गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

उन्मेष...!


कलाकार तो अदृश्य सर्वभर
ओळ उमटते कधी झर झर
पडद्यामागून रेखितो कुंचला
कधी चित्रातून निसर्ग निर्झर

गतस्मृतींनी दाटता गहिवर
उमटते भयचित्र पटलावर
नव्या चित्रात भरू रंग नवे
फुलपाखरांचा मुक्त वावर

सोसाट्याचे वारे नी वादळ
झाडे साहती जरी पानगळ
वसंताची लागताच चाहूल
कोंब नवा गर्भात सळसळ

नवा जन्म मनाच्या कुशीत
नवे कूजन नव्याने खुशीत
होऊ या सज्ज घडविण्या
येणाऱ्या वर्षा नव्या मुशीत

रविवार, २७ डिसेंबर, २०२०

निरोप...!


मित्राशी सुखदु:खाच्या मनसोक्त गप्पा झाल्यावर तो दिवेलागणीच्या वेळी घराकडे परत जायला निघाला. मित्र म्हणाला, आता थोड्या वेळातच अंधार पडेल, रात्रीचा अंधारात प्रवास करण्यापेक्षा मुक्काम कर. रात्री आणखी थोडे हितगूज करू, सकाळी ताजेतवाने होऊ आणि मग जा तू आपल्या मार्गाने...

तो म्हणाला, ‘नको! कारण, दोन गोष्टी – एक म्हणजे समारोप कधी लांबवू नये, निरोप नेहमी चटकन घ्यावा म्हणजे सहवासांच्या क्षणांचा मिळालेला आनंद दीर्घकाळ टिकतो. आणि दुसरे म्हणजे अंधाराची तमा त्यांना ज्यांना उजेडाची सवय आहे. माझ्यासारख्या जन्मांधाला कसला दिवस आणि कुठली रात्र, रात्रंदिन आम्हां तमाचाच सहारा...!’

त्याच्या स्वरातला विषाद मित्राला हेलावून गेला आणि मैत्रीच्या पोटी असलेल्या मायेच्या उबेतून मित्र म्हणाला, ‘ठीक आहे, जशी तुझी इच्छा पण थांब मी कंदील पेटवून देतो तेवढा सोबत ठेव म्हणजे माझ्या जीवाला घोर लागणार नाही.’
‘चेष्टा करतोयस का? अरे जिथे मला दिसतच नाही तिथे कंदिलाचा उजेड काय प्रकाश पाडणार...?’ तो म्हणाला.
‘मित्रा, तुला दिसत नाही हे मान्य पण तुझ्या समोरून कुणी अंधारातून आला तर कंदिलामुळे त्याला तर तू दिसशील...’

मित्राचा युक्तिवाद पटल्याने मित्राच्या इच्छेला मान देवून तो कंदील घेऊन मार्गस्थ झाला. रस्ता सवयीचा असल्याने तो झपाझप चालू लागला. बरेच अंतर पार केल्यावर आणि रात्र बरीच झाल्यावर अंधारातून अचानक कुणीसे त्याच्या अंगावर आदळले आणि तो भेलकांडला. अत्यंत सात्विक संतापाने तो ओरडला, ‘मुर्खा, दिसत नाही का...’

आपल्या अशा उद्धाराने चिडलेला वाटसरू म्हणाला,
‘हेच मीही तुला विचारू शकतो, डोळे फुटलेत का तुझे...?’
‘अरे बाबा, मी जन्मांध, माझे डोळे जन्मत:च गेलेले पण तुझ्या दृष्टीला काय झालं? तू तर बघू शकतोस ना?’
‘हो तर, मी बघू शकतो पण अमावस्येच्या रात्रीच्या एवढ्या मिट्ट काळोखात दिसायला दिव्यदृष्टी नाही मला!’
‘मित्रा, त्याची कल्पना आहे म्हणून मी हातात पेटता कंदील घेऊन चाललो आहे ना, त्याचा उजेड नाही दिसला?’
‘कंदील? कुठे आहे कंदील? अच्छा हा इकडे पडलेला होय?
त्याची वात केव्हाच निवलीय बुवा, तुम्हाला पत्ताच नाही!’

-------------------------------------------------------------------------------------
कुणाच्याही उसन्या प्रकाशाने आपला मार्ग थोडा काळ उजळल्यासारखा वाटू शकतो. मात्र वाटेतले अडथळे, खाच-खळगे टाळून दूरचा पल्ला गाठायचा तर उसना प्रकाश फार उपयोगाचा नाही, त्यासाठी ‘अप्प दीपो भव’ अर्थात ‘तूच तुझ्या मार्गाचा प्रकाश हो’ हा बुद्धाचा सल्ला मानायलाच हवा.
 
शेवटचे चार दिवस शिल्लक असलेले २०२० हे वर्ष त्या हितचिंतक मित्रासारखे आहे जे आपल्याला सहाय्यभूत ठरू शकतील अशी साधने देऊ इच्छिते. आपला पुढचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून या मित्राने आपल्याला त्यासाठी सिद्ध करण्याची एकही संधी सोडलेली नाही.

अगदी कठीण अशा घटक चाचण्या (आठवा: लॉकडाऊन), सहामाही परीक्षा (बघा: कोरोना चाचण्या) आणि आता वार्षिक परिक्षा (पक्षी: लसीकरण) घेऊन त्याने आपली चांगलीच तयारी करून घेतलेली आहे. आता आपली तयारी कितपत झाली आहे याचीच खरी परीक्षा आहे. आपण आपल्या अंत:चक्षुनी गेल्या वर्षभरातील अनुभवांकडे डोळसपणे पाहून काही शिकणार आहोत की आपल्या चर्मचक्षुंना दिसते तेच खरे मानून आंधळेपणाने भौतिकातच गुंतून पुन्हा त्याच दुष्टचक्रात अडकणार आहोत हा निर्णय सर्वस्वी आपला आहे.

एक वर्ष सरते आणि दुसरे सुरु होते म्हणजे खरतर फक्त भिंतीवरचे कालनिर्णय बदलते. वर्ष ‘बदलले’ किंवा ‘नवे’ वर्ष सुरु झाले असे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा आपला दृष्टीकोन बदलेल, सवयी बदलतील, जीवनशैली बदलेल. दिवस तर रोजच नवा असतो पण त्या नव्या दिवसाचे आपण काय करणार हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर कुठल्याही पुस्तकात तर सोडा, गुगलकडे पण असू शकत नाही... ज्याचे त्यालाच शोधावे लागते. ज्याला सापडते तो सुखी-समाधानी होतो ज्याला नाही सापडत तो टीकाकार '(अतृप्त आत्मा?) होतो... बघा तुम्हाला कोण व्हायचे आहे?

...आणि हो, आपण जन्मांध असलो म्हणून काहीही बिघडत नाही, विवेकाने जगायला दूरदृष्टी लागते, डोळ्याने तर प्राण्यांनाही दिसते! दुसरे, आपल्या कंदिलाची वात विझली आहे हे समजायला उजेडाचीच गरज असते असे नाही, कंदिलाच्या काचेची ऊब कमी झाली यावरूनही ते समजायला हरकत नाही. पण त्यासाठी मन संवेदनशील हवे आणि जाणीवा प्रगल्भ... नव्या वर्षाचा कुठलाही दिखाऊ अल्पजीवी संकल्प करण्यापेक्षा हे साधता येईल...? आलेच तर सच्चिदानंद...

सरत्या वर्षाचा निरोप घेतांना त्याने दिलेला प्रकाश साठवून ठेवून स्वयंप्रकाशित होण्याचा प्रयत्न करू या... शुभम भवतु !

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

(जाय)बंदी...!

विकासाची हाव करी
नष्ट वने घनदाट...
दिशाहीन भटकता
प्राणी रोज चुके वाट !

'निती’च्या राज्याची
वाट चुकला रानगवा...
त्याला धडा शिकविण्या,
उन्मादी माणसांचा थवा !

बेबंद शहरीकरण
घुसमटतो रोज श्वास...
मृगजळामागे धावता
होती नित्य नवे भास !

कुणी गाठतो मरणा
ऊरस्फोड धावून...
अन कुणी साधतो ते
गळा फास लावून !

बहुतांचे आशास्थान
तरी वाटे मुक्ती हवी…
बदलता रचना सारी
व्यवस्थाही रोज नवी !

कोठे परंपरांचे जोखड
भक्तीची रिकामी कोठी…
तत्व हळूच गळून जाता
समष्टिहून व्यक्ती मोठी !

हत्येला वध म्हणण्याची
पुराणोक्त परंपरा आहे...
स्वसंरक्षणार्थ हिंसा येथे
सर्वच धमन्यांतून वाहे !

उरेल सापळाच फक्त
विरता मूक आकांत...
अन्वयार्थ समजविण्या
‘नीती’मान एक कांत !

सारे साऱ्यांच्या भल्याचेच
खोट संकल्पात नाही...
आमच्या नेक इराद्यांना
नडते अतिलोकशाही !

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

पन्नाशी...!


नवा दिवस रोज बघावा अन प्राजक्त व्हावे
निर्माल्याच्या काळजीने का फुलणेच रहावे?

फुलांस नसते चिंता आपल्या प्रारब्ध योगाची
तळवे सुगंधीच करते निर्माल्यही सहज भावे!

क्षण थांबत नाही पळभर, काळ चालतो पुढे
सुखांनाही लागते जागा हे का मनास न ठावे?

चाफ्याच्या अबोल्याची नाळ बांधलेली वेदनेशी
मोहरण्याच्या चाहूलीने मुक्त गाणे स्वच्छंद गावे!

फुलं गळतात म्हणून कळीचं राहत नाही फुलणं
रिकाम्या गाभाऱ्यातही भक्तिरसच सर्वभर धावे!

प्रवास हा कोहम पासून सोहम पर्यंत एकलाच
‘नेती नेती’चे भान जपत प्रपंचात वैराग्य ल्यावे!

रंगूनी रंगात साऱ्या रंग असावा वेगळा
मुक्तात्मा स्वयंभू, जाणतो सारेच कावे!

निर्माल्याच्या काळजीने का फुलणेच रहावे?
नवा दिवस रोज बघावा अन प्राजक्त व्हावे...

प्रिय बंधुसखा योगाचार्य कुमार अर्थात रंगांचा किमयागार वैभव पुराणिक याचे
नाबाद अर्धशतकाबद्दल मनस्वी अभिनंदन आणि निरामय शतकासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!