रविवार, २८ मे, २०२३

सतीचे वाण...!


विनायक दामोदर सावरकर अर्थात तात्याराव या ओजस्वी प्रतिभेच्या युगपुरुषाने जे 
अलौकिक कार्य करून ठेवले त्यातील भाषाप्रभू महाकवी आणि विज्ञाननिष्ठ सुधारक ही त्यांची दोन रूपे मला अधिक भावतात. पैकी, सर्वगुणसंपन्न उत्कृष्ट काव्यप्रतिभेचा याहून अधिक भाषासमृद्ध, प्रतिभासंपन्न, आशयघन आणि तेजस्वी नमुना माझ्या पाहण्यात नसल्याने सावरकरांची २५ कडवी आणि १०० ओळींची "माझे मृत्युपत्र" ही संपूर्ण कविता...         

वैशाखिचा कुमुदनाथ नभात हांसे
यच्चन्द्रिका धवल सौधातली विलासे
घाली स्वये जल जिला प्रिय बाल खासे
जाई फूले चिमुकली नटली सुवासे ll १ ll

आले घरी सकल आप्त सह्रद जिवाचे
आनंदमग्न कुल गोकुल काय साचे
आदर्श दीप्ति-शुचिता-धृति यौवानांचे
पाहून जे तरुण मंडल कीर्ति नाचे ll २ ll

प्रेम हृदे विकसली नव-यौवनाच्या
गंधे सुवासित उदात्त सुसंस्कृतिच्या
दिव्या लता तरुसी जे गृह बाग़ झाला
ज्यां पौर हर्षित वदे जन "धर्मं-शाला" ll ३ ll

स्वयंपाक त्वां निजकरें कुशले करावा
प्रेमें तुझ्या अधिकची सु-रसाल व्हावा
संवाद सर्व मिळुनी करितां नितान्त
जेवावयासी बसलो जईं चांदण्यात ll ४ ll

श्री रामचंद्र वनवास कथारसाला
कीं केवीं देश इटली रिपु-मुक्त झाला
तानाजिचा समरधीर तसा पोवाडा
गावा चित्तोडगढ वा शनिवार वाडा ll ५ ll

झाली कशी प्रियकरा अपुली अनाथा
दुर्दास्यखिन्न शरछिन्न विपन्न माता
शोकें विवंचुनी तिच्या जईं मोचनाचे
केलें अनंत तरुणा उपदेश साचे ll ६ ll

तो काल रम्य मधुरा प्रिय संगती ती
ते चांदणे नवकथा रमणीय रात्री
ते ध्येय दिव्या निज मातृ-विमोचानाचे
तो उग्र निश्चयही ते उपदेश साचे ll ७ ll

झाल्या तदा प्रियकरा सह आण-भाका
त्या सर्व देवी वहिनी, स्मरति तुम्हां कां
"बाजीप्रभु ठरू" वदे युव संघ सर्व
"आम्ही चित्तोड़ युवती" युवती सगर्व ll ८ ll

कीं घेतले व्रत न हे अम्ही अन्धतेने
लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्ग माने
जे दिव्य-दाहक म्हणोनी असावयाचे
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे ll ९ ll

ज्या होती ते प्रियजन सह आण-भाका
त्यांते स्मरोनी मग सांप्रत हे विलोका
नाही पूरी उलटली जरी आठ वर्षे
तों कार्यसिद्धि इतुकी मन का न हर्षे ?? ll १० ll

आसेतु पर्वत उचम्बळला स्वदेश
वीराकृति धरित टाकुनी दीनवेष
भक्तांचिया रघुपदी झुलतात झुंडी
जाज्वल्य होयही हुताशन यज्ञकुंडी ll ११ ll

तो यज्ञ सिद्ध करण्यास्तव उग्र दीक्षा
जे घेती येई तइं तत्कृतिची परीक्षा
"विश्वचिया अखिलमंगल धारणाला
बोला असे कवण भक्ष्य हुताशनाला ?" ll १२ll

आमंत्रण प्रभु रघुत्तम सोडितां हे
दिव्यार्थ देव !!! अमुचे कुल सज्ज आहे
हे साध्वी !! गर्जुनी असे पहिल्या हविचा
हा ईश्वरी मिळविला अम्ही मान साचा ll १३ ll

धर्मार्थ देह बदलो ठरले नितान्त
ते बोल-फोल बालिश नचि बायकांत
ना भंगली भिउनिया धृति यातनान्ना
निष्काम कर्मरति योग ही खंडिला ना ll १४ ll

ज्या होती तैं प्रियजना सह आण-भाका
केल्याची सत्य कृतिने अजि ह्या विलोका
दीप्तानलात निज मातृ-विमोचनार्थ
हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ ll १५ ll

हे मातृभूमि तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाक्-विभव ही तुज अर्पियेले
तुंतेंची अर्पिली नवी कविता वधूला
लेखां प्रति विषय तूची अनन्य झाला ll १६ ll

त्वत्-स्थंडिले ढकलिले प्रिय मित्र-संघा
केलें स्वये दहन यौवन देह-भोगा
त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा
तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा ll १७ ll

त्वत्-स्थंडिली ढकलली गृह-वित्त-मत्ता
दावानालात वहिनी नव-पुत्र-कांता
त्वत्-स्थंडिली अतुल-धैर्यनिष्ठ बंधू
केला हवि परम कारुण पुण्यसिंधू ll १८ ll

त्वत्-स्थंडिला वरी बळी प्रिय बाळ झाला
त्वत्-स्थंडिला वरी अता मम देह ठेला
हे काय बंधू असतो जरी सात आम्ही
त्वत्-स्थंडिलीच असते दिधले बळी मी ll १९ ll

संतान ह्या भारतभूमिस तीस कोटि
जे मातृभक्ति सज्जन धन्य होती
हे आपुले कुल ही तय मध्ये ईश्वरांश
निर्वंश होउनी ठरेल अखंड वंश ll २० ll

कीं ते ठरों ही अथवा न ठरो परंतु
हें मातृभू अम्ही असो परिपूर्ण हेतु
दीप्तानलात निज मातृ-विमोचनार्थ
हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ ll २१ ll

ऐसे विवंचुनी अहो वहिनी !! व्रताते
पाळोनी वर्धन करा कुल दिव्यतेतें
श्रीपार्वती तप करीं हिम-पर्वती ती
कीं विस्तवात हसल्या बहुराजपुती ll २२ ll

तें भारतीय ललना-बल-तेज काही
अद्यापि या भरतभूमित लुप्त नाही
हें सिद्ध होइल असेंच उदार उग्र
वीरांगने !! तव सुवर्तन हो समग्र ll २३ ll

माझा निरोप तुजला येथुनी हाच देवी
हा वत्स-वत्सल तुझ्या पदी शीर्ष ठेवी
सप्रेम अर्पण असो प्रणति तुम्हांते
आलिंगन प्रियकरा मम अंगनेते ll २४ ll

कीं घेतले व्रत न हे अम्ही अन्धतेने
लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्ग माने
जे दिव्य-दाहक म्हणोनी असावयाचे
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे ll २५ ll

आणि, या काव्यातील "...की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने..." या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पुष्ट्यर्थ, सावरकरांचे नातू सात्यकी यांचा विज्ञाननिष्ठ सावरकर हा लेख इथे वाचा.

रविवार, ७ मे, २०२३

नाळ...!


फुलाचा गंध मोहवतो
भ्रमराचं गुंजन वेडावतं
रानफूल व्हावं वाटलं किती,
नाळ तुटणं अवघड असतं...

तोडावे वाटतात सारे पाश
जगून घ्यावे वाटते निर्धास्त
नेमस्तपण आडवं येतं,
नाळ तुटणं अवघड असतं...

उद्याची मुळी चिंता नको
फक्त आज हरायचं नसतं
कालची खंत नको म्हणता,
नाळ तुटणं अवघड असतं...

भिरकावून द्यावे सारे संकेत
बंध सारे तोडून वहावे मस्त
लांघाव्या साऱ्या मर्यादा पण,
नाळ तुटणं अवघड असतं...

मनापासून हसलो तर
कुठलं ओझं अवजड नसतं
धाय मोकलून रडलो तर
नाळ तुटणं अवघड नसतं...!

सोमवार, १ मे, २०२३

...माझा !


कातळालाही बोलती करती लेणी
परंपरेचा वसा जणू पंढरीची वारी

बाणा रामशास्त्री अन् परखड वाणी
विवेक रक्षण्या लेखणीची मातब्बरी

शारदेचा वरदहस्त अन गंधर्वगान
गानकोकिळा शोभीवंत सूर-सागरी

फाळके-गदिमा-आचार्य अन पुलं-तें-नेमाडे  
खाशाबा-सचिन फडके पताका गगनावरी

उकडीचे मोदक मधुर पुरणपोळी सणावारी
वस्त्रांच्या महाराण्या राजस पैठणी नऊवारी

पसायदान, गाथा आणि शाहिरी
सर्वस्पर्शी आमची मुशाफिरी

गडकोटांचे भक्कम बुरुज ही खूण सुराज्याची 
जाणता राजा अन सुधारकांची फौज ही न्यारी 

इतिहास शौर्याचा तसा भक्तीचा
संस्कृतीची धुरा मराठी खांद्यावरी

सूज्ञ समावेशक आज्ञापत्रांचे पाईक होण्या 
महाराष्ट्र धर्म नांदत राहो समृद्धीच्या दारी...!

समस्त मराठी जनांस ६३व्या महाराष्ट्र दिनाच्या बाणेदार शुभेच्छा...!