रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

ता.क. ...?

परवा दिनाने त्याच्या मनोगतात सांगितल्याप्रमाणे माझे पत्र ता.क. (PS - Post-Script, you know!) शिवाय पूर्ण होत नाही. जगातील सर्वात मोठा, दोन पानी, ता.क. लिहिण्याचा विश्वविक्रम माझ्या नावावर आहे हे दिनाने परवाच्या व्हिडीओत सप्रमाण दाखवले आहेच. तेव्हा गेले तीन दिवस, 'लव्ह यू जिंदगी...'च्या ट्यूनवर तरंगणाऱ्या या 'आज मै उपर...'चा समारोप एका प्रसंगोचित 'ता.क.'नेच करावा असे वाटते.

पन्नाशीच्या आदल्या दिवशी... 'आपणही गेल्या काही काळापासून पोटार्थी गरजेने 'रॅट रेस'मधील उंदीर झालो आहोत आणि त्यामुळे वेगळे काही करण्याची आपली उमेद आणखीन उर्मी झपाट्याने लोप पावत चालली आहे...' अशा विचारांत 'देणं...' लिहिली गेली; त्यात निराशेपेक्षा विषाद अधिक होता. शिवाय 'पिंडी ते ब्रह्मांडी' पाहण्याच्या तात्विक सवयीमुळे 'सूक्ष्म बदलल्याशिवाय स्थूल बदलणार नाही' या पक्क्या धारणेने, शेवटच्या माणसात मुलभूत बदल घडत नाही तोवर समाज बदलणार नाही ही विचारधारा माझ्या सीएसआर - कम्प्लीट सोशल रिफॉर्म मधून प्रत्यही डोकावत असतेच.

तथापि डॉक्टर कणेकरांसारखा एक प्रश्न मला नेहमी पडत असे, 'मि. शिरी(मनी)ष , तुम्ही एवढं लिहिता, पण वाचतं का कुणी...?' समाजमाध्यमांचा (आणि खरतरं कुठल्याच माध्यमाचाच काय साधनाचासुद्धा) प्रोफेशनल वापर करण्याची कला आणि कुवत कधीही साध्य न झाल्याने आपल्या लिखाणाचे बाकी काही नाही तरी, 'लगता है तुम्हारे लिखनेसे गलत लोग जाग गये है...' ही 'क्रांतीवीरा'ची भीती खरी ठरू नये याची काळजी. पण ते तसे नाही असे समजते.

माझ्या लिखाणाला बरेच वाचक लाभतात आणि त्यातील बऱ्याच वाचकांना ते, लाईक करण्याइतके नसले तरी, शेअर करण्याइतके आवडते याचे दाखले मला हितचिंतकांकडून वेळोवेळी मिळत होतेच, कबुलीही मिळाली ! पूर्वी मी 'इत्यादी'वरच्या पोस्टची केवळ दुवा (लिंक) फेसबुकावर डकवत असे, तथापि बरेच लोक लिंक क्लिक करत नसल्याने मूळ पूर्ण मजकुरापर्यंत ते पोहचत नाहीत तेव्हा मी संपूर्ण पोस्ट फेसबुकावर कॉपी-पेस्ट करावी असा मोलाचा सल्ला मिळाला जो मी शिरसावंद्य मानून विनाविलंब तंतोतंत अंमलात आणला.

आता माझ्याच ब्लॉगवरचे लिखाण मीच कॉपी-पेस्ट करत असल्याने त्याखाली आपले नाव घालावे आणि - 'मूळ पोस्ट कुठल्याही फेरबदल न करता माझ्या नावासकट शेअर करण्यास माझी हरकत नाही' - असा शहाजोगपणाचा व्यावहारिक सल्लाही द्यावा हे काही मला सुचले नाही, किंबहुना असे काही सुचत नाही हीच आणखी एक मूळ समस्या. परिणामी, मजकूर कॉपी-पेस्ट करणाऱ्यांनी, त्यात मुळातच नसलेले लेखकाचे नाव स्वत:हून टाईप करून पुढे पाठवावे ही अपेक्षा किती बाळबोध आहे याचे प्रत्यंतर आले जेव्हा एका ग्रुपवर माझ्याशी ओळखदेखही नसलेल्या एका 'मित्रा'ने 'माझ्या मित्राची पोस्ट' अशा टिप्पणीसह छातीठोकपणे माझी पोस्ट शेअर केली. यानिमित्ताने जगन्मित्र असल्याचा अभिमानास्पद फील दिल्याने मी त्याचा ऋणीच आहे पण 'म्हातारी मेल्याचं दु:ख नाही काळ सोकावतो...' या तत्वाने, जे आपले नाही त्यावर क्षणिक सुखा-समाधानासाठी हक्क सांगण्याची वृत्ती अवघ्या मानव्याला अंती घातक ठरू शकते याची चिंता, बाकी काही नाही.

स्वामित्वाची, हक्काची भावना प्रस्थापित करून प्रबळ होण्यासाठी बीज-क्षेत्र न्याय अस्तित्वात आला आणि रानटी माणूस सिव्हीलाईज्ड झाला तेव्हापासून आपल्या 'निर्मिती'ला आपले नाव देण्याची प्रथा रूढ झाली. राजे-रजवाड्यांनी आपल्या नावाच्या मुद्रा चलनात आणल्या, संस्थानिकांनी आपली संस्थान वसवली, सामान्यांनी जमिनीचे तुकडे आणि दारांवर आपल्या नावाची तोरणं लावली, एवढेच काय, रस्त्यावर राहणाऱ्यांनी सुद्धा आपापला कोपरा आरक्षित केला. जेथे जेथे व्यवहाराची शक्यता निर्माण झाली त्या प्रत्येक ठिकाणी स्वामित्वाची, हक्काची नोंदणी आली. यातून 'कले'सारख्या अभिजात आणि कालातीत क्षेत्राचीही सुटका झाली नाही. कलाकृतीला बाजारात किंमत मिळू शकते हे समजल्यावर 'सिग्नेचर आर्ट'चे लोण पसरले. थेट पिकासोपासून खडूंनी रस्त्यावर चित्र काढणारे कलाकार त्याखाली आपले नाव टाकून आपली कला मॉनीटाईज करू लागले... आणि यात काहीही चूक नाही.

मला प्रश्न पडतो तो फक्त एवढाच की पुरातन काळापासून लेण्यांमध्ये कोरलेली भित्तीचित्रे, सर्वांगसुंदर शिल्पे, भव्य-दिव्य दगडी मंदिरे आणि तत्सम इतर वास्तू, शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून आणि कल्पकतेतून साकारलेले प्रचंड आणि अभेद्य किल्ले आणि अशा इतर अनेक सार्वजनिक कलाकृती या अनामिक कलाकारांनी कोणत्या प्रेरणेतून घडवल्या असतील? आपल्या अलौकिक कलाकृतीवर आपले नाव टाकण्याची इच्छा त्यांना झाली नसेल? इतिहासाच्या पानांनी आपली दखल घ्यावी अशी ओढ त्यांना का लागली नसेल?

याचे मी माझ्या अखंड चिंतनातून माझ्यापुरते शोधलेले उत्तर असे आहे की जेव्हा तुमचे धोरण सर्वसमावेशक असते, उद्देश स्वार्थाच्या पलीकडे असतो आणि मार्ग सेवाभावाचा असतो तेव्हा सर्वकालिक सामूहिक उपलब्धी ही तुमच्या क्षणिक प्राप्तीपेक्षा वरचढ ठरते आणि तुमच्या स्वीकृत कार्यात, कर्तव्यात व्यवहार आड येत नाही... येऊ नाही!

या ता.क.ने माझ्याच ता.क.चा पूर्वीचा विक्रम मोडण्या अगोदर थांबावे हे उत्तम... वाचत रहाल आणि आवडेल, पटेल ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवत रहाल ही अपेक्षा... नाव टाकलं नाही तर मुळीच हरकत नाही पण फेरबदल मात्र करू नये एव्हढीच माफक अपेक्षा!

शुभम भवतु !

शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

लव्ह यू जिंदगी...!

पन्नाशीचा कार्यक्रम मला सुखद धक्का देणार हे पूर्वनियोजित होते पण मला चकित व्हायला झाले ते अनेक कारणांनी. मुळात मुलीला आठवड्याच्या मध्यात एका दिवसासाठी नवीन जॉबमधून सुटी घेऊन येणे जमेल असे वाटत नव्हते त्यामुळे संध्याकाळी मुलीला घरी बघूनच माझी एक्साइटमेंट सुरू झाली आणि... पार्टीही !



कुठलाही प्रसंग निगुतीने साजरा करण्यासाठी कंबर कसणारी गृहस्वामिनी, माझा प्रत्येकच वाढदिवस हा सणासारखा सजवते याची कल्पना होती पण पन्नाशीसाठी खास ५० हृदयरूपी चॉकलेट्सचा बुके बनवण्यातली तिची कल्पकता आणि कलात्मकता जेवढी लोभस होती तेवढीच त्यासाठी लागणारी चिकाटीही दाद देण्याजोगी ! या प्रसंगाचा संस्मरणीय सोहळा करण्यासाठी तिने कधीपासून काय काय तयारी केली आहे याची कल्पना केवळ तिचे वरील व्हॉट्सएप स्टेटस पाहून मुळीच येणार नव्हती


संध्याकाळी पुण्यातील बहुतेक साऱ्या आप्त आणि स्नेहयांची मैफिल जमल्यावर जेव्हा मुलीने तिचा लॅपटॉप टीव्हीला जोडण्याचा कार्यक्रम सुरू केला तेव्हा, ‘अरे देवा, आणखी एक व्हर्च्युअल इव्हेंट की काय...’ या विचाराने खरतर अस्वस्थ व्हायला झालं. गेल्या दोन वर्षापासून, ‘प्लीज टर्न ऑफ (ऑर ऑन) युअर माईक... ’ आणियुवर स्क्रीन इज नॉट व्हिजिबल...’ या सगळ्या प्रकाराचं अगदी चूर्ण घ्यायला लागेल इतकं अजीर्ण झालंय, मग त्याचा उद्देश कितीही चांगला आणि हेतू कितीही प्रामाणिक असला तरी ! पण आज तरी माझ्या अल्पजीवी संयमाचा कुठल्याच प्रकारे अंत पहायचा नाही याची खूणगाठ बांधल्यासारखी सारीच माणसं अगदी शिस्तीत वागत होतीतंतोतंत !



मुलीने जेव्हा तिने संकलित केलेला व्हिडिओ सुरू केला तेव्हा पुढे काय असणार याचा अंदाज आलाअसे मला वाटले. पण जेव्हा पाहिला मित्र पडद्यावर चलचित्राच्या माध्यमातून प्रकटला तेव्हा आधी माझ्या आश्चर्याला आणि मग आनंदाला पारावार राहिला नाही कारण रवी, आपल्या ओणमच्या पारंपारिक वेशातील मुलांसह, मला थेट त्याच्या बंगलोरच्या घरातून शुभेच्छा देत होता...प्रत्येक मित्राच्या स्वभावानुसार त्याचे मनोगत आणि ते व्यक्त करण्याची शैली भिन्न असली तरी माझ्याशी असलेले भावबंध आणि माझ्याबद्दलची प्रामाणिक तळमळ हीमनाला स्पर्शून गेली... डॉक्टरच्या भाषेतहृद्य!’ रवी आणि जवानच्या आठवणी जेवढ्या उत्कट होत्या तेवढेच अभ्या आणि मुक्याचे प्रकटन परखड. पश्या आणि दिनाचे गुंतणे जेवढे मोहक होते तेवढेच डॉक्टरने त्याच्या कौशल्याचे आणि कुमारने आपल्या कलेचे खास माझ्यासाठी केलेले प्रयोजन वंदनीय ! शिवाय, ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर...’ असल्याने किमान आणखीन सहा मित्रांचे मनोगत वेळेत मिळू शकले नाही म्हणे, अन्यथा या अष्टप्रधान मंडळाचा चौदा रत्नजडित हार झाला असता !

 
भाव, अर्थ, गंध, रस, रूप, ज्ञान, शब्द आणि रंग अशा अष्टसिद्धींनी बहरलेल्या दूरस्थ जिवलगांच्या हृदयस्थ शुभेच्छांना परिपूर्ण केले ते विनयाताईने खास या प्रसंगासाठी केलेल्या कवितेने. जीवलगांचे हे मनोज्ञ अभिष्टचिंतन पन्नाशी सार्थक करून गेले हे निश्चित!


आपल्या पन्नाशीला आपले दोन्ही पालक आपल्यासोबत असणे आणि त्यांचे आशीर्वाद लाभणेहे फारच भाग्याचे आणि समृद्धीचे लक्षण असल्याचे जाणवले. अन्यथा, ‘मेरे पास मां है !’ हाइंडियावली मांप्रमाणे कालबाह्य झालेला डॉयलॉग मारून किती दिवस आपले अकर्म झाकणार आणि वर, आईवडील माझ्याकडे असण्याइतका मोठा कधीच न झाल्याने मीच अजूनही आईवडिलांकडे असतो…’ अशा सेंटी फिलॉसॉफीमागे दडण्याचाही उबग आला होता, त्यातून काही काळ (तरी) सुटका झाली... त्याबद्दल साऱ्यांचे, विशेषत: डॉक्टरचे जाहीर आभार !

साऱ्या सोशल मिडीयाला जमेस धरून, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, फोन, मेसेजेस, ग्रीटींग्ज आणि आभासी माध्यमातून पन्नाशीच्या शुभेच्छांनी शंभरी केव्हाच ओलांडली तेव्हा काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या... सोसायटीचा सिक्युरिटी ओळख दाखवतो आणि ‘कुणाकडे जायचंय...?’ असं न विचारता आपल्याच घरी जायला आत सोडतो इतपत समाजातील पत आयुष्याला पुरेल एवढी माफक अपेक्षा असलेल्या मला, या स्नेह-मायेच्या वर्षावाने गुदमरायला झालं. आजच्या हिशेबी जगात, माणसाची सामाजिक प्रतिष्ठा त्याच्या मिळकतीवरून आणि ओळखींवरून ठरत असल्याने, पंचवीस वर्षात साध्या दोन चाकांची भर घालता न आल्याने आपण कुणाच्या खिजगणतीतही नसू असा माझा जो समज होता तो या निमित्ताने भ्रम ठरला याचा आनंद.


शिवाय या निमित्ताने आणखी एक जाणीव प्रकर्षाने झाली... आईवडिलांनी दिलेले आयुष्य तुमचे स्वत:चे असले आणि ते कसे जगावे याचा पूर्ण अधिकार तुम्हाला असला तरी ते तुमच्या मालकीचे नसते, त्यावर आईवडिलांसह साऱ्याच स्नेह्यांचा, सुहृदांचा, स्वजनांचा तुमच्याहून अधिक अधिकार असतो, हक्क असतो आणि ही संख्या जेवढी अधिक तेवढी तुमची प्राप्ती (प्राप्तीकराशिवायची!) अधिक... ही समृद्धी अनुभवली की आयुष्यात काय कमावलं असे वृथा प्रश्न पडणे मग बंद होते...

मुलीने आणि तिच्या आईने या प्रसंगाचा सोहळा करण्यासाठी योजलेली कल्पकता, घेतलेले कष्ट, त्यांना कायमच असणारा आईपपांचा भक्कम आधार, मित्र-आप्तेष्टांची बहुमोल साथ आणि योगदान या साऱ्याने खरंच खूप भारावून जायला झाले आणि, माझ्या लीन्क्डईन प्रोफाईल मध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘...no matter how far I have come, it’s still a long way to go!  याची पुन्हा एकदा समृद्ध जाणीव झाली... तंतोतंत !


Thank you ALL, Love You All and Love You ZINDAGI!

बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

देणं…!

कण कण झुरलो
क्षण क्षण साठवितांना
वाटले खर्चू निवांत
त्यांना आठवितांना...

खिसे उसवत राहिले
कितीही टाके घालून
वरुन सुख भरले तरी
गळून जाई खालून...

एक दिवस ठरवले आता
‘मना’प्रमाणेच रहावे
शिल्लक वेळ देऊन
सुख मिळते का पहावे...

जमापुंजी उघडून बघता
उरलो होतो कफल्लक
क्षण सारे उडून गेले...
पोकळी तेवढी श्रीशिल्लक !

मग म्हटले भेटू स्वत:ला
करू नये कशाचीच गय
तर समोर कुणी आगंतुक,
आरशाचे वाढले होते वय...

न्याहळून पहिले तर
केसांवर दिसली रुपेरी झाक
थकलेला चेहरा म्हणाला,
‘माझं देणं देऊन टाक…!’

बोध...!


पन्नास म्हणजे अर्धशतक... एवढा काळ टिकलो याचे आंतरिक समाधान आणि, ‘ठरवलं तर शतकही गाठता येईल’ अशी ओढ लावणारी वेडी आशा. पन्नाशीला अनेक संदर्भ नव्याने उमगू लागतात. पंचविशीतला बाणेदार ध्येयवाद किंवा ‘कर लो दुनिया मुठ्ठीमें’ ही राजसी महत्वाकांक्षा व्यवहाराचे टक्के-टोणपे खाऊन वरमलेली असते आणि, ‘अरेच्चा, हे असे आहे होय, हरकत नाही वेगळ्या दृष्टीनेही पाहू या...’ एवढा उदारमतवादी दृष्टिकोन विकसित झालेला असतो... नव्हे, व्हावाच लागतो, कारण त्याशिवाय तरणोपाय नाही ही शहाणीव रोज वाढते वय नित्यनेमाने देत असते. शारीरिक क्षमता अतिसूक्ष्मपणे का होईना पण दिवसेंदिवस कमी होतेय ही जाणीव फारशी सुखावाह नसली तरी, रोज नव्याने उगवणारा पांढरा केस हे म्हातारपणाचे लक्षण मानण्यास साफ नकार देण्याइतक्या, तरुण मनाच्या संवेदना तीव्र असल्याने तो तातडीने कलप तरी केला जातो किंवा कलम तरी.

‘तरुण आहे रात्र अजूनी...’ ही आता थोडी कल्पनारम्य स्थिती वाटू लागली असली तरी ‘वय निघून गेले...’ म्हणायलाही मन धजावत नाही अशी ही त्रिशंकू परिस्थिती. पंचविशीतला चेहरा मनातून पूर्णपणे पुसला गेला नसला तरी आठवावा लागण्याइतपत धूसर नक्कीच झालेला असतो. ‘कितने दूर कितने पास...’ ही भावना फक्त तरुणपणीचे मोरपंखी दिवस, पाऊल न वाजवता आयुष्यात आलेले आणि कायमची हुरहूर लावून गेलेले चेहरे, मैफिलींसह इतरही कारणांसाठी जागविलेल्या रात्री, भावनांच्या आवर्तनात तरलतेच्या पलीकडे जाऊन ‘दुनियादारी’ शिकवून गेलेले प्रसंग, सोयीसाठी बांधलेले आणि गैरसोय होताच मोडलेले (भाव?)बंध एवढ्यापुरतीच मर्यादित न राहता विरक्ती, मुक्ती, मोक्ष किंवा किमानपक्षी वैकुंठाच्या बाबतीत तरी प्रबळ होत जाते.

खऱ्या अर्थाने मिड-वे किंवा हाफ-वे म्हणावे अशी ही वाटचाल. शिल्लक अंतर हे पार केलेल्या अंतराइतके नक्कीच नसले तरी उरलेला प्रवास घडलेल्या प्रवासाइतकाच, किंबहुना मोठाच, भासणार याची जाणीव पदोपदी करून देणारा हा टप्पा. कमावले त्याचे समाधान आणि गमावले त्याची हुरहूर अशा संमिश्र भावनांच्या हिंदोळ्यावर आयुष्याशी तडजोड करून ‘समन्वय’ साधतांना ‘अनुराग’ आणखीन ‘अस्मिता’ दोन्ही जपण्याची प्रामाणिक धडपड. भोगाच्या मायाजालातून स्वेच्छा-मुक्ती नाही आणि अभोगी विरक्तीचा विनाअट स्वीकार नाही. आहे त्यात संपूर्ण समाधान नाही पण स्पर्धा करण्याइतकी इर्षाही नाही. ठसठसणारे दु:ख नाही, आतडे पिळवटणारी वेदना नाही पण निवृत्त व्हावे इतकी इतिकर्तव्यता नाही आणि समाधानी असावे इतके सुखही नाही, अशी ही अस्थिर संभ्रमित अवस्था... तरुणांच्या दृष्टीने अधेड आणि ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला मिळण्यास अजून बराच अवकाश असल्याने त्यांच्या दृष्टीने ‘...तसे तरुण आहात!’

तस बघितलं तर ही अवस्था आजच्या लाईफ-स्टाईलचे तंतोतंत रुपक असायला हरकत नसावी. माणसाने स्वत:ची प्रगती आणि विकास करण्याच्या नादात तो अशा टप्प्यावर उभा आहे की नेमके काय कमावले आणि काय गमावले याचा सारासार विचार केल्यास आत्मसन्मान, समाधान, मन:शांती, नीतीमत्ता आणि सदसद्विवेक यांच्या बदल्यात मिळवली ती लाभार्थी तडजोड, नश्वर समृद्धी, निरंतर अस्थैर्य, बेगडी प्रतिष्ठा आणि विपरीत विचार आणि त्यातून उत्पन्न होणारे विकार आणि विखार.

अर्थात एकेरी वाटेवर ‘परती’चा मार्ग नसतो म्हणूनच हवी ‘उपरती’... ती कुण्या एका अमुकच्या पन्नाशीला झाली काय किंवा साऱ्यांच्या असोशीला झाली काय, भरकटलेल्याला योग्य मार्ग दाखवल्याशी मतलब. प्रवास अटळ आहे म्हणून जसे गतानुगतिक होण्याची गरज नाही तसेच अगतिक होण्याचीही गरज नाही... दिशा योग्य, वेग वाजवी आणि मन शुद्ध राखल्यास ठिकाण सापडतेच.

आज आयुष्याच्या मध्यावर आणि एका अपरिहार्य टप्प्यावरची ही आत्मिक अनुभूती... उद्या असेल?

कालाय तस्मै नम:

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

जोडे...!



इवल्या इवल्या अस्तव्यस्त आठवणी
क्षणांच्या हिरवळीवर इतस्ततः पसरलेल्या
त्यावर अनवाणी चालत चालत
इतक्या दूर निघून आलो
की आता विसरायला झालेय...
...जोडे कुठे काढून ठेवले होते.   

 

टाच नाजूक होती निघालो होतो तेव्हा

अजूनही आहे थोडीशी मृदु...

...आणि राहील तशीच

जोवर कडू-गोड आठवणी

खट्याळपणे गुदगुल्या करून

तिला हुळहुळवतील...

 

खरंच...

विसरायला झालेय

जोडे नेमके कुठे काढलेत ते

पण कधी वाटतं...

आता त्यांची गरज नाही...

...आणि कदाचित...

उपयोगही !