बुधवार, २२ मार्च, २०२३

'गुढी उभारनी'


दोन वर्षांपूर्वीच्या
'कानूस...?' या बहिणाबाईंच्या बोलगीतांवरील पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे, कुठल्याही प्रकारचे प्रमाणीत डॉक्युमेंटेशन उपलब्ध नसल्याने, तुक्याची गाथा जशी लोकगंगेने तारली तशा बहिणाबाईंच्या रचना खान्देशाने आपल्या श्रुती-स्मृतींमध्ये जिवंत ठेवल्याने त्यांच्याबद्दल खात्रीने काही दावा करता येणे अवघड असले तरी त्यातील अस्सल माणूसपण आणि समृद्ध जाणिवां या निश्चित वैश्विक असल्याने त्यांच्या अभिजाततेबद्दल दुमत नसावे.

आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने बहिणाबाईंची, शुभेच्छांसोबत दरडावणारी आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही रचना, आजच्या - जाणिवा बोथट आणि भलत्याच संवेदना नको तेवढ्या टोकदार झालेल्या - काळात करण्याचे धारिष्ट्य कुणी करेलसे वाटत नाही. शिवाय, आपल्याच पोटच्या अपत्यांना, पाल्यांना देखील ओरडायची चोरी असणाऱ्या अधुनिक जीवनशैलीत, थेट समाजालाच चार गोष्टी ऐकवण्यासाठी (नीतिमत्ता, नैतिक अधिकार असली थेरं कालबाह्य झाल्याने) जी 'पुण्याई' लागते ती कमावलेला 'ऐसा कौन माईका लाल होगा...?'

तेव्हा आपल्याच भावना बहिणाबाईंनी १०० वर्षांपूर्वी व्यक्त केल्यात असे मानून म्हणू या...

आरंभ होई चैत्रमासीचा
गुढ्या-तोरणे सण उत्साहाचा

गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी

गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा

अरे, उठा झाडा आंग
गुढीपाडव्याचा सन
आतां आंगन झाडूनी
गेली राधी महारीन

कसे पडले घोरत
असे निस्सयेलावानी
हां हां म्हनतां गेला रे
रामपहार निंघूनी

आतां पोथारा हे घर
सुधारा रे पडझडी
करीसन सारवन
दारीं उभारा रे गुढी

चैत्राच्या या उन्हामधीं
जीव व्हये कासाईस
रामनाम घ्या रे आतां
रामनवमीचा दीस

पडी जातो तो 'पाडवा'
करा माझी सुधारनी
आतां गुढीपाडव्याले
म्हना 'गुढी उभारनी'

काय लोकाचीबी तर्‍हा
कसे भांग घोटा पेल्हे
उभा जमीनीच्या मधीं
आड म्हनती उभ्याले

आस म्हनूं नही कधीं
जसं उभ्याले आडवा
गुढी उभारतो त्याले
कसं म्हनती पाडवा ?

~ बहिणाबाई चौधरी

सोमवार, २० मार्च, २०२३

चिवचिवाट...?

चित्र: वैभव पुराणिक, नासिक 

चार वर्षांपूर्वी आजच्या जागतिक चिमणी दिवशी लिहिलेल्या 'चिऊताई...!' या पोस्टची आठवण झाली ती सन्मित्र शामने चिमण्यांची ठवण करून दिलेल्या इंद्रजित भालेराव यांच्या या हृद्य कवितेने...

बाप म्हणायचा काढलेली नखं
दारात कधीच नयेत टाकू
दाणे समजून खातात चिमण्या
आणि मरतात आतडी फाटू फाटू

सुगी संपली की बाप
देवळात नेऊन कणसं बांधायचा
सुगीत हाकललेल्या चिमण्यांसाठी
पाण्याचं मडकं बांधून पुण्य सांधायचा

पाखरं असल्या तरी ओळखायच्या
बापाच्या मनीचा भाव
तेव्हा सुगी संपली तरीही
चिमण्या सोडीत नसायच्या गाव 

अंगणातले दाणे टिपायला आता चिमण्या येत नाहीत कारण (प्र)गतीशील माणसाला ना अंगण उरलं ना त्यात बागडणाऱ्या चिमण्या. अलिकडे बाळाला घास भरवायला, जोजवायाला चिऊ-काऊची गरजच उरली नाही, मोबाईलवर क्लिक केलं की हव्या तेवढ्या चिमण्या आणि हवा तेवढा चिवचिवाट... असा आभासी संस्कार पिढी घडवेल...?

आजच्या 'मटा गोल्ड'मध्ये खुद्द चिमणीनेच 'काय चाल्लंय काय...' हा माणसाला पत्रातून विचारलेला प्रश्न ऐकून थोडतरी अंतर्मुख व्हायला होत का बघा...!

रविवार, १९ मार्च, २०२३

अप्रूप…!


माणूस संपर्कात येतो. व्यावहारिक कारणांनी परिचय होतो.
काही सामाईक गोष्टींनी ओळख वाढते. हळूहळू स्नेह जुळतो.
मग कधीतरी कुठल्यातरी विशिष्ट आवडीचे धागे जुळतात.
ती आवड अभिव्यक्तीशी निगडित असेल तर गुंतणे सुखावह वाटते.
आणि अभिव्यक्ती काव्यरूप असेल तर त्या नात्याचे वेगळेच अप्रूप…!

वय वाढत जाते तशी संवेदनशीलता वाढणे, मन हुळहुळे होणे, जाणीवा अलवार होणे स्वाभाविकच. पण वाढत्या वयात मनोव्यापारांच्या अभिव्यक्तीचे साधन नित्य जोपासणे सहजसाध्य नव्हे.
कारण उमेद, उन्मेष, उत्साह, ऊर्जा… सहसा तरुणाईशी संदर्भित अशी ही लक्षणे.
ज्येष्ठांच्या ठायी ती आढळली की वाटते ते अप्रूप…!

स्वतःच्या पंचाहत्तरीला स्वरचित ९५ कवितांचे सचित्र पुस्तक, अत्यंत कल्पक तथा समर्पक नामकरणासह, केवळ खाजगी वितरणासाठी प्रकाशित करून स्नेह्यांना ते कॅनव्हासच्या लिफाफ्यात कुरियरने धाडण्याची कल्पना केवळ कवीमनालाच सुचू शकते.
यासाठी लागणारी चिकाटी, शिस्तप्रियता, नियोजन कौशल्य आणि संयम हे अप्रूप…!

अशा आनंदयात्रीच्या स्नेह्यांच्या यादीत आपली वर्णी लागणे, एव्हढेच नव्हे तर, प्रस्तावना लिहिण्याच्या प्रस्तावाला, आपला वकूब आणि मर्यादा ओळखून दिलेल्या सविनय नकाराची व्यथा देखील एका कवितेतून व्यक्त करून, मनी कुठला सल न बाळगता, आता पुस्तकावरील अभिप्रायाची प्रतिक्षा देखील कवितेतून व्यक्त करणे याचे अप्रूप…!

आजकाल काहीही, कधीही, कुठेही आणि कसही साजरं करण्याचं सर्वत्र फोफावलेलं फॅड आणि ‘रीएलिटी’चाही ‘शो’ करणाऱ्या प्रच्छन्न दिखाऊ जगात, कुणीतरी काही विशिष्ट क्षण संस्मरणीय करण्यासाठी करत असलेला प्रामाणिक आटापिटा आणि तो 'लाईव्ह' अथवा 'व्हायरल' न करता निवडक स्नेह्यांसोबत, हितगुज करावा तसा, साजरा करण्याची कल्पना याचे अप्रूप…!

‘अविनाश भोसेकर सर’ या आमच्या, ‘सुमंत्रच्या विनयाताईंचे यजमान’ या रूपाने परिचित आणि यथावकाश सुपरिचित झालेल्या चिरतरुण स्नेह्यांनी त्यांच्या पंचाहत्तरी निमित्त संकलित, संपादित आणि प्रकाशित करून आम्हाला सप्रेम भेट केलेले त्यांचे चित्ररूप ‘अविनाशी कवितांकुर...' हे आजचे खरेखुरे अप्रूप…!

यातील सर्व कवितांचे रसास्वादन करून त्यावर एक स्वतंत्र पोस्ट लिहिण्याचा मानस आहेच. आज, आपण उपभोगत असलेल्या सुख-सुविधांच्या महिन्याच्या बिलांव्यतिरिक्त आणि आपणच ऑनलाईन ऑर्डर केलेल्या सामानाशिवाय, काहीतरी अनपेक्षित, आपल्या ताजेपणाने ‘मना’ला प्रफुल्लित करणारे आणि निर्व्याज सुखावणारे पार्सल डिलिव्हर झाले याचा जेव्हढा आनंद तेवढेच… अप्रूप !

सरांना अखंड 'कवितांकुरा'साठी प्रवाही प्रतिभेच्या आणि निरोगी दीर्घायुष्याचा 'अविनाशी' शुभेच्छा !

शुभम भवतु !

रविवार, ५ मार्च, २०२३

अगतिक...!


असंगाशी संग I प्राणाशी गाठ I
भरला काठोकाठ I पापकुंभ II

येई तारण्या I म्हणे युगंधर I
तो ही धुरंधर I संभ्रमित II

स्वार्थांध सत्ता I हेच एक सत्य I
ओशाळते नित्य I माणुसकी II

अधर्मी धर्म I राहतो उदास I
त्याचा अदमास I कुणालागी II

सारेच संत I सदाच दसरा I
चेहरा हसरा I अगतिक II

वाढो मानव्य I विवेकी जागृत I
प्रवाही पण मृत I दैवगती II

रंगात रंगूनी I ठोकली हाळी I
आली आली होळी I धूळधाण II

उन्हां कधी लाभो I भाग्य सावलीचे I
आर्त माऊलीचे I ऐकावे गा II