शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

चिमणा...!


एके सकाळी एक चिमणा

माझ्या खिडकीत येवून बसला...

मला कळेना, यांत

माणसांत नसलेला जिव्हाळा कसला...! 

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०११

सोबती...!


चंद्र चांदण्यांचा सोबती

की रात्र चंद्राबरोबर

कोण झुरतं कुणासाठी

कळत नाही खरोखर...!

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११

काळजी...!


आयुष्य थांबले जरा

थकल्या मना देण्या आराम

लोकांना काळजी इतकी

म्हणे हा अर्ध की पूर्णविराम...!

रविवार, २५ सप्टेंबर, २०११

असाध्य...!


दांभिक सौजन्य अन

स्वाभिमानी बेपर्वाई

काय भोगावे काय त्यागावे

असाध्य नेमस्त चतुराई...!

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

निर्वेध...!


स्वत:ला अव्यवहारी ठरू देण

निर्मम-निर्वेध अन रास्त

स्वकष्टार्जित अपयश

पोकळ यशापेक्षा दुरापास्त...!

बुधवार, २१ सप्टेंबर, २०११

सवय...!


तुझी मला अलीकडे

इतकी सवय झालीय

मोगरा दरवळला तरी

वाटत तूच आलीय...!

मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

धुमारा...!


उपचारांच्या भाऊगर्दीत

जाणीवेचा कोंडमारा

प्रच्छन्न भावनेला

उपेक्षेचा धुमारा...!

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११

खंत...!


सृजनाची उर्मी की

निर्वाहाची भ्रांत

संदिग्ध अभिनिवेशात

निर्माणाची खंत...!

रविवार, ११ सप्टेंबर, २०११

विसर्जन...!?!


यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम I

इष्टकामप्रसिध्यर्थम पुनरागमनाय च  II

ॐ तत्सद ब्रम्हार्पणमस्तु  I

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०११

मुर्दाड...!


भ्याड शासकांचे मुर्दाड सरकार

सर्वत्र रास छिन्न शरीरांची

हतबल रक्षक आणि गाफील मने

राजद्वारी तोरणे षंढ लक्तरांची...!

बुधवार, ७ सप्टेंबर, २०११

चर्चा..!


सुष्टांच्या दुष्ट प्रथा अन

त्रस्तांच्या खिन्न व्यथा

स्वप्रकाशाचा दीप पेटू दे

चर्चा तमाच्या यथा-तथा..!

रविवार, ४ सप्टेंबर, २०११

चाहूल...!


कधी दुर्गा कधी गौरी

रूपे लोभस तिची सारी

माहेराला आल्या लक्ष्मीची

चाहूल तोरण  दारी...!

शनिवार, ३ सप्टेंबर, २०११

दांभिक...!


दांभिकपणा गर्दभांचा हल्ली

नेमका किती वाढलाय...

नारायण आणखीन हरी

कधीचा वेशीबाहेर अडलाय...!

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०११

यादी...!


तू मला ओळखतेस म्हणून

वाट पाहण सोडत नाहीस...

मला आणि काही नको

मी कुठल्याच यादीत मोडत नाही...!

गुरुवार, १ सप्टेंबर, २०११

ओम...!?!


अकार चरण युगुल I उकार उदर विशाल I

मकर महामंडल मस्तकाकारे I

हे तिन्ही एकवटले तेथ शब्दब्रह्म कवळले

ते मियां गुरुकृपा नमिले आदिबीज...I