रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

गाभारा...!


(स)माजमाध्यमाने चांगलीच सोय करून दिल्याने स्वतः:ला लेखक अथवा त्याहून सुलभ म्हणजे कवी समजणाऱ्यांचे अक्षरश: पेव फुटलेले असतांना भाषेच्या भवितव्याबद्दल एवढी तळमळ, कळकळ आणखीन हळहळ व्यक्त करणारे मान्यवर व्यवहार कुठल्या भाषेतून करतात याचा धांडोळा घेतल्यास बरेच जावईशोध लागल्यामुळे भोवळ आल्याशिवाय राहणार नाही.

वरील प्रकटनातील भाषाविशिष्ट स्वर-व्यंजन,  उपरोध आणि त्यांच्या उपयोजनाचे प्रयोजन अर्ध्या जरी प्रस्तुत भाषाभिमान्यांस समजले, उमजले तरी, अमृताशी पैजा जिंकणाऱ्या माऊलींच्या आणि छत्रपतींच्या प्राकृत भाषेचे प्राक्तन बदलल्याशिवाय राहणार नाही आणि 'अभिजातते'च्या नावाने गळे काढण्याची कदापि गरज पडणार नाही.

याबाबतीत अल्लामा इकबाल यांचा 'खुदीको कर बुलंद इतना...' सल्ला शिरोधार्य मानायलाच हवा. वापर नसलेल्या गोष्टी कालौघात नामशेष होतात हे सांगायला आजच्या ब्ल्यू टूथ आणि ओटीपीच्या काळात डार्विनची गरज नसावी. वापर हा सवयीतून येतो आणि सवय संस्कारातून येते. संस्कारासाठी अध्ययन, चिंतन, मनन, प्रकटन यांचा परिपाठ असावा लागतो. अन्यथा, तथाकथित भाषाभिमान्यांचे अरुण्यरुदन हे आज महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय शिमग्याइतकेच निंदनीय तथा शोचनीय ठरल्यास नवल नाही.  असो!

'शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस...'

असा वस्तुनिष्ठ सल्ला देणाऱ्या आत्मनिष्ठ, समाजनिष्ठ जाणिवांचा धनी आणि शब्दरत्नाकराचा महामेरू, वि. वा. उर्फ तात्याराव शिरवाडकर अर्थात महाराष्ट्राचे वैभव कुसुमाग्रज यांचा आज ११० वा जन्मदिवस. या निमित्ताचे औचित्य साधून हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करणे अभिमानास्पदच पण केवळ सोहळ्यांच्या परंपरेने संस्कृती विकास पावत नसते, त्यासाठी काही तत्वांचा, मूल्यांचा, संस्कारांचा वसा घ्यावा लागतो. कथनी आणि करणी मधला फरक राजकारण्यांना शोभत असला तरी रयतेने तरी त्या वाटेने जाऊ नये. अन्यथा 'यथा राजा तथा प्रजा' या न्यायाने समाजात दांभिकता बोकाळण्यास वेळ लागत नाही. 

आजच्या निमित्ताने, ज्यांच्या नावाने हा जयघोष चालला आहे त्या कुसुमाग्रजांनी समाजव्यवस्थेतील  दोषांवर आणि दांभिकतेवर कोरडे ओढण्याची एकही संधी कधी हातची जाऊ दिली नाही. त्यासाठी त्यांच्या अखेर कमाईस्वातंत्र्यदेवीची विनवणीसहानभूतीसिंहस्थ या कविता जरूर वाचाव्या मात्र आजच्या परिस्थितीला अगदीच समर्पक असणारी कुसुमाग्रजांची ही कविता... सामाजिक-राजकीय उद्बोधनासाठी.

गाभारा

दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाहीगाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्‍यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.
- कुसुमाग्रज

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

तेजोनिधी..!


डॉक्टर सचिन चिंगरे ! जुन्या शाळूसोबत्याची प्रौढपणी, कळत्या(?) वयात नव्याने झालेली हीच खरी ओळख. सचिन आणि मी इयत्ता दहावीपर्यंत एकाच वर्गात शिकलो असलो तरी शाळेतला सचिन मला फारसा आठवत नाही. आम्हा लिंबूटिंबू मुलांच्या मानाने किंचित मोठा दिसणारा आणि पौरुषाच्या खुणा पौगंडावस्थेपासून बाळगणारा सचिन माझ्या मैत्र परिघात (आजच्या भाषेत रेंजमध्ये!) असणे शक्यच नव्हते आणि त्यामुळे आमच्या बालमैत्रीचे योग नसल्याने त्याचे त्या वयातले अनेक भोग टळले ! (शंका असल्यास जाणकारांस विचारा !) पण राशीला असलेले ग्रह सहसा पिच्छा सोडत नाहीत तद्वत मी त्याच्या राशीला बसणे हे त्याचे भागधेयच होते आणि माझे पुरुषस्य भाग्यमं !

अत्यंत व्यावहारिक (व्यावसाईक म्हणणे सिर्फ बेवकुफीही नहीं, बे(ई)मानी होगी ! आठवा: ‘नाजायज प्रिस्क्रिप्शन’!) कारणाने सुमारे ३० वर्षांच्या खंडानंतर आम्ही सन्मित्र दिनेशच्या सदिच्छेने भेटलो त्याला आज सुमारे ७ वर्षे लोटली. माझ्या नेहमीच हुळहुळणाऱ्या हृदयाच्या निमित्ताने २०१५ च्या दिवाळीत मी सचिनला खऱ्या अर्थाने ‘भेटलो’ आणि आजवर केवळ ऐकलेले आणि सहसा पहिल्याच भेटीत जवळपास अशक्य असणारे ‘हृदया हृदय येक जाले। ये हृदयीचे ते हृदयी घातले। द्वैत न मोडता केले। आपणा ऐसे अर्जुना।’ अनुभवले... तंतोतंत! असे होण्यामागे – सौख्य, आनंद आणि उन्मेष बहुरंगी, बहुढंगी असले तरी सद्भाव, आर्त आणि विवेक एकरंगी असतात (मोनोटोनोस का म्हणानात) – हे एक कारण असावे का ? ते काहीही असले तरी चिंगरेंच्या सौख्यपंचकाला भेटल्यावर लगोलग मला जे सुचले ते असे...   

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५
सर्वव्याधिप्रमोचकं I
परिस्थितीची सम्यक जाण
सहजीवनाचा निकोप वसा
बहुतांच्या स्वास्थ्यावर दोघे
सोडत जाती निरामय ठसा…!

वैद्यकव्यवसायाप्रती माझ्या अस्वस्थ जाणिवांमध्ये वैद्यकशास्त्रायोगे मुलभूत परिवर्तनास कारणीभूत ठरलेल्या धुळ्याच्या डॉ. सचिन व डॉ. सौख्या चिंगरे (नावात अर्थाबरोबरच सौ. देखील अनुस्यूत असणे किती विलक्षण!) या सुविद्य वैद्यक दंपतीस सस्नेह. माझ्या शतायुषाच्या संकल्पास दृढ करणारा सचिन आपला वर्गमित्र आहे याचा अवर्णनीय आनंद आणि सार्थ अभिमान येथे प्रकट करणे प्रस्तुत ठरावे. शुभम भवतु…I

येथून सुरू झालेला प्रवास कवितेच्या माध्यमातून नित्य नवी वळणे घेत काव्य-शास्त्र-विनोदाच्या मार्गाने मैत्र जुळवून गेला आणि फोनवर तासंतास बोलणाऱ्या माझ्या मित्रमंडळात आणखी एक मूल्यवर्धक भर पडली. आम्हाला चर्चेसाठी कुठलाही विषय वर्ज्य नसल्याने, स्कुल ऑफ थॉट भिन्न असल्या तरी मानवी आयुष्याच्या मूलभूत धारणा आणि कवीमनाला शाप असणाऱ्या संवेदनशील जाणिवा समांतर असल्याने आमच्या सहवेदना एकरूप होत राहिल्या... राहतील !

आज डॉक्टरला वाढदिवसाच्या निमित्ताने काही काव्यात्म शुभेच्छा द्याव्या अशी उर्मी खूप होती पण सूर्याला  काजवे दाखविण्यात काय हशील या विचाराने आणि 'कविता विचारप्रधान की भावनेचे प्रकटन...?' या आमच्या दिनाच्या घरी रंगलेल्या चर्चेत भावनाविवशतेला माझा कौल मिळाल्याने मला डॉक्टरबद्दल उचंबळून आलेल्या साऱ्याच भावना आज, आत्ता ताबडतोब व्यक्त करायला जमेल असे नाही... त्यासाठी लागणारी प्रतिभा काही वेगळीच असते !

तेव्हा 'गेले द्यायचे राहूनी...' ही खंत उराशी बाळगून, या पोस्टचे शीर्षक सार्थ ठरवणारा, डॉक्टरने मला दिलेला  मित्रत्वाचा प्रेमळ सल्ला... 


इत्यादीवर डॉक्टरचे इत्यादी     

अभिजातता...!'मी सावरकर'

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

संस्कार...!


काल आमच्या विवाहसंस्काराला २५ वर्षे पूर्ण झाली, सिल्व्हर ज्युबिली अर्थात रौप्य महोत्सव का म्हणानात ! तब्बल २५ वर्षे म्हणजे दोन तपांहून अधिक काळ... दोघांच्या तपश्चर्येची दोन आवर्तने झाली की... बघता बघता ! आणि या सहप्रवासात जगाला दाखवण्यासारखी लौकिक जमापुंजी फारशी नसली तरी मर्मबंधात जपण्यासारखी उपलब्धी अक्षरश: अगणित ठरावी. मात्र आम्हाला अभिमान आणि समाधान वाटावे अशी दृष्य प्राप्ती म्हणजे आमचे कन्यारत्न - मैत्रेयी ! 

डोळ्यांचे ऑपरेशन झालेले असतांना, डोळ्यांवर काळा गॉगल चढवून मुलीने आमच्या मैरेजच्या ट्वेन्टी फिफ्थ एनिवर्सरीचा जो नेत्रदीपक सोहळा ऑर्गनाईज केला तो अगदीच संस्मरणीय झाला - एकदम एपिक, यु नो ! व्हेन्यूच्या निवडीपासून मेन्यूच्या संयोजनातील केवळ टेस्टच नाही तर विवेक-विचारही आम्हाला स्पर्शून गेला. त्यातून, आमच्या २५ वर्षांच्या सहप्रवासाच्या क्षणचित्रांचे कोलाज, त्याला रोमँटिक फील देणारी सजावट आणि गुलाबपाकळ्यांच्या वृष्टीपासून, २५ दिव्यांचे औक्षण आणि २५चा फ्रूटकेक असा दोन्ही संस्कृतींचा संगम केवळ समर्पकच नाही तर आत्यंतिक मनोहारी ठरला. या सर्व संयोजनात तिला तिचे दोघे भाऊ आणि दोन्ही मावशांची मोलाची साथ लाभली.

२८ वर्षांपूर्वी आईपपांच्या लग्नाला २५ वर्षे झाली तेव्हा, धुळ्याच्या घरातच आमच्या वकुबानुसार आम्ही एक छोटेखानी रौप्य महोत्सव साजरा केला होता. काल मुलीने असाच कार्यक्रम अतिशय कलात्मक आणि आधुनिक पद्धतीने साजरा केल्याने एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे अतीव समाधान तर आहेच शिवाय यथोचित संस्कार संक्रमित झाल्याचा मन:पूर्वक आंनद !

असाच सुवर्ण, अमृत आणि हिरक महोत्सवही साजरा करण्याचे बळ आणि संधी मिळो हीच प्रार्थना ! 

शुभम भवतु !

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

पंचविशी...!


त्याला उपयोगितेचे महत्वच उमजले नाही कधी
वस्तू-व्यक्ती, भावना-कल्पना यांना 'वापरता' येते
इतके साधे-सोपे सोईस्कर 'सत्य' गमलेच नाही त्याला
'अर्थ' आणि 'कारण' दोघांना पारखाच होता तो नेहमी
करायचा निरुपयोगी उद्योग, निर्हेतुक निर्ममपणाने...
म्हणायचा वेळ फार जातो 'उत्पादक' काम करण्यात
होणार नव्हतेच त्याचे काही, नाहीच झाले या मर्त्य जगात !

पण चित्रगुप्ताच्या गफलतीने पोहचला कर्मचाऱ्यांच्या स्वर्गात,
जिथे ज्याला बघावे तो व्यस्त, 'उपयोगी' कामात सतत व्यग्र.
हा हिंडायचा, कायम गडबडीत असणाऱ्या गर्दीचे धक्के खात
किंवा पहुडायचा हिरव्यागर्द माळरानावर निळ्याशार आकाशाखाली
प्राणी-पक्ष्यांच्या जोडीने निसर्गाच्या नाद-रस-रंग-गंधाची किमया अनुभवत 
उमटायच्या त्या जाणीवा चित्र-शिल्प-शब्द-सुरांतून... अभिनिवेशाशिवाय !

ओढ्यावरून पाणी भरायच्या कामात गर्क तिने पाहिले एकदा याला
कर्मचाऱ्यांच्या स्वर्गात एवढा रिकामटेकडा बघून अचंबा वाटला तिला
म्हणाली काम देऊ तुला, माझा एक हंडा देऊ पाणी भरून आणायला?
हा म्हणाला, हंडा दे पण असे उत्पादक उद्योग करायला वेळ नाही मला...
हंडा घेतला आणि उभा-आडवा रंगवून दिला निरर्थक रंग-रेषांनी...
तिला कळेचना याचे काय करावे... पण काहीतरी नवीन जाणीव जागी झाली

यथावकाश त्याने तिचे इतस्ततः उडणारे केस बांधायला रंगीबेरंगी रिबीनी बनवल्या
त्या रिबिनींनी केस बांधून स्वतःला निरखण्यात तिचा कामाचा वेळ वाया जाऊ लागला
केवळ तीच नाही तर आणखीनही काही लोक याच्या नादी लागून कलाकृती करू लागले
आता मात्र धुरिणांना आपल्या स्वर्गात हे निरर्थक लोण पसरणे धोक्याचे वाटू लागले आणि...
त्यांनी याला कर्मचाऱ्यांच्या स्वर्गातून हाकलून लावण्याचे ठरवले, एवढ्यात चित्रगुप्त प्रकटला!

म्हणाला याला चुकूनच इकडे आणले होते, योग्य ठिकाणी नेऊन सोडतो, काळजी नसावी.
त्याला खूपच बरे वाटले, सुटका झाल्यासारखे... इथे कुणाला कशासाठी वेळच नाही म्हणे !
तो निघाला तर... आजवर कधीही ऐकले, बघितले तर काय कल्पिले देखील नाही
असे अघटित त्या दिवशी त्या कर्मचाऱ्यांच्या स्वर्गाने बघितले.
ती चक्क त्याच्या सोबत निघाली, तो जाईल तिथे जायला... 
आणि आणखीनही काही निघाले.
कर्मचाऱ्यांच्या स्वर्गातल्या समस्त ज्येष्ठ-श्रेष्ठ अनुभवी विद्वानांना
त्यांच्या त्या निरुपयोगी निर्णयाचा न हेतू समजला न अर्थ... कधीही !

-----------------------------------------------------------------------------------------

असो, आज ही कथा आठवण्याचे कारण म्हणजे तिने तो निरर्थक, निरुपयोगी, निर्हेतुक निर्णय घेतला त्याला आज २५ वर्षे झाली... बाकी काही नाही ! 

...आणि, पन्नाशीनिमित्त माझ्या अकर्माचे डॉक्टरांनी केलेले मार्मिक निरूपण हे या रूपकाची प्रेरणा असल्याने, त्यांचे मन:पूर्वक आभार !