रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

पोकळी...!


पोकळीने घेतली जागा स्वतःची
उत्सवाची सर्व गर्दी पांगल्यावर…

सन्मित्र शामने ‘मुसाफिर’ सदानंद बेंद्रे यांची ही अत्यंत दार्शनिक अल्पाक्षरी धाडली आणि तिच्या संपूर्णतेचा शोध घेतांना सापडले नचिकेत जोशींचे जागेच असलेले चांदणे.

अस्तित्वाच्या पूर्णतेच्या शोधात आपल्यापुरते आकलन झालेल्या जीवन-जाणिवा हेच अध्यात्म. कोहम् पासून सोहम् अर्थात अहं ब्रह्मास्मि पर्यंतचा प्रवास आणि नेति नेति ते इदं न मम याची प्रचिती हेच सामान्य संवेदनशील माणसाचे आत्मज्ञान. हे ज्ञान जेव्हा सभोवतालाची जाण आणि जगण्याचे भान देते तेव्हा त्या अनुभूतीची प्रचिती तथा अभिव्यक्ती भिन्न असली तरी त्यातील अंतस्थ सूत्र एकच असते याची जाणीव करून देणाऱ्या या गझल स्वरूपातील दोन रचना.

एक नचिकेत जोशी यांच्या ‘चांदणे जागेच आहे’ या त्यांच्या अलीकडे प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातील...

एकटा आहे बरा मी, कोणत्या चर्चेत नाही
रात्र माझी, स्वप्न माझे झोप उसनी घेत नाही. 

मी तुझ्यावर प्रेम केले व्हायचे होऊन गेले
मी अशा क्षुल्लक चुकांना फार किंमत देत नाही. 

आखल्या रेषेत हल्ली बरसते आभाळ माझे
एकही वादळ आता त्याच्या सोबतीला येत नाही. 

आपुल्या नात्यास कोणी पाहिजे ते नाव द्यावे
ते तसेही कोरलेले या हातच्या रेषेत नाही. 

धूळ आहे, मळभ आहे, ही हवाही उष्ण आहे
उंच आकाशात उडण्याचा मनाशी बेत नाही. 

ताटवे फुलतात बाकी आजही बागेत माझ्या
फुल तू चुरगाळलेले आजही बागेत नाही. 

एक आहे विश्व माझे माणसांनी घेरलेले
फक्त मी सोडून का कुणी तुझ्या दुनियेत नाही. 

पालखी उठताच माझी दोन डोळे चिंब झाले
आणि विझण्याची तयारी माझी या राखेत नाही. 

वाहत्या गर्दीत माझा शोध घेणे व्यर्थ आहे
मुखवटे आहेत तेथे त्यात हा नचिकेत नाही.

आजची दुसरी गझल, आमचे सर्जक सन्मित्र डॉ. सचिन चिंगरे यांच्या 'एक नाजायज प्रिस्क्रिप्शन...' या मुक्तछंदातील प्रकटनाचे एक्स्टेंशन वाटणारी आणि भावगर्भिततेत नचिकेत जोशींच्या गझलेशी जुळी भासणारी पण केवळ आत्ममग्नतेत न रमता, डॉक्टरांच्या नेहमीच्या सर्वव्यापी आणि सर्वसाक्षी विचक्षण परिप्रेक्ष्यानुसार एकूणच मानव्यावर भाष्य करणारी...

इतके मिळवल्यावर कळते जगण्याला इतके लागत नाही
भरुन पावते तन बिचारे बुभुक्षा द्वाड मनाची भागत नाही.

लख्ख उजेडाची रात ही डोळ्यांनी उघड्या लोक झोपती
दिवस काळेकुट्ट तरी कुणी मिटून डोळेही जागत नाही.

कुठून शिकला मानव नकळे सराईत रोबोटता चलाख ही
राहिला ना मित्र मित्रासम शत्रूही शत्रूसम वागत नाही.

बेल वाजते उघडतो दरवाजा तितकेच सवयीचे खुले अल्पस्मित
पांढरपेशा शहरी नशिबी कडकडून गळाभेटीचे स्वागत नाही.

मुकाट मरतो रोज जितेपणी लोकतांत्रिक मरण मतदाता राजा
धनुष्य मोडले तोफा विझल्या आग कुणीच डागत नाही.

हवे लबाडांना रुपये चैनीला हा याचनेचाही धंदा झाला
व्रतस्थ माधुकरी, पोटार्थी भिक्षा कुणी मागत नाही.

या दोन्ही रचना एकत्र सादर करण्यामागे तुलना अथवा स्पर्धेचा भाव नसून रविवारच्या काव्यमैफिलीचा नमुना पेश करण्याचा मानस आहे. शिवाय ‘मुसाफिर’सह तीनही कविवर्यांची आणि अर्थात शामचीही अनुमती गृहीत धरलेली आहे, कुणाचीही याविषयी हरकत नसेल ही अपेक्षा !

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

वरदान...!



जवळपास १५ वर्षांपासून ही खंत व्हायरल होते आहे. दर वर्षी गणेश चतुर्थीला तर तिची हमखास आठवण येते. 'इत्यादी'वरच ही वेदना आजपर्यंत दोनदा प्रकटलीय, आज तिची ही तिसरी वेळ. याची कारण दोन - 

एक म्हणजे, दिवसेंदिवस समाजाच्या भौतिकतेत भौमितिक प्रमाणात वाढणाऱ्या रुची आणि वृद्धीने या देव आणि भक्ताच्या काल्पनिक संवादातील समर्पकता वाढून या अभिव्यक्तीतील विषाद अधिकच गहिरा होत चाललाय. 

दुसरे असे की, काव्यशास्त्र तथा पद्याच्या यमनियमात चपखल बसणारी ही काव्यरचना नसली तरी तिचा आशय-विषय आणि भाव-भान हे थेट काळजाला भिडणारे असल्याने त्याची 'प्रेरित' अथवा 'संपादित' आवृत्ती बनविण्याची गरज नाही.

तेंव्हा, या रचनेच्या अज्ञात कर्त्याला पुन्हा एकदा शतश: नमन करून आणि माऊलींच्या 'जो जे वांच्छिल तो ते लाहो, प्राणिजात' या पसायदानास स्मरून, त्याने देवाकडे मागितलेले वरदान सकळ मानव जातीस लाभो ही बाप्पाचरणी प्रार्थना ! 

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
'दोन क्षण दम खातो' म्हणून माझ्या घरी टेकला
'उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला'
मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला…

तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस?
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक…

'इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो
काय करू आता सार मॅनेज होत नाही
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाही

इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग
तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात'

माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन
एम बी एचे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस का रे?

असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको
परत येउन मला दमलो म्हणायला नको

माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश
'माग' म्हणाला 'हवं ते एक वर देतो बक्षिस
सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप'

मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं?

'पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं'
'सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं'
'हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव'
'प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव'

'देशील आणून परत माझी हरवलेली नाती'
'नेशील मला परत जिथे आहे माझी माती'
'इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं'
'आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं'

'कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर'
'भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार'
'य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान'
'देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान?'

"तथास्तु" म्हणाला नाही सोंडेमागून नुसता हसला,
सारं हाताबाहेर गेलंय पोरा… "सुखी रहा" म्हणाला !

या रचनेचा रचयिता जसा आजवर अज्ञात आहे तद्वत सदर रचना निनावी असल्याने, हत्ती आणि आंधळ्यांच्या गोष्टीनुसार ज्याला जो बोध झाला किंवा जो भाव भावला तसे नामकरण या रचनेच्या नशिबी आहे. माझे गेल्यावेळचे आकलन हे 'दहा दिवसाच्या खातिरदारीनंतर भक्त बाप्पाची त्याच्या संदेशासह बोळवण करतात म्हणून बाप्पाने नुसत्या आशिर्वादावर भक्ताची बोळवण केली...' असे असल्याने तेव्हा मी 'बोळवण' असे बारसे केले होते तथा आज मला यातील आशेची उमेद अधिक भावल्याने आजचे या रचनेचे नाव आहे... 'वरदान...!' 

काव्यरसिकांना, याच संदर्भातली माझी 'ऐकतोयस ना...?' ही एका फोटोवरून सुचलेली रचना इथे वाचता येईल.

शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

आशा...!


"गुलजार, आरडी आणि आशाताई या त्रिवेणी संगमाच्या स्निग्ध प्रवाहात जे मोती वेचले त्यातील ‘मेरा कुछ सामान...’ हा शीर्षस्थ शुभ्र मौक्तिक. याच्या तोडीचे पुन्हा कधी आयुष्यात मिळेल, गवसेल, लाभेल असे काही वाटले नव्हते. पण या आमच्या गोताखोर स्नेह्यांनी पुन्हा एकदा कलासागरात डुबकी मारून काढले काय तर हे अमृत... “तुमुल कोलाहल कलह में मैं ह्रदय की बात रे मन...” आता याबद्दल या माणसाचे आभार कसे मानावे...?"

एप्रिल २०१९ मध्ये लिहिलेल्या या 'कोलाहल' पोस्टचा विषय बोजड, तत्वचिंतनात्मक धाटणीचा असला तरी त्याला सुभग, सुनीत आणि सुश्राव्य करणारा मोहक स्वर काल ९० वर्षांचा झाला. लतादीदींचा स्वर अलौकिक, दैवी तथा असामान्य होता हे निर्विवाद पण आशाताईंनीच एका मुलाखतीत साभिनय (मिमिक्री हा आशाताईंचा आणखी एक कलागुण ज्यास म्हणावा तसा वाव मिळाला नाही) सांगितले तसे, लतादीदींचा स्वर हा देवघरातल्या समईसारखा सात्विक, स्निग्ध आणि सालस होता त्याला, 'दम मारो दम...' चा ठसका जसा झेपला नसता तशी 'रात अकेली है...' मधले उन्मादक आव्हानही पेलवले नसते आणि 'मेरा कुछ सामान...' च्या मुक्तछंदातला छांदिष्टपणाही मानवला नसता. या सगळ्यांना अक्षरश: पुरून उरणारा एकमेव आवाज म्हणजे आशा भोसले !

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही कदाचित गायन प्रकारात एकमेव असलेल्या या गांधर्वकन्येने सुमारे २० भाषांमध्ये ११,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केल्याची नोंद २०११ सालातील आहे. पुढील १२ वर्षात त्यात अजून किती भाषा आणि गाणी यांची भर पडली असेल हे एक तो मंगेशीच जाणे ! आजही स्टेजशो करण्याची उर्मी, ऊर्जा आणि उत्साह असलेल्या या चमत्काराचे नाव 'आशा' शिवाय निराळे काय असू शकले असते...! 

थेट सचिनदा, ओ पी नय्यर, खैय्याम पासून पंचम, इलायाराजा, ए आर रहमान पर्यंत अशी दिग्गज संगीतकारांची आणि, 'पिया तू अब तो आ जा...' अशा उन्मादक पासून 'इन आँखोंकी मस्ती...' अशा आव्हानात्मक, ते मराठीतील, 'जिवलगा राहिले दूर घर माझे...' अशा आर्ततेची रेंज पदरी बाळगणारी आणि तेवढ्याच डौलाने मिरवणारी आशा काल नव्वदीची झाली असे तिला बघून कुणालाही पटणार नाही ! म्हणूनच विंदांच्या शब्दात थोडा बदल करून सांगायचे तर,

'आशा'त आजच्या ही गाणे असे उद्याचे,
स्वप्न चिरंतनाचे इतकेच जाणतो मी...!'

बाय द वे, उडत्या, फिल्मी गितांशिवाय क्लासिकल अर्थात शास्त्रीय प्रकारात आशाने फार काही केले नाही असे मानणारे वेळ काढून वरील अल्बममधील चीजा जरूर ऐकतील ही...आशा !

आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृङ्खला । 
यया बद्धा: प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत् ॥