रविवार, २६ जुलै, २०२०

उपसंहार...!



गेल्या चार महिन्यापासून कोरोना विषाणूच्या सावटाखाली, एकामागे एक ५ लॉकडाऊन भोगलेल्या पुणेकरांना उद्यापासून थोडा दिलासा मिळणार असला तरी, कोरोनाचे काय करायचे?’ या त्रिलोक व्यापून दशांगुळे शेष तात्कालिक प्रश्नासह, त्याच्याच अनुषंगाने काही मुलभूत प्रश्नांचा आढावा घेणे गरजेचे ठरते. या विषाणूशी लढण्यासाठी अनेक शासकीय व्यवस्था, स्वयंसेवी संस्था आणि अनेकानेक अनामिक करोना योद्धे अहोरात्र प्राणाची बाजी लावून लढत असले तरी, या विषाणूच्या अनिर्बंध फैलावाने अनेक घटनात्मक व्यवस्थांच्या आणि लोकाभिमुख संस्थापानांच्या मर्यादा उघड झाल्या’, हे सत्यही नाकारता येत नाही.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदाबरहुकुम स्वत:ला ‘अहर्निशं सेवामहे’ उपलब्ध करून देणारे पोलीस दल आणि स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अखंडित आरोग्यसेवा देणारे वैद्यक, परिचारिका व त्यांचे सहाय्यक यांच्या निरपेक्ष कार्याला सलाम करून, त्यांना या परिस्थितीत ढकलणाऱ्या व्यवस्थेचे आणि त्यामागील कार्यकारण भावाचे विश्लेषण करणे आवश्यक वाटते. या विषयाच्या खोलात जातांना जागतिक अर्थकारण, भौगोलिक राजकारण, नवमूल्यव्यवस्थाधीन बाजारपेठ आणखीन भ्रामक विकासाचे घातसूत्र असे अनेक आयाम असले तरी त्या साऱ्याचा प्रस्तुत प्रकटनात अंतर्भाव न करता, व्यक्ती – समष्टी – सृष्टी यांचा मनुष्यधर्माच्या परिप्रेक्ष्यातून उहापोह करू या.

स्वत:च्या उत्कर्षासाठी, सोयीसाठी आणि सुरक्षित, आरामदायी जगण्यासाठीची धडपड अनुचित नसली तरी अशी अभिलाषा ही व्यक्तीनिष्ठ आणि परिणामी संकुचित असते. अशा स्वार्थी धडपडीने इतर कुणाचे दमन किंवा प्रसंगी नुकसानही होऊ शकते आणि या ‘इतर’मध्ये समस्त सृष्टीमधील कुणीही, अगदी ‘पर्यावरण’ही असू शकते. स्वत:च्या विलासी वास्तव्यासाठी कुणा धनिकाने बहुमजली प्रासाद बांधणे आणि समाजधनातून, सामुहिक श्रमदानातून गाडगेबाबांनी गावोगावी धर्मशाळा बांधणे यांचा तौलनिक अभ्यास केला तर हा मुद्दा सूर्यप्रकाशाइतका लख्ख समजू शकतो. अलीकडच्या कळीच्या शब्दांच्या अर्थात ‘कीवर्ड्स’च्या काळात ज्याला ‘कॉमन गुड’ म्हणतात त्याला आपल्या संस्कृतीमधील ‘वैश्विक कल्याण’ आणि त्यासाठी योग्य जीवनमूल्यांची जोपासना ही शिकवण चिरंतन आहे.

व्यक्तीनिर्माणाआधी (किंवा शिवाय) समाजधारणा अथवा राष्ट्रनिर्माण म्हणजे हलक्या प्रतीच्या तांदळाची बिरबलाची खिचडी शिजत का नाही म्हणून चिंतीत होण्यासारखे आहे. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार या न्यायाने, व्यक्तीतच न रुजलेली जीवनमूल्ये समाजात कुठून येणार आणि असा मूल्यहीन (पण मौल्यवान?) समाज मनुष्यधर्माची जोपासना करून वैश्विक कल्याण साधण्यासाठी सृष्टीशी त्याची जन्मजात बांधिलकी कशी जपणार हा मूळ प्रश्न आहे. ‘समूहप्रिय’ असलेल्या माणसाने आपल्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी ‘समाज’ नावाची व्यवस्था तयार केली आणि तिच्या धारणेसाठी काही नियम, कायदेकानून तयार केले असे मानले तर समस्त मनुष्यप्राण्यांचे काही समान हक्क मान्य करायला हवे. सामाजिक सुरक्षिततेच्या निकषांमध्ये केवळ दोनच मुलभूत गोष्टींचा समावेश करायचा ठरवला तरी, निरामय स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी निदान प्राथमिक आरोग्यसेवा आणि, सर्वांना समान संधी मिळावी म्हणून किमान शिक्षणसुविधा यांना अग्रक्रम मिळायलाच हवा.

प्राप्त परिस्थितीत नेमक्या याच दोन आघाड्यांवर आपण केवळ चीतपट झालेलोच नाही तर अगदीच भांबावलेलो आहोत हे त्या विषयीच्या रोजच्या बदलत्या निर्णयांमागील धरसोड वृत्तीने स्पष्ट दिसून येते. असे होण्याचे कारण हे दोन फसलेल्या नीतींचे फलित असावे काय? संकुचित लघुदृष्टी तात्कालिक योजनांमध्ये सर्वसमावेशक सर्वकालिक दूरदृष्टीच्या अभावामुळे भविष्यवेधी नियोजनातील निर्णायक त्रुटी आणि ‘शिक्षण’ या संकल्पनेच्या मुळातच अत्यंत चुकीच्या धारणेमुळे सपशेल फसलेले शिक्षणविषयक धोरण आणि त्याची तेवढीच निर्बुद्ध विध्वंसक कार्यवाही!

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणि स्मार्ट उपकरणांच्या काळात माणसे देखील स्मार्ट व्हायला हवी असतील तर शिक्षणाचा मूळ उद्देश हा स्मार्ट होणे एवढाच असायला हवा आणि स्मार्ट असण्याचे केवळ तीन निकष पुरेसे ठरावे –

१. प्रश्न पाडणारी जिज्ञासा आणि पडलेले प्रश्न विचारण्याचे, त्यांची समर्पक उत्तरे शोधण्याचे स्वातंत्र्य,
२. सुचलेल्या उत्तरांवर, कल्पनांवर कृती करण्याची धडाडी आणि अशा कृती आराखड्यांना पोषक वातावरण,
३. आपल्या कृतीच्या समग्र परिणामांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची सामाजिक बांधिलकी.

अशा प्रकारच्या तत्वनिष्ठ शिक्षणप्रणालीतून तयार झालेले युवक कुठल्याही क्षेत्रात गेले तरी स्वार्थापूर्वी (किंवा किमान स्वार्थाबरोबर तरी) समाजस्वास्थ्याचा म्हणजेच ‘यष्टी’ बरोबर ‘समष्टी’चाही विचार करतील आणि सृष्टीचे संवर्धन ओघानेच होईल. अशा तरुणांचे नियोजन हे अगदी परिपूर्ण (परफेक्ट) नसले तरी सर्वसमावेशक आणि भविष्यवेधी नक्कीच असेल. मग भले यासाठी आपल्याला एका संपूर्ण पिढीच्या परिवर्तनाची प्रतीक्षा करावी लागली तरी हरकत नाही!

आणि हो जाता जाता... कोरोनावर औषध सापडेपर्यंत, उपलब्ध साऱ्या संभाव्य उपायांचा भडिमार करण्यापेक्षा, केवळ एकच गोष्ट आपल्या हातात आहे – आपली प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) वाढवणे आणि हे करण्यासाठी ज्यांनी शरीर-बुद्धी-चित्त यांना सुदृढ राखण्यासाठी कायम किमान योगसाधना केली आहे, करीत आहेत त्यांना निश्चितच धोका कमी, खरतर नगण्य आहे. तद्वतच शिक्षण, प्रशिक्षण, शिबिरे, कार्यशाळा या ‘केजी ते पिजी’च्या माध्यमातून आपण मुलांवर, युवकांवर अक्षरश: हजारो प्रकारच्या ‘ज्याला स्कोप आहे’ अशा विषय-कौशल्यांचा भडीमार करत असतो. त्या सगळ्या ऐवजी एकच अत्यंत मुलभूत कौशल्य मुलांनी वृत्तीत बाणवले तर त्यांना आयुष्यात कधीच कशाचीही उणीव भासणार नाही... ते कौशल्य म्हणजे शिकायला शिकणे (लर्निंग टू लर्न!) आजच्या तथाकथित ‘शिक्षणा’चा सारा भर हा लर्निंग (शिकणे) सोडून ‘अर्निंग’ (कमावण्यावर) आहे आणि तो मुख्यत्वे बदलेली जीवनमूल्ये, अनाठायी आदर्श आणि अत्यंत आत्मकेंद्री विचार याचा परिपाक आहे.

‘मी म्हणजे व्यक्ती हा समष्टीचा अर्थात (मानव) समूहाचा भाग आहे आणि समष्टीचा सृष्टीशी अन्योन्य संबंध असल्याने माझ्या प्रत्येक विचार-विकार आणि कृती-रीतीचा एक तदनुषंगिक सर्वव्यापी परिणाम होत असतो आणि तो ‘पूर्णात्पूर्णमुदच्यते’ न्यायाने माझ्यापासून सुरु होऊन माझ्यातच विलय पावतो आणि तरीही शिल्लक राहतो...’ ही शिकवण मानवधर्माचे मूलतत्व आहे, ते समजून घेऊन धारण करणे यात विश्वकल्याण आहे हेच अंतीम सत्य!

शुभम भवतु!

बुधवार, १ जुलै, २०२०

टाहो...!


ना नाचल्या
दिंडी पताका 
टाळ-मृदूंगाचा
स्वरही मुका,
रिंगण न धरी
फेरा म्हणून
ज्ञाना विव्हल,
उदास तुका...!

विठ्ठल नामाचा रे टाहो...!