शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

सिंहस्थ...!




व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर
संतांचे पुकार, वांझ झाले...

रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग, तुडुंबला...

बँड वाजविती, सैंयामिया धून
गजांचे आसन, महंता‌सी...

आले खड्ग हाती, नाचती गोसावी
वाट या पुसावी, अध्यात्माची?

कोणी एक उभा, एका पायावरी
कोणास पथारी, कंटकांची...

असे जपीतपी, प्रेक्षकांची आस
रुपयांची रास, पडे पुढे...

जटा कौपिनांची, क्रीडा साहे जळ
त्यात हो तुंबळ, भाविकांची...

क्रमांकात होता, गफलत काही
जुंपते लढाई, गोसव्यांची...

साधू नाहतात, साधू जेवतात
साधू विष्ठतात, रस्त्यावरी...

येथे येती ट्रक, तूप साखरेचे
टँकर दुधाचे, रिक्त तेथे...

यांच्या लंगोटीला, झालर मोत्याची
चिलीम सोन्याची, त्याच्यापाशी...

येथे शंभराला, लाभतो प्रवेश
तेथे लक्षाधीश, फक्त जातो...

अशी झाली सारी, कौतुकाची मात
गांजाची आयात, टनावारी...

तुज म्हणे ऐसे, मायेचे माइंद
त्यापाशी गोविंद, नाही नाही...!

- कुसुमाग्रज

बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५

दिवस असे की...!

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये,
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये...

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार,
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे,
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...

शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये सर्दी फार,
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...

कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव,
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...

कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ,
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...


असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये...!
- संदीप खरे

बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

नागपंचमी...!


माटी का एक नाग बनाके,
पुजे लोग लुगाया...
जिंदा नाग जब घर मे निकले,
ले लाठी धमकाया...!

जिंदा बाप कोई न पुजे,
मरे बाद पुजवाये...
मुठ्ठी भर चावल लेके,
कौवे को बाप बनाय...!

पाथर पूजे हरी मिले,
तो मै पूजू पहाड़...
घर की चक्की कोई न पूजे,
जाको पीस खाए संसार...!

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५

ठिकरी...!



एका रिकाम्या रविवारी...
जुने कपाट आवरायला घेतले तर…
अवचित येऊन बिलगले माझे बालपण...!

सापडला एका काचेच्या बरणीत
बंद असलेला खजिना…
काही टवके उडालेल्या गोट्या,
थोडे चिंचोके आणि
कसल्या कसल्या बिया...
एक ठिकरी आट्यापाट्यांची,
चुकीच्या घरात पडल्यासारखी…

…आणि सापडली एक खाकी वही
निळ्या निळ्या रेघांची...!
काही निळी ओळखीची अक्षरे सुद्धा
आता पुसट झालेली…

एक इवलासा पेन्सिलचा तुकडा होता...
शार्पनर मध्ये अडकलेला,
श्वास अडकवा तसा…


एक चेंडूही होता...
अजूनही अंगावर अंगणातली माती वागवणारा
बरोबर खेळून खेळून सोलली गेलेली बॅटही होती…
लहानपणीचे अंगणच भेटले जणू…!

खूपश्या रिकाम्या आगपेट्या,
आगगाडीच्या सुटलेल्या डब्यांसारख्या...
आणि सापडले एक वर्षानुवर्ष वापरलेले
शाळेचे पांढरे स्वेटर,
आता विरलेले आणि जुनाट झालेले…
माझ्यासाखेच...!

होता एक कचकड्याचा चष्मा, 
यात्रेत घेतलेला…
खूपशी रिकामी पाकिटं…
तिकिटांसाठी जमवलेली...
अजूनही वेगळे पाकीट होते,
पोस्ट करण्याची वाट पहाणारे…

एक सापडले जुने बंद घड्याळ,
हट्टाने बाबांकडून घेतलेले...
आजोबांचे ढापलेले फाउंटन पेन,
आता निब तुटलेले…
आणि आजीने बारश्याला दिलेले
वाळेही होते, आता काळे पडलेले!

आज जाणवले असे कि
जगण्याचा तोल सांभाळतांना…
वर्षांचा हिशोब आटोपला
निरागस 'मी'पण हरवतांना…

किती दिवसांनी भेटले बालपण,
सुखावून गेले जातांना…
नात्यांच्या तडजोडी निमाल्या
मिठीत त्याच्या विसावतांना…!


गुलजार सरांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या 
'आज मुझे उस बुढी अलमारी के अंदर…' रचनेचा
करुणा गोविंद कुलकर्णी यांनी लिहिण्याच्या पहिल्याच प्रयत्नात केलेला भावस्पर्शी मुक्त भावानुवाद…!