बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

सहचर्य...!

आमचे कवीमनाचे सन्मित्र दिनेश हे किती रोमॅंटिक आहेत याचा दाखला देण्यासाठी त्यांनी स्वत:च्या विवाहासाठी निवडलेली तारीख पुरेशी ठरावी – २१ डिसेंबर – वर्षातील सगळ्यात मोठी रात्र असलेला दिवस !

काल त्यांच्या यशस्वी सहचर्याची तब्बल २२ वर्षे पूर्ण झाली. या सूज्ञ, समंजस आणि समन्वयी सहजीवनाने त्यांना काय दिले याचा सुंदर आलेख अर्थातच एका उत्कट व भावविभोर काव्यपुष्पातून ऋतुचक्राच्या रुपकाद्वारे त्यांनी मांडला.

एरवी बहुदा वैयक्तिक वेदनेच्या स्वमग्नतेत गुरफटलेली त्यांची अभिव्यक्ती या निमित्ताने मोकळा श्वास घेऊन, त्यांच्याच ‘वय...’ या आणखी एका अभिजात कवितेच्या तोडीची रसभरीत आणि साक्षात्कारी अनुभूती ठरली.

या निमित्ताने सौ. वहिनींचे अर्थात शिल्पा मॅडमचे अनेक कारणांसाठी आभार मानावे तितके थोडे ! तथापि एका अतिविशिष्ट कारणासाठी त्यांचे आभार मानणे या प्रसंगी केवळ औचित्याचेच नव्हे तर आत्यंतिक आगत्याचे ठरावे, ते म्हणतात ना, ‘मौकाभी है और दस्तूर भी...’ अगदी तस्सेच... तंतोतंत !

आमच्या सन्मित्राच्या आयुष्यातील वहिनींच्या आगमनाने आम्हाला आमच्या बालमित्रात दडून बसलेल्या कवीचे प्रच्छन्न आणि सुभग दर्शन झाले आणि त्यानिमित्ते मराठी सारस्वताचा कविधर्म वर्धिष्णू झाला...
               
“हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड ।
तरी आतां अवधानामृतें वाढ । सिंपोनि कीजो ।।१९।।
मग हें रसभाव फुलीं फुलेल । नानार्थ फळभारें फळा येईल ।
तुमचेनि धर्में होईल । सुकाळ जगा ।।२०।।“ 
(॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय ११ ॥)
 
‘तप्तपदी’ला सप्तपदीत बसवून, (सं)वेदनांना सप्तरंगांच्या गोफात गुंफून, सप्तसुरात ‘मैने तेरे लीयेही सात रंगके सपने चुने...’ गुणगुणणाऱ्या या सुविद्य, सुस्वभावी दांपत्याला शतायुषी सहजीवनासाठी अनेकानेक शुभेच्छा...!

आणि ज्यासाठी एवढे नमनाला घडाभर तेल घातले ती, सन्मित्र दिनाची सौ. शिल्पा वहिनींना समर्पित केलेली ही प्रफुल्ल अष्टाक्षरी रचना... शब्द कवीचे असले तरी एकमेकाला समजून-उमजून समरसतेने सहजीवन फुलविणाऱ्या प्रत्येक सहचरास यात आपल्या भावनांचे प्रतिबिंब दिसल्यास ती कवीच्या प्रगल्भ जाणिवांची अभिव्यक्त समृद्धी...!


ऋतू तुझे माझे

तुझी नजर शालिन
उरी कळ अनंताची
झाले मनांचे मिलन
साक्ष होती वसंताची

रक्तवेगी देह उष्ण
अंगभर सुख कळा
ग्रीष्म कोरडा बाहेर
सोसे त्याच्या उष्ण झळा

सुख दु:खाचा वर्षाव
अंगी घेत झालो चिंब
छत्री प्रेमाची जिरवी
पावसाचा वृथा दंभ!

दंव पहाटे रोज तू
कोजागिरी फुलविली
चंद्र शरद चांदणी
अवसेला मी अर्पिली

दिपोत्सव डोळ्यांत अन्
लाल बिंदी तुझ्या भाळी
हेमंताला दिली मीच
भेट रंगीत दिवाळी!

प्रेममूळ रुजे खोल
उमलले गोड फळ
आली तशीच जाईल
शिशिराची पानगळ

आले गेले किती तरी
साक्ष देईल ही धरा
नाते आपुले प्रफुल्ल
सांग ह्या ऋतूंना जरा!!

- दिनेश

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

श्री गुरुचरित्र

आमचे आजोबा अण्णा अर्थात बापू केशव पुराणिक यांनीकेशवतनयया उपनामाने अध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक तथा सामाजिक विषयांवर विविध साहित्यप्रकारात विपुल लेखन केले. अण्णांच्या समग्र प्रकाशित, अप्रकाशित साहित्याचे टंकलेखन करून आंतरजालावर सर्वांच्या संदर्भासाठी जतन करावे या आमच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप मिळण्यास सुरवात झाली तीगीत ज्ञानेश्वरचे, केवळ टंकलेखनच नव्हे, तर एका छोटेखानी जाहीर कार्यक्रमात आमच्या मर्यादित क्षमतेत त्याचे सादरीकरण देखील करून! सदर कार्यक्रमाचे ध्वनिचित्रमुद्रण युट्युबवर उपलब्ध आहे, ते आपण येथे बघू शकता.

गीत ज्ञानेश्वरइतकीच किंबहुना त्याहून अधिक लोकप्रिय असलेली अण्णांची रचना म्हणजेसंक्षिप्त श्री गुरुचरित्र’! सरस्वती गंगाधर रचित मूळ गुरुचरित्राच्या सुमारे २५०० पाने इतक्या विस्तारामुळे आधुनिक जीवनशैलीत त्याचे पारायण करण्यास अडचण येत असल्याचे निदर्शनास आल्याने, अण्णांनी ७, , ३ किंवा अगदी एकाच दिवसातही पारायण करता येईल असा श्री गुरुचरित्र सारामृताचा उपक्रम केला आणि ८०च्या दशकात तो अण्णांच्या हयातीत प्रकाशितही झाला. प्रकाशकाने नवीन स्वरुपात या ग्रंथाच्या अधिक आवृत्याही काढल्या तथापि त्या सर्वत्र सहज उपलब्ध नसतात असा अनुभव आहे.

गत दोन वर्षात विषाणू संकटाने साऱ्यांनाच बराच काळ गृहकैदेत रहावे लागले आणि बहुतांना नानाविध प्रापंचिक, व्यावहारिक कारणांनी मानसिक, शारीरिक अडचणींचा सामना करावा लागला. अशा अवघड काळात मनोबल उंचावण्यासाठी अनेकांनी आध्यत्मिकतेकडे कल वाढवला आणि नामस्मरण तथा पारायणाने चित्त शांत, शुद्ध होत असल्याने असे उपक्रम करण्याचा आलेख वाढलेला दिसला. तथापि, मुळातच दुर्मिळ झालेल्या केशवतनयकृतसंक्षिप्त श्री गुरुचरित्रग्रंथाची छापील आवृत्ती या काळात मिळणे अधिकच दुरापास्त झाले. या निमित्तानेसंक्षिप्त श्री गुरुचरित्रग्रंथाच्या टंकलेखनाचे कार्य सत्वर सुरु करावे जेणे करून भाविकांना तो सहज उपलब्ध होईल हा विचार बळावला.

अण्णांची नातसून सौ. करूणा मनीष पुराणिक हिने, मार्च २०२१ च्या सुमारास सुरवात केलेले या ग्रंथाच्या टंकलेखनाचे काम, सुरवातीचा काही भाग संगणकावर व नंतरची सुमारे २०० पाने स्मार्टफोनवर, असे गेल्या ९ महिन्यात अत्यंत चिकाटीने पूर्ण केले. टंकलेखनाच्या तपासणी आणि सूचनांचे काम, अण्णांचे नाशिकस्थित नातू श्री. वैभव शामकांत पुराणिक व सौ. स्वाती वैभव पुराणिक या उभयतांनी नेहमीप्रमाणे अतिशय निगुतीने व तत्परतेने केले. आमचे तीर्थरूप, अण्णांचे सुपुत्र श्री. शशिकांत बापू पुराणिक यांनी आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनाने सर्व दुरुस्त्यांसह ग्रंथ योग्य स्वरूपात तयार झाला आहे याची फेरतपासणी केली. सदर ग्रंथ पीडीएफ तथा मुद्रित स्वरूपात सुवाच्य व सुबक दिसावा म्हणून त्याच्या सुशोभीकरणाचे छोटेसे पोषाखी काम करून अस्मादिकांनी या सागरी सेतू बांधण्याच्या कामातील आपला खारीचा वाटा उचलला.

हा उपक्रम सुरु करतांना तो कधी पूर्ण होईल, कसा पूर्ण होईल याचा अंदाज नव्हता परंतु दत्तगुरूंच्या कृपेने आणि अण्णांसह साऱ्याच थोऱ्यामोठ्यांच्या आशीर्वादाने, मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आणि चंपाषष्ठीच्या कुळधर्माच्या मुहूर्तावर हे कार्य सिद्ध झाल्याने दुग्धशर्करा योग जुळून आल्याचे अतीव समाधान वाटले. या समाधानाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, केशवतनयकृतसंक्षिप्त श्री गुरुचरित्रग्रंथाचे सात दिवसांचे पारायण करून दत्तजयंतीला समारोप करणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या विचाराने ग्रंथाच्या डिजिटल आवृत्तीचे प्रसारण आजच्या मुहूर्तावर करून हा कपिलाषष्ठी योग साधावा म्हणून हा प्रपंच!

अत्यंत निर्मळ भावनेने आणि सद्हेतूने आम्ही आमच्या अल्पमतीनुसार आणि मर्यादित क्षमतेत केलेल्या या छोट्याशा प्रयत्नाचे स्वागत होईल आणि त्यात काही न्यून राहिले असल्यास त्यास सर्वस्वी आम्ही जबाबदार असून कुणीही कसलीही चूक, उणीव अथवा न्यून सप्रमाण दाखवून दिल्यास त्याचे त्वरित निराकरण करण्यास आम्ही तत्पर आहोत.

या निमित्ताने सुरु झालेल्याकेशवतनयसाहित्य संवर्धन अभियानास सर्वांच्या सहभाग, मार्गदर्शन आणि आशीर्वादाची नितांत गरज आहे. आम्ही सर्वांस या निमित्ताने विनंती करतो की आपल्याकडे अण्णांचे म्हणजेच बापू केशव पुराणिक अर्थातकेशवतनययांचे कुठलेही प्रकाशित, अप्रकाशित साहित्य, माहिती, पत्रे, चित्रे किंवा इतर कुठल्याही स्वरुपातील काहीही ऐवज असल्यास कृपया आम्हाला कळवावे व आपण या अभियानात कुठल्याही प्रकारे सक्रिय सहभाग घेऊ इच्छित असल्यास त्याचा तपशील द्यावा.

अण्णांचे साहित्य संचित आंतरजालावर जतन करण्याच्या कामी दत्तगुरूंची कृपा आणि अण्णांचे आशीर्वाद आहेतच, आपले सर्वांचे स्नेहाशीर्वाद लाभल्यास कार्य सिद्धीस नेणे कठीण नसावे.

शुभम भवतु !

संवत्सर प्लव, शके १९४३, मार्गशीर्ष नवमी रविवार, १२ डिसेम्बर २०२१ - सदर पीडीएफ आवृत्ती येथे वाचू शकता - https://drive.google.com/file/d/1fZxNgkuMhem-fwPa6Ai253Nm2XxOjDkj/view?usp=sharing

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

ता.क. ...?

परवा दिनाने त्याच्या मनोगतात सांगितल्याप्रमाणे माझे पत्र ता.क. (PS - Post-Script, you know!) शिवाय पूर्ण होत नाही. जगातील सर्वात मोठा, दोन पानी, ता.क. लिहिण्याचा विश्वविक्रम माझ्या नावावर आहे हे दिनाने परवाच्या व्हिडीओत सप्रमाण दाखवले आहेच. तेव्हा गेले तीन दिवस, 'लव्ह यू जिंदगी...'च्या ट्यूनवर तरंगणाऱ्या या 'आज मै उपर...'चा समारोप एका प्रसंगोचित 'ता.क.'नेच करावा असे वाटते.

पन्नाशीच्या आदल्या दिवशी... 'आपणही गेल्या काही काळापासून पोटार्थी गरजेने 'रॅट रेस'मधील उंदीर झालो आहोत आणि त्यामुळे वेगळे काही करण्याची आपली उमेद आणखीन उर्मी झपाट्याने लोप पावत चालली आहे...' अशा विचारांत 'देणं...' लिहिली गेली; त्यात निराशेपेक्षा विषाद अधिक होता. शिवाय 'पिंडी ते ब्रह्मांडी' पाहण्याच्या तात्विक सवयीमुळे 'सूक्ष्म बदलल्याशिवाय स्थूल बदलणार नाही' या पक्क्या धारणेने, शेवटच्या माणसात मुलभूत बदल घडत नाही तोवर समाज बदलणार नाही ही विचारधारा माझ्या सीएसआर - कम्प्लीट सोशल रिफॉर्म मधून प्रत्यही डोकावत असतेच.

तथापि डॉक्टर कणेकरांसारखा एक प्रश्न मला नेहमी पडत असे, 'मि. शिरी(मनी)ष , तुम्ही एवढं लिहिता, पण वाचतं का कुणी...?' समाजमाध्यमांचा (आणि खरतरं कुठल्याच माध्यमाचाच काय साधनाचासुद्धा) प्रोफेशनल वापर करण्याची कला आणि कुवत कधीही साध्य न झाल्याने आपल्या लिखाणाचे बाकी काही नाही तरी, 'लगता है तुम्हारे लिखनेसे गलत लोग जाग गये है...' ही 'क्रांतीवीरा'ची भीती खरी ठरू नये याची काळजी. पण ते तसे नाही असे समजते.

माझ्या लिखाणाला बरेच वाचक लाभतात आणि त्यातील बऱ्याच वाचकांना ते, लाईक करण्याइतके नसले तरी, शेअर करण्याइतके आवडते याचे दाखले मला हितचिंतकांकडून वेळोवेळी मिळत होतेच, कबुलीही मिळाली ! पूर्वी मी 'इत्यादी'वरच्या पोस्टची केवळ दुवा (लिंक) फेसबुकावर डकवत असे, तथापि बरेच लोक लिंक क्लिक करत नसल्याने मूळ पूर्ण मजकुरापर्यंत ते पोहचत नाहीत तेव्हा मी संपूर्ण पोस्ट फेसबुकावर कॉपी-पेस्ट करावी असा मोलाचा सल्ला मिळाला जो मी शिरसावंद्य मानून विनाविलंब तंतोतंत अंमलात आणला.

आता माझ्याच ब्लॉगवरचे लिखाण मीच कॉपी-पेस्ट करत असल्याने त्याखाली आपले नाव घालावे आणि - 'मूळ पोस्ट कुठल्याही फेरबदल न करता माझ्या नावासकट शेअर करण्यास माझी हरकत नाही' - असा शहाजोगपणाचा व्यावहारिक सल्लाही द्यावा हे काही मला सुचले नाही, किंबहुना असे काही सुचत नाही हीच आणखी एक मूळ समस्या. परिणामी, मजकूर कॉपी-पेस्ट करणाऱ्यांनी, त्यात मुळातच नसलेले लेखकाचे नाव स्वत:हून टाईप करून पुढे पाठवावे ही अपेक्षा किती बाळबोध आहे याचे प्रत्यंतर आले जेव्हा एका ग्रुपवर माझ्याशी ओळखदेखही नसलेल्या एका 'मित्रा'ने 'माझ्या मित्राची पोस्ट' अशा टिप्पणीसह छातीठोकपणे माझी पोस्ट शेअर केली. यानिमित्ताने जगन्मित्र असल्याचा अभिमानास्पद फील दिल्याने मी त्याचा ऋणीच आहे पण 'म्हातारी मेल्याचं दु:ख नाही काळ सोकावतो...' या तत्वाने, जे आपले नाही त्यावर क्षणिक सुखा-समाधानासाठी हक्क सांगण्याची वृत्ती अवघ्या मानव्याला अंती घातक ठरू शकते याची चिंता, बाकी काही नाही.

स्वामित्वाची, हक्काची भावना प्रस्थापित करून प्रबळ होण्यासाठी बीज-क्षेत्र न्याय अस्तित्वात आला आणि रानटी माणूस सिव्हीलाईज्ड झाला तेव्हापासून आपल्या 'निर्मिती'ला आपले नाव देण्याची प्रथा रूढ झाली. राजे-रजवाड्यांनी आपल्या नावाच्या मुद्रा चलनात आणल्या, संस्थानिकांनी आपली संस्थान वसवली, सामान्यांनी जमिनीचे तुकडे आणि दारांवर आपल्या नावाची तोरणं लावली, एवढेच काय, रस्त्यावर राहणाऱ्यांनी सुद्धा आपापला कोपरा आरक्षित केला. जेथे जेथे व्यवहाराची शक्यता निर्माण झाली त्या प्रत्येक ठिकाणी स्वामित्वाची, हक्काची नोंदणी आली. यातून 'कले'सारख्या अभिजात आणि कालातीत क्षेत्राचीही सुटका झाली नाही. कलाकृतीला बाजारात किंमत मिळू शकते हे समजल्यावर 'सिग्नेचर आर्ट'चे लोण पसरले. थेट पिकासोपासून खडूंनी रस्त्यावर चित्र काढणारे कलाकार त्याखाली आपले नाव टाकून आपली कला मॉनीटाईज करू लागले... आणि यात काहीही चूक नाही.

मला प्रश्न पडतो तो फक्त एवढाच की पुरातन काळापासून लेण्यांमध्ये कोरलेली भित्तीचित्रे, सर्वांगसुंदर शिल्पे, भव्य-दिव्य दगडी मंदिरे आणि तत्सम इतर वास्तू, शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून आणि कल्पकतेतून साकारलेले प्रचंड आणि अभेद्य किल्ले आणि अशा इतर अनेक सार्वजनिक कलाकृती या अनामिक कलाकारांनी कोणत्या प्रेरणेतून घडवल्या असतील? आपल्या अलौकिक कलाकृतीवर आपले नाव टाकण्याची इच्छा त्यांना झाली नसेल? इतिहासाच्या पानांनी आपली दखल घ्यावी अशी ओढ त्यांना का लागली नसेल?

याचे मी माझ्या अखंड चिंतनातून माझ्यापुरते शोधलेले उत्तर असे आहे की जेव्हा तुमचे धोरण सर्वसमावेशक असते, उद्देश स्वार्थाच्या पलीकडे असतो आणि मार्ग सेवाभावाचा असतो तेव्हा सर्वकालिक सामूहिक उपलब्धी ही तुमच्या क्षणिक प्राप्तीपेक्षा वरचढ ठरते आणि तुमच्या स्वीकृत कार्यात, कर्तव्यात व्यवहार आड येत नाही... येऊ नाही!

या ता.क.ने माझ्याच ता.क.चा पूर्वीचा विक्रम मोडण्या अगोदर थांबावे हे उत्तम... वाचत रहाल आणि आवडेल, पटेल ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवत रहाल ही अपेक्षा... नाव टाकलं नाही तर मुळीच हरकत नाही पण फेरबदल मात्र करू नये एव्हढीच माफक अपेक्षा!

शुभम भवतु !

शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

लव्ह यू जिंदगी...!

पन्नाशीचा कार्यक्रम मला सुखद धक्का देणार हे पूर्वनियोजित होते पण मला चकित व्हायला झाले ते अनेक कारणांनी. मुळात मुलीला आठवड्याच्या मध्यात एका दिवसासाठी नवीन जॉबमधून सुटी घेऊन येणे जमेल असे वाटत नव्हते त्यामुळे संध्याकाळी मुलीला घरी बघूनच माझी एक्साइटमेंट सुरू झाली आणि... पार्टीही !



कुठलाही प्रसंग निगुतीने साजरा करण्यासाठी कंबर कसणारी गृहस्वामिनी, माझा प्रत्येकच वाढदिवस हा सणासारखा सजवते याची कल्पना होती पण पन्नाशीसाठी खास ५० हृदयरूपी चॉकलेट्सचा बुके बनवण्यातली तिची कल्पकता आणि कलात्मकता जेवढी लोभस होती तेवढीच त्यासाठी लागणारी चिकाटीही दाद देण्याजोगी ! या प्रसंगाचा संस्मरणीय सोहळा करण्यासाठी तिने कधीपासून काय काय तयारी केली आहे याची कल्पना केवळ तिचे वरील व्हॉट्सएप स्टेटस पाहून मुळीच येणार नव्हती


संध्याकाळी पुण्यातील बहुतेक साऱ्या आप्त आणि स्नेहयांची मैफिल जमल्यावर जेव्हा मुलीने तिचा लॅपटॉप टीव्हीला जोडण्याचा कार्यक्रम सुरू केला तेव्हा, ‘अरे देवा, आणखी एक व्हर्च्युअल इव्हेंट की काय...’ या विचाराने खरतर अस्वस्थ व्हायला झालं. गेल्या दोन वर्षापासून, ‘प्लीज टर्न ऑफ (ऑर ऑन) युअर माईक... ’ आणियुवर स्क्रीन इज नॉट व्हिजिबल...’ या सगळ्या प्रकाराचं अगदी चूर्ण घ्यायला लागेल इतकं अजीर्ण झालंय, मग त्याचा उद्देश कितीही चांगला आणि हेतू कितीही प्रामाणिक असला तरी ! पण आज तरी माझ्या अल्पजीवी संयमाचा कुठल्याच प्रकारे अंत पहायचा नाही याची खूणगाठ बांधल्यासारखी सारीच माणसं अगदी शिस्तीत वागत होतीतंतोतंत !



मुलीने जेव्हा तिने संकलित केलेला व्हिडिओ सुरू केला तेव्हा पुढे काय असणार याचा अंदाज आलाअसे मला वाटले. पण जेव्हा पाहिला मित्र पडद्यावर चलचित्राच्या माध्यमातून प्रकटला तेव्हा आधी माझ्या आश्चर्याला आणि मग आनंदाला पारावार राहिला नाही कारण रवी, आपल्या ओणमच्या पारंपारिक वेशातील मुलांसह, मला थेट त्याच्या बंगलोरच्या घरातून शुभेच्छा देत होता...प्रत्येक मित्राच्या स्वभावानुसार त्याचे मनोगत आणि ते व्यक्त करण्याची शैली भिन्न असली तरी माझ्याशी असलेले भावबंध आणि माझ्याबद्दलची प्रामाणिक तळमळ हीमनाला स्पर्शून गेली... डॉक्टरच्या भाषेतहृद्य!’ रवी आणि जवानच्या आठवणी जेवढ्या उत्कट होत्या तेवढेच अभ्या आणि मुक्याचे प्रकटन परखड. पश्या आणि दिनाचे गुंतणे जेवढे मोहक होते तेवढेच डॉक्टरने त्याच्या कौशल्याचे आणि कुमारने आपल्या कलेचे खास माझ्यासाठी केलेले प्रयोजन वंदनीय ! शिवाय, ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर...’ असल्याने किमान आणखीन सहा मित्रांचे मनोगत वेळेत मिळू शकले नाही म्हणे, अन्यथा या अष्टप्रधान मंडळाचा चौदा रत्नजडित हार झाला असता !

 
भाव, अर्थ, गंध, रस, रूप, ज्ञान, शब्द आणि रंग अशा अष्टसिद्धींनी बहरलेल्या दूरस्थ जिवलगांच्या हृदयस्थ शुभेच्छांना परिपूर्ण केले ते विनयाताईने खास या प्रसंगासाठी केलेल्या कवितेने. जीवलगांचे हे मनोज्ञ अभिष्टचिंतन पन्नाशी सार्थक करून गेले हे निश्चित!


आपल्या पन्नाशीला आपले दोन्ही पालक आपल्यासोबत असणे आणि त्यांचे आशीर्वाद लाभणेहे फारच भाग्याचे आणि समृद्धीचे लक्षण असल्याचे जाणवले. अन्यथा, ‘मेरे पास मां है !’ हाइंडियावली मांप्रमाणे कालबाह्य झालेला डॉयलॉग मारून किती दिवस आपले अकर्म झाकणार आणि वर, आईवडील माझ्याकडे असण्याइतका मोठा कधीच न झाल्याने मीच अजूनही आईवडिलांकडे असतो…’ अशा सेंटी फिलॉसॉफीमागे दडण्याचाही उबग आला होता, त्यातून काही काळ (तरी) सुटका झाली... त्याबद्दल साऱ्यांचे, विशेषत: डॉक्टरचे जाहीर आभार !

साऱ्या सोशल मिडीयाला जमेस धरून, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, फोन, मेसेजेस, ग्रीटींग्ज आणि आभासी माध्यमातून पन्नाशीच्या शुभेच्छांनी शंभरी केव्हाच ओलांडली तेव्हा काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या... सोसायटीचा सिक्युरिटी ओळख दाखवतो आणि ‘कुणाकडे जायचंय...?’ असं न विचारता आपल्याच घरी जायला आत सोडतो इतपत समाजातील पत आयुष्याला पुरेल एवढी माफक अपेक्षा असलेल्या मला, या स्नेह-मायेच्या वर्षावाने गुदमरायला झालं. आजच्या हिशेबी जगात, माणसाची सामाजिक प्रतिष्ठा त्याच्या मिळकतीवरून आणि ओळखींवरून ठरत असल्याने, पंचवीस वर्षात साध्या दोन चाकांची भर घालता न आल्याने आपण कुणाच्या खिजगणतीतही नसू असा माझा जो समज होता तो या निमित्ताने भ्रम ठरला याचा आनंद.


शिवाय या निमित्ताने आणखी एक जाणीव प्रकर्षाने झाली... आईवडिलांनी दिलेले आयुष्य तुमचे स्वत:चे असले आणि ते कसे जगावे याचा पूर्ण अधिकार तुम्हाला असला तरी ते तुमच्या मालकीचे नसते, त्यावर आईवडिलांसह साऱ्याच स्नेह्यांचा, सुहृदांचा, स्वजनांचा तुमच्याहून अधिक अधिकार असतो, हक्क असतो आणि ही संख्या जेवढी अधिक तेवढी तुमची प्राप्ती (प्राप्तीकराशिवायची!) अधिक... ही समृद्धी अनुभवली की आयुष्यात काय कमावलं असे वृथा प्रश्न पडणे मग बंद होते...

मुलीने आणि तिच्या आईने या प्रसंगाचा सोहळा करण्यासाठी योजलेली कल्पकता, घेतलेले कष्ट, त्यांना कायमच असणारा आईपपांचा भक्कम आधार, मित्र-आप्तेष्टांची बहुमोल साथ आणि योगदान या साऱ्याने खरंच खूप भारावून जायला झाले आणि, माझ्या लीन्क्डईन प्रोफाईल मध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘...no matter how far I have come, it’s still a long way to go!  याची पुन्हा एकदा समृद्ध जाणीव झाली... तंतोतंत !


Thank you ALL, Love You All and Love You ZINDAGI!

बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

देणं…!

कण कण झुरलो
क्षण क्षण साठवितांना
वाटले खर्चू निवांत
त्यांना आठवितांना...

खिसे उसवत राहिले
कितीही टाके घालून
वरुन सुख भरले तरी
गळून जाई खालून...

एक दिवस ठरवले आता
‘मना’प्रमाणेच रहावे
शिल्लक वेळ देऊन
सुख मिळते का पहावे...

जमापुंजी उघडून बघता
उरलो होतो कफल्लक
क्षण सारे उडून गेले...
पोकळी तेवढी श्रीशिल्लक !

मग म्हटले भेटू स्वत:ला
करू नये कशाचीच गय
तर समोर कुणी आगंतुक,
आरशाचे वाढले होते वय...

न्याहळून पहिले तर
केसांवर दिसली रुपेरी झाक
थकलेला चेहरा म्हणाला,
‘माझं देणं देऊन टाक…!’

बोध...!


पन्नास म्हणजे अर्धशतक... एवढा काळ टिकलो याचे आंतरिक समाधान आणि, ‘ठरवलं तर शतकही गाठता येईल’ अशी ओढ लावणारी वेडी आशा. पन्नाशीला अनेक संदर्भ नव्याने उमगू लागतात. पंचविशीतला बाणेदार ध्येयवाद किंवा ‘कर लो दुनिया मुठ्ठीमें’ ही राजसी महत्वाकांक्षा व्यवहाराचे टक्के-टोणपे खाऊन वरमलेली असते आणि, ‘अरेच्चा, हे असे आहे होय, हरकत नाही वेगळ्या दृष्टीनेही पाहू या...’ एवढा उदारमतवादी दृष्टिकोन विकसित झालेला असतो... नव्हे, व्हावाच लागतो, कारण त्याशिवाय तरणोपाय नाही ही शहाणीव रोज वाढते वय नित्यनेमाने देत असते. शारीरिक क्षमता अतिसूक्ष्मपणे का होईना पण दिवसेंदिवस कमी होतेय ही जाणीव फारशी सुखावाह नसली तरी, रोज नव्याने उगवणारा पांढरा केस हे म्हातारपणाचे लक्षण मानण्यास साफ नकार देण्याइतक्या, तरुण मनाच्या संवेदना तीव्र असल्याने तो तातडीने कलप तरी केला जातो किंवा कलम तरी.

‘तरुण आहे रात्र अजूनी...’ ही आता थोडी कल्पनारम्य स्थिती वाटू लागली असली तरी ‘वय निघून गेले...’ म्हणायलाही मन धजावत नाही अशी ही त्रिशंकू परिस्थिती. पंचविशीतला चेहरा मनातून पूर्णपणे पुसला गेला नसला तरी आठवावा लागण्याइतपत धूसर नक्कीच झालेला असतो. ‘कितने दूर कितने पास...’ ही भावना फक्त तरुणपणीचे मोरपंखी दिवस, पाऊल न वाजवता आयुष्यात आलेले आणि कायमची हुरहूर लावून गेलेले चेहरे, मैफिलींसह इतरही कारणांसाठी जागविलेल्या रात्री, भावनांच्या आवर्तनात तरलतेच्या पलीकडे जाऊन ‘दुनियादारी’ शिकवून गेलेले प्रसंग, सोयीसाठी बांधलेले आणि गैरसोय होताच मोडलेले (भाव?)बंध एवढ्यापुरतीच मर्यादित न राहता विरक्ती, मुक्ती, मोक्ष किंवा किमानपक्षी वैकुंठाच्या बाबतीत तरी प्रबळ होत जाते.

खऱ्या अर्थाने मिड-वे किंवा हाफ-वे म्हणावे अशी ही वाटचाल. शिल्लक अंतर हे पार केलेल्या अंतराइतके नक्कीच नसले तरी उरलेला प्रवास घडलेल्या प्रवासाइतकाच, किंबहुना मोठाच, भासणार याची जाणीव पदोपदी करून देणारा हा टप्पा. कमावले त्याचे समाधान आणि गमावले त्याची हुरहूर अशा संमिश्र भावनांच्या हिंदोळ्यावर आयुष्याशी तडजोड करून ‘समन्वय’ साधतांना ‘अनुराग’ आणखीन ‘अस्मिता’ दोन्ही जपण्याची प्रामाणिक धडपड. भोगाच्या मायाजालातून स्वेच्छा-मुक्ती नाही आणि अभोगी विरक्तीचा विनाअट स्वीकार नाही. आहे त्यात संपूर्ण समाधान नाही पण स्पर्धा करण्याइतकी इर्षाही नाही. ठसठसणारे दु:ख नाही, आतडे पिळवटणारी वेदना नाही पण निवृत्त व्हावे इतकी इतिकर्तव्यता नाही आणि समाधानी असावे इतके सुखही नाही, अशी ही अस्थिर संभ्रमित अवस्था... तरुणांच्या दृष्टीने अधेड आणि ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला मिळण्यास अजून बराच अवकाश असल्याने त्यांच्या दृष्टीने ‘...तसे तरुण आहात!’

तस बघितलं तर ही अवस्था आजच्या लाईफ-स्टाईलचे तंतोतंत रुपक असायला हरकत नसावी. माणसाने स्वत:ची प्रगती आणि विकास करण्याच्या नादात तो अशा टप्प्यावर उभा आहे की नेमके काय कमावले आणि काय गमावले याचा सारासार विचार केल्यास आत्मसन्मान, समाधान, मन:शांती, नीतीमत्ता आणि सदसद्विवेक यांच्या बदल्यात मिळवली ती लाभार्थी तडजोड, नश्वर समृद्धी, निरंतर अस्थैर्य, बेगडी प्रतिष्ठा आणि विपरीत विचार आणि त्यातून उत्पन्न होणारे विकार आणि विखार.

अर्थात एकेरी वाटेवर ‘परती’चा मार्ग नसतो म्हणूनच हवी ‘उपरती’... ती कुण्या एका अमुकच्या पन्नाशीला झाली काय किंवा साऱ्यांच्या असोशीला झाली काय, भरकटलेल्याला योग्य मार्ग दाखवल्याशी मतलब. प्रवास अटळ आहे म्हणून जसे गतानुगतिक होण्याची गरज नाही तसेच अगतिक होण्याचीही गरज नाही... दिशा योग्य, वेग वाजवी आणि मन शुद्ध राखल्यास ठिकाण सापडतेच.

आज आयुष्याच्या मध्यावर आणि एका अपरिहार्य टप्प्यावरची ही आत्मिक अनुभूती... उद्या असेल?

कालाय तस्मै नम:

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

जोडे...!



इवल्या इवल्या अस्तव्यस्त आठवणी
क्षणांच्या हिरवळीवर इतस्ततः पसरलेल्या
त्यावर अनवाणी चालत चालत
इतक्या दूर निघून आलो
की आता विसरायला झालेय...
...जोडे कुठे काढून ठेवले होते.   

 

टाच नाजूक होती निघालो होतो तेव्हा

अजूनही आहे थोडीशी मृदु...

...आणि राहील तशीच

जोवर कडू-गोड आठवणी

खट्याळपणे गुदगुल्या करून

तिला हुळहुळवतील...

 

खरंच...

विसरायला झालेय

जोडे नेमके कुठे काढलेत ते

पण कधी वाटतं...

आता त्यांची गरज नाही...

...आणि कदाचित...

उपयोगही !

रविवार, ११ जुलै, २०२१

जंटलमन...!


‘सुहाना सफर और ये मौसम हंसी...’, ‘जंटलमन, जंटलमन, जंटलमन...’, ‘नैन लड गई है...’ पासून ‘मांगके साथ तुम्हारा...’, ‘मधुबनमे राधिका नाचे रे...’ व्हाया ‘सुखके सब साथी दुखमें न कोई...’, ‘रामचंद्र कह गये सियासे...’ ते ‘आज पुरानी राहोंसे कोई मुझे आवाज न दे...’ पर्यंत, केवळ गाण्यांच्या रेंजमधून अदाकाराच्या ताकदीची कल्पना यावी असा चित्रेतिहास लिहिणारा ‘कोहिनूर’ म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार मुहम्मद युसुफ खान अर्थात सर्वांचा लाडका दिलीप कुमार ! पुढे ज्या खानावळीत जेवून अनेकांची वजनं आणि प्रतिष्ठा(?) नको तितकी वाढली आणि बहुतेकांच्या डोक्यात हवा गेली त्या भक्तजीवी खानेसुमारीचा कुलपुरुष हा मूळ खान ! अत्यंत कोवळ्या वयात, चित्रपट निर्मितीचा वारसा लाभलेल्या आणि ‘द ग्रेटेस्ट शोमन’ होण्याच्या वाटेवर दमदार पावलं टाकणाऱ्या राजला थेट भिडण्याचा याचा ‘अंदाज’च ‘आगाज ऐसा है तो अंजाम क्या होगा...’ याची झलक द्यायला पुरेसा होता. केवळ ६५ चित्रपट करून आणि जिवंतपणी स्वत:च्या मृत्युच्या अफवा अनेकदा ऐकून सगळ्याला अक्षरश: पुरून अख्यायिका [Legend] म्हणून उरलेला हा महानायक !

आम्ही शाळेत असतांना कृष्णधवल दूरचित्रवाणीसंचावर जुन्या चित्रपट गीतांचा ‘चित्रहार’ नावाचा कार्यक्रम लागत असे. त्यावेळी या महाशयांना वरीलपैकी कुठल्यातरी गीतावर ताल धरतांना पाहिलेले. त्यामुळे आमची तोंडओळख दूरदर्शनवर पुसटशी झाली असल्याने त्यांच्याबद्दल फारसा स्नेह किंवा लगाव असण्याचे कारणच नव्हते; चाहता होण्याचा तर प्रश्नच नव्हता. कडक इस्त्रीचे पांढरे कपडे (विशेषत: विजार) घालतो आणि खूप छान नाचतो(?) म्हणून जितेंद्र आवडता नट असण्याची आमची बाळबोध अभिरुची पुढे अमिताभच्या आमच्या आयुष्यातील एन्ट्रीने हळूहळू परिपक्व होत गेली. माध्यमिक शाळेपासून महाविद्यालयापर्यंत हिंदी सिनेमाचा आमचा अवकाश अमिताभ या एकाच नावाने व्यापून राहिल्यामुळे, आर्ट फिल्म, पॉवरफुल कंटेंट आणि मेथड ॲक्टिंग आमच्या आयुष्यात येईपर्यंत आम्हाला इतर कुठल्याही अभिनेत्याबद्दल फारसा जिव्हाळा नव्हता.

दिलीपकुमारला प्रथमच नव्या रंगीत चित्रपटात आणि थेटरात पाहण्याचा योग आला त्यालाही कारणीभूत अमिताभच. ‘शक्ती’ मध्ये अभिनयाची जबरदस्त जुगलबंदी असल्याच्या जोरदार चर्चा कानावर आल्याने, ‘आपल्या’ अमिताभला अभिनयात टक्कर देणारा हा कोण सुपरमॅन या उत्सुकतेपोटी आम्ही शक्ती पहिला आणि खरं सांगायचं तर त्या वयात तो आम्हाला समजलाही नाही आणि आवडला तर मुळीच नाही. ’शोले’ आणि ‘दिवार’मधल्या अमिताभच्या मृत्यूने काळजाला झालेली जखम अजूनही भरलेली नसतांना ‘शक्ती’मध्ये त्याला पुन्हा मारायची काय गरज होती या उद्विग्नेत ती अभिनयाची जुगलबंदी का काय ती आम्हाला स्पर्शसुद्धा करू शकली नाही. शिवाय ‘आमच्या’ अमिताभच्या विरोधात असलेल्या व्यक्तिरेखेने आमच्या मनात घर करण्याचे कारणच नव्हते.

गद्धेपंचविशी सरली आणि आमची गाढवाची शिंगे यथावकाश गळून पडली. (याबद्दल दुमत असू शकते ती गोष्ट वेगळी !) सिनेमा, नाटक हे दिग्दर्शकाचे माध्यम असते या बहुमुल्य ज्ञानाबरोबर, हिरो आणि अभिनेता यातला फरक समजू लागला. अभिनय म्हणजे नेमके काय आणि तो कशाशी खातात याचा वस्तुपाठ संजीवकुमार-जया भादुरी यांच्या नैसर्गिक अभिनयाने शिकवला आणि भूमिका जगणे म्हणजे काय हे अमोल पालेकर, शबाना आझमी, ओम पुरी, स्मिता पाटील आणि नसिरुद्दीन शाह या दिग्गजांनी अक्षरश: बोटाला धरून शिकवले. एवढा गृहपाठ झाल्यावर आम्हाला अभिनय रसग्रहणाच्या बिगरीत प्रवेश मिळाला आणि आम्ही एका नव्या दृष्टीने सिनेमा बघू लागलो.

बुद्धाला झालेली पहिली बोधी म्हणजे, ‘आपल्या आधीही अनेक बुद्ध होऊन गेलेत आणि पुढेही अनेक होणार आहेत...’ ही होती असे सांगतात. आमची पात्रता ही निर्बुद्ध राहण्याची किंवा फारतर हतबुद्ध होण्याची असल्याने आम्हाला आमच्या पातळीनुसार झालेली बोधी ही होती की मेथड ॲक्टिंग हा काही इरफान, अभय देवल, नवाजुद्दिन, पंकज त्रिपाठी किंवा केके यांचा नवनूतन अविष्कार नसून बलराज साहनी, मधुबाला, मीनाकुमारी, गुरुदत्त, नूतन आदी कलाकार भूमिका समजावून घेऊन ती आपल्या सहजसुंदर नैसर्गिक अभिनयाने जगण्याचा जो अनुभव देत असत तीच मेथड ॲक्टिंग. आणि यातला सार्वकालिक बाप माणूस म्हणजे दिलीपकुमार ! या उद्बोधनानंतर, कुठल्याही नव्या विषयात आकंठ बुडण्यात पटाईत असलेले आम्ही मागे हटतो की काय ? उणेपुरे ६५ सिनेमे बघायला कितीसा वेळ लागतो...

अर्थात युट्युब, नेटफ्लिक्सच्या अभावात, दूरदर्शनवर दाखवले जाणारे जुने सिनेमे, ते लावणारे थिएटर आणि मिळाल्याच तर व्हिडीओ कैसेट यावरच सारी भिस्त असल्याने आम्हाला हे मिशन काही सहजासहजी पुरे करता आले नाही. तरीही मिळाले तेवढ्या भांडवलावर दिलीपकुमारला आमच्या आवडत्या अभिनेत्यांच्या यादीत अत्युच्य स्थान देणे सहज शक्य झाले. त्याच्या फिल्मोग्राफचा आमचा प्रवास उलटा... म्हणजे ‘सौदागर, कर्मा, विधाता, मशाल, शक्ती, क्रांती’ पासून ‘राम और श्याम, लीडर, मुगल-ए-आज़म, गंगा-जमुना, मधुमती, नया दौर, देवदास’... असा असला तरी दिलीपकुमार आवडण्याचा आमचा क्रम सरळ आणि चढताच राहिला आहे.

सहअभिनेत्रींमध्ये देविकाराणी, वैजयंतीमाला, मधुबाला ते लीना चंदावरकर असा ६ दशके पसरलेला पैस, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे ८ फिल्मफेअर पुरस्कार, किशोर कुमार पुरस्कार, असंख्य (न)कलाकारांचा प्रेरणास्त्रोत आणि कोट्यावधी प्रेक्षकांचा हृदयस्वामी असलेला दिलीपकुमार ‘दीदार’ ‘देवदास’ मुळे ‘ट्रॅजेडी किंग’ ठरला असला तरी कुठल्याही चौकटीत बंदिस्त नव्हता. त्याने ‘नया दौर’ बनवून जी वाट प्रशस्त करून दिली तीवरून चालतांना बहुतेकांना त्याची पायधूळ मस्तकी लावून आणि त्याच्या निसर्गदत्त ओरिजिनल प्रतिभेची प्रयत्नपूर्वक नक्कल करून आपली तुंबडी भरावी लागली.

केवळ अभिनयातच नाही तर आशय-विषयातही त्याच्या कलाकृतींनी नव्या दिग्दर्शकांना भुरळ पाडली. नसता, ऑस्कर पर्यंत मजल मारलेला आशुतोष गोवारीकरचा ‘लगान’ ‘नया दौर’वर बेतला नसता (‘सुन मितवा...’ हे गाणे ‘साथी हाथ बढाना...’ची सही सही नक्कल आहे आणि ‘परफेक्शनिस्ट’ आमिरचा ‘भुवन’ हा ‘नया दौर’ मधल्या ‘शंकर’चा जुळा भाऊ शोभतो) आणि मूळ चित्रपटाच्या कित्येक पट पैसे खर्चलेला, भव्यदिव्य सेट्स आणि संगीतनृत्याने फटी बुजवण्याचा प्रयत्न करणारा आणि अभिनयाची पराकाष्ठा करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करणारा शाहरुख आणि संजय लीला भन्सालीचा ‘देवदास’ माधुरी, ऐश्वर्या, जैकी श्रॉफ एवढी तगडी स्टारकास्ट असूनही शरत्च्चंद्र चटोपाध्याय, बिमल रॉय आणि दिलीपकुमारच्या साध्याच, लो-बजेट, कृष्णधवल पण अत्यंत खऱ्याखुऱ्या उत्कट आणि भावविव्हल ‘देवदास’च्या पासंगालाही पुरला नाही. उलट स्वत:ला सुपरस्टार समजणाऱ्या मिमिक्री किंगच्या मर्यादा त्यामुळे ठसठशीतपणे स्पष्ट झाल्या.

शेवटी, केवळ तीन गोष्टी ज्या या महानायकाला इतरांपेक्षा वेगळा आणि प्रणेता ठरविण्यास पुरेशा आहेत – दिलीपकुमारला अभिनय करावा लागला नाही, तो प्रत्येक भूमिका समजून-उमजून अक्षरश: जगला म्हणूनच त्याचे अनुकरण करून त्याच्या पुढच्या पिढीतील अभिनेत्यांना आपापल्या कारकिर्दीची सुरवात करावी लागली, हे एक !

‘बैराग’च्या अनुभवाने त्याने आपली बदलेली भूमिका समजून घेतली आणि ‘शक्ती’पासून आपली मुख्य अभिनेता ते सहअभिनेता (‘चरित्र अभिनेता’ हे संस्करण आम्हाला फारच विचित्र वाटते, त्यामुळे इतर अभिनेत्यांना ‘चरित्रहीन’ म्हणायचे की काय अशी एक कुशंका आमच्या चिकित्सक मनाला येते!) ही बदलेली ओळख तेवढ्याच ताकदीने केवळ स्वीकारली नाही तर अक्षरश: गौरवीली. अन्यथा, पोरगेलेसे अनिल कपूर (मशाल) आणि विवेक मुश्रन (सौदागर) तर सशक्त, स्वत:ला सिद्ध केलेले अमिताभ (शक्ती) आणि शत्रुघ्न सिन्हा (क्रांती) हे लौकिक अर्थाने नायक असतांना ते चित्रपट दिलीपकुमारने आपल्या अनुभवी, कणखर खांद्यांवर पेलले नसते. आपल्या भूमिकेबद्दल अत्यंत चोखंदळ असणे हे वैशिष्ट्यही मूलत: दिलीपकुमारचेच... मग 'बैराग' त्याला निमित्त ठरत असला तरी !

‘शतकाचा महानायक’ म्हणून गौरवला गेलेला, आमचा लाडका हिरो अमिताभ म्हणतो की हिंदी चित्रपटांचा इतिहास लिहायचा झाल्यास तो दोन स्पष्ट भागात लिहावा लागेल – दिलीपकुमारपूर्वी आणि दिलीपकुमारनंतर ! आजवरच्या हिंदी सिनेमातील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी सुपरस्टारच्या या एका विधानातच खरतर सारे काही आले, तरी सगळ्यांच्या माहितीकरता आणि नोंदीकरता येथे हे सांगणे उचित ठरावे –

आज भयंकर ग्लॅमर आणि अफाट पैसा मिळविणाऱ्या आणि त्याच्या जोरावर काहीही करू धजावणाऱ्या सिनेनटांना, हा मार्ग प्रशस्त करून दिला तो दिलीपकुमारने... अभिनेत्यांनी दिग्दर्शकाकडे मासिक वेतनावर काम करण्याची प्रथा मोडीत काढून, अभिनेत्याने आपल्या कामाचे ‘मानधन’ आपण ठरविण्याची नवीन रीत सुरु करून त्याने आपल्या पुढल्या पिढ्यांना मान आणि धन दोन्ही मिळवता येईल याची सोय करून दिली...

तेव्हा त्या अर्थानेही ‘नया दौर’ घडविणारा या ‘आझाद’चा ‘अंदाज’ ‘निराला’ होता हे काय सांगायला हवे ? आमच्या लेखी हिंदी चित्रपटांच्या १०० वर्षांच्या इतिहासात केवळ दोनच खरेखुरे सुपरस्टार झाले ज्यांनी प्रवाहपतीत न होता प्रवाहाला वेगळे वळण देण्याचा यशस्वी प्रयत्न केला... त्यातील एक अध्याय आज संपला !

हिंदी सिनेमाचा आजवरचा स्वयंभू सम्राट आणि जंटलमन महानायकाला अखेरचा दंडवत... अलविदा दिलीपसाब...!

रविवार, ४ जुलै, २०२१

कौशल्य...!


कबीर विणकर होता, हातमागावर कापड विणत असे. रोजच्या उदरनिर्वाहासाठी लागेल एवढे वस्त्र रोज विणावे आणि बाजारात तेवढे दाम मिळाले की विकून घरी परतावे असा त्याचा शिरस्ता होता.

एक दिवस विणलेले वस्त्र ५ मुद्रांना विकून परतावे म्हणून बाजारात उभा राहिला. सकाळची दुपार आणि दुपारची संध्याकाळ होत आली तरी त्याच्या वस्त्रास कुणी २ मुद्रांपेक्षा अधिक देण्यास तयार होईना.

हताश झालेल्या कबीराची अवस्था पाहून एका कुशल विक्रेत्याला त्याची दया आली. विक्रेत्याने त्याच्याकडचे वस्त्र घेतले आणि बाजाराच्या चौकात उभे राहून हाळी दिली,
‘लोकहो, बघा, बघा ! या वस्त्राची पोत बघा, रंग बघा आणि किती तलम आहे ते तरी बघा. इतके सुंदर वस्त्र, जे एरवी तुम्हाला बघायलाही मिळणार नाही ते, फक्त आणि फक्त १२ मुद्रांना उपलब्ध आहे, अशी सुवर्णसंधी हातची घालवू नका !’

त्याच्या या जाहिरातीला भुललेल्या लोकांची एकच झुंबड उडाली आणि विक्रेत्याने ते वस्त्र १२ मुद्रांना हातोहात खपवले. पांगापांग झाल्यावर विक्रेता कबीराकडे आला आणि म्हणाला,
‘बघितलस ? असं कौशल्य लागतं विकायला. तुला ५ मुद्रांची अपेक्षा होती, या घे १०, दामदुप्पट ! माझ्या दलालीच्या २ मुद्रा मी ठेवतो !’

कबीर हात जोडून म्हणाला, ‘महाराज, माझ्या कामाची आणि माझ्या उत्पादनाची किंमत मला माहितीय आणि मला तेवढीच अपेक्षित आहे. वरची ‘कमाई’ ही आपल्या ‘कौशल्या’ची आहे, तेव्हा ती आपणच ठेवा आणि मला माझ्या ५ मुद्रा द्या म्हणजे मी निघतो...!’

शनिवार, २६ जून, २०२१

गोधडी...!

प्रिय दिना,

चपळपण मनाचें मोडितां मोडवेना ।
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा ।
म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥

ज्याला हे समजते, उमजते आणखीन साधते तोचि एक समर्थ बाकी सगळेच असमर्थ! जगात असे काय आहे ज्याला समर्थ-स्पर्श झालेला नाही…?तरीदेखील आपल्या अल्पबुद्धीनुसार या अनंत अनाकलनीय पसाऱ्याचा अर्थ लावतांना कधी कधी विपर्यास होणार तर कधी बुद्धिभेदहेतू प्रामाणिक आहे आणि प्रयत्नात खोट नाही तोवर सारेच क्षम्य आणि स्वीकारणीय देखीलतेव्हा अप्रिय निसर्गक्रमाची फार विषादात्मक उजळणी नको आणि तपशिलांची अतिचिकित्साही. न पेक्षा चिंतन आणि प्रकटनाचे अधिष्ठान इतरत्र हलवावे आणि चपळ मनास अन्य विषयी गुंतवावे

सध्या एका प्रदर्शनानिमित्त सौ. स्वाती, आदित्य आणि काकूंसह पुण्यास वास्तव्यास आहे आणि त्यांचा मुक्काम १८ पर्यंत असेल असे 'विश्वसनीय' सूत्रांकडून समजते. कुमार काका स्वत:हून अशा सुवर्ण संधीचा लाभ घेतील व ती साजरी करण्यास मित्रांना आमंत्रित करतील अशी अपेक्षा करणे म्हणजे 'मी शाकाहारी आहे म्हणून सिंह मला खाणार नाही' अशा आत्यंतिक भाबडेपणाच्या कल्पनारंजनासारखे ठरावे. तेव्हा आपल्या अति महत्वाकांक्षी सवंगड्यांकडून अधिक अपेक्षा न करता आपण स्वत:हून नासिक वारी करावी काय असा विचार होतोयआपली काय भूमिका…?

बदलेल्या विषयाच्या उत्तरार्थ 'वेगळ्या' प्रतिसादाच्या अपेक्षेत… 

मनीष   

----------------------------------------------------------------------- 

उपरोक्त पत्राच्या मायन्यातील दिना म्हणजे आमचा जीवलग, प्राणसखा, परममित्र दिनेश मनोहर चंद्रात्रे जो आज पन्नाशीचा होतोय! (त्याच्या नावाआधी लावलेल्या प्रत्येक विशेषणाला एक वेगळा, सघन आणि हृद्य संदर्भ आहे, त्यांचे प्रयोजन साहित्यिक सौंदर्यापेक्षा आत्मिक अनुभूतीशी जवळीक सांगणारे असल्याने साऱ्यांनाच त्यांची स्पंदने जाणवतीलच असे नाही आणि म्हणूनच तशी अपेक्षाही नाही!) आमच्या जवळपास चाळीस वर्षांच्या मैत्रीच्या सप्तरंगी गोधडीत सगळ्यात ठसठशीत रंग असेल तर तो निरंतर (अक्षरश:!) संवादाचा आणि साऱ्या तुकड्यांना घट्ट धरून ठेवणारा धागा असेल तर तो निर्हेतुक (तंतोतंत!) स्नेहाचा... बंधुसखा कुमार, दिना आणि मी हे त्रिकूट शालेय जीवनापासून एकत्र होते आणि आज कुमार आणि मी आपापल्या प्राक्तनाने (की कर्माने?) धुळ्याच्या विरहात इतरत्र स्थायिक असतांनाही दिना, त्याच्या धारणांवर असतो तसाच, धुळ्यात ठाम आहे! मी नव्वदच्या सुमारास पुण्यास आल्यापासून आमचा पत्रसंवाद सुरु झाला आणि आज गेली तीन दशके तो शेकडो पत्रांच्या माध्यमातून निरंतर सुरु आहे आणि... राहील! वरील पत्र हे त्याच मर्मबंधातल्या ठेवीतील एक मोरपीस...

कुमारला जन्मत:च कलेची अलौकिक दैवी देणगी लाभल्याने त्याला अविष्कारांसाठी साधनांची कधीच कमतरता नव्हती... नाही, आम्हां दोघांचे तसे नव्हते. शाळेत निबंध लिहिण्याची आवड आणि वक्तृत्व, रंगमंचीय अविष्कार यातील गोडी यामुळे माझी हाती लेखणी आली आणि मी अखंड बोलू आणि मनसोक्त लिहू लागलो. दिनाने यथावकाश या दोन्ही माध्यमात मुशाफिरी केली आणि त्याच्या काही स्केचेस आणि विशिष्ट कवितांनी कुमारला आणि मलाही भुरळ घातली. दिनाच्या अत्यंत संवेदनशील मनाची तेवढीच आर्त ही एक अभिव्यक्ती बघा...    

दोन शब्द बोलण्यास येथे त्यांना उसंत नाही
माझी ही कहाणी कुणास ही पसंत नाही

सुई धाग्याने विणू म्हटले नात्यांचे वस्त्र
टोचून घेण्यास माझ्या, जरा ही अंत नाही

पानगळ, झळांची मला झाली पुरती सवय;
ऋतुचक्रात माझ्या आता उरला वसंत नाही

परिघाकडून केंद्राकडे प्रवास हा अटळ
सहनशील क्षितिज माझे अनंत नाही

कर्म-भोग घेऊन शिरी, जरी चालतो एकला;
क्रुसावर हासणारा, मी मुळीच संत नाही!

या बरोबरच दिनाने मला लिहिलेली असंख्य पत्रे हा मराठी भाषा समृद्ध करणारा वस्तुपाठ ठरावा. कविता आणि पत्रे याबरोबर दिनाने काही ललित लिहिण्याचा प्रयत्न केला आणि तो समृद्धी अर्थात ‘समू’साठी असल्याने जेवढा भावविभोर तितकाच उत्कट आणि संवादी झाला नसता तरच नवल...

 गेल्या वर्षीपासून मनुष्य जमातीवर विषाणूचे जे अभद्र सावट पडले आहे त्याची झळ दिनालाही बसली आणि त्याच्या अतिसंवेदनशील मनाने त्याची नोंद घेतांना त्याच्या मूळ विरक्त वृत्तीने उचल खाल्ली. या संदर्भात त्याने अगदी अलीकडे लिहिलेल्या ‘काही नोंदी समूच्या...’ ला दाद देण्यासाठी जी कविता मी त्याला धाडली होती ती आजच्या दिवसासाठी मी राखून ठेवली होती... आज दिनाच्या पन्नाशीनिमित्त त्याला या कवितेची सस्नेह भेट...

लयाची खंत नको

मागे उत्पत्ती उभी

सूर्य अस्तास जाता

नवी चंद्रकोर नभी...!

 

ओहोटी अन पानगळ

ऋतुचक्र अक्षत राहे

भरतीचा वसंत येता

चैतन्य भरून वाहे...!

 

काही लयास जाते तसे

उगवते रोज नवे काही

शून्यातून उमलते

शून्यातले अर्थवाही...!

 

दिना, आज सकाळच्या संदेशात म्हटले तसे...

“पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि

नाबाद शतकासाठी मन:पूर्वक शुभेच्छा...!”

 

नेहमीप्रमाणे... अजून बरेच बोलायचे, लिहायचे, सांगायचे, ऐकायचे आहे... 

पुन्हा कधीतरी...

रविवार, ६ जून, २०२१

म्होरक्या...!

शरद ऋतूचा काळ होता. आदिवासी आपल्या म्होरक्याकडे गेले. या वेळी हेमंत आणि शिशिरात थंडी कशी  पडेल कडक, सौम्य की नेहमीसारखीच, विचारायला. म्होरक्या मूळचा आदिवासीच असला तरी आधुनिकतेची झळ बसल्याने, निसर्गाशी नाळ अगदीच तुटली नसली तरी पूर्वीसारखी घट्टही राहिली नव्हती. त्यामुळे आकाशाकडे बघून, मातीला नाक, कान लावून आणि वाऱ्याच्या स्पर्शातून पूर्वी जसे वातावरणाचा अंदाज बांधता येई तसा अलीकडे येईनासा झाला असल्याने म्होरक्याला स्वत:चीच खात्री वाटेनाशी झाली होती !

परंतु तो म्होरक्या असल्याने लोक त्याच्याकडे आशेने बघताय म्हणतांना त्याला भाकीत वर्तवणे क्रमप्राप्तच होते. तेव्हा त्याने, हुशारी आणि सतर्कता या आपल्या नेतृत्वगुणांच्या आधारे, लोकांना सांगितले, ‘या वर्षी थंडीचा कडाका चांगलाच असणार आहे तेव्हा तुम्ही सारे आतापासून लाकडे गोळा करून ठेवाल तर बरे !’

आपल्या लोकांना असे सांगितले तर खरे पण आपणही खात्री करून घ्यावी म्हणून म्होरक्याने जवळच्या गावातल्या पोस्टात जाऊन वेधशाळेला दूरध्वनी केला आणि ‘या वर्षी हिवाळा कसा असणार आहे ?’, विचारले. वेधशाळेने सांगितले, ‘या वर्षी हिवाळा कडक असणार असे दिसतंय !’

म्होरक्या आपल्या लोकात परतला आणि त्यांना आणखीन लाकडं गोळा करण्याच्या सूचना दिल्या.

एका आठवड्याने म्होरक्या पुन्हा पोस्टात गेला आणि वेधशाळेशी संपर्क करून म्हणाला, ‘यावेळी कडाक्याची थंडी पडणार आहे असेच आपली यंत्रणा सांगतेय ना ?’ वेधशाळा म्हणाली, ‘अलबत ! या वर्षीचा हिवाळा मोठा कठीण असणार आहे !’

म्होरक्या पाड्यावर परतला आणि आपल्या माणसांना म्हणाला, ‘मित्रांनो, अगदी बारकाईने शोध घ्या आणि लाकडाचा एक एक तुकडा, झाडाचे खोड, ढलपी, फांदी, काडी-कचरा, जे मिळेल ते जमवून ठेवा !'

सुमारे दोन आठवड्यांनी म्होरक्या पुन्हा पोस्टात गेला आणि वेधशाळेशी संपर्क करून म्हणाला, ‘तुम्हाला नक्की खात्री आहे ना की यावर्षी फारच कडाक्याची थंडी पडणार आहे ?’ वेधशाळा म्हणाली, ‘आता तर प्रश्नच उरला नाही, या वर्षी कदाचित शतकातली सर्वाधिक गोठवणारी थंडी पडणार असे दिसतेय !’

‘तुम्हाला एवढी खात्री कशामुळे वाटतेय...?’ म्होरक्याने विचारले.

वेधशाळा म्हणाली, ‘आदिवासी वेड्यासारखे लाकडं गोळा करताहेत...!’

 ---------------------------------------------------------------------------------

पोस्ट पूर्णपणे अराजकीय असून केवळ कार्यकारणभाव समजून घेण्याचा वस्तुपाठ म्हणून सांगितली आहे. फारतर कालच्या विश्व पर्यावरण दिवसाचा ‘उपसंहार’ (आजच्या प्रच्छन्न चंगळवादी काळात किती समर्पक !) समजायला हरकत नाही.

तथापि या निमित्ताने तीन गोष्टींचा उहापोह करायला हरकत नसावी - 

- माणसाची भविष्याचा ‘वेध’ घेण्याची कमकुवत होत चाललेली कुवत.
- समूहांच्या नियोजनातील माणसाची अक्षम्य धोरणशून्यता आणि कमालीचे परस्परावलंबित्व.
- नैसर्गिक परिसंस्थेचा अतिसामान्य (खरतर नगण्य!) घटक असूनही तीवर स्वामित्व गाजविण्याची माणसाची राक्षसी लालसा.

वाचा आणि विचार करा... आधी विचार, मग आचार आणि यथावकाश व्यवहार !