रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

‘राम’...!


रामायण हे केवळ एक महाकाव्य नव्हे तर ते एक तत्वचिंतन आहे जे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात शोधू शकतो...

‘रा’ म्हणजे प्रकाश आणि ‘म’ म्हणजे आतला. ‘राम’ म्हणजे आतला प्रकाश, अर्थात आपले अंतर्मन किंवा अस्तित्वाचे भान...! कसे ते पाहू या... 

'श्रीराम' हा राजा 'दशरथ' आणि राणी 'कौसल्या' यांचा जेष्ठ पुत्र. दश रथ म्हणजे ज्याच्याकडे दहा रथ आहेत. हे दहा रथ प्रतिक आहेत पाच 'ज्ञानेंद्रीये' आणि 'पंचेद्रीये' यांचे. कौसल्या म्हणजे कुशल. दहा रथांचा कुशल वापर ‘रामा’सारख्या तेजस्वी पुरुषोत्तमास जन्म देतो!

रामाचा जन्म अयोध्येत झाला. अ-योध्या म्हणजे जेथे युद्ध घडू शकत नाही. जिथे संघर्षाला, वैराला, विषादाला स्थान नसते असे मन शुद्ध असते आणि शुद्ध मनात कायम प्रकाशाचा, तेजाचा, ज्ञानाचा वास असतो!

अंतरात्मा हा ‘राम’ आहे आणि आपले मन हे ‘सीता’. श्वास किंवा प्राण जी आयुष्याची दोरी आहे तो वायुपुत्र ‘हनुमान’, विवेक हा ‘लक्ष्मण’ तर अहं हा ‘रावण’! ‘अहं’ जेव्हा ‘मना’चे हरण करतो तेव्हा ‘आत्मा’ कष्टी होतो. परंतु आत्मा स्वत:हून मनापर्यंत पोहचू शकत नाही, त्यासाठी त्याला प्राणाची गरज लागते. संपूर्ण 'विवेक'भानाने आणि 'प्राणा'च्या सहाय्याने 'आत्मा' आणि 'मन' यांचे पुनर्मिलन घडते तेव्हा 'अहं' नष्ट होतो... 

बघा तुमच्या अनुभवाशी जुळतंय का...?

शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

पसारा...!


घरातील कुठल्याही कपाटाचं दार उघडलं कीछोट्या पल्ल्याच्या अनधिकृत पण (म्हणूनच?) लोकप्रिय प्रवासी गाड्यांमध्ये दाटीवाटीने बसलेल्या पैंसिंजरांनी दार उघडताच बाहेर सांडावे अशा पद्धतीने अंगावर धावून येणारी बोचकी हे 'समृद्धीचं लक्षण मानायचंसंग्रही वृत्तीचं की गलथानपणाचं?' या विषयी प्रत्येकाचे स्वतंत्र मत असणे स्वाभाविकच. पुण्यात तर ती वास्तव्याची पूर्वअटच असते... ओसंडून वाहणारी कपाटे नव्हेस्वतंत्र मत असणे आणि ते कुठलाही विधिनिषेध न बाळगता जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी आणि चौकी चौकी ('चार रस्त्यांच्या छेदनबिंदूवरया अर्थानेगैरसमज नसावा!) उच्चरवात व्यक्त करणे! या विषयावर पीएचडी देखील करण्यास एखादा बाजीराव पुणेकर सरसावणारच नाही असे नाही. नाहीतरी अलीकडे वर्तमानपत्रांच्या सौजन्याने 'आपण यांना पाहिलंत का?', 'यंदा कर्तव्य आहेकिंवा 'निधन वार्तायांच्या तोडीस तोड, अंनत आणि अतर्क्य विषयात पीएचडी मिळविलेल्या महाभागांच्या सस्मित मुखकमलाचे रोज घरबसल्या दर्शन होते आणि सकाळ उजळून निघते. अन्यथा एवढ्या प्रकांडपंडितांना एकत्र बघण्याचा योग यायला सिंहस्थाचीच वाट बघायला लागायची! आता हे सारे विद्वान राष्ट्रउभारणीतसम्यक विकासात किंवा गेलाबाजार सोसायटीच्या गणेशोत्सवात काय योगदान देतात असले टवाळखोर प्रश्न ज्यांच्या डोक्यात येतात त्यांना ‘तुह्यी यत्ता कंची?’ असे विचारून मोकळे व्हावे. नाहीतरी अशा विवेकाची मिजास दाखविणाऱ्या अनाठायी प्रश्नकर्त्या मुक्तात्म्यांचे काय करायचे असते याचे 'प्रयोगातून विज्ञानअलीकडे सप्रात्यक्षिक शिकवण्याचे असिधारा व्रत महाराष्ट्रातील काही समाजसुधारकांनी घेऊन 'स्वच्छ भारत' साधना निरंतर चालवली आहेचतेव्हा अशा उन्मत्त विवेकखोरांकडे फार लक्ष द्यायचे कारण नाही. मुद्दा काय तर कपाट... नव्हेओसंडून वाहणारे कपाट! 

'लागेल कधीतरीच्या अत्यंत व्यवहार्य कारणांपासून सुरु होणारीकुठलीही वस्तूच काय चिंधीही टाकून न देण्याची वकिली, 'माझ्या मावशीने स्वतः:च्या हाताने बनवून माझ्या रुखवतात दिली होतीअशा भावनिक वळणांवरून अगदी, 'शेवटी सारचं नश्वर आहे म्हणून कुणी जगणं सोडतं का?' च्या तत्वचिंतनाशी सलगी करते पण ती चिंधी असंख्य प्रमोशन-डिमोशन पचवूनही रिटायरमेंटमध्ये जात नाही. 'नवे ते हवेआणि 'जुने सोडवत नाही'च्या संयोगातून कपाटे फुगत राहतात आणि अगदीच टेकीला येऊन ‘आत्ता प्रसवतील’ अशी झाली की नवीन कपाटाचा कपटी प्रस्ताव येतो. नवीन कपाटाला जागा नसेल तर ' मोठ्ठ घर घ्या कधीतरीने सुरु होऊन ‘किती चांगली स्थळ आली होती मला’ आळवणरा राग 'माझं मेलीचं नशिबचं फुटकं 'च्या समेवर येईतो नामधारी 'कर्त्यापुरुषाचा पार ‘जोगिया’ झालेला असतो. याची देही याची डोळा सदेह विरक्ती म्हणजे काय याचा तो जिताजागता नमुना मग निमूट नवीन कपाटाच्या तयारीला लागतो आणि आपल्या घराण्याचा उद्धार टाळण्याचा पुन्हा एकदा केविलवाणा प्रयत्न करतो.

या सगळ्याला पुरून उरणारा (अक्षरश:) पुरुष हा खरा पुरुषोत्तम! अरेवानरसेनेच्या मदतीने समुद्रात सेतू बांधणं काय अवघड आहेआमचे कित्येक राजकारणी तर त्यांच्या चमत्कारी कंत्राटदारांच्या हातून अदृश्य पूल रातोरात बनवू शकतात किंवा असलेला रस्ता हातोहात अदृश्य करू शकतात. त्या वनवासी रामाला म्हणावं बायकोला हवी असलेली हरेक वस्तू मिळवण्याचासांभाळण्याचा आणि प्रत्येकवेळी तिचे (वस्तूचे; बायकोचे अनुस्यूत असते हे ज्याला समजत नाही तो मुदलात लग्न करण्यास नालायक ठरावा!) मनापासून कौतुक करण्याचे शिवधनुष्य उचलून दाखव तर तू खरा पुरुषोत्तम! नुसत्या कांचनमृगाने काय होते, इथे साक्षात इंद्राला ‘हा ऐरावत जरा अशक्त आणि फिकाच वाटतोय, यातला जरा गुटगुटीत आणि गोल्डन फिनिशमध्ये आहे का हो?’ विचारून आधीच डळमळीत असणाऱ्या त्याच्या आसनावरून साफ भुईसपाट करण्याचे सामर्थ्य बाळगणाऱ्या आमच्या रणरागीणींची एक हौस भागवून दाखव म्हणावं! आख्ख्या तुळशीबागेची संभावना ज्यांना ‘छे बाई, इथे काही व्हरायटीच नाही!’ इतक्या सहजतेने करता येते त्या महिलावर्गास वनवैभवाची काय पत्रास? यांच्या शॉपिंगने नाही तुला ‘राम’ म्हणायला लावले तर पैसे परत!

असो, तूर्तास मुद्दा असामान्य महिला शक्ती किंवा त्यांचे असाधारण तोलमोल कौशल्य हा नसून त्यांनी ज्या गरीब बिचाऱ्या दुकानदारांवर मेहरबानी करून वस्तू स्वरुपात जे काही स्वीकारले आहे त्याच्या जपणुकीसाठी, सतत पाळणा हलता ठेवणे ही आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता समजणाऱ्या कुटुंबातली बाई जशी कायम ‘बाळसेदार’ भासते, तसे ‘कायम गर्भार असणाऱ्या कपाटांचे एकूणच आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अभिसरणातील स्थान’ असा आहे. चर्चा कितीही फुटकळ आणि अतार्किक असली तरी नाव भारदस्त असलं की ती आपोआपच बौद्धिक व वैचारिक ठरते असे गुह्यज्ञान, वर्षभरात चौथ्या चैनलशी लगीन लावलेल्या माझ्या एका सुप्रसिद्ध दूरदर्शन सूत्रसंचालक मित्राने मला अलीकडेच दिले. त्याचे नाव खोटे असले तरी तो सांगतोय ते खरे असावे! तर ही असली कपाटे नेमके कशाचे निदर्शक आहे आणि या समस्येवर (कुणाच्या?) कायमस्वरूपी तोडगा काय अशा विचारमंथनातून हाती आलेले हलाहल नदीत सोडून तिथे आधीच गुदमरणाऱ्या असंख्य पीओपी बाप्पांना 'निळकंठ' करण्याचे पातक नको म्हणून हे मुक्त चिंतन!

ज्या वस्तू गेल्या सहा महिन्यात लागल्या नाहीत त्या इतर संग्रहणीय ठिकाणी (पक्षी: पोटचा माळा किंवा बेडचे पोट) हलविणे; वर्षभरात न लागलेल्या गोष्टींचे ऑडीट करणे आणि त्याहून अधिक काळ अस्पर्श राहिलेल्या वस्तूंना मुक्ती देणे एवढी साधी, सोपी आणि ‘वस्तुनिष्ठ’ त्रिसूत्री बरीच अडगळ हातावेगळी करू शकते. मोकळ्या झालेल्या जागेत सोईस्कर मांडणी करून अनेक गोष्टींना मोकळी हवा लागू शकते. हं, आता प्रत्येक गोष्टीत ‘एव्हढ सोपं नसत ते!’ असाच पवित्रा घेतला तर कुठल्याच पसाऱ्याला कधीच मुक्ती मिळणार नाही. आणि जुन्या कालबाह्य आणि म्हणून निरुपयोगी गोष्टी टाकून देण्याचं धैर्य दाखवलं नाही तर मोकळा श्वास घ्यायला नवीन सुखांना जागाच मिळणार नाही. शेवटी अडगळ आणि पसारा हा फक्त कपाटातच असतो अस थोडीच आहे? आठवणी, तर्कटं आणि विषाद मनात कमी पसारा करत नाहीत. क्षण, संदर्भ आणि नाती जतन करून वाढत नाहीत आणि टाकून देवू म्हणून तुटत नाहीत. तिथे आईच्या ममत्वाची नित्य आणि निरपेक्ष पखरणच हवी. 'जोपासना' शब्दात जेवढी 'उपासना' अनुस्यूत आहे तेवढेच 'तपस्या' शब्दात 'तप'... सहानुभूती मधली अनुभूती ‘सह’ शिवाय भूतदया ठरून करुणेच्या यादीत मोडते आणि ‘भावने’त ‘सत्’ नसेल तर 'सद्भावना' हा फक्त उपचार ठरतो.

गौरी सासरी गेल्या, गणपती अद्याप विराजमान आहेत आणि नवरात्र तोंडावर आलेय. मग? करू या एकदा आवराआवर आणि बघू या किती प्रसन्न वाटत ते...? चला लागा कामाला! तेव्हढेच आपलेही 'स्वच्छ भारत' अभियानाला योगदान, काय...?!!

सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

श्रीगणपतिस्तोत्रं


प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥

द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||

शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

भीनी भीनी भोर...!भीनी भीनी भोर...
बर्‍याच दिवसांनी ऐकल...
योग्य वेळेस पाठवलस आणि ऐकता आलं.
सकाळी आठ च्या सुमारास.
सुरवातीचा पक्ष्यांचा, गायींचा आवाज, एकदम सुरात.
ते संपता संपता तानपुरा अस्पष्ट पणे वाजायला सुरवात होतेे...
षड्ज व मंद्र पंचम; वातावरण निर्मिती होते.
स्वरमंडल टाइप वाद्य त्यात अजून सुर भरतं, बर्फाच्या गोळ्यावर गोड लाल सरबत छिडकल्यासारखं!
संतूरचा फक्त भास होण्या इतपतच वापर.
...आणि आशाताईंचा षड्ज अवतरतो....
त्याबद्दल लिहाव तितकं थोडं!
मंद्र सप्तकातल्या निषादावर हलका स्पर्श करत, कोमल धैवता पर्यंत जाऊन वर कोमल रिषभ,गंधार व तीव्र मध्यम दाखवत तोडी रागाचं रूप दाखवत आशाताई पुढे सरकतात.
भीनी उच्चारताना सा पं पंपं अशा रीतीने पंचम घेऊन मियाँ की तोडी कन्फर्म करतात.
मग पुढे काय होतं ते नुसत ऐकावं!
साथीला फ्लूट, सितार, वायोलीन आदिंची रेलचेल.
मधे सरगम घेताना मात्र आशाताईंनी पंचम टाळलाय...
जरासी शरारत...
इति!

[व्हॉटसप मेसेज]