शनिवार, २९ जून, २०१९

सौदा...!


 The Elephant And The Dog

टॉम आणि जेरी यांची ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी अजब मैत्री त्यांच्या कार्टून सेरीजने अजरामर करून ठेवण्यापूर्वी अशा विजोड जोड्यांच्या कथा हितोपदेश, इसापनीती, जातक कथा आणि पंचतंत्र अशा ‘प्रबोधन’ साहित्यातून वाचायला मिळत. काही विशिष्ट प्राणी अगदी स्वाभाविकपणे नैसर्गिकरित्या एकमेकाचे तथाकथित ‘शत्रू’ असतात असे ‘जंगलबुक’ सांगते. उदा. वाघ आणि सिंह, बगळा आणि करकोचा किंवा तरस आणि लांडगा असले प्राणी समानधर्मी आणि एकाच गणाचे भासले तरी त्यांचे गुण जुळतीलच असे नाही. अशीच एक सर्वार्थाने विजोड जोडी म्हणजे हत्ती आणि कुत्रा! आता या दोघांचे कुठलेच गुण आणि गण जुळणे शक्य नसले तरी हे दोघेही माणसाळू शकतात आणि त्यामुळे ‘पाळीव’ ठरतात एव्हढेच काय ते, माणसाने त्यांना बहाल केलेले, साम्य! अन्यथा कुत्री ही, बऱ्याचदा आपली भिती लपविण्यासाठी, अत्यंत कर्कश्श भुंकत असतात आणि अत्यंत धीर-गंभीर प्रकृतीच्या शांतताप्रिय गजराजांना शोर अजिबातच सहन होत नाही. महाकाय हत्तीला घाबरून कुत्री अधिकच चेवाने भुंकतात आणि त्यांच्या या गदारोळामुळे गजराजांना ते अधिकच अप्रिय होतात. थोडक्यात काय तर कुत्रा आणि हत्ती यांचा छत्तीसचा आकडा, त्याची ही गोष्ट...

सुजलाम सुफलाम राज्य होतं. राजा जाणता, न्यायी आणि दयाळू होता. प्रजा सुखी समाधानी होती. राज्याचे वैभव राजवाड्याबाहेर झुलणारे हत्ती आपल्या तुकतुकीत कांती आणि टोकदार, शुभ्रधवल सुळ्यांनी दर्शवित होते. यातला एक सगळ्यात तरुण आणि देखणा हत्ती सगळ्यांच्या लाडाकोडात वाढत होता आणि त्याच्या अंगावर रोज मणामणाने मांस चढत होते. मात्र हत्तींच्या तंबूच्या बाहेर एका खबदाडीत एक मरतुकडा कुत्रा कसाबसा दिवस काढत होता. दिवसभर वणवण करून कुठे काही खायला मिळते का हे शोधण्यात त्याचे आयुष्य चालले होते. राजबिंडा हत्ती आणि अस्थिपंजर कुत्रा यांना एकमेकाची न खबर होती, न मैत्री न वैर!

एक दिवस राजबिंड्या गजराजाचे राजेशाही भोजन चालू असतांना भुकेल्या श्वानाला त्या शाही अन्नाचा वास लागला आणि नकळत त्याची पावलं तंबूकडे वळली. तंबूच्या कनातीखालून हळूच डोकं घालून बघतो तर काय, राजाचे सेवक राजबिंड्या हत्तीला मोठमोठ्या चांदीच्या थाळ्या भरभरून अन्न पुरवता आहेत आणि गजराज आपल्याच मस्तीत त्या रुचकर, स्वादिष्ट अन्नाचा फन्ना उडवीत आहे! हत्तीची सोंड आणि तोंड यांची गाठ पडेतो काही अन्न खाली सांडते आहे आणि आपल्याच धुंदीत भोजनाचा अस्वाद घेणाऱ्या गजराजांना त्याचा पत्ताही नाही. हे लक्षात आल्यावर कुत्रे महाराज हळूच चोरपावलांनी हत्तीच्या पुढल्या दोन पायांमध्ये जाऊन उभे राहिले आणि हत्तीच्या सोंडेतून खाली सांडणाऱ्या अन्नाचा फडशा पाडू लागले. अशा रीतीने त्यांना मिळालेल्या भोजनाचा स्वाद तर चांगला होताच शिवाय त्यांचे पोट भरण्यासही ते पुरेसे होते म्हणतांना हा त्यांचा दिनक्रमच झाला आणि त्यांची वणवण संपली!

मुळात अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ असलेल्या विशाल हृदयाच्या गजराजांना कुत्र्याची ही चलाखी लक्षात आली होती पण खायला मिळाल्याने तो भुंकत नसल्याने त्यांना त्याच्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. उलट रोजच्या राजेशाही, पौष्टिक खुराकामुळे काही दिवसताच कुत्रा देखील अंगापिंडाने भरला आणि देखणा दिसू लागला. आता उघड उघडच हत्तीसमोर येऊन तो जेवणाची वाट बघू लागला आणि हत्ती देखील त्याला आपल्या बरोबरीने जेवू घालू लागला आणि ते दोघे भोजनभाऊ झाले, त्यांची चांगलीच गट्टी झाली. काही दिवसातच त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली की आता ते बहुतेक वेळ एकत्रच घालवू लागले. कधी कुत्रा हत्तीच्या सुळ्यांना लटकून झोके घेई तर कधी हत्ती आपल्या सोंडेत त्याला पकडून हवेत गरगर फिरवत हेलकावे देत त्याचा पाळणा करी. कधी कुत्रा हत्तीचा पाय, कान किंवा सोंड खाजवून देई तर कधी हत्ती सोंडेने त्याच्या अंगावर पाणी उडवी आणि त्याला उचलून थेट आपल्या डोक्यावर बसवून सैर करवून आणी. असे दिवस मजेत चालले होते.

आणि एक दिवस राज्याच्या एका गावातून एक गावकरी काही कामानिमित्त राजधानीच्या शहरात आला. आपले काम आटोपून परत जात असतांना त्याची नजर या मजेत खेळणाऱ्या हत्ती आणि कुत्र्याच्या जोडीकडे गेली. हा धष्टपुष्ट, देखणा आणि चपळ कुत्रा आपल्या घरादाराची, शेताची राखण करायला चांगला आहे या विचाराने त्याला आपल्या सोबत घेऊन जावे अशा विचाराने तो माहुताकडे आला. खर तर माहुताचा त्या कुत्र्याशी दुरान्वयानेही संबंध नसतांना केवळ तो आपल्या हत्तीशी खेळतो म्हणून आपला त्याच्यावर अधिकार आहे असे माहुताला वाटले. गावकऱ्याने माहुताशी ‘सौदा’ केला आणि काही धनाच्या बदल्यात माहुताने कुत्र्याची ‘मालकी’ गावकऱ्याला बहाल केली, गावकरी कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घालून त्याला घेवून आनंदात गावाकडे निघून गेला.

इकडे आपल्या प्रिय मित्राच्या विरहात गजराजांना अन्नपाणी गोड लागेना. त्यांचे कशातच मन रमेना. त्यांनी पाण्यात खेळणे, पाण्याचे फवारे उडवणे देखील सोडून दिले आणि ते आपल्या मित्राच्या आठवणीत दिवस दिवस उदास राहू लागले. त्यांच्या या खंत काढण्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होऊन ते हळूहळू खंगू लागले. याची खबर राजाला मिळाली आणि राजा व्यथित झाला.

सगळ्याच राजांच्या पदरी असतो तसा एक अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि निष्ठावान प्रधान या राजाच्याही दिमतीला होताच. किंकर्तव्यदिग्मूढ अवस्थेत जाणे आणि अशा नेहमीच्याच झालेल्या प्रसंगी तज्ञांचा सल्ला घेणे असा परिपाठ अगदी इंद्रापासून कुणालाच चुकला नसल्याने आपला हा राजा तरी त्याला अपवाद कसा असेल? बहरहाल, राजाने प्रधानजींना बोलावणे धाडले, आता पुढे...

“महाराजांचा विजय असो! आपण बोलावणे धाडलेत महाराज?”
“होय, प्रधानजी. पण आज राज्याचे हाल-हवाल विचारायला आपली आठवण नाही काढली!”
“देवाची कृपा महाराजांवर सतत राहो. असे काय असावे महाराज जे आपल्या प्रजेशिवाय आपल्या चिंतेचा विषय बनू शकते?”
“प्रधानजी, आमच्या प्रजेत फक्त मनुष्यप्राणीच येतात काय? इतर जीवसृष्टीची देखील काळजी घेणे आमची जबाबदारी नाही काय?”
“महाराज, असे का बोलता? या राज्यातील माणसेच नव्हे तर पशु-पक्षी, झाडे-झुडपे, नदी-नाले, फळे-फुले एव्हढेच नव्हे तर अगदी येथील दगड-माती देखील आपल्याला आपल्या मुलाबाळांइतकी प्रिय आहे आणि आपण या समग्र सृष्टीची एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे काळजी घेता हे राज्यात कुणाला ठाऊक नाही?”
“प्रधानजी, हे जर खरे असेल तर आमचा लाडका गजराज अलीकडे स्वस्थ दिसत नाही ही बातमी आमच्यापासून का लपवून ठेवली?”
“क्षमा असावी महाराज, पण आपल्यापासून लपवून ठेवण्याचा कुठलाच हेतू नव्हता, केवळ आपल्या जीवाला घोर लागू नये म्हणून सांगितले नव्हते. शिवाय राज्यातले सर्वात अनुभवी आणि रामबाण औषधाचे धन्वंतरी पशुवैद्य गजराजाची चिकित्सा करीत आहेत आणि सेवकांची एक फौजच त्यांना हवे नको ते बघायला त्यांच्या दिमतीला दिली आहे. गजराजांना लवकरच गुण येईल याबद्दल आम्ही आपणास खात्री देतो, आपण चिंता करू नये.”
“प्रधानजी, आपल्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे तरी देखील आपण या विषयात जातीने लक्ष घालावे अशी आमची इच्छा आहे.”
“जशी आपली आज्ञा महाराज, आम्ही आत्ताच गजराजांच्या स्वास्थ्याची विचारपूस करून आवश्यक ती तजवीज करतो.”

महाराजांना आश्वस्त करून प्रधानजी निघाले खरे पण आता हळूहळू त्यांनाही चिंतेने ग्रासले. राज्यातल्या सगळ्यात निष्णात माहुताच्या देखरेखीत, निवडक प्रमाणिक सेवकांच्या सेवेच्या छायेत आणि ऐरावातालाही दुर्लभ अशा राजेशाही सरंजामात ठेवलेल्या गजराजांना, दीर्घानुभवी पशुवैद्यांनाही निदान होऊ नाही, असा कुठला असाध्य आजार झाला असावा आणि कशामुळे या विचारात तंबूच्या दिशेने निघालेल्या प्रधानजींना खुद्द पशुवैद्यच समोरून येतांना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा प्रधानजींच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. स्वत:ला सावरत उसने अवसान आणून प्रधानजी हसतमुखाने पशुवैद्यांना सामोरे गेले.

“प्रणाम, वैद्य महाराज! काय म्हणताय आमचे गजराज? आपल्या रामबाण औषधाचा प्रभाव पडला की नाही त्यांच्या विकारावर?”
“क्षमा असावी, प्रधानजी! माझ्याकडे आपल्याला समाधान वाटावे असे सांगण्यासारखे काहीही नाही. सर्व प्रकारच्या उपयांनंतरही गजराजांच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा नाही, उलट ती दिवसेंदिवस अधिकच ढासळत चालली आहे.”
“आश्चर्यच म्हणायचे, वैद्यराज! आपल्यालासुद्धा निदान होऊ नये असा कुठला जगावेगळा विकार जडलाय आमच्या गजराजांना?”
“प्रधानजी, विकाराच म्हणाल तर गजराजांच्या अगदी नखातसुद्धा रोग सापडत नाही, मग औषध काय आणि कसे देणार?”
“काय सांगताय वैद्य महाराज? नखातसुद्धा रोग नाही? मग प्रकृती खालवतेय तरी कशाने?”
“माफ करा, प्रधानजी, आपल्याला ऐकायला कदाचित थोडे विचित्र वाटेल पण माझा असा अंदाज आहे की गजराजांच्या अशा अवस्थेचे कारण आहे त्यांची मनोवस्था! त्यांचे चित्त थाऱ्यावर नसल्याने ते आहार-विहारात अक्षम्य हेळसांड करीत आहेत.”
“काय सांगताय काय वैद्यराज? गजराजांना उदास होण्याचे कारणच काय? महाराजांनी त्यांच्या देखभालीत कुठलीही कसर ठेवलेली नाही. कित्येक माणसांच्या नशिबी नसेल अशी व्यवस्था गजराजांसाठी केली जाते, मग असे होण्याचे काय कारण?”
“क्षमा असावी, प्रधानजी, त्याची मला कल्पना नाही. पण याव्यतिरिक्त दुसरे कुठलेही कारण मला तरी आढळत नाही.”
“असे असेल तर आपण निघू शकता वैद्यराज, आम्ही बघतो काय करता येईल ते. आपल्या सल्ल्याबद्दल आभार!”

विचारमग्न अवस्थेत प्रधानजी तंबुजवळ पोहचले आणि माहूत त्यांना सामोरा आला. त्याच्याही देहबोलीत उदासी आणि चेहऱ्यावर काळजी असली तरी सूक्ष्मशी अपराधी छटा प्रधानाजींच्या नजरेतून सुटली नाही. माहुताचा प्रणाम स्वीकारून काहीही न बोलता प्रधानजी थेट गजराजांच्या दिशेने निघाले. गजराजांची अवस्था बघवत नव्हती! एवढा तरणाबांड राजबिंडा दिसणारा महाकाय प्राणी एखाद्या उपासमार झालेल्या रोगजर्जर कुपोषित जनावरासारखा अस्थिपंजर झालेला पाहुन प्रधानजींच्या पोटात तुटले. ते दृश्य सहन न होऊन प्रधानजींनी मान फिरवली आणि दूर एक सेवक त्यांच्याकडे घाबरलेल्या पण काही बोलण्यास उत्सुक नजरेने पहात असलेला दिसला. प्रधानजींनी त्याला इशारा केला आणि ते तंबूबाहेर चालू लागले.

तंबूतून बाहेर पडून राजवाड्याच्या दिशेने झपझप चालणाऱ्या प्रधानजींना गाठायला सेवकाला त्यांच्या मागे जवळ जवळ धावावे लागले. प्रधानजी एका छोट्याशा पायवाटेवर वळून तंबू आणि माहूत यांच्यापासून दूर एका झाडाखाली थांबले आणि सेवक मागून धापा टाकत त्यांच्या जवळ येवून थांबला. प्रधानजींनी इशारा करताच तो बांध फुटल्यासारखा बोलू लागला आणि त्याने तंबू बाहेरील मरतुकडा कुत्रा, त्याचा तंबू प्रवेश इथपासून गजराज आणि श्वान यांची निखळ मैत्री ते गावकरी आणि माहुताचा त्याच्याशी सौदा इथपर्यंत सारी कहाणी एका दमात सांगून टाकली. कहाणी ऐकतांना प्रधानाजींच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले आणि इतक्यावेळ काळजीने ओसंडून वाहणारा त्यांचा चेहरा क्रोधाने फुलून आला. सेवकाचे नाव विचारून आणि झाल्या प्रकाराची कुणाकडेही वाच्यता न करण्याची त्याला तंबी देवून प्रधानजी काही एका निर्धाराने राजवाड्याकडे शीघ्रतेने चालू लागले.

“महाराजांचा विजय असो! क्षमा असावी महाराज, परवानगीशिवाय दाखल झालो.”
“प्रधानजी, आम्ही आपणास बखुबी जाणतो आणि आपल्या बुद्धिचातुर्य तथा स्वामीनिष्ठेची कदर करतो. आपण कुठल्याही शिष्टाचाराचे, विशेषत: राजशिष्टाचाराचे, असमर्थनीय उल्लंघन करणार नाही याची आम्हांस खात्री आहे. ज्याअर्थी आपण एवढ्या तातडीने आमच्या भेटीस आलात त्या अर्थी खबर तेवढीच महत्वाची असणार हे न कळण्याइतके आम्ही अजाण नाही, बोला...”
“महाराज बातमी गजराजांबद्दलच आहे आणि... खर तर चांगली नाही पण म्हणूनच तातडी करणे गरजेचे आहे.”
“प्रधानजी आमच्या संयमाचा अंत न पाहता जे आहे ते थेट सांगा आणि वेळेचा अपव्यय टाळा म्हणजे गोष्टी हाताबाहेर जाणार नाहीत.”
“महाराज, पशुवैद्य सर्व प्रकारच्या चिकित्सेनंतर या निष्कर्षाला आले आहेत की गजराजांचा विकार शारीरिक नसून मानसिक आहे...!”
“प्रधानजी, केवळ मानवालाच नव्हे तर सर्वच सजीवांना भाव-भावना असतात हे आम्ही समजू शकतो, पण गजराजांच्या भावना दुखावण्यासारखे काय आक्रीत घडले?”
“महाराज, आम्हाला ज्ञात झालेला घटनाक्रम आणि आमच्या आकलनानुसार गजराजांना विरहाची बाधा झाली आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ चित्त राहू लागले आहेत ज्याचा थेट परिणाम त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यावर होत आहे.”
“विरहाची बाधा? प्रधानजी, गजराज प्रेमात पडले आहेत असे आपण सुचविता आहात काय...?”
 “होय, महाराज! प्रेमच, पण मीलनोत्सुक आकर्षण किंवा प्रणयातील प्रेम नव्हे तर मित्रप्रेम!”
“मित्रप्रेम? प्रधानजी, आता अधिक कोडी न घालता काय घडले आहे ते स्पष्ट सांगा, काळजीबरोबर आमच्या उत्सुकतेतही भर पडली आहे.”

प्रधानजींनी सेवकाकडून समजलेला गजराज-श्वान मैत्रीचा किस्सा आणि माहूत आणि गावकरी यांचा सौदा याचे साद्यंत वर्णन केले आणि ते महाराजांच्या आज्ञेची वाट पहात खाली मान घालून उभे राहिले. काही वेळ विचार करून महाराजांनी सेवक आणि माहूत दोघांनाही सत्वर दरबारात हजर होण्याचे फर्मान सोडले आणि प्रधानजींच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. थोड्या वेळातच घाबरलेला सेवक आणि गर्भगळीत झालेला माहूत दरबारात महाराजांसमोर हजर झाले आणि मुजरा करून थरथरत उभे राहिले.

“सेवक, आम्ही जे ऐकले ते खरे आहे का? तुम्ही त्या मैत्रीचे आणि सौद्याचे प्रत्यक्षदर्शी आहात की कुणाकडून त्याबद्दल ऐकले आहे?”
“महाराजांचा विजय असो! महाराज, गजराज अगदी बाल्यावस्थेत असल्यापासून त्यांच्या तंबूची देखरेख करण्याची व्यवस्था मी पाहतो. त्यामुळे मलादेखील गजराजांचा खूपच लळा लागला आहे. तो श्वान तंबूत दाखल झाला तेव्हा सर्वप्रथम मीच त्याला हुसकवून लावण्याचा प्रयत्न केला होता पण गजराजांना त्याची सोबत आवडते आहे हे ध्यानात आल्यावर मी त्याला देखील जीव लावू लागलो.”
“तुम्ही सांगताय ते जर खरे मानायचे तर याबद्दल माहुताला देखील समजले असेलच की...?”
“नक्कीच, महाराज! आम्ही त्याबद्दल बोललो देखील. खरे तर गजराज हल्ली किती आनंदात असतात हे माहुतानेच मला दाखविले.”

महाराजांबरोबर साऱ्या दरबाराची नजर माहुताकडे वळताच त्याचा धीर सुटला आणि तो महाराजांना लोटांगण घालत हंबरडा फोडून रडत रडत सांगू लागला,
“क्षमा, महाराज, क्षमा! प्राणांचे अभय असेल तर मी सारे खरे सांगतो, महाराज! दया करा, महाराज दया करा...!”
“माहूत, तुम्ही आधीच क्षमा मागता आहात म्हणजे तुम्हाला तुमचा गुन्हा कबूल आहे असे मानावे काय...?”
“महाराज, काही क्षुद्र मुद्रांच्या क्षणिक मोहापायी मी माझ्या मालकीच्या नसलेल्या कुत्र्याचा सौदा केला हे मला मान्य आहे. पण तो कुत्रा गजराजांचा मित्र बनला असल्याने त्या सौद्याचा इतका विपरीत परिणाम होईल असे मला मुळीच वाटले नव्हते! मला स्वत:च्या पोटच्या पोराप्रमाणे प्रिय असलेल्या गजराजांची ही अवस्था पाहुन माझीही आतडी तीळ तीळ तुटतेय आणि कुठल्या कर्मदरिद्री क्षणी मला निष्कारण मोह पडला आणि दुर्बुद्धी सुचली या विचाराने मी स्वत:ला रात्रंदिवस कोसतो आहे. ज्याचे मी पालन-पोषण करायचे, जोपासना करायची त्याची माझ्यामुळेच अशी अवस्था झालेली बघून खरे तर मला देहांत शासनच व्हायला हवे. पण महाराज, माझे वृद्ध माता-पिता, माझी विधवा बहीण, माझी पत्नी, माझी चार मुले असे माझे सारे कुटुंब माझ्या एकट्यावरच अवलंबून असल्याने ती जबाबदारी निभावणे हे देखील माझेच कर्तव्य असल्याने मी प्राणांचे अभय मागतो आहे, महाराज! हे सगळे खरे असले तरी माझ्या हातून, नेणीवेतून का असेना, अक्षम्य अपराध घडला आहे आणि त्याची आपण द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, महाराज!”

“माहुताच्या कबुलीजबाबामुळे साऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला आहे. या विषयाचा न्याय-निवाडा होण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या सेवकाला इनाम देण्यात यावे आणि माहुताला सजा व्हावी हे उचितच होईल. तथापि इनाम आणि सजा काय असावे आणि का असावे याचा निर्णय घेण्याची आणि ते दरबारास समजावून देण्याची जबाबदारी आम्ही प्रधानजींवर सोपवितो.”

“सर्वच सजीवांना भाव-भावना असतात आणि जगण्यास आवश्यक प्राथमिक गरजांमध्ये साथ-सोबत, सहवास आणि संगत ही तेवढीच गरजेची असल्याने सखे-सोबती, मित्र-सांगाती हे देखील जगण्याचे अविभाज्य घटक असतात. मैत्री कुणाची कुणाशी व्हावी याला काहीही नियम किंवा निकष नाही, केवळ ती सहज जुळावी, जाणीवपूर्वक जोपासावी आणि निखळ, निर्हेतुक असावी एवढीच काय ती पूर्वअट! माणसाला मात्र भाव-भावनांबरोबर षड्रिपुंचीदेखील वीण असल्याने त्याला प्रसंगी क्षुद्र गोष्टींचा लोभ वाटणे, मोह पडणे हे देखील स्वाभाविक मानायला हवे. पण त्यासोबत माणसाला प्रामाणिकपणा, विधिनिषेध, उपरती आणि पश्चाताप अशी मानवी मूल्ये सुद्धा असल्याने सेवकाचा प्रामाणिकपणा आणि माहुताला झालेली उपरती याचा देखील सहानुभूतीने विचार व्हावा. तेव्हा घडल्या प्रकारचा विधी-निषेध म्हणून माहुताने स्वत: कुठल्याही विशेष व्यवस्था अथवा साधनसामुग्रीशिवाय, मिळेल त्यावर गुजराण करीत, पदयात्रा करावी व श्वानास असेल तेथून शोधून परत आणावे आणि सेवकाला पदोन्नती मिळून गजराजांबरोबरच, परतलेल्या श्वानाच्या आणि सर्वच पशुंच्या देखरेखीची आणि दरबारास त्याबद्दल इत्यंभूत माहिती वेळोवेळी देण्याची जबाबदारी सोपवावी.”

महाराजांची क्षमाशीलता आणि न्यायप्रियता, प्रधानजींची संवेदनशील तर्कबुद्धी, सेवकाची राजनिष्ठा आणि माहुताची पश्चातापदग्ध उपरती या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून दरबार काही काळ नि:स्तब्ध झाला आणि नंतर एकच उद्घोष आसमंतात दुमदुमला...
“महाराजांचा विजय असो...!”

तात्पर्य: नैसर्गिक शत्रू मानले जाणारे प्राणी देखील प्रसंगवशात मैत्री करू शकतात आणि एकमेकाचे घट्ट जीवलग होऊ शकतात.

अस्वीकृती: ही ‘बोधकथा’ इसापनीती, हितोपदेश, पंचतंत्र किंवा जातक/झेन कथा यापैकी कुठेही आढळू शकणाऱ्या एका छोट्याशा मैत्रीपूर्ण कथेवर आधारित असली तरी कल्पनाविस्तार, मांडणी, लिखाण आणि प्रकाशन हे सर्व प्रस्तुत लेखकाने मूल्यशिक्षणाच्या उद्दात हेतूने जनहितार्थ केलेले असून ही कथा सांप्रत काळातील कोणत्याही वैयक्तिक, सामाजिक, राजकीय किंवा पर्यावरणीय घटनांचे पडसाद वैगरे नसून ही कथा, त्यातील पात्रे व प्रसंग यांचा रूपकात्मक विचार करू नये आणि स्वतंत्र देशातील स्वयंप्रज्ञ नागरिकांनी तो तसा केल्यास त्याचा अन्वयार्थ हा ज्याच्या त्याच्या स्वतंत्र प्रज्ञेवर अवलंबून असेल!

शुभम भवतु I

रविवार, २३ जून, २०१९

अजून...!



मातीला अजून येतो गंध
जळली नाही तिची माया,
थेंब पडता पापणीवर अन्
बहरुन येते अजून काया...!

फुलांमध्ये मध शाबुत आहे
चाफाही फुलतो बिनबोभाट,
नारळात भरते पाणी अन्
अजून नागमोडी चालते वाट...!

परतावा न बघता पहिला
बीज अजूनही देते फळ,
चोचीला मिळतोच दाणा
इवल्या पंखात भरते बळ...!

सूर्यबिंब टेकता क्षितिजावर
धरणी लेवते केशरी साज,
नदी अवखळ अजून वाहते
समुद्र घालतो गंभीर गाज...!

निसर्गाचे निरंतर चक्र
माणूस असेल हरवला,
'सुखाचा मंत्र' त्याच्या
मनी कुणी भरवला...?

जल जमीन जंगल सृष्टी
निसर्गच इथे ईश्वर आहे,
कितीही रुद्र भासला तरी
माणूस सुद्धा नश्वर आहे...!

सौदा झाला सगळ्याचा म्हणून
जगण्याची त्यावर भिस्त नाही,
माणसाने सोडले असेल ताळतंत्र
सृष्टी मोडीत तिची शिस्त नाही...!

येतोपाऊस अजून तरी
घेऊन सोसाट्याचा वारा,
हिंमत अशी हरु नकोस
भिऊन जगण्याला पोरा...!