रविवार, ११ जुलै, २०२१

जंटलमन...!


‘सुहाना सफर और ये मौसम हंसी...’, ‘जंटलमन, जंटलमन, जंटलमन...’, ‘नैन लड गई है...’ पासून ‘मांगके साथ तुम्हारा...’, ‘मधुबनमे राधिका नाचे रे...’ व्हाया ‘सुखके सब साथी दुखमें न कोई...’, ‘रामचंद्र कह गये सियासे...’ ते ‘आज पुरानी राहोंसे कोई मुझे आवाज न दे...’ पर्यंत, केवळ गाण्यांच्या रेंजमधून अदाकाराच्या ताकदीची कल्पना यावी असा चित्रेतिहास लिहिणारा ‘कोहिनूर’ म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार मुहम्मद युसुफ खान अर्थात सर्वांचा लाडका दिलीप कुमार ! पुढे ज्या खानावळीत जेवून अनेकांची वजनं आणि प्रतिष्ठा(?) नको तितकी वाढली आणि बहुतेकांच्या डोक्यात हवा गेली त्या भक्तजीवी खानेसुमारीचा कुलपुरुष हा मूळ खान ! अत्यंत कोवळ्या वयात, चित्रपट निर्मितीचा वारसा लाभलेल्या आणि ‘द ग्रेटेस्ट शोमन’ होण्याच्या वाटेवर दमदार पावलं टाकणाऱ्या राजला थेट भिडण्याचा याचा ‘अंदाज’च ‘आगाज ऐसा है तो अंजाम क्या होगा...’ याची झलक द्यायला पुरेसा होता. केवळ ६५ चित्रपट करून आणि जिवंतपणी स्वत:च्या मृत्युच्या अफवा अनेकदा ऐकून सगळ्याला अक्षरश: पुरून अख्यायिका [Legend] म्हणून उरलेला हा महानायक !

आम्ही शाळेत असतांना कृष्णधवल दूरचित्रवाणीसंचावर जुन्या चित्रपट गीतांचा ‘चित्रहार’ नावाचा कार्यक्रम लागत असे. त्यावेळी या महाशयांना वरीलपैकी कुठल्यातरी गीतावर ताल धरतांना पाहिलेले. त्यामुळे आमची तोंडओळख दूरदर्शनवर पुसटशी झाली असल्याने त्यांच्याबद्दल फारसा स्नेह किंवा लगाव असण्याचे कारणच नव्हते; चाहता होण्याचा तर प्रश्नच नव्हता. कडक इस्त्रीचे पांढरे कपडे (विशेषत: विजार) घालतो आणि खूप छान नाचतो(?) म्हणून जितेंद्र आवडता नट असण्याची आमची बाळबोध अभिरुची पुढे अमिताभच्या आमच्या आयुष्यातील एन्ट्रीने हळूहळू परिपक्व होत गेली. माध्यमिक शाळेपासून महाविद्यालयापर्यंत हिंदी सिनेमाचा आमचा अवकाश अमिताभ या एकाच नावाने व्यापून राहिल्यामुळे, आर्ट फिल्म, पॉवरफुल कंटेंट आणि मेथड ॲक्टिंग आमच्या आयुष्यात येईपर्यंत आम्हाला इतर कुठल्याही अभिनेत्याबद्दल फारसा जिव्हाळा नव्हता.

दिलीपकुमारला प्रथमच नव्या रंगीत चित्रपटात आणि थेटरात पाहण्याचा योग आला त्यालाही कारणीभूत अमिताभच. ‘शक्ती’ मध्ये अभिनयाची जबरदस्त जुगलबंदी असल्याच्या जोरदार चर्चा कानावर आल्याने, ‘आपल्या’ अमिताभला अभिनयात टक्कर देणारा हा कोण सुपरमॅन या उत्सुकतेपोटी आम्ही शक्ती पहिला आणि खरं सांगायचं तर त्या वयात तो आम्हाला समजलाही नाही आणि आवडला तर मुळीच नाही. ’शोले’ आणि ‘दिवार’मधल्या अमिताभच्या मृत्यूने काळजाला झालेली जखम अजूनही भरलेली नसतांना ‘शक्ती’मध्ये त्याला पुन्हा मारायची काय गरज होती या उद्विग्नेत ती अभिनयाची जुगलबंदी का काय ती आम्हाला स्पर्शसुद्धा करू शकली नाही. शिवाय ‘आमच्या’ अमिताभच्या विरोधात असलेल्या व्यक्तिरेखेने आमच्या मनात घर करण्याचे कारणच नव्हते.

गद्धेपंचविशी सरली आणि आमची गाढवाची शिंगे यथावकाश गळून पडली. (याबद्दल दुमत असू शकते ती गोष्ट वेगळी !) सिनेमा, नाटक हे दिग्दर्शकाचे माध्यम असते या बहुमुल्य ज्ञानाबरोबर, हिरो आणि अभिनेता यातला फरक समजू लागला. अभिनय म्हणजे नेमके काय आणि तो कशाशी खातात याचा वस्तुपाठ संजीवकुमार-जया भादुरी यांच्या नैसर्गिक अभिनयाने शिकवला आणि भूमिका जगणे म्हणजे काय हे अमोल पालेकर, शबाना आझमी, ओम पुरी, स्मिता पाटील आणि नसिरुद्दीन शाह या दिग्गजांनी अक्षरश: बोटाला धरून शिकवले. एवढा गृहपाठ झाल्यावर आम्हाला अभिनय रसग्रहणाच्या बिगरीत प्रवेश मिळाला आणि आम्ही एका नव्या दृष्टीने सिनेमा बघू लागलो.

बुद्धाला झालेली पहिली बोधी म्हणजे, ‘आपल्या आधीही अनेक बुद्ध होऊन गेलेत आणि पुढेही अनेक होणार आहेत...’ ही होती असे सांगतात. आमची पात्रता ही निर्बुद्ध राहण्याची किंवा फारतर हतबुद्ध होण्याची असल्याने आम्हाला आमच्या पातळीनुसार झालेली बोधी ही होती की मेथड ॲक्टिंग हा काही इरफान, अभय देवल, नवाजुद्दिन, पंकज त्रिपाठी किंवा केके यांचा नवनूतन अविष्कार नसून बलराज साहनी, मधुबाला, मीनाकुमारी, गुरुदत्त, नूतन आदी कलाकार भूमिका समजावून घेऊन ती आपल्या सहजसुंदर नैसर्गिक अभिनयाने जगण्याचा जो अनुभव देत असत तीच मेथड ॲक्टिंग. आणि यातला सार्वकालिक बाप माणूस म्हणजे दिलीपकुमार ! या उद्बोधनानंतर, कुठल्याही नव्या विषयात आकंठ बुडण्यात पटाईत असलेले आम्ही मागे हटतो की काय ? उणेपुरे ६५ सिनेमे बघायला कितीसा वेळ लागतो...

अर्थात युट्युब, नेटफ्लिक्सच्या अभावात, दूरदर्शनवर दाखवले जाणारे जुने सिनेमे, ते लावणारे थिएटर आणि मिळाल्याच तर व्हिडीओ कैसेट यावरच सारी भिस्त असल्याने आम्हाला हे मिशन काही सहजासहजी पुरे करता आले नाही. तरीही मिळाले तेवढ्या भांडवलावर दिलीपकुमारला आमच्या आवडत्या अभिनेत्यांच्या यादीत अत्युच्य स्थान देणे सहज शक्य झाले. त्याच्या फिल्मोग्राफचा आमचा प्रवास उलटा... म्हणजे ‘सौदागर, कर्मा, विधाता, मशाल, शक्ती, क्रांती’ पासून ‘राम और श्याम, लीडर, मुगल-ए-आज़म, गंगा-जमुना, मधुमती, नया दौर, देवदास’... असा असला तरी दिलीपकुमार आवडण्याचा आमचा क्रम सरळ आणि चढताच राहिला आहे.

सहअभिनेत्रींमध्ये देविकाराणी, वैजयंतीमाला, मधुबाला ते लीना चंदावरकर असा ६ दशके पसरलेला पैस, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे ८ फिल्मफेअर पुरस्कार, किशोर कुमार पुरस्कार, असंख्य (न)कलाकारांचा प्रेरणास्त्रोत आणि कोट्यावधी प्रेक्षकांचा हृदयस्वामी असलेला दिलीपकुमार ‘दीदार’ ‘देवदास’ मुळे ‘ट्रॅजेडी किंग’ ठरला असला तरी कुठल्याही चौकटीत बंदिस्त नव्हता. त्याने ‘नया दौर’ बनवून जी वाट प्रशस्त करून दिली तीवरून चालतांना बहुतेकांना त्याची पायधूळ मस्तकी लावून आणि त्याच्या निसर्गदत्त ओरिजिनल प्रतिभेची प्रयत्नपूर्वक नक्कल करून आपली तुंबडी भरावी लागली.

केवळ अभिनयातच नाही तर आशय-विषयातही त्याच्या कलाकृतींनी नव्या दिग्दर्शकांना भुरळ पाडली. नसता, ऑस्कर पर्यंत मजल मारलेला आशुतोष गोवारीकरचा ‘लगान’ ‘नया दौर’वर बेतला नसता (‘सुन मितवा...’ हे गाणे ‘साथी हाथ बढाना...’ची सही सही नक्कल आहे आणि ‘परफेक्शनिस्ट’ आमिरचा ‘भुवन’ हा ‘नया दौर’ मधल्या ‘शंकर’चा जुळा भाऊ शोभतो) आणि मूळ चित्रपटाच्या कित्येक पट पैसे खर्चलेला, भव्यदिव्य सेट्स आणि संगीतनृत्याने फटी बुजवण्याचा प्रयत्न करणारा आणि अभिनयाची पराकाष्ठा करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करणारा शाहरुख आणि संजय लीला भन्सालीचा ‘देवदास’ माधुरी, ऐश्वर्या, जैकी श्रॉफ एवढी तगडी स्टारकास्ट असूनही शरत्च्चंद्र चटोपाध्याय, बिमल रॉय आणि दिलीपकुमारच्या साध्याच, लो-बजेट, कृष्णधवल पण अत्यंत खऱ्याखुऱ्या उत्कट आणि भावविव्हल ‘देवदास’च्या पासंगालाही पुरला नाही. उलट स्वत:ला सुपरस्टार समजणाऱ्या मिमिक्री किंगच्या मर्यादा त्यामुळे ठसठशीतपणे स्पष्ट झाल्या.

शेवटी, केवळ तीन गोष्टी ज्या या महानायकाला इतरांपेक्षा वेगळा आणि प्रणेता ठरविण्यास पुरेशा आहेत – दिलीपकुमारला अभिनय करावा लागला नाही, तो प्रत्येक भूमिका समजून-उमजून अक्षरश: जगला म्हणूनच त्याचे अनुकरण करून त्याच्या पुढच्या पिढीतील अभिनेत्यांना आपापल्या कारकिर्दीची सुरवात करावी लागली, हे एक !

‘बैराग’च्या अनुभवाने त्याने आपली बदलेली भूमिका समजून घेतली आणि ‘शक्ती’पासून आपली मुख्य अभिनेता ते सहअभिनेता (‘चरित्र अभिनेता’ हे संस्करण आम्हाला फारच विचित्र वाटते, त्यामुळे इतर अभिनेत्यांना ‘चरित्रहीन’ म्हणायचे की काय अशी एक कुशंका आमच्या चिकित्सक मनाला येते!) ही बदलेली ओळख तेवढ्याच ताकदीने केवळ स्वीकारली नाही तर अक्षरश: गौरवीली. अन्यथा, पोरगेलेसे अनिल कपूर (मशाल) आणि विवेक मुश्रन (सौदागर) तर सशक्त, स्वत:ला सिद्ध केलेले अमिताभ (शक्ती) आणि शत्रुघ्न सिन्हा (क्रांती) हे लौकिक अर्थाने नायक असतांना ते चित्रपट दिलीपकुमारने आपल्या अनुभवी, कणखर खांद्यांवर पेलले नसते. आपल्या भूमिकेबद्दल अत्यंत चोखंदळ असणे हे वैशिष्ट्यही मूलत: दिलीपकुमारचेच... मग 'बैराग' त्याला निमित्त ठरत असला तरी !

‘शतकाचा महानायक’ म्हणून गौरवला गेलेला, आमचा लाडका हिरो अमिताभ म्हणतो की हिंदी चित्रपटांचा इतिहास लिहायचा झाल्यास तो दोन स्पष्ट भागात लिहावा लागेल – दिलीपकुमारपूर्वी आणि दिलीपकुमारनंतर ! आजवरच्या हिंदी सिनेमातील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी सुपरस्टारच्या या एका विधानातच खरतर सारे काही आले, तरी सगळ्यांच्या माहितीकरता आणि नोंदीकरता येथे हे सांगणे उचित ठरावे –

आज भयंकर ग्लॅमर आणि अफाट पैसा मिळविणाऱ्या आणि त्याच्या जोरावर काहीही करू धजावणाऱ्या सिनेनटांना, हा मार्ग प्रशस्त करून दिला तो दिलीपकुमारने... अभिनेत्यांनी दिग्दर्शकाकडे मासिक वेतनावर काम करण्याची प्रथा मोडीत काढून, अभिनेत्याने आपल्या कामाचे ‘मानधन’ आपण ठरविण्याची नवीन रीत सुरु करून त्याने आपल्या पुढल्या पिढ्यांना मान आणि धन दोन्ही मिळवता येईल याची सोय करून दिली...

तेव्हा त्या अर्थानेही ‘नया दौर’ घडविणारा या ‘आझाद’चा ‘अंदाज’ ‘निराला’ होता हे काय सांगायला हवे ? आमच्या लेखी हिंदी चित्रपटांच्या १०० वर्षांच्या इतिहासात केवळ दोनच खरेखुरे सुपरस्टार झाले ज्यांनी प्रवाहपतीत न होता प्रवाहाला वेगळे वळण देण्याचा यशस्वी प्रयत्न केला... त्यातील एक अध्याय आज संपला !

हिंदी सिनेमाचा आजवरचा स्वयंभू सम्राट आणि जंटलमन महानायकाला अखेरचा दंडवत... अलविदा दिलीपसाब...!

रविवार, ४ जुलै, २०२१

कौशल्य...!


कबीर विणकर होता, हातमागावर कापड विणत असे. रोजच्या उदरनिर्वाहासाठी लागेल एवढे वस्त्र रोज विणावे आणि बाजारात तेवढे दाम मिळाले की विकून घरी परतावे असा त्याचा शिरस्ता होता.

एक दिवस विणलेले वस्त्र ५ मुद्रांना विकून परतावे म्हणून बाजारात उभा राहिला. सकाळची दुपार आणि दुपारची संध्याकाळ होत आली तरी त्याच्या वस्त्रास कुणी २ मुद्रांपेक्षा अधिक देण्यास तयार होईना.

हताश झालेल्या कबीराची अवस्था पाहून एका कुशल विक्रेत्याला त्याची दया आली. विक्रेत्याने त्याच्याकडचे वस्त्र घेतले आणि बाजाराच्या चौकात उभे राहून हाळी दिली,
‘लोकहो, बघा, बघा ! या वस्त्राची पोत बघा, रंग बघा आणि किती तलम आहे ते तरी बघा. इतके सुंदर वस्त्र, जे एरवी तुम्हाला बघायलाही मिळणार नाही ते, फक्त आणि फक्त १२ मुद्रांना उपलब्ध आहे, अशी सुवर्णसंधी हातची घालवू नका !’

त्याच्या या जाहिरातीला भुललेल्या लोकांची एकच झुंबड उडाली आणि विक्रेत्याने ते वस्त्र १२ मुद्रांना हातोहात खपवले. पांगापांग झाल्यावर विक्रेता कबीराकडे आला आणि म्हणाला,
‘बघितलस ? असं कौशल्य लागतं विकायला. तुला ५ मुद्रांची अपेक्षा होती, या घे १०, दामदुप्पट ! माझ्या दलालीच्या २ मुद्रा मी ठेवतो !’

कबीर हात जोडून म्हणाला, ‘महाराज, माझ्या कामाची आणि माझ्या उत्पादनाची किंमत मला माहितीय आणि मला तेवढीच अपेक्षित आहे. वरची ‘कमाई’ ही आपल्या ‘कौशल्या’ची आहे, तेव्हा ती आपणच ठेवा आणि मला माझ्या ५ मुद्रा द्या म्हणजे मी निघतो...!’