बुधवार, २९ जून, २०११

साथ...!?!


प्रत्येकाला  वाटचालीत

साथ ही हवीच असते...

प्रवासाच्या सुरवातीला

प्रत्येक वाट नवीच असते...!

मंगळवार, २८ जून, २०११

हमी...!?!


काही काही भावनांचे

जाणीव मूल्य कमी भरते...

विश्वास लिहून दाखविला

की ती हमी ठरते...!

सोमवार, २७ जून, २०११

पत्र...!?!


पत्र म्हणजे...

वैशाखातला अवचित गारवा

ठुमरीनंतर आळवलेला

मैफिलीतला मारवा...!

रविवार, २६ जून, २०११

अनुबंध...!?!


शुभेच्छेच्या फुलांना

दुराव्याचा गंध

भेटीमुळे होतात

दृढ अनुबंध...!

शनिवार, २५ जून, २०११

निरंतर...!?!


नदीच्या काठावर बसलो तेव्हा

वाटले, पाणी किती छान आहे...

निरंतर वहात असते म्हणून

जगण्याचे त्याला भान आहे...!

शुक्रवार, २४ जून, २०११

चाकोरी...?!?


आडवाटेने चालतांना या

चाकोरी तर कधीच मोडली...

रस्ता काटेरी अन सूर्य माथ्यावर

त्यात सावलीनेही साथ सोडली...!

गुरुवार, २३ जून, २०११

भान...!


इथल्या एकटेपणात आहे

एक सुप्त समाधान...

गर्दीत आपल्या भूमिकेचं

ठेवावं लागतं भान...!

मंगळवार, २१ जून, २०११

मुग्ध...!?!


कोण म्हणत अश्रूंना

स्वत:ची भाषा नसते...

रडण्याला सांत्वनाची

मुग्ध अभिलाषा असते...!

सोमवार, २० जून, २०११

आज...!?!


निरव शांतता फक्त

समुद्राची हि गाज...

मन नाही थाऱ्यावर

अन पापणी का लावतेय आज...!

शुक्रवार, १७ जून, २०११

बंदिश...!?!


प्रत्येकाच्या वेदनेची

तार जरा वेगळी आहे...

षडज एकच लागला तरी

बंदिश मात्र आगळी आहे...!

गुरुवार, १६ जून, २०११

व्यवहार...?!?


मनाची कविता होतांना

व्यवहारसुद्धा यावा लागतो...

रात्रीला रात्र भेटण्यासाठी

मध्ये दिवस जावा लागतो...!

बुधवार, १५ जून, २०११

लय...!?!


सुरावटीतली लय ऐकून

जो तो म्हणाला वाsवा

तारांवर पडलेला ताण

त्यांना कसा कळावा...!

मंगळवार, १४ जून, २०११

हिशोब...!?!


आयुष्याचे दिवस मोजतांना

ते रात्रींना सहज टाळतात...

दिवसातले हिशोब मग

रात्रींना गाठून छळतात...

सोमवार, १३ जून, २०११

शुभेच्छा...!?!


तुला काही लिहावे तर

विचार सारे लपून बसतात

भावनांचे मोकाट वारू अन

शब्द मात्र जपून असतात...!

रविवार, १२ जून, २०११

मैत्र...!?!


मैत्रीत तरी हिशोब नसतील

अस उगाच वाटलं होत...

कधीपासून विणतोय ते वस्त्र

आधीपासूनच फाटलं होत...!

शनिवार, ११ जून, २०११

पाऊस...!?!


या पावसाळ्यात,

आरशावर ठिबकणाऱ्या

वळीवाच्या थेंबांनी मला कधीच सांगितलंय

या पावसाळ्यात घर बांधायचं नाही...

तेव्हा आता थुई थुई पावसात भिजवीण्यापेक्षा,

तुझ्या पावलांवर अळीव्याची नक्षी काढ...

...नाही, पाऊस तोच आहे, मातीही तीच आहे, 

आणि तुझ पाऊलही...

फक्त आताशा,

माझ्या हातात माती ओल धरत नाही...!

शुक्रवार, १० जून, २०११

रूपक...?!?


प्रतिभेची किंमत

इथे शून्य आहे

प्रतिमेच्याच शोधात

प्रत्येक अन्य आहे...!

गुरुवार, ९ जून, २०११

परिवर्तन...!?!


इथल्या वाटचालीला

चाकोरीचा शाप आहे...

परिवर्तनाबद्दल बोलण

हे देखील पाप आहे...!

बुधवार, ८ जून, २०११

अद्वैत...!?!


अद्वैताचा अर्थ मला

त्या क्षणी कळला

तू अडखळलीस अन

माझा तोल ढळला...!

मंगळवार, ७ जून, २०११

गणित...!?!

माणसं आयुष्य कसं

गणितात जगतात...

अनुभवाच्या पुंजीला

वयाने भागतात...!

सोमवार, ६ जून, २०११

पक्ष...?!?


प्रत्येकाचा इथे कुठला

ना कुठला पक्ष आहे

तरी पक्षबदलास उशीर नको 

म्हणून प्रत्येक जण दक्ष आहे...!

रविवार, ५ जून, २०११

वृक्षवल्ली...!?!


वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरे...

पक्षीही  सुस्वरे आळविती

तुका म्हणे होय मनासी संवाद

आपुलाची वाद आपणांसी...!

शनिवार, ४ जून, २०११

उपरा...!?!

असीम या दुनियेत

प्रत्येक जण उपरा आहे...

तरी जो तो म्हणतो

हा माझा कोपरा आहे...!

गुरुवार, २ जून, २०११

नियती...!?!


एक डाव माझा

एक नियतीचा...

जीत ठरलेली तिचीच,

मला विरंगुळा हयातीचा...!

बुधवार, १ जून, २०११

अनामिक...!?!


चालता चालता अचानक जाणवलं

वेगळी म्हणून निवडलेली पायवाट

इतिहासाच्या पाउलखुणांनी

मलीन झालीय कधीचीच...दु:ख नव्हतं,

चालण्याचे श्रम वाया गेल्याचं...

विषादही दाटला नव्हता,

वेळ खर्ची पडण्याचा...वाईत वाटल ते याच  

रूढ वाटेचा किनाराही नव्हता नशिबात

अन प्रवासाचा उद्देशच धूरकटला होता

गावाचं नाव न सांगणा-या पाटीसारखा..!