शनिवार, ३१ डिसेंबर, २०११

भूत...!प्रवास इथला

काळाचा दूत

आजचा आज

उद्याचे भूत...!

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

शूल...!


एकेका शब्दातून

व्यक्त एकेक शूल

हळव्याला प्रचीती

भटक्याला रानभूल...!

गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

मीमांसा...!

 

नपुंसकाचे शील

दुर्बलाची अहिंसा

बकाचे ध्यान अन

वांझोटी मीमांसा...!

बुधवार, २८ डिसेंबर, २०११

आत्मभान...!


दुष्टचक्राच्या वावटळीत

उरावे कसे आत्मभान

'मस्त चाललय आमचं...'

तारण ठेवलाय स्वाभिमान...!

रविवार, २५ डिसेंबर, २०११

बेट...!क्रुसाचा काटेरी वसा

वेदनेला भिडणे थेट

जादुई पोतडीत आज

सापडावे करुणेचे बेट...!

शनिवार, २४ डिसेंबर, २०११

दुखवटा...!


कळपातला नव्हतोच कधी

ना चढविला कधी मुखवटा

त्यांच्या स्वयंभू क्षुद्रतेचा

मला का उसना दुखवटा...!

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११

जंतू...!


बेनाम चिंता

अक्षय किंतु

मनी मानसी

षडरिपूंचे जंतू...!

गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

संदर्भ...?


नि:संदर्भलाही

संदर्भ नवे...

कसे झुलावे

क्षणासवे...?

बुधवार, २१ डिसेंबर, २०११

शून्य...!


तुझ्याशिवाय आयुष्य

एक पोकळ शून्य आहे

तुझ्याशिवाय माझ्यासाठी

प्रत्येकजण अन्य आहे...!

मंगळवार, २० डिसेंबर, २०११

स्वगत...!


उदासीनतेची परिसीमा

अन एकलेपणाची हद्द

संवाद हरवला कधीचाच

आता तर स्वगतही रद्द...!

सोमवार, १९ डिसेंबर, २०११

गुंथी...!


मनाचिये गुंथी

वेदनेचे ध्यान

आकळिता तत्व

व्यर्थ देहभान...!

गुरुवार, १५ डिसेंबर, २०११

मूल्य...!कालबाह्य मूल्यांच्या अडगळीचा

कुणाला ठेवायचाय लेखा-जोखा

प्र-गतीच्या दिशाहीन झाकोळात

कुठली माउली अन कोण चोखा...!

मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

मुमुक्षा...!


आदी तू मी आत्मज

संपूर्ण तू मी शून्यवत

क्षणिक माझी मुमुक्षा

तू चिरंतन तूच शाश्वत...!

सोमवार, १२ डिसेंबर, २०११

काडेपेटी...!


काडेपेटी मागतो येता-जाता

विडी-बिडी  नाही, नाही नशा

पुष्कळ गोष्टी आहेत म्हणे

पेटवून टाकाव्यात अशा...!

रविवार, ११ डिसेंबर, २०११

द्वंद्व...!


आकाशी झेपावता पक्षी

डहाळी डहुळली जराशी

पाठवणी की आळवणी,

द्वंद्व कवटाळीत उराशी...!

शनिवार, १० डिसेंबर, २०११

विराणी...!


गर्द निळे निरभ्र आकाश

संथ खोल निश्चल पाणी

अश्राप जीवाचा एक हुंकार

उठता तरंग निळी विराणी...!

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

असणे...!


वृक्षवल्ली पशुपक्षी

स्वच्छंद वाहते झरे

'असण्या'चे भान नरा

येइतो आयुष्य सरे...!

गुरुवार, ८ डिसेंबर, २०११

बुद्ध...!?!


भावते वैराग्य आम्हा

मोहवितो शृंगारही

बुद्धाचे अनित्य तसा

मेनकेचा अंगारही...!

बुधवार, ७ डिसेंबर, २०११

विचक्षण...!


संभ्रमित थोडासा

थोडासा विचक्षण...

रात्रभर नाही सरला

गोठलेला एक क्षण...!

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

फाके...!

विरलेले जगण्याचे वस्त्र अन

उसवलेले जाणीवेचे टाके

मूल्यांचा अभद्र बाजार,

संवेदनेला रोजचेच फाके...!

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

चला गया...!


मै जिंदगीका साथ

निभाता चला गया...

हर फिक्रको धुयेंमे

उडता चला गया...!

रविवार, ४ डिसेंबर, २०११

वेडाचार...!


कटीबद्ध जगरहाटी

सांभाळण्या 'सदाचार'

बदलाची अपेक्षादेखील

इथे शुद्ध वेडाचार...!

शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

जीवात्मा...!


दृश्य-स्पर्श-गंध  अन

अलवार सुखाची धुंदी

मुक्त स्वच्छंद जीवात्मा

क्षणिक मोहाचा बंदी...!