रविवार, २८ मार्च, २०२१

चतुराई...!


सिंहाने आपल्या श्वासाची दुर्गंधी येते काय जाणून घ्यायला कुत्र्याला बोलावले.

‘माझ्या तोंडाचा घाण वास येतो काय रे?’

‘होय महाराज, येतोय खरा!’ इमानी कुत्र्याने खरेखरे सांगितले.

सिंहाला सत्य ऐकून राग आला आणि त्याने एका फटक्यात कुत्र्याचे प्राण घेतले.

खात्री करून घ्यावी म्हणून सिंहाने लांडग्याला बोलावले आणि विचारले,

‘काय रे, माझ्या तोंडाची दुर्गंधी येते काय?’

कुत्र्याचे काय झालेय ते बघून लबाड लांडगा सावधपणे म्हणाला,

‘छे, छे, महाराज! काहीतरीच काय ? तुमचा श्वास उसासारखा गोड आहे !’

खोटी स्तुती करतो म्हणून राग आल्याने सिंहाने लांडग्याच्याही नरडीचा घोट घेतला.

आता पाळी कोल्हयाची होती. सिंहाने कोल्हयाला विचारले,

‘तू नीट सांगशील का रे, माझ्या श्वासाला घाण येते का ते?’

धूर्त कोल्हयाने आपल्या मित्रांची दशा पहिली होती आणि ‘हो’ म्हणा किंवा ‘नाही’ म्हणा, मरण काही टळत नाही या कल्पनेने त्याला युक्ती सुचली !

कोल्हा म्हणाला, ‘महाराज, माफ करा पण काही दिवस झाले माझ्या तोंडाची चवही गेलीय आणि नाकाला वासही येईना झालाय...

कोरोनाची लागण झालीय बहुतेक, कोव्हिड टेस्ट करून घ्यावी म्हणतो...!’

-------------------------------------------------------------------

सत्तेपुढे शहाणपण चालत नसते पण चतुराई चालायला हरकत नसावी आणि चतुराईला कुठलेच मापदंड लावायचे कारण नाही कारण ती तशीही विधिनिषेधशून्यच असते... म्हणे! मोक्याच्या क्षणी, ‘नरो वा कुंजरोवा...’ अशा संदिग्धतेत सत्य लपवून, भारतवर्षाचा भूगोल आणि इतिहास बदलणारा ‘धर्म’ लाभलेली नीतीमत्ता, कालौघात ‘बळी तो कान पिळी’च्या वाटेने गेल्यास नवल ते काय...? तेव्हा तूर्तास, तुकोबारायांची ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही...’ ही शिकवण साफ दुर्लक्षून कुठलीच बाजू न घेता कुंपणावर बसावे आणि राजधर्म राखावा हे धूर्त कोल्हयाचे कातडीबचाऊ धोरण, श्रेयस्कर नसले तरी, अगदीच सोईस्कर... कसे ?

-------------------------------------------------------------------

खुलासा: प्राण्यांसंबंधी असलेली ही पारंपारिक जातक कथा कुणाला उपहासात्मक व्यंग भासली तर तो वाचणाराचा दृष्टिदोष आणि यातील पात्रे बातम्यांमध्ये भेटल्यासारखी वाटली तर तो निव्वळ योगायोग. सदर बोधकथा पूर्णत: अराजकीय पण मूल्य(शिक्षण) देणारी आणि केवळ प्रबोधनात्मक आहे !

...आणि हो, एवढा खुलासा करूनही कुणाला काही खटकल्यास... 

बुरा न मानो होली है !

रविवार, २१ मार्च, २०२१

कूजन...!


विषयाची धरुनी कास
बुद्धी लावली पणास
होता भ्रमनिरास
झाली गोची !

विवेकाचा होत अभाव
भावनेला मात्र वाव
राघूंना खरा भाव
पोपटपंची !

नीरक्षीर विवेक नाही
मनास धनाची ग्वाही
नांदते लोकशाही
बलवंतांची !