सोमवार, ३० डिसेंबर, २०१३

आयुष्य…!


थेंब थेंब जगणे
कवडसे जमवणे
सुखाला भ्रमाच्या
धुंदीत रमवणे…

कण कण मरणे
क्षण क्षण झुरणे
भंगूनही नित्य
पाऱ्यासम उरणे…

श्वासांचे कोंडणे
शब्दांनी भांडणे
अनावर होता
उसासून सांडणे…

गणिताचे फसणे
हिशोबाचे चुकणे
प्रयत्नांना वेडावत
नशिबाचे हुकणे…

स्वप्नांचे सजणे
उन्मेशांचे फुलणे
काळाने कूस बदलता
नवे बीज रुजणे…!

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

अश्मयुग...!


अजूनही त्यांच्या जाणीवेत

असूया अन तेढ फार आहे

आधुनिक जगण्यालाही

अश्मयुगाची धार आहे…!

बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

फकीर...!


अनुनयाचा मोह नाही

अवहेलनेची खंत नाही

कळपातला होऊन चरण्या

वेड्या फकिरा उसंत नाही…!

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

रौरव...!

 

सान्निध्याची सक्ती अन
तादात्म्याचा अभाव
याहून काय वेगळा असेल
रौरव-नरकाचा प्रभाव…!

शनिवार, १४ डिसेंबर, २०१३

'मी'...!

 

थोडासा मी जगलो
किंचितसा मी तगलो 
मी कदाचित जिंकलो
पण 'मी' कितीसा उरलो…?

बुधवार, ११ डिसेंबर, २०१३

वीण…!

 

सुखाचा धागा,
वेदनेची वीण…
भरजरी वस्त्र आणि
वागवण्याचा शीण…!

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१३

रोजच..!

 

व्यवहाराच्या भाळी

रोजच सुवर्णतुला

'मना' रिझवण्यासाठी

गतस्मृतींचा झुला…!

सोमवार, २ डिसेंबर, २०१३

उन्मुक्त...!


 
दुखणे जुनेच तरी
 
कळ रोज नित्य नवी…
 
वाहण्या भार जगण्याचा
 
उमेद उन्मुक्तच हवी…!

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१३

अर्धेच...!


 
अर्धेकच्चे आयुष्य तसा अर्धाच आव

अर्धेअधिक चोर अन उरलेले साव

सारे काही अर्धेच पण सोंग परिपूर्ण

प्रतिभाही अर्धी तरी प्रतिमेची हाव…!

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३

जागोजागी…!

जमविण्या माया
झिजविती काया
जन्म उभा वाया
भोगालागी…!
सरता भोग 
उरतो रोग 
झुरती लोग
जागोजागी…!

बुधवार, २० नोव्हेंबर, २०१३

चलाख...!

 
देहभोगाच्या विवंचनेत
'मना'ची चलाख युक्ती
पिंडाची कुचंबणा फार अन
कावळ्याच्या हाती मुक्ती…!

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

सचिन...!

तू रिटायर होणार आहेस म्हणतात… 
नेमके काय वाटते आहे ते शब्दात सांगणे कठीण आहे… 

आपल्या पहिल्यावहिल्या प्रेमपात्राचे लग्न ठरल्याचे समजल्यावर काय वाटते… 
आपण चिकाटीने प्रयत्न करून मिळवायची ठरवलेली जागा 'गेली' समजल्यावर काय वाटते...
आपण कोकण एक्स्प्रेसचे मनसुबे रचले असताना एसटीने जावे लागल्यास कसे वाटते… 

'हुरहूर'… अगदी चपखल नसली तरी खूप जवळ जाणारी मनोवस्था!


तुझे वेगळेपण काय?
तुझ्यापूर्वी आम्ही क्रिकेट बघतच नव्हतो असे नाही 
पण त्यात कैफापेक्षा सवयीचाच भाग अधिक होता… 
आणि तुझ्याशिवाय बघणारच नाही असेही नाही
पण आता त्यात 'आवड' किती असेल अन 'सवड' किती…?

तू आम्हाला काय दिलेस?
आमच्या रोजच्या धकाधकीच्या अन 'रोजमर्रा'च्या आयुष्यात  
निखळ आनंदाचे आणि अतीव समाधानाचे दोन क्षण… 
जगात 'भारतीय' म्हणून अभिमानाचे स्थान आणि मान… 
एका आगळ्याच प्रतिभा-विलासाचा अद्भुत अन नयनरम्य साक्षात्कार…


तू आम्हाला काय शिकवलेस?
क्रिकेटमधले नादमय संगीत आणि तालबद्ध पदन्यास
देशासाठी सर्वस्व पणाला लावून लढण्याचा ध्यास
प्रतिस्पर्ध्याला केवळ कौशल्याने आणि जिद्दीने नामोहरम करण्याचे तंत्र 
मनुष्य प्राण्याला असाध्य असे विक्रम करूनही सोज्वळ राहण्याचा मंत्र   
केवळ सजीवांचाच नाही तर मैदानाचाही यथायोग्य मान राखण्याचे औचित्य
देहमनाचे, वागण्याबोलण्याचे, जगण्याअसण्याचे आत्यंतिक पावित्र्य… 

लढा व्यक्तीशी नाही तर वृत्तीशी देण्याचा धडा
अथक मेहनतीने भरायचा सुखसंपन्नतेचा घडा
समर्पणाची परिसीमा अन व्रतस्थ वृत्तीची शिदोरी 
शांत संयमी वृत्तीने उडवायची टग्याटवाळांची भंबेरी
समृद्ध अनुभवी वावराने वाढवायचे इतरांचे मनोबल 
मोहवायचे गोंडस प्रतिमेने जन सारे लोकल-ग्लोबल


तुझ्या निवृत्तीसाठी ही कविता नाही उत्कट झरा आहे 
वृत्त-छंद-यमक जुळले नाही तरी भाव अगदी खरा आहे
तू पुन्हा खेळतांना दिसणार नाही… म्हणतात
हल्ली 'स्वप्नां'नाही माणसे देवामध्ये गणतात…!

(पेन्सिल स्केच सन्मित्र दिनेशने काढले आहे. त्याचे सौजन्य आणि अनुमती गृहीत धरलेली आहे!)

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१३

ग्वाही…!

 
प्रागतिक पुरोगामी राष्ट्रात
 
समृद्धीची दुमदुमते द्वाही
 
दिन दुबळ्या वंचित प्रजेला
 
प्र-योजनांची अभद्र ग्वाही…!

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

'मना'...!


वास्तवाची जाण आहे

जगण्याचे भान आहे

'मना' रिझवण्या पण

कल्पनाविलास छान आहे…!

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

गोडवा...!


उत्सव उत्कट नात्याचा

सहजीवनाचा गोडवा…

'नातिचरामि'चा मंत्र

रुजवितो पाडवा…!

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१३

लक्ष्मीपूजन...!


आदि-धान्य-धैर्य-गज

संतान-विजय-विद्या-धन

पूजिता अष्ट-लक्ष्मी

सार्थ कृतार्थ जीवन…!

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

थाट…!


 

दिवाळी पहाट 

उटण्याचा घमघमाट

भूपाळीचे सूर अन

अभ्यंगाचा थाट…!

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

उत्सव...!


दिव्यांची रांगोळी,

चैतन्याचा प्रकाश…

तेजाचा उत्सव,

झगमगते आकाश…!

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१३

सांत्वन...!

 
हरपले जे अनमोल छत्र त्या
 
विदग्ध क्षतींना भराव नाही…
 
संवेदनांच्या हिंदोळ्यावर झुलता,
 
सांत्वनाचा माझा स्वभाव नाही…!
 
[सन्मित्र मिलिंदच्या पितृवियोगाच्या दु:खात सहभागी अमुक एक]

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

'अस्मि'...!

 

तुका आकाशाएवढा तरी
उरला उपकारा पुरता…
किडा मुंगी जीव तुझा
तोही 'अस्मि'ने झुरता…?

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

सृजन…!

 

नदीचे वाहणे, झऱ्याची झुळझुळ
पक्षांचे कूजन… पानोपानी
जाणिवेचे जगणे, हळवी कुजबूज
क्षणांचे सृजन… मनोमनी…!

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१३

मोल…!

 
 वाहत्या पाण्याला
जगण्याचे मोल…
साचल्या डबक्यात
शेवाळाची ओल…!

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१३

'अर्थ'...!

 

जगण्याला अर्थ होता
तेव्हा गणित समजले नाही...
व्यवहाराचा 'अर्थ' उमजता
जगणे नि:संदर्भ नाही...!

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३

नवरस...!

 
दुर्गा शक्ती अम्बा माया
 
रूपे तुझी कोटी कोटी...
 
लक्ष्मी सरस्वती देवी
 
नवरस तुझ्या घटी पोटी...!

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१३

स्वाधीन...!

पंचमहाभूतांचा स्थूल देह
 
उत्पत्ती-स्थिती-लयाधीन
 
'अनित्य' सूक्ष्म आकळता
 
आत्मा मुक्त मी स्वाधीन
 
 
परम पूज्य गुरुजी पद्मभूषण ग्लोबल विप्श्चना आचार्य
श्री सत्यनारायण गोएंका यांना सद्गदित श्रधांजली…!
२९ सप्टेम्बर २०१३
 

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

बोळवण...!

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
 
'दोन क्षण दम खातो' म्हणून माझ्या घरी टेकला
 
'उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला'
 
मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला…
 
तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस?
 
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस?
 
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
 
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक…
 
 
'इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
 
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो
 
काय करू आता सार मॅनेज होत नाही
 
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाही
 
इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग
 
तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग
 
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
 
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात'
 
 
माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन
 
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन
 
एम बी एचे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे?
 
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस का रे?
 
असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
 
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक
 
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको
 
परत येउन मला दमलो म्हणायला नको
 
माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश
 
'माग' म्हणाला 'हवं ते एक वर देतो बक्षिस
 
सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप
 
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप'
 

 मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं
 
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं?
 
'पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं '
'सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं'
'हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव'
 'प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव '
'देशील आणून परत माझी हरवलेली नाती '
'नेशील मला परत जिथे आहे माझी माती '
'इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं '
'आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं '
'कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर '
'भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार '
'य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान'
'देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?'
 
"तथास्तु" म्हणाला नाही सोंडेमागून नुसता हसला
 
सारं हाताबाहेर गेलंय पोरा… "सुखी रहा" म्हणाला…!

सोमवार, ९ सप्टेंबर, २०१३

आदिबीज...!

 
अकार चरण युगुल
उकार उदर विशाल
मकार महामंडल
मस्तकाकारें...
 
हे तिन्ही एकवटले
तेथें शब्दब्रह्म कवळलें
 ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें
आदिबीज...!

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१३

दहीहंडी...!



यशोदेचा कान्हा राधेचा श्याम

गोपींचा नटखट गोपाळा…

सख्यांसह फोडीतो दहीहंडी

तो गोविंद निळा सावळा…!

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

मनोज्ञ...!

 
इवलेसे आयुष्य
जगण्या काय हवे…
शुभेच्छांचे बळ अन
जीवलगांचे थवे…
 
पुस्तक मनोज्ञ वाचता
विचारांना पंख नवे...
कवितेच्या मुग्धतेत
उडणे सावरी सवे…
 
उगाच बघता कधी
जे भवति ना भवे…
उन्मादल्या मनासाठी
पापणी ओली लवे…
 
घडविण्या जे आवडे
स्वप्न त्याचे व्हावे
क्षण क्षण आयुष्य
चिंब पावसात न्हावे…!

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

रक्षाबंधन…!


 
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण

रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटली पाहिजे अंतरीची खूण

धन्य तोचि भाऊ धन्य ती बहीण
प्रिती ती खरी जी जगी लाभावीण...!

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१३

बिंब…!

तुझी पत्र वाचतांना
मनाचा पक्षी
आठवणींच्या आभाळात
उंचच उंच झेपावतो…

नजर धुसर केणारी
त्याची ती झेप पाहून
काळ्या मेघालाही
आश्चर्य वाटतं…

त्याने कडूगोड आठवणींनी
टाकलेला हुंकार फक्त
आकाशालाच ऐकू येतो…

त्याच्या डोळ्यातली
हिमालयाला लाजवणारी उंची
थिट करते अवघं ब्रह्मांड
त्याच्या इवल्या पंखांसमोर…

तुझ्या कुंतलांच्या
सावलीसाठी आसुलेला
तो थकतो, विचार करतो
अन परततो…

तुझ्याच आठवणींच्या राज्यात
अन गुंततो पुन्हा तुझ्या
नसण्याची साक्ष देणाऱ्या तुझ्याच
विचारांच्या भोवऱ्यात… पंख मिटून!

रविवार, ११ ऑगस्ट, २०१३

श्रावण...!

 
श्रावणाच्या सरींना
 
ऊन ऊन झळाळी
 
अंकुरल्या बीजातून
 
फूल फूल डहाळी
 
 
सृष्टीला लावण्य हिरवे
 
पानोपानी ग विलास
 
हाती रंगता मेहंदी
 
मनोमनी उल्हास…!

शनिवार, १० ऑगस्ट, २०१३

धाप…!

 
झिम्मगर्भल्या क्षणाने
 
गीत पिसाटून गावे
 
ओंजळीत येता येता
 
सत्य निसटून धावे…
 
 
कुचंबण्याच्या देही
 
उमटण्याचा शाप
 
मन अलवार होता
 
जीवा-शिवाला धाप…!

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

गीत...!

 
जगण्याचा उत्सव होता
 
फुलणे बहरून यावे…
 
पाव्याच्या मुग्ध स्वरांनी
 
गीत सृजनाचे गावे…!

बुधवार, ३१ जुलै, २०१३

सराव…!

 
जीवनेच्छा उत्कट होती
 
पण मी जगलोच नाही…
 
तरण्याचा केला सराव
 
तरी मी तगलोच नाही…!

मंगळवार, ३० जुलै, २०१३

कण कण...!

 
जगण्याची तडफड
 
उडण्याची फडफड
 
एवढासा उर
 
धपापे किती…
 
 
मानगुटीवर भूत
 
पायाखाली वाळू
 
कण कण निसटता
 
भविष्याची भिती…!

सोमवार, २९ जुलै, २०१३

ओंजळ…!

 
नामाचा गजर
 
भक्तीचे सोंग
 
भोगण्याची सक्ती
 
अभोगी किती…
 
 
नीतीचा बाजार
 
जगण्याचे ढोंग
 
मूठ झाकलेली
 
अन ओंजळ रिती…!

रविवार, २८ जुलै, २०१३

भ्रमिष्ठ…!

 
शब्दांचे बुडबुडे
 
शब्दांचा रतीब
 
शब्दशर नाठाळ
 
गर्विष्ठ किती…
 
 
जाणीवांचे भेंडोळे
 
स्पंदनांचा हुंकार
 
संवेदना घायाळ
 
भ्रमिष्ट मती…!

सोमवार, २२ जुलै, २०१३

अमृत...!

 
ये तन विषकी बेलारी
 
गुरु अमृतकी खान
 
शिश दिये जो गुरु मिले
 
तो भी सस्ता जान…!
 
 
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

शुक्रवार, १९ जुलै, २०१३

श्वासही...!

 
जगण्याचे भान त्यांचे
 
अपरिमित ढळलेले…
 
श्वासही त्यांनी जणू
 
लाभातच वळलेले…!

बुधवार, १७ जुलै, २०१३

गंध...!

 
पाऊस असा ठिबकत
 
बरसून उरलेला…
 
गंध तिचा उत्कट
 
पसरून मुरलेला…!

बुधवार, ३ जुलै, २०१३

बिंब...!

 
ज्याची जेवढी खिडकी
 
तेवढे त्याचे आकाश…
 
जाणीवेच्या बिंबातून
 
व्यासाइतका प्रकाश…!

बुधवार, २६ जून, २०१३

शुभेच्छा...!

 

आयुष्याच्या वेलीवर

सुखदु:खाची फ़ुले…

योगाच्या हिंदोळ्यावर

भोग अभोग झुले…!

"सन्मित्र दिनेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा!"

शुक्रवार, २१ जून, २०१३

नेमस्त...!

 
 
एखाद्या चुकार क्षणी
 
झुगारून नेमस्त ढोंग
 
चिंतावे संपते कसे
 
जन्माचे टुकार सोंग…!

गुरुवार, २० जून, २०१३

भागधेय...!

 
जगण्याचे भान येता
 
कविता मिटावी… नि:शब्द
 
मर्त्य देहाचे भागधेय
 
हाती ज्याच्या ते… प्रारब्ध!

गुरुवार, १३ जून, २०१३

हुरहूर...!

 
प्रत्येक गोष्टीला म्हणे
 
कधीतरी अंत आहे
 
हुरहूर त्यात मोडत नाही
 
याची मात्र खंत आहे…!