सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

अमृत-माया...!


वेदनेचा फुत्कार लाभो

आर्ततेचा दग्ध ठसा

माउलीची दिंडी वहाया

अमृत मायेचा वसा...!

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

अ-बाधित...!


हरवणे कधी गवसणे

मिटून अवचित फुलणे

मुग्ध विश्रब्ध जगण्याचे

अस्पर्श अ-बाधित लेणे...!

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१२

काजवा...!


काजव्याचे नशीब

अन प्रकाशाचा शाप

मालवला तर निष्प्रभ

चमकला तर पाप...!

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१२

समन्वय...!


दोन त्रीज्यांच्या समन्वयाने

वर्तुळ सांधणारा व्यास...

प्रेमाच्या गर्भज्ञ अवगुंठनावर

कृतार्थ सहप्रवासाचा ध्यास...!

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१२

पाऊलखूण...!


संस्कार घडतांना मना

उमजेलच असे नाही...

पाऊलखूण पावलाला

समजेलच असे नाही...!

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१२

बोचणी...!


'नाही रे' ची खंत तशी

'आहे रे' ची टोचणी

निरलस जीवनेच्छेला

मायेची दुखरी बोचणी...!