बुधवार, ३१ ऑगस्ट, २०११

पाचोळा...!


साथ या शब्दाचा अर्थ

खरतर किती वेगळा आहे...

फुलासोबत असेल तर पान

नाहीतर नुसताच पाचोळा आहे...!

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०११

चातुर्य...!


बेहिशोबी माणसाला

ते मूर्ख ठरवतात...

स्वत:च्या कद्रूपणाला

चातुर्याचे लेबल लावतात...!

सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

शिष्टाई...!


विजयोत्सव अविशिष्ट भ्रामक लढाईचा

उन्माद सत्ता अन दांभिक सहमतीचा

कुणी काय मिळविले काय हरविले

निष्कलंक निष्ठेला आधार भ्रष्ट शिष्टाईचा...!

रविवार, २८ ऑगस्ट, २०११

कृतज्ञ...!


कृषिधन हे बळीराजाचे

नांगर आणि पिकता मळा

वैभव अन भूषण उत्सवाचे

सण कृतज्ञतेचा बैलपोळा...!

शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

उन्नती...!?!


एकापेक्षा एक नमुने

कथा किती अन व्यथा किती

पण लक्षात कोण घेतो

हि उन्नती कि अवनती...!?!

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०११

संसार...!?!


संसारतल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा,

सुखाची  साधनं हि वयानुरूप, कालानुरूप निरनिराळी असतातच

आणि प्रत्येक जण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळंतोही...

पण संसार टिकतो तो कसा...?

तर दु:ख जेव्हा सगळ्याच एकच होतं तेव्हा घर उभं राहतं...!

- व पु काळे

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

चाळीशी...!?!


"तीशीतून मागे पाहत होतो, तेव्हा बालपणीच्या आठवणींचे चटके विसरलो नव्हतो. चाळीशीतून बालपण, त्यातल्या पाढे, मोडी पुस्ती, भूगोलाचे कूट प्रश्न आणि इतिहासाच्या सनावळ्या ह्या वेदना जमेला धरून सुद्धा मजेशीर वाटायला लागते.

तारुण्यात निराळ्या अर्थाने चटका लाऊन गेलेल्या व्यक्ती पुन्हा भेटल्या की शेक्श्पिअर चालीवर 'हाच का तो चेहरा - की ज्याने बुडवली होती असंख्य गलबते आणि जन्माला घातले होते ट्रोयचे युद्ध ?' असे स्वतालाच मिस्कीलपणे विचारावेसे वाटते.

सारी युद्धे शांत झालेली असतात. मन देवटाक्या सारखे निर्मळ होते आणि म्हणूनच कदाचित नवा रंग स्वीकारायला नाही म्हणत नाही. मनाच्या खरया औदार्याचा साक्षात्कार चाळीशीतच होतो आणि म्हणून कदाचित प्रथमच चाळीशी चढवलेल्या त्या कुण्या इंग्रजाने म्हटले असेल की, आयुष्याची सुरुवात चाळीशीत होते.

न्याय - अन्याय, मान - अपमान, प्रेमभंग आणि प्रेमपूर्ती, निर्धनता आणि सधनता हे सारे भोग भोगून चाळीशीतला माणूस म्हणतो, "अस्सं ! ह्या खेळाचे नियम हे आहेत होय ? आल लक्षात. आता मांडा सारीपाट !" 

- पु ल देशपांडे

धन्यवाद दिना, तुझ्यामुळे इतके चपखल लिखाण शोधायचे आणि टाईप करायचे काम वाचले...!

शनिवार, २० ऑगस्ट, २०११

पथ्य...!


घर एक स्वप्न

अन घर एक सत्यही...

पण टिकविण्यासाठी ते

पाळायची असतात काही पथ्यही ...!

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११

नाळ...!


आयुष्याच कोडं

भल्याभल्यांना सुटत नाही...

कितीही वैराग्य आलं

तरी जीवनाशी नाळ तुटत नाही...!

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०११

निष्काम...!


निष्काम कर्मयोगाचा अर्थ

इथे कुणाला कळला आहे...

न केलेल्या कामाच्या श्रेयाकडे

मनुष्यस्वभाव ढळला आहे...!

बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

कीर्ती...!


प्रेरणेने केलेले अनुकरण

त्यांच्या लेखी नक्कल असते...

स्फुर्तीलाच कीर्ती म्हणायची

त्यांची आगळी शक्कल असते...!

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११

ऐदी...!


माणसामाणसातला संवाद

कुठेतरी हरवलाय...

तो शोधण्यात गुंतलेल्याला

ऐदी त्यांनी ठरवलाय...!

सोमवार, १५ ऑगस्ट, २०११

जाग...?!?


माझ्या अशा अभिव्यक्तीचा

क्वचित कुणाला राग येईल...

लाल किल्ला ध्वजासह विकायला काढला

की हिंदुस्थानला जाग येईल...?!?

रविवार, १४ ऑगस्ट, २०११

खेळ...!दुस-याचा विचार करायला

इथे कुणाला वेळ आहे...

म्हणायला माणसाचं जग

प्रत्यक्षात उंदरामांजराचा खेळ आहे...!

शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

बंधन...!


बंधन नव्हे कच्च्या धाग्याचे...

वचन नव्हे खोट्या त्यागाचे...

सदोदित जाणून एकमेका...

व्रत हे जीव पाखडण्याचे...!

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०११

आठवणी...!


डोळ्यात आसू, ओठांवर हसू

आणतात आठवणी...

गर्दीत एकट, एकलेपणात गर्दी

करतात आठवणी...!

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०११

आव...!


फांदीवर बसून एकला कावळा

करतोय केव्हाचा कावकाव

त्याचाही भरून आलाय गळा

तरी गाण्याचा आणतोय आव...!

बुधवार, १० ऑगस्ट, २०११

क्षण...!


काही क्षण फक्त

दोघांचेच असतात

धरून ठेवता येत नाही

म्हणून विसरायचे नसतात...!

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०११

गूढ...!निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी

एक घरट दोन पक्षी...

आयुष्याच्या भक्क उजेडात

नियतीची गूढ नक्षी...!

रविवार, ७ ऑगस्ट, २०११

मैत्र...!


बेगडी नात्यांच्या जंजाळात

जीव कधीचाच दमतो...

माउली म्हणती 'मैत्र जीवाचे'

कृष्ण-सखा-सुदाम्यासह रमतो...!

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०११

पिंड...!


स्वार्थासाठी लाचारी  की

स्वत्वासाठी  नुकसान स्वीकारावं...

आपापल्या पिंडानुसार

ज्याच त्याने ठरवावं...!

बुधवार, ३ ऑगस्ट, २०११

गूढ...?


एकटाच पाहून घरात मला

चिमणा चिमणीला म्हणाला...

एकलेपणाचे गूढ याचे

विचारावे ग कुणाला...?

मंगळवार, २ ऑगस्ट, २०११

प्रतिमा...!


प्रतिमेचा शोध माझा

अलीकडे का फसतो...

आरसा मला बघून

अनोळखीस हसतो...!