मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६

व्यास...!


अट्टाहास कशाला ना
छंद-बद्ध अनुप्रासाचा…?
घ्यावा वसा कधी तरी  
वर्तुळ-भेदी व्यासाचा…!

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

व्यथा...!


एकटेपणाची निर्मम व्यथा
मनाचे आंदोलन अविनाशी…
गूढ अस्तित्व निरर्थकतेचे
भासमान परी सर्वसाक्षी…!

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

रिक्त...!


जगण्याचे मर्म उमजते जेव्हा
असणे माझे ती निमूट साहते…!

भरले वाटते सर्व व्रण तेव्हा
जखम आतून संतत वाहते…

खुळावतो नादही पाहण्याचा
पाहणे माझे ती हळूच पाहते…

शुष्क झालेल्या वाटांची बेगमी
कधी अचानक नक्षत्रात नाहते

अन भासलो कधी रिक्त तरी
गुंतणे 'मना'चे भरून राहते…

जगण्याचे मर्म उमजते जेव्हा
असणे माझे ती निमूट साहते…!