रविवार, २९ मार्च, २०१५

आपो'आप'...!


'आप'लीच यादवी
'आप'लेच भूषण
'आप'ल्या अविवेकाचे
लोकशाहीस दूषण…

'आप'लेच दात
'आप'लेच ओठ
'आप'लीच लाज
निघते काठोकाठ…

"'आप'ली माणसे
'आप'लीच नाती
तरी कळपाची
मेंढरास भीती…"

बुधवार, २५ मार्च, २०१५

सावध...!


जगण्याची सक्ती नाही
हसण्याची मात्र आहे…
दिवस काढायचा सावध,
हरवण्याची रात्र आहे…!

मंगळवार, २४ मार्च, २०१५

जगणे...!


घड्याळी आयुष्य कसे
क्षण क्षण सरते
रोज जन्मून जगणे
कण कण मरते…!

आले किती गेले किती
किती उरले शिल्लक
आकड्यांच्या जंजाळात
जगणे होते क्षुल्लक…

हिशेबच शिकायचा तर
दोन यत्ता पुरतात
जगणे समजण्यासाठी
खुळे इथे झुरतात…!

शनिवार, २१ मार्च, २०१५

नव-वर्ष...!

 
वसंताच्या हिरवाईला चैत्राचा स्पर्श
सृष्टीच्या नवलाईला सृजनाचा हर्ष 
आरोग्य यश सुख समृद्धीची गुढी 
सांगण्या उभी दारी 'आले नव-वर्ष'!

चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढी पाडवा) - अर्थात - हिंदू नववर्षाच्या मन:पूर्वक सदिच्छा 
हे वर्ष आपणा सर्वास सूज्ञ सौख्य-समाधानाचे आणि विवेकपूर्ण जाणिवेचे जावो...!

रविवार, १५ मार्च, २०१५

प्रवास...!


खुळावल्या दिसांची याद
रुक्ष जगण्यातील गम्मत
जगल्या क्षणांच्या शिदोरीवर
उरल्या प्रवासाची हिम्मत...!

शुक्रवार, १३ मार्च, २०१५

निश्वास...!


भोगण्याच्या भोगातून
सुटे ना देहभान माझे
मन शेवरी शेवरी अन
जगणे निश्वासांचे ओझे…!

बुधवार, ११ मार्च, २०१५

तेव्हा...!

 

तू हसायचीस तेव्हा
सारे कसे सोपे वाटायचे
भर उन्हाळ्याच्या दुपारी
रेशमी मेघ दाटायचे…!

रविवार, ८ मार्च, २०१५

स्त्रीत्व...!


पुरुषाच्या नशिबी नाही 
कोमल कणखर स्त्रीत्व 
जग उद्धारण्या समर्थ 
समर्पित स्वयंभू स्वत्व…!

जागतिक महिला दिनाच्या सर्व पुरुषांना शुभेच्छा…!

गुरुवार, ५ मार्च, २०१५

रुढार्थ...!


रंगात रंगण्याचा उत्सव
होळीत अनिष्टाचे दहन
पोरखेळ खोडकर वाटता
जाणावा रुढार्थ गहन…!

बुधवार, ४ मार्च, २०१५

तादात्म्य...!


गतकाळाच्या स्मृती अन
आकांक्षांची स्वप्ने नवी…
जगण्याचा बहर उमलण्या
तादात्म्याची सिध्दी हवी…!

रविवार, १ मार्च, २०१५

अन्वयार्थ…!


स्वप्नीं चालतां लवडसवडीं । जो अडखळूनि पडला आडीं ।
तो जागा हो‌ऊनि आपणातें काढी । तैशी वृक्षा वोढी साधनीं ॥

पीक आलिया घुमरी । ते शेतीं कोण नांगर धरी ।
गजान्तलक्ष्मी आलिया घरीं । भीक दारोदारीं कोण मागे ॥

हातीं लागलिया निधान । नयनीं कोण घाली अंजन ।
साधलिया निजात्मज्ञान । वृथा साधन कोण सोशी ॥

- संत एकनाथ महाराज (एकनाथी भागवत)