रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

ये दोस्ती...?



म्हणजे गोष्ट तशी छोटी होती, फार काही नाही. म्हणजे असं बघा... दोन तरणेबांड, राजबिंडे तरूण होते. परिस्थितीच्या रेट्यात बिचारे फार सुशिक्षित सुसंस्कारीत होऊ शकले नाहीत, पण मनाने चांगले होते. शिक्षण आणि संस्कार थोडे कमी पडल्याने ‘नाईन टू फाईव्ह’वाला, आधी टाय आणि कालांतराने डाय लावून करायचा, सोफीस्टीकेटेड जॉब त्यांच्या नशिबी नव्हता. त्यामुळे बिचाऱ्यांना हेराफेरी, चोऱ्यामाऱ्या, दादागिरी अशा अत्यंत सौम्य स्वरूपाचे अदखलपात्र पण तरी उगाचच गुन्हेगारी समजले जाणारे उद्योग करून आपला चरितार्थ चालवावा लागे. पण दोघे स्वभावाने अतिशय चांगले होते. त्यांच्या या व्यवसायात अनेकदा शौर्य आणि पळपुटेपणा तसेच संधिसाधूपणा आणि सचोटी यांचे पेचप्रसंग उभे रहात. अशा प्रत्येक प्रसंगी, मुळचा मनाचा अतिशय स्वच्छ, दयाळू आणि इतरांबद्दल कणव असलेला मोठा, एका नाणाक्ष... आपलं, चाणाक्ष युक्तीने सत्याची बाजू घेणे भाग पाडत असे आणि सरळ वळणाच्या दोघां हातून नकळत पुण्य घडत असे.

अशाच एका धाडसी पुण्यकर्माच्या वेळी दोहोंच्या हातून एका इमानदार पुलीसवाल्याचे प्राण वाचले आणि त्या पुलीसवाल्याने याची चांगलीच याद राखली. इमानदार लोक जनरली असतात तसा हा पुलीसवाला शूरवीर आणि कर्तव्यदक्ष देखील असल्याने त्याने एका डाकूला स्वत:च्या हाताने पकडून शिक्षा देण्यासाठी जे जंग जंग पछाडले त्यामुळे एका रसिक मनाच्या, नाचगाण्याचा नवाबी शौक असलेल्या पण आपल्या डाकूगीरीत अत्यंत गब्बर असलेल्या या उलट्या काळजाच्या नराधमाचे शत्रुत्व ओढवून घेतले. परिणामी जेलमधून पळून गेलेल्या डाकूने गावाकडे, गावापासून तुटलेल्या ऊंच गढीवर, रहाणाऱ्या पुलीसवाल्याच्या संपूर्ण कुटुंबाचा बळी घेतला, देवदर्शनाला गेलेली छोटी बहु तेवढी वाचली. रामा, शिवा, गोविंदा...! नवपरिणीत बहूचे अकाली वैधव्य आणि निष्ठावान सेवक रामलाल यांच्यावर कोसळलेल्या दु:खाच्या संकटाने वेडापिसा झालेल्या सूड भावनेने पेटलेल्या पुलीसवाल्याने थेट डाकूचा तळ गाठला आणि क्रूरकर्मा असण्याबरोबरच अत्यंत कुटील असणाऱ्या डाकूने जन्मभर पुरेल अशी शिक्षा म्हणून पुलीसवाल्याचे बाहूच छाटून टाकले.

आता विनाबाहू, विधवा बहू आणि रामलाल यांच्यासह आयुष्य कंठणारा पुलीसवाल्याचा आत्मा एकाच विचाराने तडफडतो आहे... आपल्या स्वत:च्या, तळाला खिळे लावलेल्या बुटांच्या, पायांनी त्या डाकूचा खात्मा! पण हे करण्यासाठी त्याला सोशिक बहू आणि वृद्ध, थकलेला रामलाल यांचा उपयोग नाही. म्हणूनच त्याने याद राखलेल्या त्या सालस पण धाडसी आणि सुस्वभावी पण गुन्हेगारीस मजबूर जोडगोळीची एकाच पास्ट परफॉरमन्सच्या आधारे परस्पर रिक्रूटमेंट करून टाकली. गावात दाखल झालेल्या या दोघांनी खरेतर पुलीसवाल्याने केलेल्या एका गल्तीच्या भांडवलावर पहिल्याच रात्री तिजोरीवर डल्ला मारून कथा संपवली असती, पण नाही! त्यांचे मुळचे सुस्वभावीपण छोट्या बहूच्या सो-शिक रूपाने समोर उभे ठाकले आणि कथा लांबली. दोन बाहुबालींच्या द्वंद्वास सुरवात झाली तीच मुळी प्रादेशिक भाषेतील सुपरस्टारच्या राष्ट्रीय स्तरावरील गेस्ट ऐपीअरन्समधल्या बेमौत मौतीने. शक्तीप्रदर्शनाच्या जीवघेण्या खेळात हकनाक बळी जाणाऱ्या निष्पाप कोकरांच्या अंध पालकांचे हृदय पिळवटून टाकणारे शल्य म्हणजे ‘इतना सन्नाटा क्यूं है भाई...’!

सुडाने पेटलेल्या दिशाहीन प्रवासात परस्परांवर कुरघोडी करण्याच्या वर्चस्वस्पर्धेत कुणाच्या हाती काय लागले हा यक्षप्रश्न! तरुण, सोशिक, शालीन कुलीन विधवा बहुचे पुनर्वसन करून तिचा उद्धार करू पाहणाऱ्या उमद्या तरुणाने खिंड लढवतांना जीव गमावून काय साधले? उरलेला दुसरा गुलछबू बेपर्वा तरुण, ज्या मित्रासोबत याच गावात खेतीबाडी करत सुखाने संसार करण्याची आणि मित्राला ‘आया’चे काम देण्याची स्वप्ने बघितली त्या मित्राशिवाय, पाण्याच्या टाकीवर चढून मिळवलेल्या, बायकोबरोबर सुखाने संसार करू शकेल? सेन्सॉरच्या आक्षेपामुळे आणि ऐनवेळी टपकलेल्या पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे डाकूचा पायाने खात्मा करण्याचे स्वप्न बघणारा पुलीसवाला, त्या क्रूरकर्म्याला जीवंत सोडावे लागल्याने, त्याला पुन्हा पळून जाण्याची संधी मिळाली तर तो काय करेल या विवंचनेत उरलेले आयुष्य कसे काढेल? आणि रहीमचाचाच्या हृदयाला घरे पाडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर कोण, कधी आणि कसे देणार... हे उपप्रश्न!

अगदीच गांभीर्याचा ओव्हरडोस नको म्हणून कथानकात ‘सुरमा भोपाली’पासून, ‘हरिराम न्हाई’, जेलर, बसंतीकी मौसी, अशी घटकाभर मनोरंजन करणारी पात्रही होती... आहेत! या साऱ्यांना फुटेज त्या मानाने कमी असले तरी यांच्या उपस्थितीने मनोरंजनाचे वेटेज नक्कीच वाढले... वाढते! तर ही झाली ग्रेटेस्ट स्टोरी एव्हर टोल्ड... शोले – हिंदी चित्रपटसृष्टीतला सगळ्यात यशस्वी सिनेमा... जो हजार वेळा बघितल्याचे छातीठोकपणे सांगणारे नरपुंगव या भूमीत आहेत. त्याचं काय...?

आज हे सार आठवण्याचं आणि हजार वेळा बघितलेल्या शिणेमाची गोष्ट दहा हजाराव्यांदा सांगण्याचं कारण म्हणजे गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात चाललेल्या सत्ताहरण वगनाट्याचे प्रयोग आणि त्या निमित्ते रोज वर्तमानपत्रातून कोसळणारे मथळे आणि दूरदर्शनवर कोकलणारे वार्ता-हर! हर हर... 

म्हणजे गोष्ट तशी छोटीच आहे... होती! पण या ‘ग्रेटेस्ट स्टोरी एव्हर टोल्ड’ची ही ‘लॉंगेस्ट स्टोरी नेव्हर अनफोल्ड’ आवृत्ती... त्याबद्दल आम्ही काहीच म्हणणार नाही... की बुवा आम्हाला, म्हणजे जनतेला, उगाचच इमामसाहब झाल्यासारखे वाटतेय आणि कुणालातरी ठाकूर झाल्यासारखे वाटते आहे... म्हणजे बुवा गोष्ट तर संपली पण नेमकी आपली हार झाली का जीत? आता आमची भूमिका तर आम्ही सांगितली (आणि चांगली वठवली देखील!), इतर भूमिका आणि पात्रे ज्याने त्याने आपापल्या प्रज्ञेनुसार समजून घ्यावी...

हो म्हणजे, तुमचा ‘जय’ आमच्या लेखी ‘विरू’ असायचा, आम्ही जिला अखंड बडबडणारी ‘बसंती’ समजलो ती तुमचा ‘पुरे पचास हजार...’ एवढा एकच डॉयलॉग असणारा सांबा असला, ज्याला आम्ही ‘कालीया’ म्हणायचो तो तुमचा ‘धोलीया’ निघायचा आणि ज्याला आम्ही सगळ्यांचे 'हात' बांधणारा (की छाटणारा?) ‘गब्बर’ म्हणायचो तो तुमचा स्वत:चेच 'हात' गमावून बसलेला ‘ठाकूर’ असला म्हणजे? झाली का पंचाईत... म्हणून ज्याचं त्यानी पाहून घ्यावं, उगाच ‘हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है...!’ काय?
-------------------
बाळासाहेबांच्या पुण्य स्मृतीस सादर समर्पित...!

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

तुझिया जातीचा..



महाराष्ट्राचाविनोदआज शंभर वर्षांचा झाला. यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही; श्लेष, वक्रोक्ती किंवा दर्पोक्ती तर दूरची बात. अशोक कुमारने भारताला विनासंकोच (आणि विनाकारण!) सिगारेट ओढायला शिकवले, दिलीपकुमारने संयत अभिनय म्हजे काय हे दाखवले (हं, आता त्याचं अश्राव्य बोलणं समजून घ्यायला सगळे प्राण कानात गोळा करायला लागायचे तो गोष्ट वेगळी!), राज-देव-शम्मी-राजेश यांनी रोमान्सची पायाभरणी केली (आणि चॉकलेट कुमारांचा मार्ग सुकर केला!). अमिताभने तरुणांना न्यायाविरुद्ध पेटून उठायला शिकवले (त्याच्या पुढच्या तीन पिढ्या थकल्या तरी तो अजूनही ऐन्ग्री यंग मैनच्या रुबाबात आपले स्थान राखून आहे!). लतादीदींनी आम्हाला गाणे ऐकायला, आशाताई आणि किशोरदाने ते गुणगुणायला आणि सचिनने क्रिकेट पहायला शिकवले.

आमच्यावरील हे सगळे संस्कार मान्य केले तर पुल नावाच्या गारुडाने आम्हाला निखळ, निरागस आणि निष्कपट हसायला शिकवले हे वरील सर्वाला पुरून उरणारे शत प्रतिशत सत्य! म्हणजे पुलंच्या आधी महाराष्ट्र हसतच नव्हता असे नाही. अगदी बाळकराम गोविंदाग्रज गडकऱ्यांपासून चिविं जोशी ते आचार्यांपर्यंत ‘विनोदी’ साहित्य महाराष्ट्राने बघितले, वाचले होतेच. पण, मुळातच धीर-गंभीर, नेमस्त आणि पंतोजींच्या शिस्तीत आणि वडिलांच्या धाकात वाढलेल्या मराठी घरावर, स्वातंत्र्याच्या काही दशकांपर्यंत प्रात:स्मरणीय श्रीराम, ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराज आणि बलोपासक समर्थ रामदासस्वामी यांची चरित्रे आणि साने गुरुजींच्या बाळबोध कथा यांच्या संस्काराने, आदर्श व्यक्तिमत्व घडवतांना उद्दात ध्येय बाळगण्याचा जो प्रघात पडला त्याला विनोदाचे (आणि आणखीन बऱ्याच गोष्टींचे!) नाही म्हटले तरी थोडेसे वावडेच होते. दासबोधात खुद्द समर्थांनीच विनोदाची ‘टवाळा आवडे विनोद...’ अशी संभावना (कि निर्भत्सना?) करून ठेवली असल्याने विनोद हा काव्य-शास्त्र-विनोदाचा अविभाज्य भाग असला तरी जनसामान्यांना त्याचा सहज लाभ होणे जिथे दुष्कर होते तिथे पुलंनी ती वाट नुसती मोकळीच नाही तर वाहती करून दिली आणि त्यांच्यानंतरही खळाळती राहील याची सोय करून ठेवली.

राम गणेशांचा आणि चिविंचा बाळबोध विनोद हा अत्यंत मर्यादाशील, सोज्वळ, सात्विक आणि कुलीन होता तर त्याच्या बरोब्बर विरुद्ध अत्र्यांचा विनोद हा इरसाल, धसमुसळा आणि हुकुमी होता. या दोन्ही प्रकारांनी महाराष्ट्राला भुरळ घातली या बद्दल शंकाच नाही. तरी विनोद आपला वाटावा इथवर प्रगती होण्यास महाराष्ट्रास ८ नोव्हेंबर १९१९ या दिवसाची वाट बघावी लागली. लक्ष्मणराव देशपांड्यांच्या घरात जन्मलेल्या कुलदीपकाने वयाच्या पाचव्या वर्षी, आजोबांनी लिहून दिलेले १५-२० ओळींचे भाषण हावभावासहीत खणखणीत आवाजात शाळेत म्हणून दाखवून आपले पुरुषोत्तम नाव सार्थ असल्याचे सिद्ध केले आणि महाराष्ट्राच्या हातावर मनोरंजनाची एक नवीन ठसठशीत रेषा उमटली!

मुंबईला इतर कोणत्याही ‘भाई’ची ओळख होण्यापूर्वी, ‘बंबईका डॉन कौन...?’ असले उद्दाम प्रश्न न विचारता आणि ‘मनोरंजन करण्याची कला’ एवढ्या एकमेव हत्याराच्या जोरावर फक्त मुंबईच नाही तर अवघ्या मराठी प्रजेवर राज्य केल ते पुलं नावाच्या जन्मजात भाईने! मुलांचे मनोरंजन करणाऱ्याचे नाते प्रभुशी जडेल असा आशावाद बाळगणाऱ्या साने गुरुजींनी, सकल मानवतेचे सर्व प्रकारे मनोरंजन करणे हे आपले जन्मसिद्ध, एकमेव आणि स्वीकृत कर्तव्य आहे इतकेच नव्हे तर तीच आपल्या आत्म्याच्या देहधारणेची इतिकर्तव्यता आहे अशा विश्वासाने लोकांना रिझविण्यासाठी एकामागेएक कार्यक्रमांची पुरचुंडी सोडून आपला खेळ मांडणाऱ्या या विदूषकाचे कुणाकुणाशी काय आणि कसे नाते जडले असेल त्याची मोजदाद विश्व्वेश्वरालाही अशक्य!

एक माणूस एका आयुष्यात जेवढ्या म्हणून अभिजात गोष्टी करू शकतो आणि ज्या ज्या म्हणून भूमिका निभावू शकतो त्या साऱ्या तर पुलंनी निभावल्याच आणि त्या साऱ्याबद्दल अनेकांनी अनेक वेळा, अनेक प्रसंगी अनेक ठिकाणी सांगितले, लिहिले देखील आहे. आजच्या दिवशी तर सर्वच माध्यमांवर पुलंबद्दल इतके काही बघायला, ऐकायला, वाचायला मिळेल की पुलंची स्वत:ची समग्र साहित्यसंपदाही बहुदा त्यापुढे तोकडी पडेल... पण हेच ते श्रेयस जे कमवावे लागते. त्यासाठी कधी 'गुळाचा गणपती' होऊन 'बटाट्याच्या चाळी'त वास्तव्य करावे लागते तर कधी ब्लॉकमध्ये शिफ्ट झालेल्या असा मी असामी'च्या माध्यमातून 'खेळीया' होऊन 'विदूषका'चे सोंग रंगवावे लागते...

मला स्वत:ला पुलंचा एक अतिशय भावलेला किस्सा सांगून पुलंच्या जन्मशताब्दी समारोप दिनाचे औचित्य साधतो. किस्सा अर्थातच पुण्यातला आहे. पुलंनी भलेही मोठ्या मनाने महाराष्ट्राच्या जनतेला विचारले असेल, ‘तुम्हाला कोण व्हायचे आहे, मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?’ पण त्यांचे पुण्यावर ‘विशेष’ प्रेम होते हे, ‘मी राहतो पुण्यात, विद्वत्तेच्या ठाण्यात...’ या त्यांच्या परखड ‘अभिव्यक्ती’तून चांगलेच व्यक्त होते! तर किस्सा असा...

एक रिक्षा डेक्कन जिमखान्यावरील एका बंगल्यापाशी थांबली. रिक्षातून वयाने प्रौढ, शरीराने गुटगुटीत हसऱ्या बाळचेहऱ्याची एक व्यक्ती उतरली आणि म्हणाली, ‘किती झाले?’ रिक्षावाला म्हणाला, ‘पावणेतीन रुपये.’ गोंडस छबीने  तीन रुपये दिले आणि चार आणे परत येण्याची वाट पाहिली. कालत्रयी न बदलणारा रिक्षावाला नेहमीच्या सहजभावाने म्हणाला, ‘सुटे नाहीत.’ ‘अरे, इतक्या वेळेपासून रिक्षा चालवताय, जमली असेल कि चिल्लर, बघा जरा.’ ‘ओ साहेब, असेल तर द्यायला आम्हाला काय दुखतय होय? नाही म्हटलं तर सोडा जाऊ द्या की! कुठ चाराण्यात जीव अडकवताय?’ ‘हे बघा तुमच्याकडे खरंच नसतील तर सांगा. दोन मिनिटे थांबा मी वरून सुटे पावणेतीन रुपये घेऊन येतो.’

रिक्षावाला ‘काय पण येडचाप कद्रू आहे...!’ अशा भावनेने बघतच राहिला. ‘माझे तीन रुपये...!’ भानावर येत रिक्षावाल्याने तीन रुपये परत केले आणि सद्गृहस्थ दोन जिने चढून वर गेले, पाच मिनिटाने धापा टाकत परतले आणि रिक्षावाल्याच्या हातावर सुटे २ रुपये ७५ नये पैसे ठेवले. कपाळाला हात मारून रिक्षावाला आपली नेहमीची मन:शांतीची स्तोत्रे पुटपुटत रिक्षा फिरवून निघाला आणि दुसऱ्या प्रवाशाने त्याला हात केला, ‘स्टेशनला येणार का?’ मगाच्या गिऱ्हाईकाने मुडाफ केला तर लांबचं गिऱ्हाईक भेटलं या आनंदात रिक्षावाल्याने मिटर टाकला आणि आपली टकळी सुरु केली. ‘काय राव, इमानदारीचा जमानाच राहिला नाही बघा!’ ‘का? काय झालं?’ ‘बघा ना एवढं घराच्या दरवाजात सोडलं, जिमखान्यावर बंगल्यात राहतात तरी चाराणे सुटं ना बघा या चिंगूस मक्खीचूस माणसाकडून!’

‘ते गृहस्थ कोण आहेत कल्पना आहे का तुम्हाला?’
‘नाही बुवा. का, तुम्ही ओळखता का त्यांना?’
‘बाबा रे अख्खा महाराष्ट्र ओळखतो त्या माणसाला. नुसता ओळखत नाही तर जीव ओवाळून टाकतो त्यांच्यावरून!’
‘असं! का बर? काय करतात म्हणायचे ते साहेब?’
‘ते लिहितात, नाटक-सिनेमा करतात, मनोरंजनाचे कार्यक्रम करून लोकांना हसवतात, दु:ख विसरायला लावतात.’
‘काय सांगताय? मग एवढ मोठा माणूस मला चाराणे का सोड ना?’
‘कारण ते तुझे नव्हते! तुझ्या हक्काचे नव्हते. असेच पैसे साठवून ते शाळा-महाविद्यालये-वाचनालये-इस्पितळे यांना देणग्या देतात जेणे करून ज्यांची पैसे खर्च करण्याची ऐपत नाही त्यांचे शिक्षणावाचून, इलाजावाचून अडू नये, काय समजलास?’

स्टेशनवर या गिऱ्हाईकाला सोडतांना किती पैसे झालें, किती घेतले आणि किती परत दिले रिक्षावाल्याला काही समजलं नाही कारण त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता गेल्याच आठवड्यात इस्पितळात त्याच्या आईचा विनाखर्च झालेला उपचार आणि राहून राहून आठवत होता त्या लहान मुलासारख्या निरागस चेहऱ्यावरचा निर्मम भाव!

[श्री. राजा गोसावी यांनी एकदा अनौपचारिक गप्पात सुहृदांना सांगितलेला पुलंचा एक किस्सा]

तर पुन्हा एकदा पुलंना त्रिवार वंदन करून ‘...तुझिया जातीचा मिळो आम्हां कोणी...’ एवढीच प्रार्थना!

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

शनिवार...!

काही चालत आले,
काही चालवत आले
काही खुरडत आले,
काही रखडत आले.

काही उत्साहाने आले,
काही निराशेने आले...
काही मुखवटा घालून आले,
काही मुखवटा उतरवून आले.

काही वॉकिंग शुजवाले आले...
काही वॉकिंग स्टिकवाले आले.
काही मॉर्निंग वॉकवाले आले,
काही इव्हिनिंग टॉकवाले आले.

काही कडक कॉलरवाले आले...
काही विदेशी डॉलरवाले आले.
काही अपात्री संपन्न होऊन आले,
काही अभागी वैफल्य घेऊन आले.

काही सेन्ट्रल लॉकिंगवाले आले,
काही ब्रिस्क वॉकिंगवाले आले. 
काही  हेल्दी जॉगिंगवाले आले, 
काही शार्प ब्लॉगिंगवाले आले.

काही वाकण्यातही ताठर आले,
काही मागण्यातही मुजोर आले.
काही सर्वस्व गमावून दीन आले,
काही पुत्रपौत्रांनी केले हीन आले.     

काही पेन्शनवाले बुधली घेऊन आले,
काही पॅकेजवाले चलनी घेऊन आले.
काही तरूण वार्धक्य लेऊन आले,
काही वृद्ध तरूण होऊन आले...!

काही वेतनआयोगवाले दांभिक आले,
काही विवेक-त्यागवाले सांघिक आले.
काही मागण्यास थेट गाभाऱ्यात गेले,
काही पायरी ओळखून याचक झाले...!

मारुती रुईने सजला आणि तेलाने माखवला,
‘सप्ताहाची बेगमी झाली’, जो तो सुखावला...  
ब्रह्मांडाएवढा वज्रहनुमान, त्याचाही श्वास दाटला
म्हणे, ‘मंद्रादिसारखा द्रोणूही याहून हलका वाटला’!