बुधवार, ३० जानेवारी, २०१३

कद्रू...!

 
पाप-पुण्याचे हिशोबही
 
कद्रूपणेच करता
 
मृत्युच्या विवंचनेत
 
जगणे गृहीत धरता...!

मंगळवार, २९ जानेवारी, २०१३

खेळ...?

 
मी मरायला निघालो तेव्हा
 
म्हणाले जगण्याचे काय घेशील
 
जगण्याचा खेळ मांडला तर
 
विचारता आम्हाला काय देशील...?

सोमवार, २१ जानेवारी, २०१३

घोळ...!

 
गंधस्पर्शित रात्र प्रहरी
 
गोठल्या थेंबांची ओळ
 
मुग्ध-क्लांत गात्र लहरी
 
भोग-विरक्तीचा घोळ...!

रविवार, २० जानेवारी, २०१३

ठसे...?

 
निषिद्ध एके काळी ते
 
होते स्वीकार्य कसे
 
मीच नाही पूर्वीचा की
 
हे काळाचे ठसे...?

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१३

ओझे...!

 
गतानुगतिक प्रवासात
 
थांबू म्हटले क्षणभर
 
विमनस्क देहमनाला
 
सावलीचे ओझे मणभर...!

गुरुवार, १७ जानेवारी, २०१३

आदिम...!

 
जाणिवांच्या पलीकडे
 
अनोखे विश्व वसलेले
 
आदिम प्रेरणांना मात्र
 
वासनांध सर्प डसलेले...!

सोमवार, १४ जानेवारी, २०१३

संक्रमण...!

 
तिळगुळाची जोडी
 
गुळ पोळीची गोडी
 
तेजाच्या संक्रमणात
 
वसुंधरेची होडी...!

मंगळवार, ८ जानेवारी, २०१३

'मी'...!

 
'मी' देह नव्हे ज्याने
 
आत्मा मढविला
 
आत्माच 'मी' ज्याने
 
भोगी देह चढविला...!

रविवार, ६ जानेवारी, २०१३

ठिगळ...!

मुक्काम तोच, तीच वाट
पाऊल पण खिळलेले
अभिनिवेश सजग अन
विषाद कित्येक गिळलेले...
 
स्वप्नांना खंड नाही
वास्तव जरी पिळलेले
धरणीला पान्हा फुटता
आभाळ मात्र ठिगळलेले...!