रविवार, १० मार्च, २०२४

गुफ्तगू ...!


मनातले व्यक्त करण्याची खुमखुमी, लिहिण्याची अतोनात हौस आणि हाताशी असलेला मुबलक वेळ एवढ्या भांडवलावर 'इगो-वाईज'च्या रूपाने ब्लॉगिंगचे केलेले धाडस आज १ लाख पृष्ठदृश्ये (व्हिजिटर्स काउंट)च्या दिशेने वेगाने वाटचाल करतेय.

सुचतील आणि रूचतील त्या कविता संग्रहित रूपात कायम आणि सहज उपलब्ध असाव्या म्हणून सुरु केलेल्या या मराठी ब्लॉग 'इत्यादी'चा उद्योग देखील पौगंडावस्थेतून वयात येतांना ५० हजार पृष्ठदृश्ये (व्हिजिटर्स काउंट)चा आकडा पार करून दौडत पुढे निघाला आहे.

सॉक्रेटिसच्या, "The way to gain a good reputation is to endeavor to be what you desire to appear..." या बोधवाचनाच्या प्रचितीसाठी 'बी[अ]कॉज' ही वर्डप्रेस साईट सुरु केली, तिला आजवर ११,६७५ लोकांनी भेट दिली आणि तिथे प्रकाशित केलेली 'उत्तरदायित्व' ही, 'सीएसआर'ची संकल्पना मराठीत समजावून सांगणारी पोस्ट बरीच लोकप्रिय ठरली, 'व्हायरल' झाली का म्हणानात!

याशिवाय, लिंक्डइन या व्यावसायिक समाजमाध्यमावर आजवर प्रकाशित केलेल्या एकूण ३७ पोस्टस् पैकी, 'व्हाय सम एम्प्लॉईज आर रेडी टू डाय फॉर देअर बॉस' या पोस्टने रचलेला १२३४ लाईक्स आणि २३१ कॉमेंट्सचा वैयक्तिक विक्रम, 'आनंद मल्लीगवड' यांच्याबद्दलच्या 'लेक मॅन ऑफ इंडिया' पोस्टवरील २५०००+ इम्प्रेशन्स, ६५०+ लाईक्स १३ रिपोस्ट्स आणि ८ कॉमेंट्स (अँड काउंटिंग...) एवढ्या प्रचंड फरकाने नुकताच मोडला!

सरतेशेवटी, 'रिसर्च गेट' या शोधनिबंधांचे संग्रहण, प्रकाशन करणाऱ्या अभ्यासस्थळावर प्रकाशित केलेल्या २३ निबंधांच्या १४,४४४ वाचनांसह, कर्वे समाजसेवा संस्थेचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात अधिक वाचला गेलेला लेखक मी आहे असे आकडेवारी सांगते.  

आता ही काय मार्च एंडिंगची आकडेमोड चालू आहे की काय असा गैरसमज होऊन माझ्या हिशोबी(?) वागण्यावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी या समग्र आकडेवारीच्या मुळाशी यावे हे उत्तम... अन्यथा शेवटी आकडेवारीच सगळ्याच्या मुळाशी येते हे आपण नित्य अनुभवतोच, नाही का? (पहा: जातनिहाय वर्गीकरण आणि तिकीट वाटप यांचा अन्योन्य संबंध)

तर, प्रश्न असा की या सगळ्याने मी काय साधले? म्हणजे मला याचा नेमका बेनिफिट (ऑफ डाउट...?) काय झाला? सुमारे हजारभर पाने लिहून मला जेवढे व्यक्त व्हायचे होते तेव्हढे होता आले का? आतल्या विद्रोही धुमसण्याला काही सर्जक मूर्त रूप देता आले का? या सगळ्या खटाटोपातून जे कमवले (पैशाव्यतिरिक्तही बरंच काही कमवता येतं, किंबहुना शाळेतल्या स्काऊट सारखी तीच खरी कमाई, हे द्रव्यसंमोहित समाजाला कसे कळावे?) आणि जमवले त्याने मी समाधानी आहे का?

तर, हो, निश्चितच! पण आज, या साऱ्याच्या जोडीला, माझ्या निखळ आनंदाचे, अतीव समाधानाचे आणि सार्थक कृतार्थतेचे कारण वेगळेच आहे...

इगो-वाईज या माझ्या पहिल्या इंग्रजी ब्लॉगवर मी 'फादरहूड' सिरीजमध्ये माझ्या पितृत्वाच्या भावनांना वाट मोकळी करून दिली ज्या योगे मैत्रेयीच्या प्रगतीच्या काही टप्प्यांची नोंद झाली. 'बी[अ]कॉज'वर 'मेटॅव्हर्स' मध्ये तिच्या प्रोफेशनल अचिव्हमेन्टची झलक दिसली. शिवाय अधून-मधून तिचा सहभाग, सहयोग असलेल्या राष्ट्रीय सामाजिक कार्यक्रमांची झलकही व्हॉटसऍप स्टेट्सद्वारा मिळत असतेच. त्यामुळे तो वसा तिने समर्थपणे पेलला आहे यात शंकाच नाही.

परवा मात्र तिने जो सुखद धक्का दिला त्याने, 'आज मैं उपर, आसमां नीचे...' अशी उन्मनी अवस्था झाली नसती तरच नवल! एकतर मुळात या बिझी मुलांनी स्वतःहून काही शेअर करायला मुहूर्ताची वाट पहावी लागते आणि जे केले ते थेट असे हृदयाचा ठाव घेणारे असेल तर हर्षवायूच नाही का होणार? तिच्या मम्मीच्या भाषेत, 'हत्तीवरून पेढे वाटण्याची तयारी...!' पण वेळेसोबत पुढे निघून गेलेले काटे टोचलेल्यांनी, रिकाम्या डायलची तुतारी करून ती फुंकायला हत्तीवरून गड (सुतावरून स्वर्गच्या चालीवर!) गाठल्याने आणि आसपासच्या बहुतांश मंडळीत साखरेचा प्रादुर्भाव आढळल्याने, तो मनसुबा 'मना'तच राहिला!

तर ही मुलगी अशीच संध्याकाळी कुठल्या टेकडीवर स्वमग्न अवस्थेत भटकत असतांना तिला काही सुचलं आणि तिने ते शब्दबद्ध केलं... तीच ही काव्यानुभूती... गुलजारांच्या 'दिल ढुंढता है...' बद्दल ऐकलेलंही नसतांना त्याच्याशी थेट नातं सांगणार हे प्रकटन, काव्याच्या व्याख्येबरोबर गजलेशीही इमान राखून असणारं आणि आयुष्याबद्दल चिंतनशील पण तेव्हढंच संवादी भासणारं! 

इत्यादीवर अस्मादिकांसह इतरही कुणाचे काही प्रकाशित करतांना इतका परमानंद मला कधीही झाला नसावा. त्याचे कारण केवळ, हा अण्णांचा पुढे चालू रहाणारा वारसा आहे, एव्हढेच नाही तर निव्वळ वंशसातत्यापेक्षा जनुकीय उत्क्रांतीने मनुष्यासह साऱ्याच प्राण्यांचे आणि पर्यायाने सृष्टीचे भले होईल यात मला मुळीच शंका वाटत नाही किंबहुना माझी तशी खात्रीच आहे.

तेंव्हा आपले अधिक प्रगत, अधिक सूज्ञ, अधिक विचारी, विवेकी आणि अधिक संवेदनशील रूप पाहता येणे हेच विकसित होण्याचे प्रबुद्ध लक्षण आहे. अन्यथा महाकाय, सर्वभक्षी, सर्वशक्तिमान डायनासॉरस नामशेष कसे झाले असते? 

असो, तर मैत्रेयीची इत्यादीवरची ही पहिली(वहिली) हिंदी/उर्दू कविता/गज़ल...

एक अंजान शहरमें,
एक धुंदलिसी शाममें
कई रोजकी खयालोंसे 
कुछ पल के लिये दूर होकर,
मन हीं मनमें गुफ्तगू चलती हैं !

वो पल याद आते हैं,
मन के अलमारीयोंमें जो बंद रखें हुए हैं !
वो पल जिसमें सुकून और शांती होती थी
जब हम मासूम और खुश हुआ करते थे,
जब सबके चेहरोंपर नकाब नहीं थे,
जब हम आझाद थे, बंधे हुए थे सिर्फ मनमर्जीयोंसे !

वो पल मिलते नहीं हैं अब,
बस ढुंढता रहता हैं मन उन्हें,
जिंदगीके खामोशीयोंमें…! 

चहाच्या बिलामागे, 'माझं सुखं माझं सुखं हंड्या झुंबर टांगलं, माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडलं...' हा बहिणाबाईंचा समग्र मनुष्यजन्माचा अभंग लिहितांना, 'काव्याची दुसरी बाजू व्यवहाराचीच...' असे प्रबोधनही करणाऱ्या वपुंच्या 'पार्टनर'ने, 'साऱ्याच गोष्टींचे विश्लेषण करता येत नाही, करायचे नसते. 'काही' गोष्टींचा निखळ, मनमुराद आनंद घ्यायचा असतो...' असा अत्यंत व्यावहारिक सल्ला 'श्री'ला दिलेला आठवतोय. तो ग्राह्य मानून आज या अभिव्यक्तीचा केवळ आनंद घ्यायचा विचार आहे...

आता याही वारशाची हमी मिळालीय म्हणतांना, तिने तेव्हढं फायनांशियल प्लॅनींगही शिकून घेतलं की पार्टनरची चहाच्या बिलाचा पाठपोट वापर करणारी फिलॉसॉफी सफळ संपूर्ण झाली म्हणायची. मग तिला मार्च एन्डचं टेन्शनही राहणार नाही आणि मी सर्वातून सर्वार्थाने निवृत्त व्हायला मोकळा...

बाय द वे, मुलीने अजूनही काही लिहिलंय असं ऐकतो, बघू या... वाट, ते 'इत्यादी'ला लाभण्याची !

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४

दीन...!


सहानुभूती 

उभे भंवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाटी गर्दी
प्रभा दीपांची फुले अन्तराळी
दौलतीची नित चालते दिवाळी !
कोपर्‍यासी गुणगुणत अन् अभंग
उभा केव्हांचा एक तो अपंग
भोवतींचा अंधार जो निमाला
ह्रदयि त्याच्या जणु जात आश्रयाला !
जीभ झालेली ओरडून शोष
चार दिवसांचा त्यातही उपास
नयन थिजले थरथरति हातपाय
रूप दैन्याचे उभे मूर्त काय ?
कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनि पसरल्या कराला
तोच येई कुणि परतुनी मजूर
बघुनि दीना त्या उधाणून ऊर
म्हणे, राहिन दिन एक मी उपाशी
परी लाभू दे दोन घास यासी
खिसा ओतुनि त्या भुक्या ओंजळीत
चालु लाग तो दीनबंधु वाट !
आणि धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात !

- कुसुमाग्रज

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

ज्ञानपीठ...!


आम्ही शाळेत असतांना एका टप्प्यावर संपूर्ण १०० मार्कांसाठी हिंदी किंवा संस्कृत अथवा ५० मार्कांसाठी संस्कृत आणि ५० मार्कांसाठी हिंदी निवडण्याचा पर्याय होता. पर्याय असण्याचे, ते दिले जाण्याचे आणि समोरच्याची निवड स्वीकारली जाण्याचा तो काळ होता.

शिवाय घरात वडीलधारी माणसे असल्याने, कुठलेही धोरणात्मक निर्णय हे प्रथम हायकोर्टाकडे आणि यथावकाश सुप्रीम कोर्टाकडे नेण्याची आणि त्यांचे निर्णय शिरसावंद्य मानण्याचाही काळ होता - अगदी रामराज्यच का म्हणानात.

स्वत:च्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना परदेशी धाडून सोयीनुसार इथल्या व्यवस्थेवर ताशेरे ओढण्याचा किंवा तिचा उदो उदो करण्याचा आणि इथल्या वंचितांसाठी गळे काढण्याच्या अमेरिकन 'मार्क्स'वादी मध्यमवर्गीय (आणि मार्गीय!) वृत्तीच्या पायाभरणीचा तो काळ.

तेंव्हा 'संस्कृत' हा 'स्कोअरिंग सब्जेक्ट' असल्याने तो १०० मार्कांसाठी घेऊन आपले (गुण)मूल्य वाढवून घ्यावे या मताचा रेटा प्रबळ होता. पण आम्ही पहिल्यापासूनच पुलंचे चाहते (भावनावेगात 'भक्त' लिहिणार होतो!) आणि त्यामुळे 'मार्क्सविरोधी' गटात असल्याने विषयांचा उपभोग मार्कांसाठी असतो हा मूल्यवर्धित विचार आमच्या 'मना'ला आजही समजलेला नसल्याने आणि विषय, त्यातही भाषा, अभ्यासण्यात अधिक रुची असल्याने आम्हाला 'बेस्ट ऑफ बोथ वर्ल्डस'चा पर्याय मोहवत होताच.

त्याच आशेने सदर मामला सुप्रीम कोर्ट अर्थात आमचे आजोबा अण्णा यांच्याकडे गेला असता, आम्ही काही वकिली करण्याअगोदरच अण्णांनी नेहमीच्या धोरणी, करारी, आणि नि:संदिग्धपणाने आपला फैसला सुनावला - 'संस्कृत सर्व भाषांची जननी आणि आपल्या संस्कृतीची धरोहर असल्याने ती अवगत असलीच पाहिजे तथापि हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याने आणि बहुतांश भारतीयांची बोलीभाषा असल्याने ती देखील सवयीची असली पाहिजे. तस्मात, दोन्ही भाषांच्या ५०-५० मार्कांचा पर्याय निवडावा!'

आमची अवस्था 'आज मैं उपर...' अशी झाली नसती तरच नवल! पुढे या निर्णयाचा मान राखून आम्ही शाळेत असतानाच, अण्णांनी लिहिलेल्या संस्कृत 'जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' हे प्रकटन आणि 'परदेसी पोस्टमन' या नाटुकलीतील हिंदी भाषिक पोस्टमनच्या भूमिकेतून, आमच्या दोन्ही भाषांवरील शालेय प्रभुत्वाचा दाखला देऊन अण्णांना आपल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही याची काळजी घेतली. शिवाय दोन्ही विषयात अगदी स्कोअरिंग नसले तरी गौरवास्पद मार्क्स मिळवून त्याही आघाडीवर तो निर्णय सार्थ ठरवला.

आज हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे काल जाहीर झालेले ५८वे भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार - उर्दू साहित्यातील कार्याबाबत गुलजार यांना हा पुरस्कार देण्यात आला असून यासोबतच संस्कृत पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांनाही ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.

भाषा हे विचारांचे माध्यम असले तरी ती तुम्हाला समृद्ध कशी करते याची दोन उदाहरणे म्हणजे या दोन भाषा. संस्कृतने आम्हांला संस्कार दिले, आणि आधी हिंदी आणी नंतर उर्दूने आमच्या संवेदना, जाणिवा समृद्ध केल्या. संस्कृतने आईच्या शिस्तीने वाढवले तर उर्दूने मावशीची प्रेमळ माया केली. या दोन्ही भाषांचा एकत्र होणारा सन्मान बघून आपल्या आजोबांच्या द्रष्टेपणाची पुन्हा एकदा प्रच्छन्न प्रचिती तर येते आहेच शिवाय स्वतःच्या भाग्याचा हेवा देखील वाटतो आहे. अगदी, '... पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति, कुतो मनुष्य:' असा !

या निमित्ताने 'अंधार सरो आणि उजेड पडो' या एकाच आशादायी भावनेचे या दोन्ही भाषांतील प्रकटीकरण किती मनोज्ञ आहे पहा...

‘असतो मा सत् गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय।’

आणि कोव्हीडच्या अत्यंत निराशेच्या काळात मानवी मनाला उभारी देण्यासाठी गुलज़ारांनी लिहिलेले 'धूप आने दो...'

धूप आने दो

मीठी मीठी है
बहुत खूबसूरत है
उजली रोशन है
जमीं गुड़ की ढेली है
गहरी सी सहमी हवा उतरी है
इस पर लगेना धुंध से
हटकर जरा से एक और ठहरो

धूप आने दो

आफताब उठेगा तो
किरणों से छानेगा वो
गहरी गहरी नीली हवा में
रोशनी भर देगा वो
मीठी हमारी जमीं
बीमार ना हो
हट के बैठो जरा
हटके जरा थोड़ी जगह तो दो

धूप आने दो...

तळटीप: गुलज़ारांबद्दल कितीही लिहिले तरी कमीच पडावे आणि 'दुबळी माझी लेखणी...'ची प्रचिती यावी अशी परिस्थिती. पण सर्व काही आपणच करावे / लिहावे असा 'अहं ब्रह्मास्मि...' अविर्भाव निदान या विषयात तरी असू नये. तेंव्हा, प्रथितयश लेखक त्यांच्या समर्थ लेखणीतून, जिवंत जाणिवेतून आणि नित्य प्रवाही संवेदनांतून जे लिहितात त्यानेही समृद्ध व्हावे म्हणून आतंरजालावरील हे दुवे...

रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

सफर...!


हमसफर ही मन्नत हमारी,
वो ही थी हमारी आरजू...

सफर इतना खूबसूरत तो
मंजिलों की किसे जुस्तजू...!

रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

मुक्त...!


माझ्या कालच्या दुर्दम्य आशावादाची त्वरित दखल घेऊन कविवर्य सन्मित्र दिनेशने 'स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग' ची मराठी आवृत्ती केवळ प्रसवली नाही तर तिच्यावर अत्यंत लयबद्ध अष्टाक्षरी संस्कार करण्याची किमया सुद्धा साधली याबद्दल त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच! 

या प्रकटनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ रूपांतरण किंवा निव्वळ अनुवाद नव्हे तर, मूळ बीजकल्पनेशी नाते सांगणारी संपूर्ण स्वतंत्र आणि स्व-छंद अभिव्यक्ती आहे कारण, यात डोकावणारी अनामिका रॉबर्ट फ्रॉस्ट यांना अभिप्रेत होती काय हे खात्रीने सांगता येणार नाही. 

ही कविता पाठयपुस्तकात 'धडा' म्हणून असल्याने, तो 'शिकविण्या'च्या उद्देशाने जे संदर्भ आढळतात त्यात, कवितेतील घर हे त्या जंगलाच्या मालकाचे(?) फार्म हाऊस(??) असल्याचे विवरण येते. शिवाय फ्रॉस्ट यांनीही 'हिज' असे पुरुषवचनी संबोधन वापरले आहे, त्याचाही संदर्भ या विवेचनास असावा असे वाटते.

तथापि, सन्मित्र दिनेशच्या कवितेचा आत्मा हा नेहमीच प्रेयसीच्या एका विरह-विव्हल प्रियकराचा राहिल्याने त्याला ते घर तिचे असावे असे वाटणे जेवढे स्वाभाविक तेवढेच रोमँटिक! त्या निमित्ताने एक वेगळाच 'ठहराव' बघायला मिळाल्याने रसिकांच्या आनंदानुभूतीत भरच पडेल यात शंका नाही! 

दिनेशच्या कवितेच्या आत्म्याला नेहमीच एक अध्यात्मिक किनारही अनुभवता येत असल्याने, त्याने त्याच्या आवृत्तीचा समारोप अध्यात्मिक पद्धतीने करणे क्रमप्राप्तच होते. फ्रॉस्टना ते देखील तसे म्हणायचे नसावे असे वाटते. फ्रॉस्टच्या, सामान्य माणसाला नित्य तोंड द्याव्या लागणाऱ्या व्यावहारिक, धोरणी द्वंद्वाला दिनेशने कर्म-धर्म-संयोगाचे एक वेगळेच परिमाण दिले, तेही कौतुकास्पद!

कार्यबाहुल्यामुळे इतर कवी मित्रांना अजून यावर प्रकटता आले नसावे असे मानून, यथावकाश आणखीनही काही आवृत्त्या अनुभवयास मिळतील ही अपेक्षा. पण तूर्तास आस्वाद घेऊ या सन्मित्र दिनेशच्या या खास अष्टाक्षरी अभिव्यक्तीचा...       

झाडी दाट ही कुणाची
आहे मलाही ठाऊक
घर गावात तिचे ते
उबदार अन् भावूक

थबकलो इथे असा
निरखत अश्या क्षणी
गोठलेले रान गार
नसेलही तिच्या मनी

घोडा अबलख माझा
थरारला तो ही खास
असा का थांबलो येथे
नसे घर आसपास

गोठलेला तलाव हा
अन् झाडी घनदाट
सांजवेळ कातर शी
पाही ती कुणाची वाट

चूक ना उमजे त्यास
करी घंटानाद मंद
घोंघावतो वारा फक्त
आणि बर्फवृष्टी कुंद

आहे सुंदर जंगल
घनदाट खोल जरी
काही शपथा जुन्या
सांभाळतो मी ही उरी

दूरवर चालणे माझे
कर्म हे कर्तव्ययुक्त
भोग सारे संपवून
व्हावे अखेर मी मुक्त!

- दिनेश चंद्रात्रे, धुळे

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

वादियां और वादे...!

‘हर घडी बदल रही है रूप ज़िंदगी…’ अशा भयाकारी वेगाने बदलणाऱ्या जगात नव्याचे जुने व्हायला हल्ली फार काळ लागत नाही. कळीचे फूल होऊन देवाच्या चरणस्पर्शाने त्याचे निर्माल्य व्हायला जेवढा काळ लागतो त्याहूनही कमी वेळात ‘नव्या’ गोष्टी ‘जुन्या’ होत चालल्यात, फक्त ‘देव’ (आणि 'भाव') तेवढे बदलले आहेत.

बरं, यात फक्त अन्नपदार्थ, कपडेलत्ते, खेळ-मनोरंजन, संस्कृती-उपक्रम, साधन-उपकरणेच नाही तर गाडी-घोडे, स्थावर-जंगम, सोयी-सुविधा यांच्यासह आवडी-निवडी, आचार-विचार, सखे-सोबती, सगे-सोयरे आणि मूल्य-तत्वे सारेच बुलेट ट्रेनच्या वेगाने आऊट डेटेड होतांना दिसते.

पूर्वी 'टूथ' हा फक्त विस्डम संदर्भातच असे त्यामुळे त्याच्याशी निगडित विस्डमही शाबूत होते. आता त्याची जागा 'ब्ल्यू' टूथ ने घेतल्याने त्याच्या उठवळ धरसोडपणाचे वैशिष्ट्यपूर्ण आणि बहुपयोगी लक्षण त्याच्या वापरकर्त्यात आढळले तर, ‘वाण नाही पण गुण लागला’ म्हणायचं. शिवाय सारे काही (प्र)दर्शनीय झाल्याने स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात ‘दिसेल ते’ कैद करण्याची चढाओढ पाहता, क्षणांचे अनुभव संवेदनेत रुजून त्यांच्या जोपासनेने जाणिवा समृद्ध होण्यासाठी आवश्यक तो संयम, ती स्थिरता, तो ठहराव, ते भान अभावानेच दिसते.

या भयावह वेगामुळे जे अपघात संभवतात त्यांचे दूरगामी परिणाम अधिक धोकादायक आहेत. 'पागल, ये मत सोच की जिंदगीमें कितने पल है, ये देख हर पलमें कितनी जिंदगी है...!' ही मुन्नाभाई फिलॉसॉफी सांगणारी उत्तान नाच करणारी नर्तकी असली तरी त्यामुळे त्यातले तत्व मुळीच हीन ठरत नाही, किंबहुना हे समजावून सांगायला तिच्याइतकी अधिकारी व्यक्ती दुसरी नाही असाही एक दृष्टिकोन असू शकतो. पण त्या एका क्षणात असलेली जिंदगी बघायची, आस्वादायची वृत्ती मात्र ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, कुठेच एक्सप्रेस डिलिव्हरीसाठी ऑर्डर करता येत नाही; ती जोजवावी, जोपासावीच लागते.

सौंदर्याचे, भव्यतेचे, उदात्ततेचे आस्वादन करण्यासाठी लागणारी रसिकता जगण्याच्या गरजांमध्ये कशी घुसमटते याचे क्लासिक उदाहरण असलेली रॉबर्ट फ्रॉस्ट यांची, आख्यायिका बनून उरलेली कविता 'स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग' १०२ वर्षांची झाली तरी आजही तेवढीच, किंबहुना अधिकच समर्पक आहे. आज जगण्याच्या धबडग्यातून वेळ काढून तिचे रसास्वादन करावे आणि जमेल तसा मुक्त भावानुवाद करावा म्हणून हा खटाटोप. आता हे प्रकटन राष्ट्रभाषेत का मातृभाषेत का नाही या मागे काही मोठी वैचारिक/तात्विक/'राज'कीय भूमिका वैगरे नाही तर या कवितेचा एकूण बाज पहाता तिला मातृभाषेत आणायला अधिक प्रतिभा, योग्यता आणि अभ्यास पाहिजे असे जाणवल्याने ही सोईस्कर पळवाट का म्हणानात! इतर कवी मित्रांनी या कामी मदत केली तर तेही लवकरच साधेल... हा दुर्दम्य आशावाद!

ये किसकी हसीं वादियां है जानता हूँ शायद मैं…
गावमेही घर है उसका पता हैं मुझे फिर भी
वो मुझे यहाँ ठहरा हुआ नहीं देखेगा 
इन वादियांके नजारे देखते हुए…
सालकी सबसे गहिरी शामके वक्त 
बर्फसी झील और वादियोंके बीच 
कोई बस्तीभी नजरमें नहीं ऐसी जगह...

क्यूँ रुका हूं मैं, मेरा घोडा है परेशान
उसने अपने गलेकी घंटीको हीलाया
ये जानने की कहीं कोई भूल तो नहीं
उतनी ही आवाज गुंजी
हवाकें हलके झोको और गिरती बर्फके सिवा...

वादियां हसीं हैं, गहिरी और लुभावनी भी
लेकिन जो वादे किये है जिंदगीसे, उन्हे निभाना होगा मुझे…
रोज सोनेसे पहले मिलोंका फासला तय करना होगा मुझे,
रोज सोनेसे पहले मिलोंका फासला तय करना होगा मुझे...!

या कवितेची जन्मकथा थोडी रंजक असल्याने इथे सांगणे उचित ठरावे. रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी जून १९२२ मध्ये, 'न्यू हॅम्पशायर' या कवितासंग्रहासाठी, त्याच नावाची दीर्घ कविता रात्रभर जागून लिहून काढली. कविता संपत आली तेंव्हा उजाडू लागले होते आणि त्या पहाटवाऱ्यात सूर्योदयाचा आनंद घ्यायला घराबाहेर उभे असतांना पूर्णपणे मुक्त, ताणविरहित (तुरिया?) अवस्थेत रॉबर्टना ही कविता सुचली आणि जणू काही झपाटल्यासारखी त्यांनी ती एकहाती लिहून काढली. म्हणजे विल्यम वर्ड्स्वर्थ यांच्या कवितेच्या व्याख्येत चपखल बसणाऱ्या आणि कवीची उदात्त निर्मितीनंतरची उत्कट भावावस्था तंतोतंत मांडणाऱ्या या कवितेने इतिहास रचणे विधिलिखितच होते...!

रॉबर्ट फ्रॉस्ट हे अमेरिकेचे एक अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्याबरोबरच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूं यांचे अत्यंत आवडते कवी होते. पंडित नेहरूंच्या शेवटच्या काळात त्यांच्या पलंगाच्या बाजूच्या मेजावर रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे एक पुस्तक पडलेले असे आणि त्यातील या कवितेचे पान उघडे असे ज्यातील शेवटच्या चार ओळी त्यांनी अधोरेखित केलेल्या होत्या...

"...The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep..."

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

परिच्छेद...!


"...शाळेच्या त्या छोट्या जगातून बाहेरच्या मोठ्या जगात पाऊल टाकल्याला आता अकरा वर्षे झाली. पण अजूनही सर्वत्र मला विषमतेची तीच ओंगळ आणि भयंकर दृश्ये दिसत आहेत. बाजारात, देवळात, विद्यालयात, नाटकगृहात, प्रवासात, सभासंमेलनात, लग्नमंडपात, स्मशानभूमीत - कुठेही पाहा. जीवनाच्या या महारोगाने आपल्याला पुरे ग्रासून टाकले आहे, समाजपुरुषाचे शरीर त्याने विलक्षण विद्रूप आणि बधिर करून सोडले आहे, या शारीरिक विकृतीचा परिणाम त्याच्या आत्म्यावरही झाला आहे असेच दिसून येईल. डोळे मिटून भारतीय संस्कृतीचा जप करीत आणि आपल्या आध्यात्मिक वारशाची स्थानी-अस्थानी प्रौढी मिरवीत आपण गेली शेकडो वर्षे एका स्वप्नसृष्टीत वावरत आलो आहो. धर्म व व्यवहार, विचार व आचार, इच्छा व कृती यात उभारलेली राक्षसी भिंत धुळीला मिळविण्याकरिता करावी लागणारी प्रचंड धडपड आमच्यापैकी एखादाच थोर आत्मा क्वचित करतो. जमल्यास त्याचा आणि आणि ते साधले नाही तर त्याच्या शिकवणुकीचा मुडदा पडून आम्ही पुन्हा स्वप्नसृष्टीतल्या आपल्या मोठेपणात मश्गूल होऊन जातो. आम्हाला सर्वोदय हवा, आम्हाला रामराज्य हवे! 'सर्वे तु सुखिनः सन्तु' या मंत्राचा उद्घोष कानांवर पडला की, आमच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहतात! पण हे सारे शेख महंमदाचे मनोराज्य सत्यसृष्टीत उतरविण्याकरिता आर्थिक आणि सामाजिक समतेची जी बैठक तातडीने निर्माण व्हायला हवी, ती उभारण्याचे अवघड आणि कष्टप्रद काम करायला आम्ही तयार नाही. परंपरागत स्वार्थावर निखारे ठेवल्यावाचून समता या शब्दाला काही अर्थ नाही, जीवनविषयक दृष्टिकोनातली क्षुद्रता नाहीशी झाल्याशिवाय खरीखुरी सामाजिक क्रांती अवतार घेऊ शकणार नाही हे सनातन कटू सत्य आहे. पण आजच्या झटपट सुधारणेच्या काळात याचा विचार करायला मंत्र्यांपासून विचारवंतापर्यंत कुणालाच वेळ नाही. आजकालची आपली सारी धडपड सत्प्रवृत्त आहे असे मानले, तरी पायावाचून उभारलेल्या चित्रपटातल्या क्षणभंगुर लाकडी मंदिरावर सोन्याचा कळस चढविण्यापेक्षा तिची किंमत अधिक नाही. कळत-नकळत सामाजिक विषमतेचे खरेखुरे राक्षसी स्वरूप लपविण्याचीच अद्यापि आपण कोशीस करीत आहोत! कुणी तिला तत्वज्ञानाच्या सात पडद्यांआड  ठेवतो, कुणी तिला धार्मिक बुरखा पांघरायला  देतो, कुणी तिला पांडित्याच्या अलंकारांनी झाकून टाकतो. पण कुठलीही व्याधी - मग ती वैयक्तिक असो वा सामाजिक असो - लपवून कधीच बरी होत नाही! या दृष्टीने मी 'पूजास्थान' ही गोष्ट चाळू लागलो म्हणजे तिच्यात एकप्रकारचा दुबळेपणा मला आता जाणवतो! तिच्यातले सत्य अधिक तीव्रतेने, अधिक उग्रतेने आणि अधिक विशाल अशा पार्श्वभूमीवर चित्रित करण्याचा मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे..."       
वि. स. खांडेकर
११.५.४९

'गुणा: पूजास्थानं गुणिषु नच लिंग नच वय: I
इयत्ता पाचवीला संस्कृत शिकवितांना धडयात आलेल्या या वचनाने जन्म दिला 'पूजास्थान' या लघुकथेला आणि तिला 'अश्रू आणि हास्य' या संग्रहात सामील करतांना तिच्या जन्मकथेनिमित्त जे चिंतन झाले त्या प्रदीर्घ प्रस्तावनेतील; साऱ्या धोरणी धारणा, अद्भुतरम्य कल्पना आणि स्वप्नरंजित आभास - यांना छेद देणारा हा परिच्छेद! पंचाहत्तर वर्षात देश खूप पुढारला, प्रगती झाली, विकास झाला, ओबडधोबड जगण्याला मऊमुलायम आधुनिकतेचा स्पर्श झाला... सारे खरेच. पण बरोब्बर ७५ वर्षांपूर्वीच व्यक्त झालेल्या या चिंतनीय वास्तवाचे काय? वि. स. खांडेकर या लेखकाच्या माध्यमातून व्यक्त झालेला पण कुणाही विचारी, संवेदनशील आणि विवेकी माणसाचा असू शकणारा हा विषाद पंचाहत्तर वर्षात किती कमी झाला... की वाढला? आणि तसे असेल तर एक प्रगत समाज म्हणून आपणही ७५ वर्षांची ही गाथा अधिक विशाल पार्श्वभूमीवर नव्याने चितारायला नको...?

निदान प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? 

ये जो शहतीर है पलकों पे उठा लो यारो
अब कोई ऐसा तरीका भी निकालो यारो

दर्दे—दिल वक़्त पे पैग़ाम भी पहुँचाएगा
इस क़बूतर को ज़रा प्यार से पालो यारो

लोग हाथों में लिए बैठे हैं अपने पिंजरे
आज सैयाद को महफ़िल में बुला लो यारो

आज सीवन को उधेड़ो तो ज़रा देखेंगे
आज संदूक से वो ख़त तो निकालो यारो

रहनुमाओं की अदाओं पे फ़िदा है दुनिया
इस बहकती हुई दुनिया को सँभालो यारो

कैसे आकाश में सूराख़ हो नहीं सकता
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो

लोग कहते थे कि ये बात नहीं कहने की
तुमने कह दी है तो कहने की सज़ा लो यारो

- दुष्यंत कुमार

रविवार, २१ जानेवारी, २०२४

रामराया...!


रामजन्मभूमी राष्ट्रोत्सवाच्या निमित्ताने,

"कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत।
तेथें मी निवांत बैसेईन बैसेईन सुखरुप क्षणैक।
पाहिन विवेक राघवाचा स्वरुप राघवाचे अत्यंत कोमळ।
जेथें नाही मळ, माईकांचा माईकांचा मळ जाय तत्क्षणीं ।
रामदरुशणीं रामदास।"

या 'समर्थ' भावनेने, समर्थ रामदासांनी सकल जनहितार्थ 
प्रभू रामचंद्राला घातलेली ही आर्त साद...

कल्याण करी रामराया ।
जनहित विवरी ।।
तळमळ तळमळ होतची आहे ।
हे जन हाति धरी दयाळा ।।

अपराधी जन चुकतची गेले ।
तुझा तूचि सावरी दयाळा ।।
कठीण त्यावरी कठीण जाले ।
आतां न दिसे उरी दयाळा ।।

‘कोठे जावे काय करावे ।
आरंभिली बोहली दयाळा ।।’
दास म्हणे आम्ही केले पावलो ।
दयेसी नाहीं सरी दयाळा ।।

जय जय रघुवीर समर्थ 


शनिवार, ६ जानेवारी, २०२४

रहस्य...!


त्या दुकानदाराने आपल्या मुलाला जगाचे ज्ञान व्हावे म्हणून जगातल्या शहाण्या माणसाकडे पाठवले.

शहाणा म्हणजे ज्ञानी आणि ज्ञानी म्हणजे कुणी साधू-तपस्वी अशी अटकळ बांधून मुलगा त्याच्या शोधात निघाला.

वाळवंटातल्या ४० दिवसांच्या प्रवासानंतर मुलगा पोहोचला ती कुण्या साधूची कुटी नव्हती तर धनिकाचा प्रशस्त महाल होता. तिथे ध्यान-धारणा, मंत्र-जाप, पूजा-साधना असले काहीही चाललेले नव्हते तर खूप वर्दळ होती. लोक येत जात होते. सौदे ठरत होते, व्यवहार पार पडत होते. जगातल्या सर्वोत्तम खानपानाची रेलचेल होती. वातावरणात संगीत होते, सुगंध होता, उल्हास होता. शहाणा (आणि श्रीमंत) माणूस साऱ्यांशी आपुलकीने बोलत होता, हवे-नको बघत होता.

मुलाकडे लक्ष जाण्यास त्याला जवळपास दोन तास लागले. मुलाचा येण्याचा उद्देश त्याने समजून घेतला पण त्याला जे हवे होते ते, 'सुखाचे रहस्य' समजावून सांगण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता म्हणून त्याने मुलाला त्याचे घर पाहून दोन तासाने परत भेटू असे सुचवले. मुलाला फक्त एकच गोष्ट करायची होती, यजमानाने दिलेला चमचा आणि त्यातले तेलाचे दोन थेंब पूर्ण वेळ सांभाळत घर पहायचे होते.

मुलाने महालाचे संगमरवरी खांबांनी सजलेले रुंद वऱ्हांडे, मखमली पायघड्या घातलेले उंच जिने, फुलांच्या ताटव्यांनी सजलेले गवाक्ष, भरजरी रेशमी पडद्यांनी नटलेले नक्षिकाम केलेले भव्य दरवाजे खिडक्या या साऱ्यांच्या साक्षीने घराचा दौरा पूर्ण केला - सारे लक्ष हातातील चमच्यावर लक्ष केंद्रित करून दोन तासांनी शहाण्या माणसाकडे परतला!

शहाणा माणूस म्हणाला, 'मग, कसे वाटले माझ्या शयनगृहातील गालिचे, मुदपाकखान्यातील लाकडी कारागिरी, वाचनालयातील पुस्तके आणि कल्पकतेने सजवलेल्या भिंती, माळीबुवांनी १० वर्षांच्या अथक मेहनतीने फुलवलेला आणि निगुतीने राखलेला बगीचा आणि त्यातील थुई थुई नाचणारे कारंजे...?'

मुलगा फारच शरमला आणि वरमून म्हणाला, 'माझे सारे लक्ष चमच्यातील तेलाकडे असल्याने मी यातील काहीही बघू शकलो नाही, त्याचा सुखद अनुभव घेऊ शकलो नाही, मला माफ करा...!'

'मग पुन्हा एकदा जा आणि मी जगभरातून जमविलेल्या साऱ्या किमती, कलात्मक आणि सुंदर गोष्टींचा आनंद घेऊन पुन्हा मला भेट. ज्या माणसावर विश्वास ठेवायचा त्याचे घर नीट निरखून बघायलाच हवे, नाही का...?'

मुलाने समाधानाने पुन्हा चमचा उचलला आणि या वेळी साऱ्या गोष्टी नीट बघून, त्यांच्या सौंदर्याचे आस्वादन करीत घराचा फेरा पूर्ण केला आणि अतिशय सुखावत सुस्मित चेहऱ्याने शहाण्या माणसास सामोरा गेला.

'... पण चमच्यातले तेल कुठेयं...?' शहाण्या माणसाने मुलाच्या हाताकडे बघत विचारले. मुलाचे तिकडे लक्ष जाताच त्याचा आनंदाने फुललेला चेहरा क्षणार्धात खर्र्कन उतरला...

'असं बघ मुला, मी तुला एवढाच सल्ला देऊ शकतो..', शहाणा माणूस अत्यंय शहाणिवेने म्हणाला, 'तू शोधतोयस त्या सुखाचे रहस्य एवढेच आहे की जगातील साऱ्या चांगल्या, हव्याशा गोष्टींचा मनसोक्त उपभोग घ्या, रसास्वादन करा पण ते करताना हातातल्या चमच्यातील तेलाचे दोन थेंब कधीही विसरू नका, नजरेआड होऊ देऊ नका...!'

---------------------------------

पावलो कोएलो यांच्या 'दि अल्केमिस्ट' या अप्रतिम पुस्तकातील ही अत्यंत बोधप्रद गोष्ट आज नव्याने आठवण्याचे कारण म्हणजे नव्या वर्षाचा संकल्प नव्हे. असे काही संकल्प करायचे नाही असा संकल्प सोडण्याइतकी शहाणीव आम्हाला अल्केमिस्टच्या आधीच आली होती. तेव्हा तसे काही प्रयोजन नाही.

फक्त गेल्या वर्षाचा अखेरचा काळ खूपच घडामोडींचा, धावत्या का होईना गाठीभेटींचा आणि...
"कभी पास बैठो तो कहूं दर्द क्या है,
अब यूँ दूर से पूछोगे तो खैरियत ही कहेंगे..!"
याचा एहसास होण्याचा,
असा संमिश्र भावनांचा ठरला म्हणून पुन्हा एकदा 'पावलो'ची आठवण बाकी काही नाही... 

तेव्हां, मी माझ्या जीवनशैलीत सकृतदर्शनी कुठलेही बदल केलेले नसल्याने पण विचारशैली अधिक मुक्त, प्रवाही आणि चिंतनशील करण्याच्या धोरणामुळे बौद्धिकांसाठी, बुद्धिप्रामाण्यवादासाठी कायमच उपलब्ध आहे, राहीन...!

ताल्लुकात बढ़ाने हैं तो कुछ,
आदतें बुरी भी सीख ले गालिब,
कोई ऐब न हो तो लोग,
महफ़िलों में नहीं बुलाते...!

बस इतना ही...