सोमवार, २८ मे, २०१२

केवडा...!


केवळ नजरभेटीने विरघळला

विरहाचा डोंगर एव्हढा

मल्मली स्पर्शाच्या मोहराने

केवडा फुलला केव्हढा...!

शनिवार, २६ मे, २०१२

अजूनही


काळोख दाटला फार तरी

अंगाई अजूनही जोजविते

तप्त दग्ध ग्रीष्म दुपारी

तळे जलपर्णी सोसविते...

रविवार, २० मे, २०१२

शून्यवत...!


सदविवेक

अभ्यागत

संवेदना

शून्यवत...!

बुधवार, १६ मे, २०१२

निलाजरी...!


बेदरकार अन कोडगी

निलाजरी प्रवृत्ती

कांचनाच्या झळाळीत

विवेकाची निवृत्ती...!

सोमवार, १४ मे, २०१२

प्रीतीबिंब...!


समुद्र तोच, तोच किनारा

आभाळही तेच हवे

कातरवेळी तुझ्या कुशीत

प्रीतीबिंब नित्य नवे...!

रविवार, १३ मे, २०१२

मोहर...!


सोड हट्ट मोड जरा बाणा

हा क्षण पुन्हा उद्या नाही

जमेल तुलाही मोहरणे

जगावेगळी ती कला नाही...!

शनिवार, १२ मे, २०१२

दे...!


शब्द शब्द वेचू दे

क्षण क्षण भिजू दे

दृष्य नाद स्पर्श गंध

जाणीवा सा-या रुजू दे...!

शुक्रवार, ११ मे, २०१२

प्रच्छन्न...!


मातीचा गंध नाही

मोहविणारा छंद नाही

प्रच्छन्न दांभिकता अन

अपेक्षांना धरबंध नाही...!

गुरुवार, १० मे, २०१२

भक्क...!


शब्दबंबाळ कर्कश्श

गच्च भरलेला दिवस

संथ संध्याकाळी उगवणारी

भक्क चंद्रहीन आवस...!

शनिवार, ५ मे, २०१२

का...!


ना मोहवी आताशा

मंद दरवळता मोगरा

बोलतो नेहमीचेच तरी

आवाज का घोगरा...!

मंगळवार, १ मे, २०१२

दीन...!


आगतिक असेल मन

पण निराश नाही...

रुद्ध विषादाने खिन्न

तरी हताश नाही...!