शनिवार, १६ जून, २०१८

विषाद...!


चार्वाक सन्मानिला येथे
गौरविला गौतम बुद्ध,
हतबुद्ध तो ही आज
पंचशीलास मूठमाती!

प्रज्ञा शील करुणा
अहिंसा परमो धर्म,
मर्म मानव धर्माचे
आज जातीपाती!

ज्ञानोबा तुकाराम सावता
नामदेव एकनाथ गोरा,
तोरा त्यांच्या जातीचा
वारस मिरविती!

भेदाभेद-भ्रम अमंगळ
विष्णुमय जग म्हणे तुका,
फुका हे त्याच्या गाथा 
माथी वाहविती!

समर्थ असो वा राजे
संत, साधू आणि महंत,
भदंत कित्येक जगती
जातीत विभागती!

ज्योतिबा अन सावित्री
शहाणे करण्या सकळा,
कळा अवहेलना सोसूनी
जात एक उरती!

टिळक आगरकर रानडे
सुधारक विचारवंत थोर,
चोर आज ज्ञातीत त्यांचा
संकोच करती!

सावरकर गांधी आंबेडकर
करण्या आपल्या जनां प्रबुद्ध,
युद्ध छेडिती परवशतेशी
व्यर्थ त्यांची नीती!

माथ्याची शोभा वाढविण्या
टोप्या, पागोटे अन पगडी,
दगडी पुतळ्यांचीच आज
रेलचेल सभोवती!

पगडी असो वा पागोटे
त्याखाली डोकी नासकी,
माणुसकी नुरे, ना विवेक
सारेच भ्रष्ट-मती!

स्वातंत्र्य समता बंधुता
घटनेने दिधली तत्वे
सत्त्वे त्यांची आज
नामशेष होती!

नष्ट करण्या जातीधर्म
भेदाभेद सारे तोडण्या,
जोडण्या नाळ माणसाशी
बाळे शाहू मागती!

मंगळवार, १२ जून, २०१८

पुलोत्तम...!


'झाले बहु होतील बहु परि या सम हा' अशा एकमेवाद्वितीय पुरषोत्तमाचा आज स्मृतिदिन. कथा, एकपात्री, नाटक, व्यक्तीचित्रण, प्रवासवर्णन आणि चिंतनपर ललीत अशा सर्व प्रांतात लीलया मुशाफिरी करणाऱ्या या मराठी सारस्वताच्या रत्नजडित स्तंभाने जे एकमेव दालन सुशोभित केले नाही ते म्हणजे कादंबरी. कुणी जिज्ञासू रसिक या विवेचनातील उणीव म्हणून 'कविता' या प्रकाराकडे बोट दाखवून त्याची 'समिक्षा' करु धजेल. पण थांबा! पुलंनी कविता देखील केल्या आणि आपल्या समिक्षात्मक काव्याविष्काराला, केवळ  पुलंचं देऊ शकतात असे नाव दिले - 'काहीच्या काही कविता' आणि त्यांचा समावेश केला 'उरलं सुरलं' मध्ये!

मला अत्यंत आवडलेल्या पुलंच्या काहीच्या काही कविता नमुन्यादाखल पहा...

अतिशय मार्मिक 'त्रिवेणी'चे दोन नमुने...

१. पक्षनिष्ठा

पंचवीस मार्क कमी पडून नापास
झालेले चिरंजीव तिर्थरूपांना म्हणाले,
'मी पहिल्यापासूनच मार्क्सविरोधी गटात आहे.'

२. हल्ली

हल्ली पुर्वीसारखे माझा
चेहरा टवटवीत दाखवणारे
आरसे मिळेनासे झाले आहेत.

एक प्रसंगोत्पात 'चारोळी'!

थँक्यू

निळ्या तळ्याच्या काठावरचा बगळा
एका अपुर-या चित्राला मदत करायला
काळ्या ढगाच्या दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याल्या 'थँक्यू' म्हणालो.

एक विचक्षण निरिक्षण

प्रश्न

आताशा बुडणा-या सुर्याला
'बराय उद्या भेटू'
असे म्हणाला की तो मला म्हणतो,
'कशावरून?
मधल्या रात्रीची
तुला अजूनही इतकी खात्री आहे?
'सुर्य आता म्हातारा झालाय.'

आणि एक पुणेरी आत्मचिंतन, छंद: मुक्त, स्वर: उपरोध

मी राहतो पुण्यात

मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या 'ठाण्या'त.
इथल्या मंडईचे देखील विद्यापिठ आहे.
आणि विद्यपीठाची मंडई झाली आहे.
बोलणे आ इथला धर्म आहे
आणि ऎकणे हा दानधर्म आहे.
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि स्रोते उपकार करतात.
उपचारांना मात्रा जागा नाही.

पुलंच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या स्नेह्यांनी टिळक स्मारकमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या शिर्षकाहून अधिक समर्पक शब्द मला या पोस्टच्या समारोपासाठी सुचू शकत नाहीत...
'तुझिया जातीचा मिळो आम्हा कुणी...' 

पुलोत्तमास सलाम!

रविवार, १० जून, २०१८

पैका...!डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या सुबुद्ध संपादनातला ‘संवादसेतू’ हा गेल्या वर्षीचा दिवाळी अंक विचक्षण अभिरुचीचा नमुना मानावयास हरकत नाही. मुळात, ‘विविधभाषक प्रतिभावंतांची लेखनयात्रा’द्वारे लेखन, कविता, गायन आणि नृत्य अशा बहुमुखी प्रतिभांचा घेतलेला ‘विदग्ध’ अदमास, ‘बापलेकी’ या हृदयस्पर्शी आयामातून लेकींनी रंगवलेले आपल्या कर्तुत्ववान पित्यांचे भावचित्र आणि ‘हिरवे हात’ विभागात पर्यावरणाबद्दल जनजागृतीसाठी मांडलेल्या तीन अनोख्या कहाण्या यांनी समृद्ध केलेल्या या प्रकाशनाने, एरवी कवितांच्या कलाबतू आणि जरीबुट्टीने सजविण्याच्या सार्वत्रिक आणि सर्वमान्य प्रघातास मुरड घालून; एक अनुवादित कथा, एक मूळ कथा, एक व्यक्तिचित्रण आणि, सद्य समाजव्यवस्था, प्राप्त परिस्थिती आणि प्रवाहपतित व्यक्तीच्या मनोभूमिकेचे विश्लेषण करणारे एक अत्यंत विवेकी मानसशास्त्रीय प्रकटन, अशा समसमासंयोगाने एक निराळीच उंची गाठली आहे. यातील मानसशास्त्रीय प्रकटन हे या विषयातील सन्मानीय तज्ञ आणि चिरपरिचित ‘वेध’कार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे असावे हा योगायोग नव्हे आणि त्यांनी प्रकटनासाठी ‘पैसा आणि माणसाची मानसिकता’ हा विषय निवडणे हा अपघात नव्हे! हा संपूर्ण लेख केवळ वाचनीयच नाही तर चिंतनीय, मननीय आणि त्याहीपेक्षा, साक्षात अनुकरणीय असला तरी तो संपूर्ण आहे तसा येथे उद्धृत करणे शक्य नाही, क्षमस्व!

ही प्रस्तावना ज्यासाठी केली तो म्हणजे डॉक्टरांनी या लेखात संदर्भासाठी दिलेला विंदांचा ‘रोकडे’ सत्य सांगणारा अभंग! विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त रोज एक कविता या उपक्रमासाठी मी विंदांच्या स्वेदगंगा (१९४९), मृदगंध (१९५४), धृपद (१९५९), जातक (१९६८), विरूपिका (१९८१) आणि अष्टदर्शने (२००३) या प्रकाशित काव्यसंग्रहांचा आणि काही बालकवितांचा अभ्यास केला त्यात मला कुठेही हा अभंग आढळला नाही. सदर अभंगाची मांडणी, पोत, आशय आणि बाज पहाता तो ‘जातक’ किंवा ‘विरूपिका’चा भाग असावा असे वाटते जो नजरचुकीने किंवा गहाळ झाल्यामुळे माझ्या निदर्शनास आला नसावा. कुणा अभ्यासक अथवा जाणकारांस या विषयी अधिक माहिती असल्यास कृपया सर्वांच्या माहितीसाठी ती येथे विदित करावी. धन्यवाद!

तर एवढे नमनाला घडाभर तेल ज्या ‘अभंगा’साठी घातले तो, विंदांच्या सभोवतालच्या परिस्थितीचे सखोल निरीक्षण आणि अत्यंत समर्पक (शेलक्या?) शब्दात त्यावर तात्विक भाष्य करण्याची प्रतिभा याचा आणखी एक नमुना! १९७६ सालच्या त्रिगुणी महेमूदने खुलविलेल्या ‘सबसे बडा रुपैय्या’ या हिंदी चित्रपटात मजरूहच्या ‘ना बिवी ना बच्चा...’ या शीर्षकगीताशी सहोदराचे नाते सांगणारा हा अभंग, आज डॉक्टर-द्वयी आनंद नाडकर्णी आणि वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या सौजन्याने...

वैकुंठीची पेठ I हवा पैका रोख; 
किरकोळ ठोक I मिळे मोक्ष! 

लज्जा सांडोनिया I मांडीत दुकान
येई नारायण I उधारीला!

अवघाची संसार I सुखाचा करावा;
आनंदे भराव्या I सर्व बॅंका!

बुधवार, ६ जून, २०१८

102 Not Out!


आम्ही अत्यंत भाग्यवान असल्याने अशा काळात जन्मलो जेव्हा अभ्यास, संशोधन आणि मनोरंजन सर्वकाही ‘वाचन’ होतं. गुगलबाबा आणि जीपीएसमावशींचा जन्म होण्याच्या आधीचा तो पुस्तकांचा सुवर्णकाळ. छापील शब्दांशी, चित्रांशी मैत्र जोडण्याचे मोरपंखी दिवस. केवळ दिवाणखान्याची शोभा वाढविण्यासाठी क्रॉसवर्ड किंवा ऐमेझोन वरून ढिगाने इंग्लिश पुस्तके खरेदी करण्याची समृद्धी तोवर सातासमुद्रापलीकडून भारताच्या सीमात घुसली नव्हती आणि ‘बेग-बॉरो-स्टील’ संस्कृतीमधील ‘बेग’ बापाला आणि ‘स्टील’ आईला चालण्यासारखे नसल्याने केवळ ‘बॉरो’च्या भरवशावर मिळेल ती पुस्तके वाचण्याची समज, आवड आणि सवड आमच्याकडे मुबलक होती. शिवाय, अगदी गुरुकुल-आश्रम नसल्या तरी आमच्या शाळांचे ठोकळे आणि शिक्षण इतकेही मोकळे-ढाकळे झालेले नव्हते कि विद्यार्थी ‘मिस’बरोबर आयटम सॉंग करतील आणि ‘सर’ विद्यार्थ्यांशी ‘बिग बॉस’ खेळतील. आमच्या त्या पठडीबाज आणि ज्ञानोपासक (करा गुगल आणि शोधा अर्थ!) शिक्षणाने आम्हाला ‘पैकेज’ नसेल दिले पण जो संस्कार दिला त्याची ‘सीटीसी’ कुठल्याही मल्टीनैशनलच्या अवाक्याबाहेरची आहे... अगदी अॅपल आणि मायक्रोसॉफ्टच्या देखील! ते असो, अशा लिखाणामुळे आपले वय झाले असल्याचे आणि आपण अगदीच कालबाह्य (आउट-डेटेड; सारखं सारखं काय गुगल?) झालो असल्याचे जाहीर प्रदर्शन होते हे सूज्ञांनी (आमच्या घरात दोनच सूज्ञ – आमचे कन्यारत्न आणि तिची जन्मदात्री! आपला काय अनुभव?) कानीकपाळी ओरडूनही भान रहात नाही... हेही वय झाल्याचेच लक्षण! त्यामुळे होते काय कि मुद्दा राहतो बाजूला आणि बाकीचाच फाफटपसारा... 

मुद्दा असा कि उपरोक्त पार्श्वभूमीमुळे वाचन हा आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता, आहे आणि जीवात जीव असेतो राहील... कितीही ऑडीओ बुक्स आणि व्हर्चुअल रीऐलीटी उपकरणं आली तरी. आणि शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वाचण्याला ‘अवांतर’ असे संबोधित असले तरी आम्ही अधिकाधिक तसे वाचन करावे जेणेकरून आमचे जगण्याचे भान आणि आकलन समृद्ध होण्यास मदत होईल अशा उद्दात विचाराने आम्हाला सार्वत्रिक अनुमोदनच नाही तर उत्तेजन होते. यामुळे वाचण्याची गोडी, चांगले निवडण्याची दृष्टी आणि वाचलेल्याचे चिंतन, मनन, रसास्वादन (समीक्षण नव्हे!) करण्याची वृत्ती अंगी बाणवली गेली.

या प्रवासात आम्हाला जसे आचार्य, गोनीदा, पु.ल., जी.ए. भेटले तसेच व.पु., सुशी, मिबो आणि शिक देखील. आचार्य, गोनीदांनी आम्हाला जगण्यातील भव्य-दिव्यत्वाची प्रचीती करून दिली, जीऐंनी गूढरम्यता दाखविली आणि पुलंनी जगप्रवासाच्या माध्यमातून विचक्षण निरीक्षणातील खट्याळ रसिकत्वाची ओळख करून दिली. व.पु. आमच्यासाठी ‘आपण सारे अर्जुन’ म्हणत ‘तप्तपदी’त आमचे ‘पार्टनर’होऊन समुपदेशन करणारे साक्षात पार्थसारथी झाले तर ‘येता-जाता’ आमच्यावर ‘बरसात चांदण्यांची’ करणाऱ्या सुशीने आपल्या विशेष ढंगात आम्हांला ‘तलखी’पासून वाचवून ‘दुनियादारी’ची ‘दास्तान’ ऐकवत आमची हसून हसून ‘लटकंती’ केली आणि आम्हाला चिरतरुण राहण्यासाठी ‘व्रतस्थ’ केले. त्यांनतर आमच्या आयुष्यात आलेल्या मिबो अर्थात मिलिंद बोकीलने आम्हाला आमचे बोट धरून कधी आमची प्राणप्रिय ‘शाळा’ दाखवली तर कधी ‘गवत्या’वर नेऊन सभोवतालच्या गराड्यात आपण कायमच ‘एकम’ असल्याची जाणीव करून दिली.

असे सारे ‘आहे मनोहर तरी...’ चित्र असतांना कशाची तरी नवरसातल्या कुठल्या तरी रसाची कमी होती आणि खमंग पुरणपोळीवर साजूक तुपाची धार पडावी तसे; चिकन करी आणि फिश करीला तोंडात बोटं घालायला लावील अशी ‘कणेकरी’ घेऊन आमच्या आयुष्यात आले शिरीष कणेकर! आजची ही संबध पोस्ट आत्ता कुठे समेवर आली...

शिरीष कणेकर हे आम्हाला वडिलांसारखे आहेत कारण त्यांचे वय आमच्या पिताश्रींइतके (खर तर अंमळ अधिकच) आहे. त्यामुळे तसे पाहता त्यांना ‘काका’ म्हणायला हवे, पण त्यांच्या आवडत्या प्रांतात ‘काका’ या नावाला वेगळेच (गडबडीत ‘भलतेच’ असे मनातले लिहून जाणार होतो!) वलय असल्याने आणि त्यांचे लिखाण हे दोस्ताशी नाक्यावर किंवा विशिष्ट ठिकाणी ‘बसून’ मारलेल्या गप्पांसारखे औपचारिकतेच्या कुठल्याही मर्यादांना डावलून (पुन्हा मनातला शब्द येऊ घातला होता...!) थेट उराउरी कडकडून भेटते आणि त्या तत्काळ तादाम्य पावण्याच्या अनुभूतीने वयाचेच काय सगळीच अंतरं (अगदी मुंबई-पुणे देखील!) गळून पडतात. शिवाय ‘काका’ या संबोधानला महाराष्ट्राच्या इतिहास आणि राजकरणाच्या संदर्भात निराळेच गूढगर्भ आयाम असल्याने, नकोच ते!

आज शिरीष कणेकर पंचाहत्तर वर्षांचे झाले असले तरी ‘...अवघे पाऊणशे वयमान...’ या ओळी, ज्या लोकांच्या अभिव्यक्तीत वयाचा अडसर होत नाही अशा, आशा (भोसले) आणि अमिताभ यांच्या पंक्तीत चपखल बसणाऱ्या कणेकरांना उद्देशूनच लिहिल्या असाव्यात. पहा: सामना मधील ‘अवघे पाऊणशे वयमान’ ही त्यांनी स्वत:च स्वत:ची घेतलेली मुलाखत. साहेबांना मुलाखतीच्या फार्ससाठी दुसऱ्याच्या पुतण्याची गरज लागली, कणेकरांना महाराष्ट्राचा लाडका मुलाखतकारही ‘गाड’ किंवा ‘गीळ’ म्हणू शकला नसता! पुलंनी त्यांच्या स्वरचित बायोडाटा अर्थात परिचय पत्रात आवडता पोषाख – चिलखत आणि अविस्मरणीय प्रसंग – पुण्यात लक्ष्मी रोडवर एक दुकानदार ‘या साहेब...’ असे म्हणाला तो – असे लिहून (विनोदी?) लेखकाचा बायोडाटा हा प्रकार अजरामर करून ठेवलाय. कणेकरांनी ‘लोकसत्ता’तील ‘चहाटळकी’ या सदरात, ‘चाहते हे ठेवलेल्या बाईसारखे असतात. मुळात गाठायला तितकेसे अवघड नसतात, पण सांभाळायला महाकठीण. स्त्रीच्या गालावरचा तीळ व पुरुषाच्या स्वभावातला पीळ शोभून दिसतो, पण तो दाखवण्याचा अट्टहास नको…’ असे लिहून वपुंची थोडी थट्टा केल्याची आठवण सांगतांना ‘मुलाखत’ हा प्रकार अजरामर करून टाकला.

आम्हाला कणेकर काय म्हणून आवडतात, त्यांच्या क्रिकेटवरील रनिंग कॉमेंट्रीसाठी, हिंदी सिनेमातील फिल्लमबाजीसाठी, ‘टिवल्या बावल्या’ या सदरात मोडणाऱ्या ‘चहाटळकी’साठी, पत्रकार म्हणून की एकपात्री कलाकार म्हणून...? अगदी खरं आणि मनापासून सांगायचं तर या सगळ्यापेक्षा आपल्या मानतील गोष्टी काहीही न लपवता बेधडक दिलखुलासपणे सांगणारा एक जवळचा मित्र म्हणून. ‘साहित्यिक’ वगैरे उपाधी कणेकरांना लावण्याच्या भानगडीत कुणी पडू नये असे आम्हाला आपले वाटते; ती त्यांना शोभणार तर नाहीच शिवाय त्या नामाधीनाच्या बोज्याने ते पुन्हा गंभीर होऊन स्वत:चाच सुधारित एपिटाफ लिहून मोकळे होतील अशी रास्त भीतीही वाटते. आर. के. लक्ष्मण यांनी जो कॉमन मैन भारताला दिला त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे शिरीष कणेकर अशी आमची भावना आहे. सर्व काही भोगून-उपभोगुन, निरनिराळ्या भूमिका निभावत आपल्याच चालीने चालणारा आणि स्वत:सह प्रत्येकाला आरसा दाखवत मार्मिकता या लक्षणाची पदोपदी आठवण करून देणारा आमचा मराठमोळा चार्ली चैपलीन!

अतुलने परवा सकाळ मध्ये ‘सर शिरीष कणेकर’ लिहून माझे अर्धे काम केलेचं होते आणि अजूनही मला जे खूप काही लिहायचे आहे ते मी सरांच्या नाबाद शतकाच्या मुहूर्तासाठी राखून ठेवतोय... फक्त तोपर्यंत माझीच विकेट गेली नाही म्हणजे मिळवली!

अलीकडे फ्लेक्स युद्धाच्या काळात रोज कुणाही सोम्या-गोम्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘जीवेत शरद: शतम’ लिहिलेले आढळते. आपलेच तुणतुणे वाजविण्याची कला आणि सिद्धी पैशाने येत असेलही पण आपल्या कामाने स्नेही – चाहते किंवा भक्त नव्हे – तयार करणे आणि कधीही प्रत्यक्ष न भेटताही सौहार्द्र जोपासणे हे ‘भाऊ’, ‘दादां’चे काम नव्हे. ज्यांनी खरच शतायुषी व्हावे अशी मन:पूर्वक इच्छा होते अशी कितीशी माणसे आज हयात आहेत... शिरीष कणेकर त्यातील एक!

सर, पंचाहत्तरीच्या मन:पूर्वक शुभेच्छा आणि नाबाद शतकासाठी मनोज्ञ शुभकामना! १०२ नॉट आउट बघितला असेलच... त्याबद्दल कधी लिहिताय...? वाट पहातोय...


आणि आजच्या मुहूर्तावर खास आपल्यासाठी रचलेली कविता...   

ध्यास ना वांझ माझा तो प्रसवेल सूर्यज्योती 
या कृष्ण सागरातूनच उपजतील शुभ्र मोती

त्यागला त्याला म्हणून नको धुंडाळू किनारे 
जलसमाधीतून त्याच्या उमलेल स्वप्न न्यारे 

गाव त्यांचा, न्यायाधीश ते अन तेच सवाली 
माझ्या निर्दोषत्वाचा निघाला प्रश्न निकाली 

प्रचीती माझ्या शब्दांची, जा विचार त्याला 
स्मिताआड रिचवला ज्याने विषाचा प्याला. 

मंगळवार, २९ मे, २०१८

'मी सावरकर'


सन्मित्र डॉ. सचिन चिंगरे, धुळे यांनी, 
'मी सावरकर' एक अभिनव वक्तृत्व स्पर्धा २०१८ साठी 
'वरिष्ठ गट - ४५ ते ६०' या श्रेणीत पाठविलेला त्यांच्या प्रकटनाचा व्हीडीओ.

सोमवार, २८ मे, २०१८

तात्याराव...!

स्वतंत्र भारत आणि मातृभूमीच्या प्रेमास समर्पित विशिष्ट हिंदुत्वाचा विचार मांडणारे, आद्य क्रांतिकारक, धीरोद्दात्त स्वातंत्र्यसेनानी, मुत्सद्दी राजकारणी, विद्याननिष्ठ तत्वज्ञ, जातीअंताचे तत्वज्ञान मांडणारे समाजसुधारकांचे प्रणेते आणि असीम प्रतिभा तथा अफाट बुद्धिमत्ता यांचा अनोखा संगम असलेले भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धीचे चळवळींचे द्रष्टे धुरीण - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्याराव यांची आज १३५वी जयंती. 

‘१८५७चा स्वातंत्र्य समर’ या ग्रंथात या दैवी प्रतिभेच्या साहित्यिकाने, ब्रिटीशांनी ज्याचा 'फसलेले बंड' अशी नोंद करून बेदखल करण्याचा प्रयत्न केला, तो 'स्वातंत्र्यसंग्राम' कसा होता याची अत्यंत तर्कशुद्ध आणि शास्त्रीय मांडणी करून देशवासीयांच्या अस्मितेला केवळ आवाहनच केले नाही तर स्वातंत्र्यलढ्याच्या यज्ञकुंडातला वन्ही चेतविण्यासाठी आपल्या आयुष्याच्या समिधा केल्या.

ओजस्वी विचार, अमोघ वक्तृत्व, अभिजात प्रकटन, अलौकिक ध्येर्य आणि असाधारण प्रतिभा लाभलेल्या या एकमेवाव्द्वितीय पुरुषोत्तमाने सुमारे १०,००० पाने मराठीत आणि १,५०० पाने इंग्रजीत एवढे विपुल आणि समृद्ध लेखन केले आहे. ते वाचण्याचा, समजून घेण्याचा आणि आचरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हीच या महापुरुषास खरी आदरांजली ठरेल.

श्री. नित्सुरे सरांनी स्वातंत्र्यवीरांच्या १००व्या जयंती निमित्ताने रचलेली कविता आज या प्रसंगी स्वत: गाऊन दाखवली त्याचे चित्रीकरण सर्वांसाठी...

रविवार, २० मे, २०१८

राज-का-रण...!


कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने गेले पाच दिवस लोकशाही व एकूणच राजकीय व्यवस्थेचा जो फड रंगला त्यामुळे नागरिकांच्या राजकीय भानाचा, त्यातील सहभागाचा आणि त्या संबंधी परिपक्वतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आपल्याला खरेखुरे लोकशाही राज्य हवे असल्यास नागरिकांच्या जाणीव जागृती, राजकीय आकलन क्षमता-विकास आणि राजकारणातील सक्रीय सहभागाला पर्याय नाही हे सत्य पुन्हा नव्याने अधोरेखित झाले. या निमित्ताने जर्मन कवि, नाटककार व रंगकर्मी बेरटोल्ट ब्रेक्ट याने त्याचे अत्यंत परखड विचार नि:संदिग्धपणे ज्या कठोर शब्दात मांडलेत ते जाणून घ्यायलाच हवेत. मूळ जर्मन प्रकटनाचा हा मराठीतील मुक्त अनुवाद...

जगात निरनिराळ्या प्रकारचे अशिक्षित आढळतात परन्तु सर्वात वाईट अडाणी हा 'राजकीय-अशिक्षित' होय. तो काहीही ऐकत नाही, काहीही पहात नाही आणि कुठल्याही राजकीय घडामोडीत भाग घेत नाही. त्याला, आपल्याला लागणाऱ्या डाळ-तांदूळ, पीठ-मीठ, भाडे-तोडे, औषध-पाणी आणि एकूणच जीवनावश्यक सर्वच घटकांचे दाम राजकीय धोरणांवर ठरतात, याचा एकततर पत्ताच नसतो किंवा तमा नसते. एवढेच नाही तर या महाभागाला आपल्या राजकीय अनास्थेचा एवढा दंभ असतो की तो ‘मला राजकारणाविषयी मनस्वी घृणा आहे’ असे छातीठोकपणे सांगत हिंडतो. अशा महामूर्खास या गोष्टीचा मुळी पत्ताच नसतो की त्याच्या राजकीय घडामोडींपासून अलिप्त रहाण्याने समाजात वेश्या, अनाथ बालके, भुरटे चोर-लुटारू एवढेच नव्हे तर शोषण करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे लांगुलचालन करणारे भ्रष्ट राजकारणी यांची वाढ होत असते...!