शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

स्वतंत्र...?


मानवाने विकासाच्या मार्गावर,
अनेकानेक यशस्वीतेचे टप्पे गाठले म्हणून...
माणसाच्या साऱ्या विजयांची पताका मिरवावी की,
वाढत्या विषमतेने आणि असंवेदनशील स्वकेंद्रिततेने
बिघडत्या समाजस्वास्थ्याची चिंता वहावी...

रोज चढत्या-उतरत्या बाजाराची पर्वणी अनुभवावी की
ऊंच मनोऱ्यांच्या पायथ्याशी कोंडलेली घुसमट ऐकावी...
नित्य शेकड्याने वाढणाऱ्या कोट्याधीशांची की
कोटी कोटीने वाढत्या वंचितांची मोजदाद करावी...

प्रच्छन्न दांभिकतेचे नयनरम्य सोहळे मिरवावे की
मूकनायकांच्या निर्मम प्रशांत सादेस प्रतिसादावे...

स्वातंत्र्यदिन साजरा करावा की
'आत्मनिर्भर' व्हावे या संभ्रमात,

आज 'मी' स्वतंत्र...?

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

मैत्र...!



एक गुपित सांगू तुला...?

चिकटत गेल्या जन्माआधीपासून पाती
अन भेटत गेली जन्मल्यापासूनच नाती...
काही रक्ताची, काही हक्काची...
काही भक्तीची तर काही सक्तीची!

नातेवाईकही होते आणि तऱ्हेवाईकही...
सगे सोयरे तसे भक्त अन उपभोक्तेही
माझ्या स्वप्नांशी नव्हता त्यांचा संबंध,
माझ्या आकांक्षा तर त्यांच्या गावीही नव्हत्या
माझी विवंचना त्यांना वंचना वाटली आणि
माझ्या भविष्याच्या कल्पनांना तर
‘वेध’ सोड ‘वेड’ ही म्हटले नाही रे त्यांनी!
म्हणून मला प्रतीक्षा होती, आहे, राहील...

माझ्यातल्या वेडेपणाला समजून घेणाऱ्या,
मी जिंकलोच कधी तर माझ्याहून अधिक धन्य होणाऱ्या
आणि हरलोच नेहमी तरी तेवढेच खिन्न होणाऱ्या पण
‘धिस इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड...'
असं धीरोदात्त बाण्याने निक्षून सांगणाऱ्या
बाकी काहीच नाही तरी, ‘मी आहे रे...'
अशा आश्वासक शब्दांची फुंकर घालत,
माझ्या अव्यवहारी, अ-मूल्य धडपडीला तेवढीच
निर्हेतुक, निनावी पाऊलखुणांची सोबत करत,
न भेटता न बोलताही सतत उमेद देत आणि
कटू भावनांचे निर्माल्य नेमाने विसर्जित करीत...

पाणकळा लागलेल्या ढगाने उसासून बरसावे, मोकळे व्हावे
तसे ज्याच्यासमोर मोकळे उघडे रिते रिकामे होता येईल...
असा एक तरी नि:संदर्भ, बेहिशेबी, बेमतलबी किनारा असावा 
चित्रगुप्ताच्या चोपडीतून निसटलेला आणि
ऋणानुबंधाच्या जंजाळातून मुक्त असा भावबंध...
विशुद्ध, निखळ, निरागस, शहाण्या मैत्रीचा...

निरपेक्ष मैत्र... तू देशील?