कारणांसाठी आभार मानावे तितके थोडे ! तथापि एका अतिविशिष्ट कारणासाठी त्यांचे आभार मानणे या प्रसंगी केवळ औचित्याचेच नव्हे तर आत्यंतिक आगत्याचे ठरावे, ते म्हणतात ना, ‘मौकाभी है और दस्तूर भी...’ अगदी तस्सेच... तंतोतंत !

आमच्या सन्मित्राच्या आयुष्यातील वहिनींच्या आगमनाने आम्हाला आमच्या बालमित्रात दडून बसलेल्या कवीचे प्रच्छन्न आणि सुभग दर्शन झाले आणि त्यानिमित्ते मराठी सारस्वताचा कविधर्म वर्धिष्णू झाला...
               
“हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड ।
तरी आतां अवधानामृतें वाढ । सिंपोनि कीजो ।।१९।।
मग हें रसभाव फुलीं फुलेल । नानार्थ फळभारें फळा येईल ।
तुमचेनि धर्में होईल । सुकाळ जगा ।।२०।।“ 
(॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय ११ ॥)
 
‘तप्तपदी’ला सप्तपदीत बसवून, (सं)वेदनांना सप्तरंगांच्या गोफात गुंफून, सप्तसुरात ‘मैने तेरे लीयेही सात रंगके सपने चुने...’ गुणगुणणाऱ्या या सुविद्य, सुस्वभावी दांपत्याला शतायुषी सहजीवनासाठी अनेकानेक शुभेच्छा...!

आणि ज्यासाठी एवढे नमनाला घडाभर तेल घातले ती, सन्मित्र दिनाची सौ. शिल्पा वहिनींना समर्पित केलेली ही प्रफुल्ल अष्टाक्षरी रचना... शब्द कवीचे असले तरी एकमेकाला समजून-उमजून समरसतेने सहजीवन फुलविणाऱ्या प्रत्येक सहचरास यात आपल्या भावनांचे प्रतिबिंब दिसल्यास ती कवीच्या प्रगल्भ जाणिवांची अभिव्यक्त समृद्धी...!


ऋतू तुझे माझे

तुझी नजर शालिन
उरी कळ अनंताची
झाले मनांचे मिलन
साक्ष होती वसंताची

रक्तवेगी देह उष्ण
अंगभर सुख कळा
ग्रीष्म कोरडा बाहेर
सोसे त्याच्या उष्ण झळा

सुख दु:खाचा वर्षाव
अंगी घेत झालो चिंब
छत्री प्रेमाची जिरवी
पावसाचा वृथा दंभ!

दंव पहाटे रोज तू
कोजागिरी फुलविली
चंद्र शरद चांदणी
अवसेला मी अर्पिली

दिपोत्सव डोळ्यांत अन्
लाल बिंदी तुझ्या भाळी
हेमंताला दिली मीच
भेट रंगीत दिवाळी!

प्रेममूळ रुजे खोल
उमलले गोड फळ
आली तशीच जाईल
शिशिराची पानगळ

आले गेले किती तरी
साक्ष देईल ही धरा
नाते आपुले प्रफुल्ल
सांग ह्या ऋतूंना जरा!!

- दिनेश

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

श्री गुरुचरित्र

आमचे आजोबा अण्णा अर्थात बापू केशव पुराणिक यांनीकेशवतनयया उपनामाने अध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक तथा सामाजिक विषयांवर विविध साहित्यप्रकारात विपुल लेखन केले. अण्णांच्या समग्र प्रकाशित, अप्रकाशित साहित्याचे टंकलेखन करून आंतरजालावर सर्वांच्या संदर्भासाठी जतन करावे या आमच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप मिळण्यास सुरवात झाली तीगीत ज्ञानेश्वरचे, केवळ टंकलेखनच नव्हे, तर एका छोटेखानी जाहीर कार्यक्रमात आमच्या मर्यादित क्षमतेत त्याचे सादरीकरण देखील करून! सदर कार्यक्रमाचे ध्वनिचित्रमुद्रण युट्युबवर उपलब्ध आहे, ते आपण येथे बघू शकता.

गीत ज्ञानेश्वरइतकीच किंबहुना त्याहून अधिक लोकप्रिय असलेली अण्णांची रचना म्हणजेसंक्षिप्त श्री गुरुचरित्र’! सरस्वती गंगाधर रचित मूळ गुरुचरित्राच्या सुमारे २५०० पाने इतक्या विस्तारामुळे आधुनिक जीवनशैलीत त्याचे पारायण करण्यास अडचण येत असल्याचे निदर्शनास आल्याने, अण्णांनी ७, , ३ किंवा अगदी एकाच दिवसातही पारायण करता येईल असा श्री गुरुचरित्र सारामृताचा उपक्रम केला आणि ८०च्या दशकात तो अण्णांच्या हयातीत प्रकाशितही झाला. प्रकाशकाने नवीन स्वरुपात या ग्रंथाच्या अधिक आवृत्याही काढल्या तथापि त्या सर्वत्र सहज उपलब्ध नसतात असा अनुभव आहे.

गत दोन वर्षात विषाणू संकटाने साऱ्यांनाच बराच काळ गृहकैदेत रहावे लागले आणि बहुतांना नानाविध प्रापंचिक, व्यावहारिक कारणांनी मानसिक, शारीरिक अडचणींचा सामना करावा लागला. अशा अवघड काळात मनोबल उंचावण्यासाठी अनेकांनी आध्यत्मिकतेकडे कल वाढवला आणि नामस्मरण तथा पारायणाने चित्त शांत, शुद्ध होत असल्याने असे उपक्रम करण्याचा आलेख वाढलेला दिसला. तथापि, मुळातच दुर्मिळ झालेल्या केशवतनयकृतसंक्षिप्त श्री गुरुचरित्रग्रंथाची छापील आवृत्ती या काळात मिळणे अधिकच दुरापास्त झाले. या निमित्तानेसंक्षिप्त श्री गुरुचरित्रग्रंथाच्या टंकलेखनाचे कार्य सत्वर सुरु करावे जेणे करून भाविकांना तो सहज उपलब्ध होईल हा विचार बळावला.

अण्णांची नातसून सौ. करूणा मनीष पुराणिक हिने, मार्च २०२१ च्या सुमारास सुरवात केलेले या ग्रंथाच्या टंकलेखनाचे काम, सुरवातीचा काही भाग संगणकावर व नंतरची सुमारे २०० पाने स्मार्टफोनवर, असे गेल्या ९ महिन्यात अत्यंत चिकाटीने पूर्ण केले. टंकलेखनाच्या तपासणी आणि सूचनांचे काम, अण्णांचे नाशिकस्थित नातू श्री. वैभव शामकांत पुराणिक व सौ. स्वाती वैभव पुराणिक या उभयतांनी नेहमीप्रमाणे अतिशय निगुतीने व तत्परतेने केले. आमचे तीर्थरूप, अण्णांचे सुपुत्र श्री. शशिकांत बापू पुराणिक यांनी आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनाने सर्व दुरुस्त्यांसह ग्रंथ योग्य स्वरूपात तयार झाला आहे याची फेरतपासणी केली. सदर ग्रंथ पीडीएफ तथा मुद्रित स्वरूपात सुवाच्य व सुबक दिसावा म्हणून त्याच्या सुशोभीकरणाचे छोटेसे पोषाखी काम करून अस्मादिकांनी या सागरी सेतू बांधण्याच्या कामातील आपला खारीचा वाटा उचलला.

हा उपक्रम सुरु करतांना तो कधी पूर्ण होईल, कसा पूर्ण होईल याचा अंदाज नव्हता परंतु दत्तगुरूंच्या कृपेने आणि अण्णांसह साऱ्याच थोऱ्यामोठ्यांच्या आशीर्वादाने, मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आणि चंपाषष्ठीच्या कुळधर्माच्या मुहूर्तावर हे कार्य सिद्ध झाल्याने दुग्धशर्करा योग जुळून आल्याचे अतीव समाधान वाटले. या समाधानाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, केशवतनयकृतसंक्षिप्त श्री गुरुचरित्रग्रंथाचे सात दिवसांचे पारायण करून दत्तजयंतीला समारोप करणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या विचाराने ग्रंथाच्या डिजिटल आवृत्तीचे प्रसारण आजच्या मुहूर्तावर करून हा कपिलाषष्ठी योग साधावा म्हणून हा प्रपंच!

अत्यंत निर्मळ भावनेने आणि सद्हेतूने आम्ही आमच्या अल्पमतीनुसार आणि मर्यादित क्षमतेत केलेल्या या छोट्याशा प्रयत्नाचे स्वागत होईल आणि त्यात काही न्यून राहिले असल्यास त्यास सर्वस्वी आम्ही जबाबदार असून कुणीही कसलीही चूक, उणीव अथवा न्यून सप्रमाण दाखवून दिल्यास त्याचे त्वरित निराकरण करण्यास आम्ही तत्पर आहोत.

या निमित्ताने सुरु झालेल्याकेशवतनयसाहित्य संवर्धन अभियानास सर्वांच्या सहभाग, मार्गदर्शन आणि आशीर्वादाची नितांत गरज आहे. आम्ही सर्वांस या निमित्ताने विनंती करतो की आपल्याकडे अण्णांचे म्हणजेच बापू केशव पुराणिक अर्थातकेशवतनययांचे कुठलेही प्रकाशित, अप्रकाशित साहित्य, माहिती, पत्रे, चित्रे किंवा इतर कुठल्याही स्वरुपातील काहीही ऐवज असल्यास कृपया आम्हाला कळवावे व आपण या अभियानात कुठल्याही प्रकारे सक्रिय सहभाग घेऊ इच्छित असल्यास त्याचा तपशील द्यावा.

अण्णांचे साहित्य संचित आंतरजालावर जतन करण्याच्या कामी दत्तगुरूंची कृपा आणि अण्णांचे आशीर्वाद आहेतच, आपले सर्वांचे स्नेहाशीर्वाद लाभल्यास कार्य सिद्धीस नेणे कठीण नसावे.

शुभम भवतु !

संवत्सर प्लव, शके १९४३, मार्गशीर्ष नवमी रविवार, १२ डिसेम्बर २०२१ - सदर पीडीएफ आवृत्ती येथे वाचू शकता - https://drive.google.com/file/d/1fZxNgkuMhem-fwPa6Ai253Nm2XxOjDkj/view?usp=sharing

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

ता.क. ...?

परवा दिनाने त्याच्या मनोगतात सांगितल्याप्रमाणे माझे पत्र ता.क. (PS - Post-Script, you know!) शिवाय पूर्ण होत नाही. जगातील सर्वात मोठा, दोन पानी, ता.क. लिहिण्याचा विश्वविक्रम माझ्या नावावर आहे हे दिनाने परवाच्या व्हिडीओत सप्रमाण दाखवले आहेच. तेव्हा गेले तीन दिवस, 'लव्ह यू जिंदगी...'च्या ट्यूनवर तरंगणाऱ्या या 'आज मै उपर...'चा समारोप एका प्रसंगोचित 'ता.क.'नेच करावा असे वाटते.

पन्नाशीच्या आदल्या दिवशी... 'आपणही गेल्या काही काळापासून पोटार्थी गरजेने 'रॅट रेस'मधील उंदीर झालो आहोत आणि त्यामुळे वेगळे काही करण्याची आपली उमेद आणखीन उर्मी झपाट्याने लोप पावत चालली आहे...' अशा विचारांत 'देणं...' लिहिली गेली; त्यात निराशेपेक्षा विषाद अधिक होता. शिवाय 'पिंडी ते ब्रह्मांडी' पाहण्याच्या तात्विक सवयीमुळे 'सूक्ष्म बदलल्याशिवाय स्थूल बदलणार नाही' या पक्क्या धारणेने, शेवटच्या माणसात मुलभूत बदल घडत नाही तोवर समाज बदलणार नाही ही विचारधारा माझ्या सीएसआर - कम्प्लीट सोशल रिफॉर्म मधून प्रत्यही डोकावत असतेच.

तथापि डॉक्टर कणेकरांसारखा एक प्रश्न मला नेहमी पडत असे, 'मि. शिरी(मनी)ष , तुम्ही एवढं लिहिता, पण वाचतं का कुणी...?' समाजमाध्यमांचा (आणि खरतरं कुठल्याच माध्यमाचाच काय साधनाचासुद्धा) प्रोफेशनल वापर करण्याची कला आणि कुवत कधीही साध्य न झाल्याने आपल्या लिखाणाचे बाकी काही नाही तरी, 'लगता है तुम्हारे लिखनेसे गलत लोग जाग गये है...' ही 'क्रांतीवीरा'ची भीती खरी ठरू नये याची काळजी. पण ते तसे नाही असे समजते.

माझ्या लिखाणाला बरेच वाचक लाभतात आणि त्यातील बऱ्याच वाचकांना ते, लाईक करण्याइतके नसले तरी, शेअर करण्याइतके आवडते याचे दाखले मला हितचिंतकांकडून वेळोवेळी मिळत होतेच, कबुलीही मिळाली ! पूर्वी मी 'इत्यादी'वरच्या पोस्टची केवळ दुवा (लिंक) फेसबुकावर डकवत असे, तथापि बरेच लोक लिंक क्लिक करत नसल्याने मूळ पूर्ण मजकुरापर्यंत ते पोहचत नाहीत तेव्हा मी संपूर्ण पोस्ट फेसबुकावर कॉपी-पेस्ट करावी असा मोलाचा सल्ला मिळाला जो मी शिरसावंद्य मानून विनाविलंब तंतोतंत अंमलात आणला.

आता माझ्याच ब्लॉगवरचे लिखाण मीच कॉपी-पेस्ट करत असल्याने त्याखाली आपले नाव घालावे आणि - 'मूळ पोस्ट कुठल्याही फेरबदल न करता माझ्या नावासकट शेअर करण्यास माझी हरकत नाही' - असा शहाजोगपणाचा व्यावहारिक सल्लाही द्यावा हे काही मला सुचले नाही, किंबहुना असे काही सुचत नाही हीच आणखी एक मूळ समस्या. परिणामी, मजकूर कॉपी-पेस्ट करणाऱ्यांनी, त्यात मुळातच नसलेले लेखकाचे नाव स्वत:हून टाईप करून पुढे पाठवावे ही अपेक्षा किती बाळबोध आहे याचे प्रत्यंतर आले जेव्हा एका ग्रुपवर माझ्याशी ओळखदेखही नसलेल्या एका 'मित्रा'ने 'माझ्या मित्राची पोस्ट' अशा टिप्पणीसह छातीठोकपणे माझी पोस्ट शेअर केली. यानिमित्ताने जगन्मित्र असल्याचा अभिमानास्पद फील दिल्याने मी त्याचा ऋणीच आहे पण 'म्हातारी मेल्याचं दु:ख नाही काळ सोकावतो...' या तत्वाने, जे आपले नाही त्यावर क्षणिक सुखा-समाधानासाठी हक्क सांगण्याची वृत्ती अवघ्या मानव्याला अंती घातक ठरू शकते याची चिंता, बाकी काही नाही.

स्वामित्वाची, हक्काची भावना प्रस्थापित करून प्रबळ होण्यासाठी बीज-क्षेत्र न्याय अस्तित्वात आला आणि रानटी माणूस सिव्हीलाईज्ड झाला तेव्हापासून आपल्या 'निर्मिती'ला आपले नाव देण्याची प्रथा रूढ झाली. राजे-रजवाड्यांनी आपल्या नावाच्या मुद्रा चलनात आणल्या, संस्थानिकांनी आपली संस्थान वसवली, सामान्यांनी जमिनीचे तुकडे आणि दारांवर आपल्या नावाची तोरणं लावली, एवढेच काय, रस्त्यावर राहणाऱ्यांनी सुद्धा आपापला कोपरा आरक्षित केला. जेथे जेथे व्यवहाराची शक्यता निर्माण झाली त्या प्रत्येक ठिकाणी स्वामित्वाची, हक्काची नोंदणी आली. यातून 'कले'सारख्या अभिजात आणि कालातीत क्षेत्राचीही सुटका झाली नाही. कलाकृतीला बाजारात किंमत मिळू शकते हे समजल्यावर 'सिग्नेचर आर्ट'चे लोण पसरले. थेट पिकासोपासून खडूंनी रस्त्यावर चित्र काढणारे कलाकार त्याखाली आपले नाव टाकून आपली कला मॉनीटाईज करू लागले... आणि यात काहीही चूक नाही.

मला प्रश्न पडतो तो फक्त एवढाच की पुरातन काळापासून लेण्यांमध्ये कोरलेली भित्तीचित्रे, सर्वांगसुंदर शिल्पे, भव्य-दिव्य दगडी मंदिरे आणि तत्सम इतर वास्तू, शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून आणि कल्पकतेतून साकारलेले प्रचंड आणि अभेद्य किल्ले आणि अशा इतर अनेक सार्वजनिक कलाकृती या अनामिक कलाकारांनी कोणत्या प्रेरणेतून घडवल्या असतील? आपल्या अलौकिक कलाकृतीवर आपले नाव टाकण्याची इच्छा त्यांना झाली नसेल? इतिहासाच्या पानांनी आपली दखल घ्यावी अशी ओढ त्यांना का लागली नसेल?

याचे मी माझ्या अखंड चिंतनातून माझ्यापुरते शोधलेले उत्तर असे आहे की जेव्हा तुमचे धोरण सर्वसमावेशक असते, उद्देश स्वार्थाच्या पलीकडे असतो आणि मार्ग सेवाभावाचा असतो तेव्हा सर्वकालिक सामूहिक उपलब्धी ही तुमच्या क्षणिक प्राप्तीपेक्षा वरचढ ठरते आणि तुमच्या स्वीकृत कार्यात, कर्तव्यात व्यवहार आड येत नाही... येऊ नाही!

या ता.क.ने माझ्याच ता.क.चा पूर्वीचा विक्रम मोडण्या अगोदर थांबावे हे उत्तम... वाचत रहाल आणि आवडेल, पटेल ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवत रहाल ही अपेक्षा... नाव टाकलं नाही तर मुळीच हरकत नाही पण फेरबदल मात्र करू नये एव्हढीच माफक अपेक्षा!

शुभम भवतु !