बुधवार, २७ जून, २०१८

व्रत...?



झपाट्याने बदलत्या काळात अन उर्ध्वगामी 'मूल्य'व्यवस्थेत अनेक गोष्टी कालबाह्य झाल्या तरी केवळ रीत, प्रथा, परंपरा आणि कुळाचार म्हणून कितीतरी गोष्टी 'यज्ञातले मांजर' न्यायाने निगुतीने राबविल्या जातात. [बाय द वे 'यज्ञातले मांजर' गोष्ट तुम्हाला माहितीये ना? नसेल तर सांगेन पुन्हा कधीतरी... इथेच!] मुळात स्त्रियांनी हाच पती मिळावा म्हणून व्रत करायचे आणि स्वत: उपाशी राहून पुरुषांच्या सर्व गरजांची सोय बघायची हाच मुळी अन्याय आहे. त्यातून आजच्या काळात शिकून स्वावलंबी झालेल्या महिलाच कित्येक ठिकाणी संसाराचा गाडा स्वत:च्या खांद्यावर वाहतांना दिसतात. बायकोच्या जीवावर रिकामटेकडे हिंडणाऱ्या नवऱ्यांची संख्या समाजाच्या सर्वच थरात बघायला मिळते. हा झाला सामाजिक न्यायाचा भाग!

दुसरीकडे पर्यावरणाचा विचार करू जाता, वटसावित्रीसाठी 'वड'च निवडण्याला शास्त्रीय आधार आहे. काही शे वर्षे जगणारा (आजच्या संदर्भात, तगणारा) हा वृक्षराज आपल्या पिकल्या पारंब्यांच्या समृद्ध शाखाभाराने फुललेल्या, परिपक्व आणि भरल्या संसाराचा निदर्शक तर आहेच शिवाय याच्या सहवासात अधिक ऑक्सिजन मिळत असल्याने याला प्रदक्षिणा घालण्याने 'पुण्य' मिळते किंवा कसे हे निश्चित सांगता येणे अवघड असले तरी ऑक्सिजन नक्की मिळतो यात शास्त्रीय तथ्य आहे आणि शुद्ध ऑक्सिजन आज 'पुण्या'पेक्षा अधिक गरजेचा आणि दुर्मिळ होत चाललाय! वाढत्या शहरीकरणात वटवृक्षांच्या तुटवड्यामुळे वडाच्या फांद्यांची पूजा करण्याचा 'उपाय' मध्यममार्गीय काढतात आणि त्या निमित्ताने संधिसाधू वृक्षतोड करून आपली तुंबडी भरून घेतात. पर्यावरण संरक्षणाच्या आत्यंतिक निकडीच्या काळात वडासारख्या वृक्षराजाची कत्तल करून कालबाह्य परंपरा जपणे आवश्यक आहे का याचा सूज्ञांनी अवश्य विचार करावा.

आपण पुलंच्या स्मृतीदिनी त्यांच्या काही 'काहीच्या काही कवितां'चा आनंद घेतला. त्यातील 'वटसावित्री'बद्दलच्या पुलंच्या या दोन 'वात्रटिका' पुलंच्या मार्मिक प्रतिभेबरोबरच त्यांच्या असामान्य विवेकबुद्धीची साक्षही देतात...

वटसावित्री : १

‘वटेश्वरा, पुढल्या जन्मोजन्मी मला
‘ह्यां’च्या समोरच्या बिऱ्हाडातल्या
बाईच्या जन्माला घाल...’

वटसावित्री : २

‘वटेश्वरा, हे
आज तुझ्या बुंध्याला गुंडाळलेलं
सूत उद्या पहाटे मी
उलंटं फिरवून घरी परत नेणार आहे.
तेव्हा आजचं सूत हे एक नुसतचं
बंडल आहे हे ध्यानात ठेव.’

वाचा आणि विचार करा...

सोमवार, २५ जून, २०१८

खयाल...!



तोल जातो जरासा, विखार मात्र फार नाही
लढण्यात त्यांच्या अजून त्वेष तो यार नाही

जिंकण्याचे निकष इथले समजवावे कसे तुला
काळीज चिरणारा कधी केलास तू वार नाही

मंथनातून उगवलेले निषिद्ध सर्वांस हलाहल
पचविलेस नीळकंठा पण तुझी ती हार नाही

युद्धांस सज्ज होऊन तू परजलीस शस्त्रे खरी
गंजल्या शस्त्रास पण कापणारी धार नाही

असे ओसंडावे शुभ्र चांदणे सोडीत धुम्रवलये
पण ठासून उडवावा असा तो हा बार नाही

लौकिकास ज्यांच्या भिऊनी वैर ना तु घेतले
त्यांच्या यादीतली ही ती माणसे चार नाही

सांगावी सारी घुसमट एकदाच जगण्याची
एवढाच आहे बस बाकी खयाल फार नाही

शोधिशी कुणाला अन हाक देता येईल कोण
आत घेण्या तुला उघडणार एकही दार नाही

जाणारा थांबेल कुणी अन म्हणेल काय कसे
विचारेल खुशाली तो हा वडाचा पार नाही

आहार निद्रा भय मैथुन पशुसम जीवनमान
उत्क्रांत जगण्याचे उरले एवढेच सार नाही

ऐकतो, पाहतो, मुक्यानेच अनुमोदन देतो
म्हणून त्यांच्या लेखी अजून मी ठार नाही

आरती नैवेद्य मंत्रपुष्प वाहून सारे जाहले
त्याच्या अनुग्रहाचा म्हणे आज वार नाही

करण्या बोन्साय माझा दुनिया आसुसलेली
पण पारंब्यांचा मला मुळी होत भार नाही

शुक्रवार, २२ जून, २०१८

अस्वीकृती...!


माझ्या या ब्लॉगवर प्रकाशित करून फेसबुकवर शेअर केलेल्या कवितांना गेल्या काही दिवसात मिळालेला प्रतिसाद हा अत्यंत सुखद असला तरी, केवळ खाली स्वाक्षरी अथवा नामनिर्देश नसल्याने त्या रचनांवरील माझ्या मालकी हक्काबाबत संभ्रम निर्माण झाला.

मला मुळातच 'मालकी'ची भावना कायमच अतिशय 'हलकी' वाटत असल्याने, कशावरही असे 'नाव टाकणे' वगैरे माझ्या प्रकृतीला मानवत नाही. आता 'नाव टाकणे' या संकल्पनेलाही अनेक निराळे 'विभक्ती प्रत्यय' असले तरी आत्ता त्याचा उहापोह करण्यात विषयांतर होऊन माझ्या (असतील नसतील त्या) वाचकांनी माझेच नाव टाकले असे व्हायला नको! परवाच एक मित्र, त्याच्या बायकोने कुणालातरी भेट म्हणून द्यायच्या तीर्थाच्या वाटीवर आपले नाव, तारीख, निमित्त टाकून आणावे म्हणून धरलेल्या स्त्रीसुलभ अशा राजहट्टाने (याला साध्या सोप्या रोजच्या वापरातल्या आणि खाजगीतल्या भाषेत 'भुणभुण' असे म्हणण्याचा 'प्रघात' आहे पण तो कठीण समयी 'घात' करू शकतो म्हणून छापील भाषेत न वापरण्याचा 'दंडक' आहे!) वैतागला होता, ते असो!

मुद्दा असा कि केवळ कशावरही आपले नाव टाकल्याने त्यावर आपले स्वामित्व सिद्ध होते या 'बीज-क्षेत्र-न्याय' संकल्पनेस माझा तत्वत: विरोध आहे कारण मला 'स्वयमेव मृगेंद्रता' अधिक भावते. तथापि अशा जगावेगळ्या धारणांनीं माझे जे भौतिक नुकसान होते ते निदान लौकिकाचे तरी होऊ नये म्हणून हे प्रकटन (हे टाईप करतांना त्याचे 'प्राक्तन' झाले... आजच्या ट्रोलिंगच्या काळात किती समर्पक... 'तुमचे प्रकटन तुमचे प्राक्तन!') आवश्यक ठरते...

हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल सामान्यज्ञान कमी असलेला कुणी (असतात हो असेही लोक, सगळेच 'भाई'चे 'जान' कसे असतील?) केवळ शारीरिक उंची आणि आवाजातील बेस हे प्रमाण मानून 'अर्जुन रामपाल'ला 'अमिताभ बच्चन' समजला तर अर्जुन रामपालची 'बसल्या' जागी 'अहिल्या' होईल पण अमिताभच्या आयुष्यभर संवर्धन केलेल्या प्रतिमेचे आणि पुण्याईचे काय? हे 'रूपक' वापरतांना माझा कुणालाही दुखवण्याचा हेतू नाही (पक्षी: अर्जुन रामपालचे चाहते(?), कारण अर्जुन रामपाल माझा ब्लॉग [किंवा, फॉर दॅट मॅटर, काहीही] वाचत असेल असे मला तरी वाटत नाही... आणि अमिताभ त्याचा स्वतःचा लिहिण्यापूर्वी माझा वाचतोच हा माझा आत्मविश्वास आहे!)

मुद्दा काय कि, केवळ रचनेच्या तळाशी माझी स्वाक्षरी नसल्याने एखादी कविता कुणाला विंदांची वाटणे तर एखादी गझल कुणाला सुरेश भटांची वाटणे हे कितीही स्वप्नवत, भयंकर सुखावह आणि 'मना'ला गुदगुल्या करणारे असले तरी सत्य नोहे! माझ्या कवित्वाचा अगदी सुरवातीच्या काळात (याला 'उमेदवारीच्या' असे म्हणण्याची पद्धत आहे पण अलीकडे या क्षेत्रात 'दावेदारी'च अधिक आढळून येत असल्याने नकोच ते! शिवाय या क्षेत्रात उमेदवारी अभावानेच होते, 'ट' ला' ट' भिडवता आला की 'कट्ट्या'वरून थेट 'गादी'वर!),
'...स्वाभिमानशून्य या जगात
फक्त लाचारीला मुभा आहे
पंगूंच्या चक्रव्यूहात पुन्हा
एक अभिमन्यू उभा आहे...'
या माझ्या चारोळीला सुरेश भटांच्या गझलेतील मत्ला (कि मक्ता?) समजून, एका, दोनेकशे कवितासंग्रह (पाडतात हो लोक एवढ्या कविता, प्रत्येक बाबतीत काय कुशंका?) नावावर असलेल्या सुस्थापित, आकाशवाणीस्टार कविवर्यांनी माझी झोप आणि सुरेश भटांची प्रतिष्ठा एकाच फटक्यात उडवली होती, तेही असो!

आणखीनच भलतीकडे भरकटण्यापूर्वी, बोल्ड टाइपातला अंडरलाईन मुद्दा एवढाच की सदर (म्हणजे 'इत्यादी' हा) ब्लॉग माझ्या आविष्काराचे साधन म्हणून चालविलेला माझा वैयक्तिक ब्लॉग असून यावरील सर्व प्रकटन हे माझे स्वतःचे वैयक्तिक प्राक्तन असून यावरील सर्व गद्य, पद्य व इतर लिखाण हे माझ्या सुपीक मेंदूला आलेले रचनात्मक फळ आहे... जे माझे नाही त्याचा उल्लेख हा यथोचित नामनिर्देश व श्रेय-सौजन्यासह वेळोवेळी केला जातो कारण तसे न करण्याइतकी वैचारिक [किंवा सामाजिक] उंची मी अजून कुठल्याही क्षेत्रात गाठलेली नाही! तेव्हा ज्या ज्या प्रकटनाच्या तळाशी नामोल्लेख अथवा श्रेय-सौजन्य टीप नसेल ते अस्मादिकांच्या आत्मिक अनुभूतीच्या मौलिक आविष्काराचे प्रतिपादन आहे व त्याच्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी ब्लॉगकाराची अर्थात माझीच आहे व राहील!

याला इंग्रजीत डिस्क्लेमर आणि मराठीत अस्वीकृती म्हणता येईल का यावर तज्ञांची मसलत अपेक्षित आहे! तेही एक असो...

गुरुवार, २१ जून, २०१८

जाग...!


पावसात भिजतांना आसवे तुंबून राहिली
आज माझ्या स्वप्नांनी जाग पुन्हा पाहिली.

जे नव्हतेच माझे त्यास कोण करिते वेगळे
माझ्याच श्वासांनी स्पंदनांची केली काहिली.

घन ओथंबून येतांना उरही भरून आलेला
पापणी ओली तरी व्यथा एकही न वाहिली.

उमेदीचा शाप असा कि मन वेडे गुंतून राही
निराशाही मग इथे माझी मी आनंदे साहिली.

एक डाव तीचा एक माझा असे उगाच वाटले
कृष्णनितीने जिंकून नियती सोवळीच राहिली.

शनिवार, १६ जून, २०१८

विषाद...!


चार्वाक सन्मानिला येथे
गौरविला गौतम बुद्ध,
हतबुद्ध तो ही आज
पंचशीलास मूठमाती!

प्रज्ञा शील करुणा
अहिंसा परमो धर्म,
मर्म मानव धर्माचे
आज जातीपाती!

ज्ञानोबा तुकाराम सावता
नामदेव एकनाथ गोरा,
तोरा त्यांच्या जातीचा
वारस मिरविती!

भेदाभेद-भ्रम अमंगळ
विष्णुमय जग म्हणे तुका,
फुका हे त्याच्या गाथा 
माथी वाहविती!

समर्थ असो वा राजे
संत, साधू आणि महंत,
भदंत कित्येक जगती
जातीत त्यां विभागती!

ज्योतिबा अन सावित्री
शहाणे करण्या सकळा,
कळा अवहेलना सोसूनी
जात एक उरती!

टिळक आगरकर रानडे
सुधारक विचारवंत थोर,
चोर आज ज्ञातीत त्यांचा
क्षुद्र संकोच करती!

सावरकर गांधी आंबेडकर
करण्या आपल्या जनां प्रबुद्ध,
युद्ध छेडिती परवशतेशी
व्यर्थ त्यांची नीती!

माथ्याची शोभा वाढविण्या
टोप्या, पागोटे अन पगडी,
दगडी पुतळ्यांचीच आज
रेलचेल सभोवती!

पगडी असो वा पागोटे
त्याखाली डोकी नासकी,
माणुसकी नुरे, ना विवेक
सारेच भ्रष्ट-मती!

स्वातंत्र्य समता बंधुता
घटनेने दिधली तत्वे,
सत्त्वे त्यांची आज
नामशेष होती!

नष्ट करण्या जातीधर्म
भेदाभेद सारे तोडण्या,
जोडण्या नाळ माणसाशी
बाळे शाहू मागती!

मंगळवार, १२ जून, २०१८

पुलोत्तम...!


'झाले बहु होतील बहु परि या सम हा' अशा एकमेवाद्वितीय पुरषोत्तमाचा आज स्मृतिदिन. कथा, एकपात्री, नाटक, व्यक्तीचित्रण, प्रवासवर्णन आणि चिंतनपर ललीत अशा सर्व प्रांतात लीलया मुशाफिरी करणाऱ्या या मराठी सारस्वताच्या रत्नजडित स्तंभाने जे एकमेव दालन सुशोभित केले नाही ते म्हणजे कादंबरी. कुणी जिज्ञासू रसिक या विवेचनातील उणीव म्हणून 'कविता' या प्रकाराकडे बोट दाखवून त्याची 'समिक्षा' करु धजेल. पण थांबा! पुलंनी कविता देखील केल्या आणि आपल्या समिक्षात्मक काव्याविष्काराला, केवळ  पुलंचं देऊ शकतात असे नाव दिले - 'काहीच्या काही कविता' आणि त्यांचा समावेश केला 'उरलं सुरलं' मध्ये!

मला अत्यंत आवडलेल्या पुलंच्या काहीच्या काही कविता नमुन्यादाखल पहा...

अतिशय मार्मिक 'त्रिवेणी'चे दोन नमुने...

१. पक्षनिष्ठा

पंचवीस मार्क कमी पडून नापास
झालेले चिरंजीव तिर्थरूपांना म्हणाले,
'मी पहिल्यापासूनच मार्क्सविरोधी गटात आहे.'

२. हल्ली

हल्ली पुर्वीसारखे माझा
चेहरा टवटवीत दाखवणारे
आरसे मिळेनासे झाले आहेत.

एक प्रसंगोत्पात 'चारोळी'!

थँक्यू

निळ्या तळ्याच्या काठावरचा बगळा
एका अपुर-या चित्राला मदत करायला
काळ्या ढगाच्या दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याल्या 'थँक्यू' म्हणालो.

एक विचक्षण निरिक्षण

प्रश्न

आताशा बुडणा-या सुर्याला
'बराय उद्या भेटू'
असे म्हणाला की तो मला म्हणतो,
'कशावरून?
मधल्या रात्रीची
तुला अजूनही इतकी खात्री आहे?
'सुर्य आता म्हातारा झालाय.'

आणि एक पुणेरी आत्मचिंतन, छंद: मुक्त, स्वर: उपरोध

मी राहतो पुण्यात

मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या 'ठाण्या'त.
इथल्या मंडईचे देखील विद्यापिठ आहे.
आणि विद्यपीठाची मंडई झाली आहे.
बोलणे आ इथला धर्म आहे
आणि ऎकणे हा दानधर्म आहे.
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि स्रोते उपकार करतात.
उपचारांना मात्रा जागा नाही.

पुलंच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या स्नेह्यांनी टिळक स्मारकमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या शिर्षकाहून अधिक समर्पक शब्द मला या पोस्टच्या समारोपासाठी सुचू शकत नाहीत...
'तुझिया जातीचा मिळो आम्हा कुणी...' 

पुलोत्तमास सलाम!

रविवार, १० जून, २०१८

पैका...!



डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या सुबुद्ध संपादनातला ‘संवादसेतू’ हा गेल्या वर्षीचा दिवाळी अंक विचक्षण अभिरुचीचा नमुना मानावयास हरकत नाही. मुळात, ‘विविधभाषक प्रतिभावंतांची लेखनयात्रा’द्वारे लेखन, कविता, गायन आणि नृत्य अशा बहुमुखी प्रतिभांचा घेतलेला ‘विदग्ध’ अदमास, ‘बापलेकी’ या हृदयस्पर्शी आयामातून लेकींनी रंगवलेले आपल्या कर्तुत्ववान पित्यांचे भावचित्र आणि ‘हिरवे हात’ विभागात पर्यावरणाबद्दल जनजागृतीसाठी मांडलेल्या तीन अनोख्या कहाण्या यांनी समृद्ध केलेल्या या प्रकाशनाने, एरवी कवितांच्या कलाबतू आणि जरीबुट्टीने सजविण्याच्या सार्वत्रिक आणि सर्वमान्य प्रघातास मुरड घालून; एक अनुवादित कथा, एक मूळ कथा, एक व्यक्तिचित्रण आणि, सद्य समाजव्यवस्था, प्राप्त परिस्थिती आणि प्रवाहपतित व्यक्तीच्या मनोभूमिकेचे विश्लेषण करणारे एक अत्यंत विवेकी मानसशास्त्रीय प्रकटन, अशा समसमासंयोगाने एक निराळीच उंची गाठली आहे. यातील मानसशास्त्रीय प्रकटन हे या विषयातील सन्मानीय तज्ञ आणि चिरपरिचित ‘वेध’कार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे असावे हा योगायोग नव्हे आणि त्यांनी प्रकटनासाठी ‘पैसा आणि माणसाची मानसिकता’ हा विषय निवडणे हा अपघात नव्हे! हा संपूर्ण लेख केवळ वाचनीयच नाही तर चिंतनीय, मननीय आणि त्याहीपेक्षा, साक्षात अनुकरणीय असला तरी तो संपूर्ण आहे तसा येथे उद्धृत करणे शक्य नाही, क्षमस्व!

ही प्रस्तावना ज्यासाठी केली तो म्हणजे डॉक्टरांनी या लेखात संदर्भासाठी दिलेला विंदांचा ‘रोकडे’ सत्य सांगणारा अभंग! विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त रोज एक कविता या उपक्रमासाठी मी विंदांच्या स्वेदगंगा (१९४९), मृदगंध (१९५४), धृपद (१९५९), जातक (१९६८), विरूपिका (१९८१) आणि अष्टदर्शने (२००३) या प्रकाशित काव्यसंग्रहांचा आणि काही बालकवितांचा अभ्यास केला त्यात मला कुठेही हा अभंग आढळला नाही. सदर अभंगाची मांडणी, पोत, आशय आणि बाज पहाता तो ‘जातक’ किंवा ‘विरूपिका’चा भाग असावा असे वाटते जो नजरचुकीने किंवा गहाळ झाल्यामुळे माझ्या निदर्शनास आला नसावा. कुणा अभ्यासक अथवा जाणकारांस या विषयी अधिक माहिती असल्यास कृपया सर्वांच्या माहितीसाठी ती येथे विदित करावी. धन्यवाद!

तर एवढे नमनाला घडाभर तेल ज्या ‘अभंगा’साठी घातले तो, विंदांच्या सभोवतालच्या परिस्थितीचे सखोल निरीक्षण आणि अत्यंत समर्पक (शेलक्या?) शब्दात त्यावर तात्विक भाष्य करण्याची प्रतिभा याचा आणखी एक नमुना! १९७६ सालच्या त्रिगुणी महेमूदने खुलविलेल्या ‘सबसे बडा रुपैय्या’ या हिंदी चित्रपटात मजरूहच्या ‘ना बिवी ना बच्चा...’ या शीर्षकगीताशी सहोदराचे नाते सांगणारा हा अभंग, आज डॉक्टर-द्वयी आनंद नाडकर्णी आणि वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या सौजन्याने...

वैकुंठीची पेठ I हवा पैका रोख; 
किरकोळ ठोक I मिळे मोक्ष! 

लज्जा सांडोनिया I मांडीत दुकान
येई नारायण I उधारीला!

अवघाची संसार I सुखाचा करावा;
आनंदे भराव्या I सर्व बॅंका!

बुधवार, ६ जून, २०१८

102 Not Out!


आम्ही अत्यंत भाग्यवान असल्याने अशा काळात जन्मलो जेव्हा अभ्यास, संशोधन आणि मनोरंजन सर्वकाही ‘वाचन’ होतं. गुगलबाबा आणि जीपीएसमावशींचा जन्म होण्याच्या आधीचा तो पुस्तकांचा सुवर्णकाळ. छापील शब्दांशी, चित्रांशी मैत्र जोडण्याचे मोरपंखी दिवस. केवळ दिवाणखान्याची शोभा वाढविण्यासाठी क्रॉसवर्ड किंवा ऐमेझोन वरून ढिगाने इंग्लिश पुस्तके खरेदी करण्याची समृद्धी तोवर सातासमुद्रापलीकडून भारताच्या सीमात घुसली नव्हती आणि ‘बेग-बॉरो-स्टील’ संस्कृतीमधील ‘बेग’ बापाला आणि ‘स्टील’ आईला चालण्यासारखे नसल्याने केवळ ‘बॉरो’च्या भरवशावर मिळेल ती पुस्तके वाचण्याची समज, आवड आणि सवड आमच्याकडे मुबलक होती. शिवाय, अगदी गुरुकुल-आश्रम नसल्या तरी आमच्या शाळांचे ठोकळे आणि शिक्षण इतकेही मोकळे-ढाकळे झालेले नव्हते कि विद्यार्थी ‘मिस’बरोबर आयटम सॉंग करतील आणि ‘सर’ विद्यार्थ्यांशी ‘बिग बॉस’ खेळतील. आमच्या त्या पठडीबाज आणि ज्ञानोपासक (करा गुगल आणि शोधा अर्थ!) शिक्षणाने आम्हाला ‘पैकेज’ नसेल दिले पण जो संस्कार दिला त्याची ‘सीटीसी’ कुठल्याही मल्टीनैशनलच्या अवाक्याबाहेरची आहे... अगदी अॅपल आणि मायक्रोसॉफ्टच्या देखील! ते असो, अशा लिखाणामुळे आपले वय झाले असल्याचे आणि आपण अगदीच कालबाह्य (आउट-डेटेड; सारखं सारखं काय गुगल?) झालो असल्याचे जाहीर प्रदर्शन होते हे सूज्ञांनी (आमच्या घरात दोनच सूज्ञ – आमचे कन्यारत्न आणि तिची जन्मदात्री! आपला काय अनुभव?) कानीकपाळी ओरडूनही भान रहात नाही... हेही वय झाल्याचेच लक्षण! त्यामुळे होते काय कि मुद्दा राहतो बाजूला आणि बाकीचाच फाफटपसारा... 

मुद्दा असा कि उपरोक्त पार्श्वभूमीमुळे वाचन हा आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता, आहे आणि जीवात जीव असेतो राहील... कितीही ऑडीओ बुक्स आणि व्हर्चुअल रीऐलीटी उपकरणं आली तरी. आणि शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वाचण्याला ‘अवांतर’ असे संबोधित असले तरी आम्ही अधिकाधिक तसे वाचन करावे जेणेकरून आमचे जगण्याचे भान आणि आकलन समृद्ध होण्यास मदत होईल अशा उद्दात विचाराने आम्हाला सार्वत्रिक अनुमोदनच नाही तर उत्तेजन होते. यामुळे वाचण्याची गोडी, चांगले निवडण्याची दृष्टी आणि वाचलेल्याचे चिंतन, मनन, रसास्वादन (समीक्षण नव्हे!) करण्याची वृत्ती अंगी बाणवली गेली.

या प्रवासात आम्हाला जसे आचार्य, गोनीदा, पु.ल., जी.ए. भेटले तसेच व.पु., सुशी, मिबो आणि शिक देखील. आचार्य, गोनीदांनी आम्हाला जगण्यातील भव्य-दिव्यत्वाची प्रचीती करून दिली, जीऐंनी गूढरम्यता दाखविली आणि पुलंनी जगप्रवासाच्या माध्यमातून विचक्षण निरीक्षणातील खट्याळ रसिकत्वाची ओळख करून दिली. व.पु. आमच्यासाठी ‘आपण सारे अर्जुन’ म्हणत ‘तप्तपदी’त आमचे ‘पार्टनर’होऊन समुपदेशन करणारे साक्षात पार्थसारथी झाले तर ‘येता-जाता’ आमच्यावर ‘बरसात चांदण्यांची’ करणाऱ्या सुशीने आपल्या विशेष ढंगात आम्हांला ‘तलखी’पासून वाचवून ‘दुनियादारी’ची ‘दास्तान’ ऐकवत आमची हसून हसून ‘लटकंती’ केली आणि आम्हाला चिरतरुण राहण्यासाठी ‘व्रतस्थ’ केले. त्यांनतर आमच्या आयुष्यात आलेल्या मिबो अर्थात मिलिंद बोकीलने आम्हाला आमचे बोट धरून कधी आमची प्राणप्रिय ‘शाळा’ दाखवली तर कधी ‘गवत्या’वर नेऊन सभोवतालच्या गराड्यात आपण कायमच ‘एकम’ असल्याची जाणीव करून दिली.

असे सारे ‘आहे मनोहर तरी...’ चित्र असतांना कशाची तरी नवरसातल्या कुठल्या तरी रसाची कमी होती आणि खमंग पुरणपोळीवर साजूक तुपाची धार पडावी तसे; चिकन करी आणि फिश करीला तोंडात बोटं घालायला लावील अशी ‘कणेकरी’ घेऊन आमच्या आयुष्यात आले शिरीष कणेकर! आजची ही संबध पोस्ट आत्ता कुठे समेवर आली...

शिरीष कणेकर हे आम्हाला वडिलांसारखे आहेत कारण त्यांचे वय आमच्या पिताश्रींइतके (खर तर अंमळ अधिकच) आहे. त्यामुळे तसे पाहता त्यांना ‘काका’ म्हणायला हवे, पण त्यांच्या आवडत्या प्रांतात ‘काका’ या नावाला वेगळेच (गडबडीत ‘भलतेच’ असे मनातले लिहून जाणार होतो!) वलय असल्याने आणि त्यांचे लिखाण हे दोस्ताशी नाक्यावर किंवा विशिष्ट ठिकाणी ‘बसून’ मारलेल्या गप्पांसारखे औपचारिकतेच्या कुठल्याही मर्यादांना डावलून (पुन्हा मनातला शब्द येऊ घातला होता...!) थेट उराउरी कडकडून भेटते आणि त्या तत्काळ तादाम्य पावण्याच्या अनुभूतीने वयाचेच काय सगळीच अंतरं (अगदी मुंबई-पुणे देखील!) गळून पडतात. शिवाय ‘काका’ या संबोधानला महाराष्ट्राच्या इतिहास आणि राजकरणाच्या संदर्भात निराळेच गूढगर्भ आयाम असल्याने, नकोच ते!

आज शिरीष कणेकर पंचाहत्तर वर्षांचे झाले असले तरी ‘...अवघे पाऊणशे वयमान...’ या ओळी, ज्या लोकांच्या अभिव्यक्तीत वयाचा अडसर होत नाही अशा, आशा (भोसले) आणि अमिताभ यांच्या पंक्तीत चपखल बसणाऱ्या कणेकरांना उद्देशूनच लिहिल्या असाव्यात. पहा: सामना मधील ‘अवघे पाऊणशे वयमान’ ही त्यांनी स्वत:च स्वत:ची घेतलेली मुलाखत. साहेबांना मुलाखतीच्या फार्ससाठी दुसऱ्याच्या पुतण्याची गरज लागली, कणेकरांना महाराष्ट्राचा लाडका मुलाखतकारही ‘गाड’ किंवा ‘गीळ’ म्हणू शकला नसता! पुलंनी त्यांच्या स्वरचित बायोडाटा अर्थात परिचय पत्रात आवडता पोषाख – चिलखत आणि अविस्मरणीय प्रसंग – पुण्यात लक्ष्मी रोडवर एक दुकानदार ‘या साहेब...’ असे म्हणाला तो – असे लिहून (विनोदी?) लेखकाचा बायोडाटा हा प्रकार अजरामर करून ठेवलाय. कणेकरांनी ‘लोकसत्ता’तील ‘चहाटळकी’ या सदरात, ‘चाहते हे ठेवलेल्या बाईसारखे असतात. मुळात गाठायला तितकेसे अवघड नसतात, पण सांभाळायला महाकठीण. स्त्रीच्या गालावरचा तीळ व पुरुषाच्या स्वभावातला पीळ शोभून दिसतो, पण तो दाखवण्याचा अट्टहास नको…’ असे लिहून वपुंची थोडी थट्टा केल्याची आठवण सांगतांना ‘मुलाखत’ हा प्रकार अजरामर करून टाकला.

आम्हाला कणेकर काय म्हणून आवडतात, त्यांच्या क्रिकेटवरील रनिंग कॉमेंट्रीसाठी, हिंदी सिनेमातील फिल्लमबाजीसाठी, ‘टिवल्या बावल्या’ या सदरात मोडणाऱ्या ‘चहाटळकी’साठी, पत्रकार म्हणून की एकपात्री कलाकार म्हणून...? अगदी खरं आणि मनापासून सांगायचं तर या सगळ्यापेक्षा आपल्या मानतील गोष्टी काहीही न लपवता बेधडक दिलखुलासपणे सांगणारा एक जवळचा मित्र म्हणून. ‘साहित्यिक’ वगैरे उपाधी कणेकरांना लावण्याच्या भानगडीत कुणी पडू नये असे आम्हाला आपले वाटते; ती त्यांना शोभणार तर नाहीच शिवाय त्या नामाधीनाच्या बोज्याने ते पुन्हा गंभीर होऊन स्वत:चाच सुधारित एपिटाफ लिहून मोकळे होतील अशी रास्त भीतीही वाटते. आर. के. लक्ष्मण यांनी जो कॉमन मैन भारताला दिला त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे शिरीष कणेकर अशी आमची भावना आहे. सर्व काही भोगून-उपभोगुन, निरनिराळ्या भूमिका निभावत आपल्याच चालीने चालणारा आणि स्वत:सह प्रत्येकाला आरसा दाखवत मार्मिकता या लक्षणाची पदोपदी आठवण करून देणारा आमचा मराठमोळा चार्ली चैपलीन!

अतुलने परवा सकाळ मध्ये ‘सर शिरीष कणेकर’ लिहून माझे अर्धे काम केलेचं होते आणि अजूनही मला जे खूप काही लिहायचे आहे ते मी सरांच्या नाबाद शतकाच्या मुहूर्तासाठी राखून ठेवतोय... फक्त तोपर्यंत माझीच विकेट गेली नाही म्हणजे मिळवली!

अलीकडे फ्लेक्स युद्धाच्या काळात रोज कुणाही सोम्या-गोम्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘जीवेत शरद: शतम’ लिहिलेले आढळते. आपलेच तुणतुणे वाजविण्याची कला आणि सिद्धी पैशाने येत असेलही पण आपल्या कामाने स्नेही – चाहते किंवा भक्त नव्हे – तयार करणे आणि कधीही प्रत्यक्ष न भेटताही सौहार्द्र जोपासणे हे ‘भाऊ’, ‘दादां’चे काम नव्हे. ज्यांनी खरच शतायुषी व्हावे अशी मन:पूर्वक इच्छा होते अशी कितीशी माणसे आज हयात आहेत... शिरीष कणेकर त्यातील एक!

सर, पंचाहत्तरीच्या मन:पूर्वक शुभेच्छा आणि नाबाद शतकासाठी मनोज्ञ शुभकामना! १०२ नॉट आउट बघितला असेलच... त्याबद्दल कधी लिहिताय...? वाट पहातोय...


आणि आजच्या मुहूर्तावर खास आपल्यासाठी रचलेली कविता...   

ध्यास ना वांझ माझा तो प्रसवेल सूर्यज्योती 
या कृष्ण सागरातूनच उपजतील शुभ्र मोती

त्यागला त्याला म्हणून नको धुंडाळू किनारे 
जलसमाधीतून त्याच्या उमलेल स्वप्न न्यारे 

गाव त्यांचा, न्यायाधीश ते अन तेच सवाली 
माझ्या निर्दोषत्वाचा निघाला प्रश्न निकाली 

प्रचीती माझ्या शब्दांची, जा विचार त्याला 
स्मिताआड रिचवला ज्याने विषाचा प्याला.