मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

सन्मान...!


२७ जानेवारी, १६ ऑगस्ट आणि ३ ऑक्टोबर या तीन दिवसात काय साम्य आहे? या तीनही दिवशी वर्तमानपत्र नसल्याने आणि इतर कधी चुकून उशीर झालाच तरच आपल्याला पेपरवाल्याकाकांची आठवण होते आणि त्यांचा नंबर शोधावा लागतो. एरवी महिन्यातून फक्त एकदा बिलाच्या निमित्ताने त्यांची ओझरती भेट होते. त्यशिवाय हा, आपल्या अस्तित्वाची फारशी चाहूलही लागू न देणारा, समाजबांधव पहाटेच्या धुक्यात मूकपणे आपले कर्तव्य आत्यंतिक निष्ठेने पार पाडीत असतो...!


वृत्तपत्र विक्री हा उद्योग कुठल्याही पारंपारिक व्यवसायाच्या चाकोरीत न बसणारा, नोकरी या सदरात मोडू न शकणारा आणि समाजसेवा म्हणून मान्य न होणारा असल्याने; अन्यथा अत्यंत सुसंघटीत असलेल्या या कामगारांना असंघटीत कामगारांसाठीच्या तरतुदी, कायदे आणि योजनांच्या निकषात बसविणे हे तसेही अप्रस्तुतच ठरावे. सिक्स सिग्मा कार्यप्रणालीच्या निकषांवर गौरविल्या गेलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांपेक्षा आणि तातडीच्या सेवा, म्हणजे अग्निशमन दल, पोलीस दल, रुग्णालय किंवा केंद्र शासनाच्या डाक विभाग यांच्या अहर्निशं सेवामहेया ब्रीदात कणभरही कमी नसलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सामाजिक योगदानाची यथायोग्य दखल घेतली जातेच असे नाही. 


माझ्या क्षमता विकसनाच्या एका कार्यशाळेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा परिचय झाला आणि या संघटन-कुशल, हाडाच्या कार्यकर्त्यांनी लवकरच त्या परिचयाचे स्नेहात रूपांतर केले आणि आमचा स्नेहबंध दृढ होत गेला. वृत्तपत्र विक्रेत्यांना ज्या विपरीत परीस्थितीत आणि अपुऱ्या संसाधनांसह काम करावे लागते त्याची माझी अल्प जाणीव या निमित्ताने समृद्ध झाली. शासनाने या समाजबांधवांच्या सामाजिक सुरक्षेच्या मागण्यांच्या अभ्यासासाठी नेमलेल्या अभ्यास समितीने अहवाल सादर करावा असा शासन निर्णय झाला. सदर अहवालाचे लेखन, संकलन आणि संपादन करण्याच्या निमित्ताने मला या समाजघटकाचा अगदी जवळून परिचय झाला आणि त्यांच्या मुलभूत समस्यांनी समाजरचनेचे एक वेगळेच आकलन दिले. खरतर हा अहवाल लिहिण्याच्या निमित्ताने मला आधीच खूप काही शिकता आले, जाणता आले.

ते माझे श्रेयस...

तेवढे पुरेसे वाटले नाही म्हणून की काय, संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. सुनील पाटणकर, सचिव श्री. बालाजी पवार आणि स्वत: वार्ताहर, वितरक असलेले संघटनेचे उपाध्यक्ष आणि या वर्षी सांगलीला पार पडलेल्या राज्यव्यापी प्रतीवार्षिक अधिवेशनाचे आयोजक आणि निमंत्रक श्री. विकास सूर्यवंशी यांनी त्या अधिवेशनात माझ्या सन्मानाचा घाट घातला. हे तिघे आणि, आपल्या निरपेक्ष स्नेहाने भारावून टाकणारे, संघटनेचे इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या अत्यंत कुशल नियोजनात पार पडलेल्या २७ जानेवारीच्या या अधिवेशनात, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांसाठी सतत आग्रही राहिलेले आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे, ठाण्याचे आमदार श्री. संजय केळकर यांच्या हस्ते आणि सांगलीचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ आणि पुढारीवर्तमानपत्राचे संस्थापक, मालक, संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांच्या उपस्थितीत एका हृद्य सोहळ्यात माझा असा फेटा घालून सत्कार करण्यात आला. मी अशा आदर-सत्कारास आणि मान-सन्मानास पात्र आहे की नाही मला ठाऊक नाही, पण इतक्या सुहृदांची माझ्या कुटुंबात भर पडली आणि सुमारे ३ लाख समाजबांधवांच्या आवाजाला शब्दबद्ध करून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याची संधी मिळाली...

हे माझे प्रेयस! 

...मुंबईची तुंबई झालेली असतांना रोजच्या वेळेवर आणि कोरडे वर्तमानपत्र पोहचविणाऱ्या ज्या व्रतस्थ समाजसेवकांना, या प्रजासात्तक दिनी पद्मभूषण पुरस्काराने गौरविलेल्या उद्योगपती आनंद महिद्रांनी अनसंग हिरोजसंबोधले त्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या, एरवी बेदखल रहाणाऱ्या कार्याची या निमित्ताने यथोचित दखल घेतली जावो आणि त्यांच्या अत्यंत वाजवी अशा मागण्या मान्य होवोत ही अपेक्षा, सदिच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना...

शुभम भवतु!

शनिवार, २५ जानेवारी, २०२०

गुजारीशे...!



पत्थरकी दिवारोंसे
टकराई मेरी गुजारीशे
सुननेवालोंमें काश 
कोई इन्सा भी होता...!

रविवार, १२ जानेवारी, २०२०

युवा...!



आज १२ जानेवारी, स्वामी विवेकानंदांची जयंती. १९८४ साली भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि १९८५ पासून आपण सारे भारतीय हा दिवस युवा दिन म्हणून साजरा करतोय. विवेकांनदांनी तरुणांच्या ठायी असलेल्या असीम ऊर्जेचे प्रवाहीकरण करण्याचे आणि युवकांचे निरंतर सत्याचा शोध घेण्याचे अथक प्रयत्न फलद्रुप होण्याचे जे उदात्त स्वप्न बघितले त्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने 'राष्ट्रीय युवा दिना'ची या तेजस्वी राष्ट्रभक्तास दिलेली ही अत्यंत समर्पक अशी मानवंदना ठरावी...!

आजच्या 'राष्ट्रीय युवा दिना'च्या प्रसंगी 'युवा' या संकल्पनेची माझी व्याख्या...      

ज्याला बदल हवा आहे,
तो प्रत्येक जण युवा आहे...!

वयाचा तारुण्याशी संबंध नाही
माणूस शिरविहीन कबंध नाही,
ज्याला रोजचा दिन नवा आहे,
तो प्रत्येक जण युवा आहे...!

जोश आहे अन आहे होशही
गुणांबरोबर असतील दोषही
मित्रांचा सोबत थवा आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!

कुठल्याही अन्यायाने व्यथित होतो
भावनावेगाने कधी स्तिमित होतो
वर्तनी विवेक तरी ज्याला हवा आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!

डोन्ट बी सायलेंट हे जसे जाणतो   
तसे डोन्ट बी व्हॉयलेंटही म्हणतो
समाजाला जोडणारा जो दुवा आहे 
तो प्रत्येक जण युवा आहे...!

सुखद भावनांचा मनी नाचता मोर
होतो थोडा गेय अन भाव-विभोर,
कधी रणवीर तर कधी बुवा आहे 
तो प्रत्येक जण युवा आहे...!

उभा जो इतिहासाच्या खांद्यावर
म्हणूनच बघू शकतो खूप दूरवर,
‘ग’ची न ज्याला बाधा देवा आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!

सजग आहे, सतर्क आहे, स्वतंत्र आहे
काव्य-शास्त्र-विनोदाचा स्वमंत्र आहे
जगन्मित्र दोस्त आपला भावा आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!

स्वातंत्र्याची ओढ आहे
जाणीवेची जोड आहे...
संस्कृती ज्याचा ठेवा आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!