गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

चैत्र-पहाट...!

 
चैत्र-पहाट उमलता
 
गुढी उभी आभाळी
 
लिंब लोणाचा शृंगार
 
धुंद आंब्याची नव्हाळी…!

बुधवार, १० एप्रिल, २०१३

सर्वसाक्षी...!

 
भोगण्याची वल्गना
वल्गनेचा विकार
विकारातून विनाश
तत्वभक्षी...
 
जगण्याची कल्पना
कल्पनेचा विचार
विचारातून साकार
सर्वसाक्षी...!

मंगळवार, ९ एप्रिल, २०१३

आरक्त...!

 
घातक संग
विकृतींचा
निस्संग रहाया
विरक्त व्हावे…
 
विखारी रंग
उत्कर्षाचा
विवेक डांबून
आरक्त न्हावे…!

रविवार, ७ एप्रिल, २०१३

भुईभार…!

 
जनांच्या संगे
 
मनाचिये भंगे
 
सोयीस्कर रंगे
 
सोपस्कार…
 
 
हितकर गर्दी
 
हरविले दर्दी
 
फुकाची वर्दी
 
भुईभार…!

शुक्रवार, ५ एप्रिल, २०१३

देणगी...!

 
गेल्या दिसांच्या आठवणींना
 
हुरहूर विश्रब्ध जाणिवेची
 
विस्मृतीचा मिळो वर किंवा
 
देणगी मुरमाड नेणीवेची…!

बुधवार, ३ एप्रिल, २०१३

कावा...!

 
विषादाने मेले नाही कुणी
 
असा त्यांचा दावा आहे…
 
जगण्याची ढोंगी व्याख्या
 
हा प्रच्छन्न कावा आहे…!

मंगळवार, २ एप्रिल, २०१३

अनित्य...!

 
सोडवल्याने सुटतीलच
 
सारे प्रश्न असे नाही…
 
अनित्य आहेत प्रश्न तसे
 
उत्तरांनाही ठसे नाही…!

सोमवार, १ एप्रिल, २०१३

'स्मार्ट'…!

 
माणूस असो नसो
 
फोन 'स्मार्ट' हवा
 
हिशेबी आयुष्याला
 
रोज 'चार्ट' नवा…!