शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०१४

दास्य…!

 

'हरवते कुठे हे
निरागस हास्य…'
मनाची तलखी
अन बुद्धीचे दास्य…!

सोमवार, २७ ऑक्टोबर, २०१४

अभाव…!हरेक गोष्टीचे कारण
काय तर म्हणे स्वभाव
हुशारीची फुशारी अन
तादात्म्याचा अभाव…!

रविवार, २६ ऑक्टोबर, २०१४

नवी…!

  

थोडीशी उर्मी
जगण्याला हवी
नव्या बंदिशीत
सुरावटही नवी…!

शनिवार, २५ ऑक्टोबर, २०१४

सत्व...!

 

'तमसो मा ज्योतिर्गमय'
दिपोत्सवाचे मूळ तत्व
'अप्प दीपो भव:'…
जीवनाचे खरे सत्व!

शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०१४

मुग्ध...!

 

तादात्म्याची मधुर चव
अन सहजीवनाची गोडी
तळ्याची शोभा वाढवी
मुग्ध राजहंसाची जोडी…!

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

यंदाच्या दिवाळीत...!

यंदाच्या दिवाळीत जरा धांडोळा घेऊ या… 

आपल्या काळात इमारतींची ऊंची वाढली पण माणुसकीची कमी तर नाही ना झाली… 
आवक वाढली पण निर्यात कमी झाली अन संख्या वाढली तशी गुणवत्ता घसरलीय का…  

माणसे उंच पण व्यक्तिमत्व खुजी अन फायदा उदंड पण नाती उथळ नाही झाली…
आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली पण त्या वाढलेल्या वर्षांमध्ये जगण्याची पडेल…?  

पदव्या स्वस्त अन शहाणपण महाग, माहितीचे डोंगर पण नेमकेपणाचे झरे आटले का…
सुखं सोई पुष्कळ, राहणीमन उंच पण वेळ दुर्मिळ आणि जगणं दळभद्री होतंय का… 

खर्च आणि तज्ज्ञ वाढले तशा समस्याही वाढल्या आणि शिल्लक कमी झाली का…
औषधं भरपूर पण आरोग्य कमी आणि मालकीची भाषा जास्त होऊन मूल्य संपली का…

जागतिक शांतिच्या गप्पा पण घरातली युद्ध आणि दोन मिळवती माणसं पण घटस्फोट वाढलेले…?
रस्ते रुंद अन घरं मोठी झाली, नटली पण दृष्टी अरूंद अन कुटुंबं छोटी होऊन घरकुलं दुभंगली… 

मोकळा वेळ हाताशी पण त्यात गंमत नाही अन विविध खाद्य प्रकार पण त्यात सत्व काही नाही… 
कारण, दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेलं अन कोठीची खोली रिकामीच… ती का…?
  
आपण भले मंगळावरही जावून आलो पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही…   
आपण बोलतो फार पण प्रेम क्वचित करतो आणि तिरस्कार तर अगदी सहज सहज करतो… 


बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत
पण आतल्या हरण्याचं काय ?
हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा
पण आत्म्याच्या गुदमरण्याच काय ?
 

हे विचार तुमच्या पर्यन्त पोहाचाविणारं तंत्रज्ञान आज आहे पण 
त्यांच्याशी तादात्म्य पावण्याचा विवेक असेल…?
हे नजरेआड करण्याचं स्वात्यंत्र जस तुम्हांला लाभलंय तशी 
त्याच्या अनुशिलनाची जबाबदारी असेल…?!?

यंदाच्या दिवाळीत जरा विचार करू या…!

{दलाई लामा यांच्या मूळ इंग्रजी कवितेचा मुक्त भावानुवाद}

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०१४

दिवाळी पहाट…!

 

अभ्यंग स्नानाने पुलकित
दिवाळी पहाट… सूरमयी
देहमनाचे चंदन सुगंधित
जादूई क्षण ते… मोहमयी!

सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

कलाकुसर…!

घरात उपलब्ध असलेल्या साधनांतून आकाशकंदील बनविण्याचे ठरविले… 
अभ्यासपूर्ण विश्लेषण आटोपल्यावर खालील सांगाडा तयार झाला…


माझी बांधणी पूर्ण झाल्यावर सुशोभित करण्याची जबाबदारी नेहमीप्रमाणे सौंदर्यशास्त्र पारंगत प्रभृतींनी स्वीकारली आणि यशस्वी रित्या पार पाडली…
 

कैमेऱ्यास तिसरा डोळा मानून कशाचेही मनसोक्त फोटो काढण्यात पटाईत असलेल्या कन्येने प्रकाशमान झालेल्या आकाशदिव्याचे क्षणचित्र केले…

  

शून्य खर्च आणि अगणित आनंद देऊन आमच्या टेरेसला शोभा प्राप्त करून देणारा स्वहस्ते बनविलेला आमचा घरगुती आकाशकंदील…!

 

तेजोमय उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या आयुष्यात 
सुख-समृद्धी-शांती-समाधान घेवून येवो हीच प्रार्थना…!

रविवार, १९ ऑक्टोबर, २०१४

धग...!


मेल्यावरही उरेल माझी
गूढरम्य सावली एवढी
धग माझ्या चीतेचीही
पोळेल जगास जेवढी…!

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०१४

मात...!

 

आधुनिक महाभारतातही
निश्चित अभिमन्यूची मात
कितीही पुढारली तरी
मागासच मनुष्य जात…!

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

दुभंग...!

 

जगण्याचे स्वप्न हरवते
नात्यांची पोत जपतांना
मनाची नित्य कुचंबणा
रूढ प्रवाहात लपतांना…!

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०१४

सूत्र..!


'त्यांच्या भविष्यासाठी करतो सगळे' 

हेच मूळ सूत्र न साऱ्या धकाधकीचे…?

मग, मतदान सोडून, जाणीवेने टाळा

बेजबाबदार भटकणे फुकाफुकीचे…!

रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

मनोज्ञ...!

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०१४

विजय दिन...!

सुष्टांचा दुष्टांवर
सत्याचा असत्यावर
विवेकाचा क्रोधावर
मांगल्याचा अमंगलावर
…विजय दिन

दुर्गेचा महिषासुर वध 
मातेचे स्वगृह आगमन 
पांडवाचा अज्ञातवास संप्पन्न 
कौत्साची गुरुदक्षिणा अर्पण 
…घडले तो सुदिन
 
आंब्याची तोरणे…
रांगोळीचे सजणे…
सरस्वती पूजणे…
आपट्याची पाने…
अन साजरे सिम्मोलंघन!
 

 विजयादशमी तथा दसऱ्याच्या मंगल शुभेच्छा…!

बुधवार, १ ऑक्टोबर, २०१४

अर्थ...!

 

असे बदलावे वारे की
जगण्यास अर्थ यावा…
असण्याचे भान येता
व्यवहार व्यर्थ व्हावा…!