रविवार, ३१ मे, २०२०

भान...!


पृथ्वीतलावरील समस्त मनुष्य जातीस वेठीस धरणाऱ्या 'करोनोविषाणूमुळे स्वत:च्याच घरात कैद करणाऱ्या 'लॉकडाऊन'चे पाचवे आवर्तन उद्यापासून सुरु होईल. या पाचव्या आवृत्तीमुळेकरोना आता आपल्या पाचवीलाच पुजलाय अशा धारणेने लोक 'सरपे कफन'च्या चालीवर, 'मुहंपे मास्कबांधून त्याच्याशी लढायला तयार झालेत. 'करोनानामशेष होणे नजीकच्या भविष्यात तरी शक्य नाही असे जैव वैज्ञानिक सांगत आहेत. तेव्हा, 'त्याला घाबरून किती काळ लपून बसणारत्यापेक्षा शक्य ती खबरदारी घेऊन जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणणे उचित!यावर सर्वच धुरिणांचे एकमत झालेले दिसते. तेव्हा तूर्तास तरी आपण या वळणावर न विसावता पुढील मार्गक्रमण टप्प्याटप्प्याने का होईना चालू करणार आहोत असे (शुभ?) संकेत मिळत आहेत.


लॉकडाऊनच्या या संपूर्ण काळात सगळ्यांना निवांत वेळ असेल आणि अंतर्मुख होण्यासारखी परिस्थिती आणि तेवढी सवड देखील असेल असे गृहीत धरून मंगळवार, दि. २४ मार्चला लिहिलेल्या ‘इष्टापत्ती’ने सुरवात करून मी त्यानंतरच्या प्रत्येक शनिवार-रविवारी ‘इनफीजम’चा प्रचार आणि प्रसार करणारे लेखन करण्याचा प्रयत्न केला जेणे करून, ‘याजसाठीं केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा...!’ ही तुकोबांची वाणी सार्थ ठरावी. आज मी या विषयाचा समारोप करण्यासाठी एक कविता सादर करतोय जिची प्रेरणा पुन्हा एकदा मला सन्मित्र दिनेशकडून मिळाली. यापुढेही माझ्या लिखाणाचा आशय-विषय आणि बाणा-बाज बदलणार नसला तरी यापुढे त्यावर करोनाचे आणि लॉकडाऊनचे सावट नसेल ही अपेक्षा!


स्वामी तिन्ही जगांचा
स्वत:स समजे जणू
नामोहरम करण्या
पुरला एक विषाणू...

निसर्गाचे चक्र अव्याहत
मोहर पहिल्या सारखा
आपल्याच कर्माने मात्र
माणूस माणसा पारखा...

हेही दिवस जातील
तशी संपेल भ्रांत ही
धडा मात्र विसरू नये
अन कर्म-सिद्धांतही...

सांभाळावी सुबुद्धी
अन संवेदनाही
अन्यथा फिरुनी
भेटेल वेदना ही...

कष्टकरीही भागीदार
विसर तयांचा न पडो
पुन्हा एकल्या वाटेवर
प्रवास त्यांचा न घडो...

मृत्युसमोर सारे एक
सद्गुणी आणि भ्रष्ट
समतेची गुढी उभारू
विषमता करण्या नष्ट...

विवेक बसू दे रक्षिण्या
विकार सारे भंगू दे,
प्रज्ञेचा जागर होता
सौहार्द्र हृदयी रंगू दे...!

जळूनी दंभ सारा
माणसास भान यावे
नवेन्मेशातून त्याने
निसर्गाचे गान गावे...!

शनिवार, ३० मे, २०२०

व्यत्यास...!


संध्याकाळच्या वेळी गावात पोहचलेल्या प्रवाशाने रात्री त्या गावातच मुक्काम करायचे ठरवले. आसपास वास्तव्यास चांगली जागा मिळते का याचा शोध घेत तो एका विश्रामगृहापाशी आला. मालकाशी चौकशी करून त्याने निर्णय घेण्यापूर्वी खोली बघण्याची इच्छा दाखवली आणि अनामत म्हणून काउंटरवर २००० रुपयांची नोट ठेवली.

पाहुणा खोली बघायला वर गेल्याबरोबर मालकाने ती नोट उचलली आणि बाजूच्या किराणा दुकानात जावून आपली २००० रुपयांची उधारी भागवली. किराणा दुकानदार ती नोट घेऊन तात्काळ घाऊक विक्रेत्याकडे गेला आणि त्याने आपली उधारी भागवली. घाऊक मालाच्या व्यापाऱ्याने ताबडतोब आपल्या मुलाला ते पैसे कर्जाच्या हप्त्यापोटी पतपेढीत भरायला पाठवले. पण २००० रुपये हातात पडल्याबरोबर मुलाला आपली विश्रामगृहाची उधारी आठवली आणि तो धावतच त्याच विश्रामगृहाच्या मालकापाशी पोहचला आणि तीच २००० रुपयाची नोट पुन्हा त्याच काउंटरवर पुन्हा एकदा विसावली.

प्रवासी मालकापाशी परतला आणि विश्रामगृहातील कुठलीही खोली आपल्या मनास आली नाही असे सांगून, एव्हाना अर्ध्या गावाचा प्रवास करून आलेली आपली २००० रुपयाची नोट उचलून चालता झाला.

तात्पर्य: कुणालाही प्रत्यक्षात काहीही लाभ झाला नाही पण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आणि उधार की जिंदगी चालू राहिली.

---------------------------------------------------------------------

काही खुलासे:

१. प्रस्तुत लेखकाने १६ मे २०२० रोजी लिहिलेल्या 'वर्तुळ' या लेखामध्ये  ज्या वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचा (Circular Economy) उल्लेख केला होता त्याचे हे उदाहरण नव्हे! त्या लेखामधील बुद्धाच्या कथेचा या गोष्टीशी सुतराम संबध नाही आणि लावायचा झालाच तर तो आहे - व्यत्यास!

२. सुमारे १० वर्षांपूर्वी इन्टरनेटवर खूपच लोकप्रिय झालेल्या '१०० डॉलर बिल' या गंमतकोड्याचा हा मुक्ताविष्कार आहे. सदर कोडे आणि त्यातील कूटप्रश्न हे दोन्ही 'अर्थ'हीन तथा 'अनर्थ'कारी असल्याचा निर्वाळा अर्थतज्ञ देतात.

३. याच्या मूळ लेखकाच्या हेतूची कल्पना नाही पण प्रस्तुत लेखकाचा उद्देश हा केवळ मनोरंजन एवढाच आहे. तसेच सदर लेख संपूर्णपणे अराजकीय असून त्यात विनाकारण सांप्रत घटनांचे संदर्भ शोधू नये ही विनंती!

शनिवार, २३ मे, २०२०

मन:शांती...!


तुझे आहे तुजपाशी I 
परि तू जागा चुकलासी II

- तुकोबा

रविवार, १७ मे, २०२०

झू...!



निवांतपणे रवंथ करीत बसलेल्या उंटाच्या पिल्लाने अचानक काही सुचून आपल्या आईला विचारले,
‘आई, आपले पाय असे लांबडे, फताडे, पसरट का आहेत?’
‘बाळा, वाळवंटात धावतांना पाय वाळूत रुतून आपला वेग कमी होऊ नये म्हणून आपले पाय असे आहेत, बरं!’
थोड्या वेळाने आणखी काही सुचून पिल्लू म्हणाले,
’आई, आपल्या पापण्या या अशा एवढ्या जाड्याभरड्या आणि ओबडधोबड का आहेत; नाजूक, रेखीव का नाहीत?’
‘अरे, वाळवंटात कधीही वाळूचे वादळ सुटते, त्यामुळे उडणारी वाळू आपल्या डोळ्यात जाऊ नये, आपल्या डोळ्यांना त्यामुळे इजा होऊ नये म्हणून आपल्या डोळ्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या पापण्या अशा आहेत!’
या उत्तराने समाधान झालेसे वाटून गप्प झालेले पिल्लू थोड्या वेळाने पुन्हा म्हणाले,
‘आई, आपल्या पाठीवर हे असे भले मोठ्ठे कुबड का आहे, मला ते मुळीच आवडत नाही! घोड्यासारखी आपली पाठ तुळतुळीत का नाही?’
‘बेटा, वाळवंटात पाण्याचं दुर्भिक्ष असते की नाही? दिवसेंदिवस पाणी न मिळता रहावे लागते. मग अशा काळात तहानेने आपला जीव जाऊ नये म्हणून आपण पाठीवरील या कुबडात पाणी साठवून ठेऊ शकतो, नाही का?’

पिल्लाला खुपणाऱ्या आपल्या सगळ्या शारीरिक व्यंगांचे महत्व आईने समजावून सांगितल्यावर पिल्लाला अगदी वेगळाच आणि भलताच भाबडा प्रश्न पडला...

‘आई, तू सांगतेयस ते सारे खरे असेल तर आपण इथे 'झू'मध्ये काय करतोय...?’

-----------------------------------------------------------------------

प्राप्त परिस्थितीत, कुंठीत झालेल्या बुद्धीला आणि गोठलेल्या भावनांना विधायक दिशा आणि कृतीशील  विचार देण्याशिवाय या गोष्टीचे काहीही प्रयोजन नाही आणि आपल्या सभोवातली घडणाऱ्या घटना आणि त्यांचे स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय वा जागतिक पातळीवर तथा आर्थिक, सामाजिक, राजकीय परिप्रेक्ष्यातील पडसाद यांच्याशी काही अनुषंगिक संदर्भ आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा!

शनिवार, ९ मे, २०२०

बंदी...!



मायावी जगाकडे पाठ फिरवून उंच टेकडीवर झोपडी बांधून विजनवासात जीवन कंठणाऱ्या तपस्व्याने, कातरवेळी वाटसरूची चाहूल लागताच त्याची अडचण ओळखली. टेकडी चढून श्वास फुललेल्या पाहुण्यास बसण्यास आसन, प्यायला माठातील पाणी दिले आणी काहीही न बोलता भोजनाची सिद्धता सुरू केली, 'पांथस्थाचे यथाशक्ती आतिथ्य करावे आणि उजाडल्यावर त्याला निरोप द्यावा' अशा विचाराने.

पाहुणा पहाटे उठला तो कर्कश्श आवाजाने. पाहतो तर साधू झोपडीत नाही पण मधोमध एक पिंजरा टांगला आहे आणि त्यातील पोपट न थांबता एकच शब्द सारखा किंचाळतो आहे... 'स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य...' ऐहिक जगातील मोहमायेचा त्याग करून नि:संग झालेल्या साधूने एका निरागस पक्षाची अशी कोंडी करावी याचे मुसाफिराला मोठे आश्चर्य वाटले. त्याने तातडीने त्या बंदिस्त जीवाला मुक्ती देण्याची मोहीम हाती घेतली.

वाटसरूने पिंजऱ्याच्या दाराची कडी काढली. दार सताड उघडले आणि तो पक्षाने बाहेर येण्याची वाट बघू लागला. काही वेळ झाला तरी पोपट पिंजऱ्यातून बाहेर येत नाही हे बघून पाहुण्याने आपल्या हाताने पोपटाला बाहेर काढायचे ठरवले आणि पिंजऱ्यात हात घातला. जेवढ्या वेगाने हात आत गेला त्याच्या दुप्पट वेगाने परतला कारण पोपटाने आपल्या बाकदार चोचीने त्यावर हल्ला केला!

या प्रकाराने स्तिमित झालेल्या पांथस्थाला काय करावे सुचेना. परंतु त्या अभागी जीवाला मुक्ती मिळवून देण्याचे सत्कार्य आपल्याच हातून पार पडले पाहीजे या दृढनिश्चयाने मनोनिग्रह करून त्याने आपली पक्षीमुक्तीमोहीम पुन्हा सुरू केली. थोडा वेळ झटापट करून तो पोपटाला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात यशस्वी झाला आणि त्याने पोपटाला मोकळ्या आकाशात उंच भिरकावून दिले. आपल्या  सत्कर्माच्या स्वानंदात मुग्ध होऊ घातलेल्या मुसाफिराच्या लक्षात आले की मगाच्या झटापटीत त्याचा हात चांगलाच जायबंदी होऊन रक्तबंबाळ झाला आहे!

'नदीवर जाऊन शुचिर्भूत व्हावे, संन्याशाचा निरोप घ्यावा, जमलंच तर हाताच्या जखमेला मलमपट्टी करावी आणि पुढील प्रवासाला निघावे' असा विचार करून पाहुणा नदीवर आला. अन्हिक उरकून आपली पोटली घेण्यासाठी टेकडीवरील झोपडीत परतला. संन्याशाची तर काहीच चाहूल नाही पण जसजसे झोपडीजवळ जावे तसतसा एक चीरपरिचीत किनरा आवाज हळूहळू कर्कश्श होऊ लागला. झोपडीत पोहचून पाहतो तर, छिन्नविछिन्न झालेल्या, चहू बाजूने तारा लोंबून उघड्या पडलेल्या पिंजऱ्याच्या मोडकळीस आलेल्या दांडीवर बसून त्याने मोठ्या सायासाने मुक्त केलेला पोपट प्राणपणाने किंचाळतोय...

'स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य...!'
------------------------------------------------------------

आचाराची विचाराशी नाळ तुटलेली असली की उच्चार हा फक्त उपचार उरतो... पोपटपंची का म्हणानात! आपल्याच स्वप्रतिमेच्या सोनेरी पिंजऱ्यात कैद असलेल्या जीवास मुक्त विहारातील मौज कशी कळावी? कैद ही मनोवस्था आहे तर मुक्ती ही प्रवृत्ती. ती ज्याच्या ठायी वास करते तो मुक्तात्मा कुठल्याही परिस्थितीत स्वत:ला जखडून ठेवत नाही आणि जो मनाने बंदिवान तो कधीही मुक्त होऊ शकत नाही. मग लॉकडाऊन असो कि नसो!

'कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही,
पण गगनभरारीचे वेड रक्तातच असाव लागत.
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही...!' 
- वपु

रविवार, ३ मे, २०२०

सृजन...!


कुठलाही आघात कधी
कालजयी ठरू नये;
बाकी सारे संपले तरी
कवितेने मरू नये...!

मायेचा पान्हा आटला,
कवितेत विषाद दाटला;
शिगोशिग भरले जरी
दु:ख आत झरू नये...!

‘मना’ला कधी मरगळ येईल
उदासवाणे सारे होईल;
कवितेने गोंजारता मात्र
डोळे पुन्हा भरू नये...!

प्रवास लांबचा वाटला,
एकटेपणाही दाटला;
कवितेची पायवाट
पायी कधी सरू नये...!

दु:ख आभाळाएव्हढे,
मनी आक्रंदून वाहे;
कविता उसासली जरी
सल उरी उरू नये...!

काळ कठीण भासला,
वाट सुचेना जाहले;
कवितेला साथ घ्यावे
मनी मुळी डरु नये...!

समोर डोंगर ठाकला,
रस्ता संपला वाटला;
वाट ठरली जागी जरी
कवितेने ठरू नये...!

भरकटेल कधी थोडी
थकेलीही कधी मधी;
व्यवहाराने कवितेला
तरी कधी वरू नये...!

कविता म्हणजे श्वास असतो
कविता म्हणजे आशावाद;
कविता रुसली कधी तरी
रुसवा मनी धरू नये...!

कविता बोलते, कविता गाते
नाचते कविता बेभान होऊन;
हरेलही कविता कधी पण
काव्य कधी हरू नये...!

शिशिरात पानगळ
पुन्हा वसंता बहर;
सृजनाचा द्रोह कधी
कवितेने करू नये...!

कुठलाही आघात कधी
कालजयी ठरू नये;
बाकी सारे संपले तरी
कवितेने मरू नये...!

[सन्मित्र दिनेशच्या प्रेरणेस अर्पण]

शनिवार, २ मे, २०२०

उद्या...?


राजा होता एक. दोन राण्या, गुणी प्रजा, सुपीक जमिनी, दुभती जनावरं आणि शब्द झेलायला आतुर दरबारी. राण्यासुद्धा अगदी बहिणी-बहिणींसारख्या एकोप्याने नांदणाऱ्या आणि प्रजासुद्धा सगळे कायदेकानून पाळणारी. शेजारी राज्यांशी मैत्रीपूर्ण सबंध आणि अडीअडचणीला धावून येणारे जीवलग.

दृष्ट लागावी असे सुखचित्र सारे. पण असे असूनही राजाला सुख समाधान म्हणून नाही, सतत चिंता आणि निद्रानाश. बरं चिंता करावी असे काही नाही पण, ‘आज सगळे ठीक चाललेय... उद्या?’ याला काय उत्तर? ना स्तवन गाणाऱ्या भाटांकडे, ना राजवैद्यांकडे, ना प्रकांड पंडितांकडे ना चतुर प्रधानजींकडे!

या राजाच्या पदरी एक सेवक. काम काय तर महालाची साफसफाई करणे, निगा राखणे. गावकुसावर एका छोट्याशा झोपडीत आपल्या पत्नीसोबत सुखाने संसार करणे. हा सेवक बघावे तेव्हा आनंदात, मस्तपैकी गाणी गुणगुणत मन लावून आपले काम करतोय. जणू कुणी कलाकारच चित्र रंगवतोय की मूर्ती घडवतोय!

राजाला मोठे आश्चर्य वाटे. तस बघितलं तर हा खरतर दरिद्री, जेमतेम खाऊन-पिऊन सुखी. याच्याकडे न पैसा-अडका, न जमीन-जुमला, न धन-संपत्ती, हा नेमका कशामुळे एवढा आनंदात राहतो? माझ्यासारख्या एका सार्वभौम, दिग्विजयी आणि श्रीमंत राजाला साध्य नाही असे कोणते सुख याला साधले आहे...?

राजा असला तरी मनुष्यच असल्याने, दुसऱ्याच्या दु:खाने विव्हल होण्यापेक्षा आपल्याला दुष्प्राप्य असणाऱ्या दुसऱ्याच्या छोट्याशाही सुखाने विदग्ध होणे त्यालाही चुकले नव्हते. तेव्हा हा आपला य:कश्चित सेवक नेमका आनंदी तरी कसा राहतो याचे कारण शोधून काढण्याचे काम त्याने आपल्या चतुर, हिकमती आणि करामती प्रधानावर सोपवले.

जन्मत:च चतुर आणि विचक्षण असणाऱ्या प्रधानाला, फळ्यावरील रेषा न खोडता लहान कशी करायची चांगलेच ठाऊक होते. आपला धनी, आपले महाराज हेच आपले पोशिंदे असल्याने त्यांची मर्जी राखणे, त्यांना खुश करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे याची प्रधानजींना पूर्ण कल्पना होती. राजाला समाधान लाभत नसले तर दुसरा तोडगा होता...

प्रधानजींनी सेवकाच्या दाराशी सुवर्णमुद्रांनी भरलेली थैली ठेवण्याची व्यवस्था केली. सेवक घरी पोहचला. पाहतो तर दारात थैली पडलेली. उचलून आत आणली आणि उघडून पाहतो तर डोळे विस्फारले. ‘माझं नशीब उघडलं, आजवरच्या कष्टांचं चीज झालं, मला धनलाभ झाला... अगं ऐकलस का?’ म्हणत हर्षाने नाचू लागला.

चुलीपाशी कामात असलेली बायको पदराला हात पुसत बाहेर येऊन पाहते तो नवरा आनंदाने बेभान होऊन नाचत सुटलेला. त्याच्या हातात थैली आणि त्यात सुवर्णमुद्रा! सेवकाच्या बायकोच्या आनंदालाही पारावार उरला नाही पण तेवढ्यात सावध होऊन ती अंगभूत व्यवहारचातुर्याने म्हणाली, ’अहो, नाचत काय बसलात? किती आहेत मोजल्यात का?’

बायकोकडे कौतुकाने पहात सेवक म्हणाला, ‘खरंच की, आनंदाच्या भरात सुख नेमकं किती आहे तेच मोजायला विसरलो!’ सुवर्णमुद्रा जमिनीवर ओतल्या आणि नवरा-बायको उत्कंठेने मोजू लागली. ९९! ‘अहो, असं कसं होईल, थांबा मी मोजते!’ बायकोने मोजल्या... ९९! ‘तू ना वेंधळीच आहेस, थांब, मी नीट मोजतो!’ ९९!

नवरा-बायकोने एकेकट्याने, आलटून-पालटून, एकत्र, राशी बनवून सुवर्णमुद्रा किमान शंभरवेळा मोजल्या... ९९! ‘थैलीला कुठे भोक पडलंय का बघ, एखादी बाहेर कुठे पडली असेल तर मी बघून येतो...’ म्हणत सेवक त्याच्या झोपडीबाहेरचा जवळ-जवळ सगळा रस्ता धुंडाळून आला, पण कुठेही सुवर्णमुद्रा पडलेली नाही, थैलीला भोकही नाही!

रात्र झाली, दिवेलागणीची वेळ झाली. जेवायची वेळ टळून गेली तरी दोघांना भूक लागली नाही. न जेवता, फक्त पाणी पिऊन दोघे अंथरुणावर पडले पण झोपेचा पत्ता नाही. एरवी जमिनीला पाठ लागताच घोरू लागणारा सेवक आणि त्याची बायको डोळे मिटून झोपेशिवाय तळमळताय, मनात सारखा एकच विचार, ‘एक सुवर्णमुद्रा कुठे गहाळ झाली?’

दुसऱ्या दिवशी सकाळी बायको प्रथम भानावर आली आणि म्हणाली, ‘अहो, ऐकलत का? नाहीतरी त्या सुवर्णमुद्रा आपल्याला विनासायास मिळाल्या आहेत. म्हणजे भगवंताची या मागे काहीतरी योजना असली पाहिजे. आपण एक सुवर्णमुद्रा कमी आहे, ती कुठे गेली याचा विचार करण्यापेक्षा मेहनतीने ती कमवू आणि शंभर पूर्ण करू!’

मनी विचार करता सेवकाला व्यवहारी बायकोचे म्हणणे पटले आणि ती म्हणतेय तसे आपण कष्ट करून, काटकसरीने जगून, आणखी एक सुवर्णमुद्रा कमवू आणि आपल्या ९९ सुवर्णमुद्रांची शंभरी पूर्ण करु असा निश्चय करून तो कामावर निघाला. राजवाड्यात रोजच्या कामाला लागतांना त्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हते आणि ओठांवर गाणे नव्हते...

चेहऱ्यावर संभ्रम, देहबोलीत तणाव आणि कामात लक्ष नाही अशा अवस्थेतील सेवकाला बघून राजा मनोमन थोडासा सुखावला पण त्याहून अधिक चक्रावला. वर्षानुवर्षे ज्या सेवकाला त्याने अत्यंत मनापासून, आनंद घेऊन, गाणी गुणगुणत काम करतांना बघितले त्याला असे बघणे राजाला साहवेना. त्याने प्रधानजींना सेवकाच्या या अवस्थेचे कारण विचारले.

‘विशेष काही नाही, महाराज, त्याला कालपासून ९९ मंडळाचं सभासद करून घेतलं आहे, आता तो असाच दिसणार!’ राजा अधिकच संभ्रमित झाला, ‘प्रधानजी, ’९९ मंडळ’ हा काय प्रकार आहे?’

‘ते होय, ते एका विशिष्ट प्रकारच्या माणसांचं मंडळ आहे, महाराज...’ गालात जीभ घोळवत प्रधानजी उत्तरले,
‘आज सुखासमाधानाने जगण्यासाठी जे हवे आहे ते सारे यथास्थित मिळालेले असतांनाही, ‘उद्याचं काय...?’ या लोभात, आपल्याला किंचित अधिक मिळालं तर आपण याहून जास्त आणि आजपेक्षा उद्या अधिक सुखी होऊ अशा कल्पनेने जी माणसं मुळात त्यांची नसलेली आणि त्यामुळे न हरवलेली शंभरावी सुवर्णमुद्रा शोधण्यात जगणं विसरतात त्याचं मंडळ!’

राजाने यातून काय बोध घेतला आणि त्याला मन:शांती मिळाली की नाही माहित नाही... सेवकाची झोप मात्र उडाली ती कायमची...!
-----------------------------------------------------------------
एका अत्यंत लोकप्रिय नागरी दंतकथेनुसार, भारतीय तरूण परदेशात, विशेषत: अमेरिकेत, जातो, स्थिर-स्थावर होतो. त्याला तिथल्या स्वतंत्र, मुक्त, सुखासीन जीवनाची भुरळ पडते. नव्याची नवलाई ओसरली की ते जीवनमानही अंगवळणी पडते. साधारण चाळीशी ओलांडली की या मूळच्या भारतीय संस्कारातील मुलाला आपल्या पौगंडावस्थेतील मुलांवर होऊ घातलेल्या पाश्चात्य संस्कारांची काळजी वाटून, 'आता पुरे झाले, गड्या आपला गाव बरा! आ, अब लौट चाले...' असे वाटू लागते.

बापाच्या मनाला ही काळजी असली तरी आता ग्रीन कार्ड होल्डर असलेल्या सुखवस्तू नागरिकाचा अमेरिकन भुलभुलैयाचा मोह सुटत नाही म्हणून तो स्वत:ची समजूत घालतो... 'अजून फक्त एक वर्ष! तेवढं झालं की कायमच जाऊ या की परत 'जन गण मन...' म्हणायला!'

...आणि हे मग दर वर्षी असच घडत राहतं! याला म्हणतात एक्स + १ सिंड्रोम - एक विकार प्रवृत्ती... ही त्या '९९ मंडळा'ची लहानपणी यात्रेत हरवलेली जुळी बहिण...!

पण या दोन्ही भावंडांना टाळण शक्य आहे...
मुळात राजाच सुखी-समाधानी झाला तर...
प्रधानजी राजाला खुश करण्याऐवजी राजाला समजावू शकला तर...
सेवकाने दाराबाहेर पडलेली थैली स्वीकारलीच नाही तर...

उणीवेच्या जाणीवेने मन:स्वास्थ्य हिरावून घेण्याआधी शहाणीव भेटली तर...? 

हे शक्य होईल...?
निदान या सक्तीच्या निवांतपणात स्वतंत्र, स्वयंभू आणि समग्र विचार करायला वेळ आहे तोवर...? अगदी लगेच आजच नाही, पण...
...उद्या?