रविवार, ३ एप्रिल, २०२२

अनमास्क...!

माणसाने विषाणूच्या सावटाखाली जगण्यास आज दोन वर्षे पूर्ण झाली आणि दोन वर्षांपूर्वी २५ मार्च २०२०च्या चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्यास लिहिलेल्या उमेद या पोस्टमध्ये, 'कास्ट अवे' सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या माध्यमातून व्यक्त केलेली 'तुझे आहे तुजपाशी...' ही शहाणीव आणि 'हेही दिवस जातील...' हा आशावाद आज फलद्रुप होतांना दिसतो आहे. 'शुरुआतका कोई अंत नहीं...' या उमेदीने पुन्हा नव्याने सुरवात करतांना, 'मास्क'चे निर्बंध हटविलेच आहेत तर मोकळ्या हवेत भरभरून श्वास घेताना आणि करोनाने मोह-मायेचे क्षणभंगुरत्व सिद्धच करून दाखवले आहे तर या नव्या अंतर्ज्ञानाच्या प्रकाशात सारेच मुखवटे टाकून द्यायला जमतेय का बघू या...?

निदान प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे मी म्हणतो...
जमेलही हळू हळू कुणी सांगावे... काय..?


उदंड झाले रे सोस
माणूस थकला जीव
शिकला धडा मोलाचा
पिंडीत शोधतो शीव...

आता आणि मोह नको 
नको मायेचा पसारा 
जमवले गमवले
कोरा झाला पट सारा... 

भय भेद भ्रम भ्रांत
सारेच लयास जावो
आराधना हो सफल 
आराध्य साऱ्यांना पावो... 

प्रश्नांच्या गर्तेस मिळो
उजळ मार्गाचा फाटा
फिटो जाळे निबिडाचे
दिसू दे प्रकाशवाटा... 

नवी आशा नव्या दिशा
स्वप्ने पाहू पुन्हा नवी
चिंतामुक्त जगण्यास
फक्त नवी उर्मी हवी...!