बुधवार, २१ एप्रिल, २०२१

गुरुजी...!

मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घ्यावे लागणे ही सहानुभूती दाखविण्याची गोष्ट नसण्याच्या काळात आमचे संपूर्ण शिक्षण पूर्ण झाले. अगदी पदव्युत्तर शिक्षण आणि विद्यावाचस्पती झालेले आमचे सहाध्यायी आणि वर्गमित्र यांना कधीही मराठी माध्यमाचा अडसर वाटलेला आम्हाला जाणवला नाही; पश्चाताप किंवा लाज तर मुळीच नाही उलट, काही ‘सन्मानीय’ अपवाद वगळता, बहुतेकांना आपल्या मातृभाषेचा सार्थ अभिमान कायमच वाटत आला आहे ! किंबहुना आपली मातृभाषा नसल्याने ‘इंग्रजी’ची ओळख ब्रिटिशांची भाषा म्हणजेच ‘साहेबा’ची भाषा, म्हणजेच वाघिणीचे दूध अशी कायमच परकी राहिल्याने तिच्या बाबतीत अतिपरिचयात अवज्ञा न होता एक भीतीयुक्त दुरावा कायम राहिल्याने, त्याबाबतीत जवळीकीने येणारी कुठलीही आगळिक न होता, आमच्यासाठी ‘येस’ चा कधीही ‘येप’ वा ‘याss’ झाला नाही, ‘नो’ चा ‘नोप’ झाला नाही आणि गुरुजींचा ‘पोप’ झाला नाही ! इयत्ता पाचवी मध्ये या भाषेची तोंडओळख होतांना, ‘ही आपली मातृभाषा नसल्याने साहेबाला जेवढे मराठी (किंवा हिन्दी) येईल तेवढी इंग्रजी आपल्याला जमली तरी पुरे’ हे अत्यंत धीर देणारे बाळकडू आणि, गणितातील प्रमेयाइतकेच किचकट वाटणारे ‘स्पेलिंग’ हे प्रकरण, त्याची सहज समजेल व जमेल अशी फोड करून (Theatre – The Atre) लीलया आत्मसात करण्याचे कसब शिकवणारे गुरुजी लाभल्याने, आज त्यांच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी विविध विषयावर इंग्रजीतून लिहिलेले शोधनिबंध (Research Papers) जगभरात वाचले आणि वाखाणले जातात, ही एक उपलब्धी... त्या व्रतस्थ गुरुजींची ! 

गध्द्धेपंचविशीत ब्रह्मचर्य नासून ‘गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही...’ अशी लाजिरवाणी अवस्था होऊ नये म्हणून समाजव्यवस्थेने ‘विवाह’ नावाचा संस्कार प्रचलित केला. या योगे, दोन जीवांचे देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने मिलन व्हावे आणि दोन कुटुंबांची सुखदु:खे एकत्र बांधली जावी आणि उभयतांनी ‘नातीचरामी’ म्हणत शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाची सोबत करावी जेणे करून त्यांना, घरातील वडीलधाऱ्यांची सेवा-शुश्रूषा करतांनाच, एक सूज्ञ, सुसंस्कृत, सुशील आणि जबाबदार पिढी घडवून मनुष्य प्रजातीचे संवर्धन करता येईल अशा उदात्त हेतूने विवाह संस्काराचे प्रयोजन केलेले आहे ! शंभरातल्या ९९ नवविवाहितांना यातील काहीही माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही कारण, ‘आठवतील ते मंत्र म्हणून लग्न लावणारा भटजी आणि त्याने लवकर ‘आटपावे’ म्हणून त्याला आमिष दाखवणारा, गुडघ्याला बाशिंग बांधलेला उतावीळ नवरा’ अशा, सर्वच मनोरंजन माध्यमांच्या आवडीच्या विनोदनिर्मितीत(?) संस्कार आणि त्यामागची भूमिका समजावून देण्यास न भटजीस उत्साह न नवरदेवास उसंत ! या पार्श्वभूमीवर, अक्षरश: दिवसभर चाललेला आमचा विवाह संस्कार आणि त्यातील प्रत्येक उपचाराचे शास्त्र जाणून घेण्याची आमची जिज्ञासा आणि प्रत्येकवेळी आमचा कान पकडून अत्यंत तळमळीने ते आम्हाला समजाऊन सांगण्याची आमच्या गुरुजींची चिकाटी आणि त्यामागचा व्यासंग यामुळे आमचा विवाह संस्कार केवळ प्रासंगिक सोहळा न होता सहजीवनाच्या जाणिवा समृद्ध करणारा एक निरंतर उत्सव झाला नसता तरच नवल!

उपरोक्त दोन्ही विषयांमधील समान सूत्र म्हणजे आमचे गुरुजी – श्री. बी. एन. जोशी सर! पायजमा-सदरा-टोपी-खडू या वेषातील न्यू सिटी हायस्कूलचे इंग्रजी शिक्षक आणि धोतर-सदरा-टोपी-उपरणे या वेषातील आमचे कुल-उपाध्याय! प्रकांडपंडीत विद्वान आणि आद्य व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर आम्हाला ज्यांच्या रूपाने भेटले त्या जोशी सरांनी आम्हाला इंग्रजीची मुळाक्षरे गिरवितांना तिची भीती तर वाटू दिली नाहीच उलट तिच्या गाभ्यात शिरून तिला केवळ आत्मसात करण्याचे कसबच नव्हे तर एका परक्या भाषेवर प्रभुत्व मिळविण्याची पायाभरणी करून दिली. आजही आम्ही इंग्रजांसारखे (किंवा इंग्रजाळलेल्यांसारखे!) फाडफाड इंग्रजी बोलू शकलो नाही तरी आमच्या इंग्रजी लिखाणाने साहेबालाही घाम फोडू शकतो याचे श्रेय निर्विवादपणे जोशी सरांचे ! आणि विवाहाला केवळ सोय किंवा बंधन (आजच्या बेबंद वेगाच्या धरसोडीच्या युगात ‘तडजोड’ किंवा ‘करार’) न मानता संस्कार मानल्याने समृद्ध झालेल्या आमच्या गृहस्थाश्रमाला लाभलेले मार्गदर्शन आणि आशीर्वाद हेही जोशी सरांचे आमच्यावरील स्नेहमयी अमिट ऋण... ज्यात आजन्म रहायला आम्हाला आवडेल !

आज हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे, इस्पितळात आपल्या भेटीस आलेल्या स्नेह्यानांच धीर देणाऱ्या आणि वयाच्या ८५ व्या वर्षी विषाणूशी धीरोदात्तपणे मुकाबला करणाऱ्या जिंदादील जोशी सरांची प्राणज्योत आज मालवली. पण आनंद सिनेमात अमिताभ म्हणतो, ‘आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं !’ तसे शिक्षकही संपत नसतात, त्यांनी देह ठेवला तरी त्यांचे संस्कार शाश्वत असतात... ते पिढ्यानपिढ्या निरंतर संक्रमीत होतात. त्यांचे पुतळे उभरायची गरज नसते कारण त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनातील त्यांच्या प्रतिमा कधीही पुसल्या जाऊ शकत नाही. म्हणूनच, ही जोशी सरांना श्रद्धांजली नव्हे तर त्यांच्या समस्त विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना दिलेले वचन आहे ‘...आम्ही चालवू हा पुढे वारसा...’

II श्रीराम जय राम जय जय राम II