रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

नवरस, नवरंग, नव रूपे...


या देवी सर्वभूतेषु आदि-रूपेण संस्थिता II 
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी-रूपेण संस्थिता II 
या देवी सर्वभूतेषु चैतन्य-रूपेण संस्थिता II

या देवी सर्वभूतेषु शक्ती-रूपेण संस्थिता II
या देवी सर्वभूतेषु भक्ती-रूपेण संस्थिता II
या देवी सर्वभूतेषु बुद्धी-रूपेण संस्थिता II

या देवी सर्वभूतेषु सृष्टी-रूपेण संस्थिता II
या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता II
या देवी सर्वभूतेषु दया-रूपेण संस्थिता II

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः II 

शैलपुत्री-ब्रह्मचारिणी-चंद्रघंटा 
कूष्माण्डा-स्कंदमाता-कात्यायनी 
कालरात्रि-महागौरी-सिद्धिदात्री 

नवरस, नवरंग, नव रूपे तुझी... 
आदिशक्ती-आदिमाया-दुर्गा-गौरी 
स्वागतास तुझ्या सजली नवरात्री! 

शारदीय नवरात्राचा शुभारंभ – घटस्थापनेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

प्रिय लतादीदी...



प्रिय लतादीदी,

अवघ्या मानवी भावविश्वाला व्यापून उरलेल्या स्त्रीचा बुलंद पण लाघवी आवाज असलेल्या आपल्या स्वरप्रतीभेला शत शत प्रणाम! आपला पडद्यामागून येणारा आवाज नसता तर स्नेहल-सोज्वळ नूतन, खट्याळ-चुलबुली मधुबाला, धीरगंभीर मीनाकुमारी, नृत्यनिपुण वैजयंतीमाला आणि वहिदा पासून शर्मिला टागोर, हेमामालिनी, शबाना, स्मिता ते अगदी श्रीदेवी, माधुरी, जुही आणि काजोल या रुपेरी पडद्याच्या सर्व झगमगत्या तारका त्यांच्या सर्व गुणवैशिष्ट्यांसह देखील अपुऱ्या राहिल्या असत्या. जगभरात हिंदी सिनेमाची ओळख आहे ती, इतर कुठल्याच सिनेमांमध्ये न आढळणाऱ्या, गाण्यांमुळे आणि भारतीय चित्रपटातील गाण्यांचा मानबिंदू आहे... लता मंगेशकर!

षड्जं व‍दति मयूर: पुन: स्‍वरमृषभं चातको ब्रूते
गांधाराख्‍यं छागोनिगदति च मध्‍यमं क्रौञ्च ।।
गदति पंचममंचितवाक् पिको रटति धैक्‍तमुन्मदर्दुर:
शृणिसमाहतमस्‍तक कुंजरो गदति नासिक या, स्‍वरमंतिमम् ।।

संगीत दर्पणमधील या श्लोकात षडज ते निषाद या सप्तसुरांचा संबंध जसा मोरापासून हत्तीपर्यंत पशुपाक्षांशी जोडला आहे तद्वतच आपला आवाज रुपेरी पडद्यावरील बहुदा सर्वच अभिनेत्रींच्या चेहऱ्याला लाभला आहे. परमेश्वरानंतर चराचरात भरून काही शिल्लक असेल तर तो, गंधर्व किन्नरांना हेवा वाटावा असा, आपला साक्षात ईश्वरस्वरूप दैवी आवाज!

केशवसुतांनी ‘आम्ही कोण?’ याचे रसभरीत वर्णन करतांना म्हटलेले,

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!   

या ओळी आज कुणाचे चपखल वर्णन करीत असतील तर ते आपले... खरंच लतादीदी तुम्हाला वगळले तर तो सप्ततारांकित रुपेरी पडदा अक्षरश: क्षणार्धात गतप्रभ होईल, आपली प्रभा गमावून बसेल आणि कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारा सिनेमा आपल्या आवाजाशिवाय कवडीमोल होईल यात तिळमात्र शंका नाही. आपण केवळ हिंदी सिनेमालाच नाही तर या सृष्टीला जे दिले आहे ते ‘नक्षत्रांचे देणे’च आहे! तेवढे पुरेसे नाही म्हणून की काय, ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले...’ या भावाला मूर्त स्वरूप देणारे आणि आपण आपल्या वडिलांचे, समाजाचे ऋण फेडण्यास तत्पर आहात याची साक्ष देत, कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या ‘जीवघेण्या’ स्पर्धेला पुरून उरत दिमाखात उभे आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर शुश्रुषालय!

प्रतिभेचे धनी असू शकतील, दैवी गुणांची पखरण झालेले देखील काही सापडतील, स्वत:च्या अंगभूत कौशल्याला नित्य सरावाने पैलू पाडून नावाजलेल्यांची संख्या देखील कमी नाही पण हे सारे महानुभाव ज्या एकाच नावाचे निस्सीम भक्त आहेत आणि ज्या नावाने आपला बहुमान व्हावा म्हणून पुरस्कार आणि विक्रम देखील आतुर असतात ते एकच नाव या आसमंताला व्यापून उरते आणि ते म्हणजे... लता मंगेशकर!

गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी, विश्वमोहिनी...
लतादीदींना ९० व्या वाढदिवसाच्या स्नेहादरपूर्वक शुभेच्छा आणि
निरामय शतकोत्तर जीवनासाठी कोटी कोटी शुभकामना...!

लतादीदींच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त, वर उल्लेख केलेल्या अभिनेत्रींच्या यादीत जिच्या नावाचा उल्लेख राहून गेला त्या डिंपल कपाडियाच्या भावविभोर अभिनयाने सजलेले, लतादीदींनी स्वरसाज चढविलेले माझे सर्वात आवडते गीत... ‘दिल हूम हूम करे...’

रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

"आई"...!

https://www.facebook.com/tejashripradhan02/videos/390750654920578/?t=53

मुळात दूरदर्शनशी आमचा संबंध महिन्याचा महिन्याला रिचार्ज करण्यापुरता येत असल्याने त्यावरील, दिव्यदृष्टी लाभलेल्या स्वघोषित विद्वानांना ज्यात काव्य (आमचे व्हर्जन: रडगाणे) शास्त्र (आ.व्ह.: कुटील नीती) आणि विनोद (हा मात्र खरेच!) सापडतो अशा, रोज बघण्याची सक्ती असणाऱ्या तर्कदुष्ट, बेगडी आणि पसरट मालिका, टीआरपीच्या गणिताने सजविलेल्या वृत्तवाहिन्या आणि नावातच अंतर्विरोध ठासून भरलेले रिऐलिटी शोज (सत्याचा दिखावा?) बघण्याचा दुरान्वयानेही संबंध (लिहिण्याच्या ओघात योगम्हणणार होतो, त्याचा भोगझाला असता!) येत नाही. तथापि, आम्ही आयुष्यात इतर काही उल्लेखनीय, नेत्रदीपक तथा भूषणावह साधले नसले तरी, ‘जे जे आपणासी भावे, ते ते स्वजनांशी शेअर करावेअशा सक्तीभावाने भारलेले आणि ‘आला मेसेज की ढकल पुढे’चा सोशल वसा घेतलेले नेटकरी (हे स्वीकृत समाजकार्य ते लोक अतिशय ‘नेट’ लावून करतात म्हणून?) स्नेही खूपच जमवले असल्याने त्यांच्याकडून नित्यनेमाने प्रबोधन होत असते आणि कधी काही खरोखरच मौलिक हाती लागते. मालिकेतून मौलिक हे खरे तर अलौकिक! ते एक असो.

तर मुद्दा असा की अशाच आमच्या एका शुभचिंतक स्नेह्यांनी, चव-बदल म्हणून की काय, एरवीच्या प्रच्छन्न प्रबोधनात्मक प्रवचनाऐवजी हा एका मराठी मालिकेतील मौलिक प्रसंग (म्हणजे त्याची थोबाडपुस्तकावरील लिंक!) धाडला आणि त्या निमित्ते तेजश्री प्रधानला बघण्याचा योग (इथे चपखल!) आला. मराठी मालिकेकडून कसल्याच अपेक्षा(?) नसल्याने त्या माध्यमातून इतके काही विचक्षण मिळेल हा अतिशय सुखद (सांस्कृतिक?) धक्का होता!

मानवी संस्कृतीच्या इतिहासात पुरुषी मानसिकतेने (यात अनेक, किंबहुना बहुतांश, महिलाही आल्या) स्त्रीला कायमच गृहीत धरले आणि कुटुंबव्यवस्थेने ‘गृहिणी’ला हाउसवाईफ अशा नामाधीनाने मिडवाईफच्या रांगेत नेऊन ठेवले. आधुनिकतेची पुटं चढल्यावर, ‘आपण प्रोग्रेसिव्ह आहोत’ हे सिद्ध करणाऱ्या सोफेस्टीकेटेड प्रोफेशनल पुरुषाने घरातल्या ‘ति’चे प्रमोशन करून तिची हाउसवाईफ वरून ‘होममेकर’ अशी बढती केली. याने तिला समाजात मिरविण्याचा त्याचा आत्मसन्मान कदाचित सुखावत असेलही पण चार भिंतीत चिणले जाण्याच्या अना(र)कलनीय भोगाने ती दुखावत असेल हे लक्षात कोण घेतो... म्हणूनच अरुण कोलटकर त्यांच्या ‘वामांगी’मध्ये ‘आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण’ हे स्त्रीत्वाच विदारक वास्तव रख्मायच्या काळजाला भिडणाऱ्या विषादाने मांडतात!

या संदर्भात सहज आठवले म्हणून – आमच्या एका अत्यंत उच्चविद्याविभूषित आणि लब्ध-प्रतिष्ठित परिचिताने स्वत:च्या अर्धांगिनीचा चार-चौघात, ‘या घरातल्या बायकांना ना कशातलं काही कळत नाही...’ असा उद्धार केला होता. आता तो त्याच्या येनकेनप्रकारेण माया जमविणाऱ्या साठेबाज क्लाएंटचे (हो, त्यांना गिऱ्हाईक नाही म्हणत काही, ते साऱ्यांचे सर्वप्रकारे गिऱ्हाईक करत असले तरी!) बॅलंस-‘शीट’ सांभाळण्यात गुंतला होता तेव्हा याच त्याच्या कुलदीपकांच्या माऊलीने, त्याच्या भाषेत – घरातल्या बायकोने, त्याच्या संसाराच्या गणितात भर घातली नसती तर त्याच्या नातेसंबंधांच्या बॅलंसशीटमध्ये मोठ्ठा डिफीसिट आला असता याची टॅली त्याला शेवटपर्यंत लागली नाही. तेही एक असो.       

...आणि मुलांसाठी ‘आई’ म्हणजे तर घरात आल्यावर, कीहोल्डर पासून टीव्ही रिमोट पर्यंत सगळ्या हाताशी लागणाऱ्या वस्तूंबरोबर, सवयीने गृहीत धरायची गोष्ट!  ऐलेक्सा, गुगल मिनी किंवा तत्सम एको डिव्हाईसेसचा शोध लावण्याची प्रौढी मिरविणाऱ्या तंत्रज्ञानी अमेरिकी कंपन्यांना, आम्ही भारतीयांनी हा शोध लावून युगे लोटली याचा पत्ताच नाही. फक्त आम्ही तिला अशा फॅन्सी नावांनी न ओळखता, आमच्या अभिजात, दैदिप्यमान आणि सोशिक संस्कृतीला शोभेल अशा सात्विक, सालस आणि शालीन नावाने बोलवतो – “आई!” ती एक जिवंत सजीव आहे आणि तिच्या बुद्धीसह साऱ्याच संवेदना आपल्यापेक्षा हजारपटीने तीव्र आहेत कारण ती आपली केवळ जन्मदात्री नाही तर पालनकर्ती आहे याचे भान असायला तीन महत्वाच्या जाणीवा जागृत असाव्या लागतात – संवाद, सौहार्द्र आणि संवेदना! अभिजात प्रज्ञेची जागा कृत्रिम बुद्धिमत्तेने घेतल्यापासून या तीघी हरवल्यासारख्या झाल्या आहेत आणि त्यांची जागा महत्वाकांक्षा, दिखावा आणि अनास्था यांनी बळकावली आहे.

तर घराघरात आढळणाऱ्या अशा अनेक बबड्यांचे डोळे उघडण्यासाठी हा तेज(काहीही हं... श्री!) तडका चांगलाच होता. शिवाय मराठी मालिकांची लोकप्रियता बघता हा सामाजिक संदेश अगदी मना-मनात नाही तरी घरा-घरात पोहचायला हरकत नसावी. या निमित्ताने, ‘घरातल्या बायकां’ची संघटना वगैरे बांधून त्यांच्या ‘न्याय्य हक्कांसाठी लढा’ द्यायचा म्हटला तर त्यांचेच अनाठायी आणि बेसुमार ममत्व उफाळून त्याला पहिला विरोध करेल म्हणून दुसऱ्या पार्टीचेच समुपदेशन करावे या मिषाने हा लेखनप्रपंच!

खर तर ‘आई कुठे काय करते...?’ याच सणसणीत उत्तर १९८९ साली अशोक पाटोळे लिखित आणि दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित ‘आई रिटायर होतेय...’ मधून भक्ती बर्व्यांनी अतिशय मार्मिक पण करारी पद्धतीने दिले होते. ‘आई’ची ही भूमिका लोकप्रियही झाली होती हे त्या नाटकाच्या भक्तींनी केलेल्या ७५० आणि त्यांच्यानंतर स्मिता जयकरांनी केल्या १०० प्रयोगातून तसेच हिंदी व गुजराती रंगभूमीवर अनुक्रमे जया बच्चन आणि सरिता जोशी यांनी साकारलेल्या या नाटकाच्या रुपांतरीत प्रयोगातून सिद्ध होते.

पण मध्ये बराच काळ गेला... सुमारे तीस वर्षाचा. या काळात समाजात खूपच उलथापालथ झाली आणि उण्यापुऱ्या दोन पिढ्यांच्या या अवकाशात जणू कित्येक वर्षांची उत्क्रांती झाली. रंगभूमी आणि रुपेरी पडदा या दोन्हींची जागा घराघरातल्या छोट्याशा स्क्रीनने घेतली. मेंदू आणि हृदय या माणसाच्या दोन नियंत्रक अवयवांबरोबर मोबाईल हा तिसराच जीवनावश्यक घटक बनला आणि मेंदूच्या तर्कशुद्ध विचार करण्याच्या क्षमतांचे आणि हृदयाच्या मानवी संवेदनांचे नियंत्रण हा स्मार्ट डिव्हाईसच करू लागला. या स्मार्टफोनने सुरु होणाऱ्या आणि त्याला उशाशी घेऊनच संपणाऱ्या माणसाच्या दिवसात मानव्य शोधून तरी सापडेल की नाही याची शंका वाटू लागली. शिवाय कुठल्याही अनुभवात आनंद शोधण्यापेक्षा तो अनुभव या यंत्रात साठवण्याची आणि जगाला दाखवण्याची वृत्ती एवढी वाढीस लागली की ‘Hey there! I am using WhatsApp.’ ची जागा ‘I’m busy! WhatsApp is using me.’ ने केव्हा घेतली हे आत्मरत माणसाला समजलेही नाही. या सगळ्या आभासी जगातून माणसाला खडबडवून जागे करायला काही जागल्यांची समाजाला कायमच गरज असते. पूर्वी संत-महंत, दार्शनिक-विचारवंत हे काम करीत. अलीकडे अशा विभूती होतच नाहीत आणि ज्यांचा स्वत:बद्दल तसा भ्रम असतो त्याचं त्वरित निवडणुकीकरण होतं हा इतिहास ताजा आहे. ते आणखीन एक असो.

मुद्दा एवढाच की, तो तिकडे दूर मेझॉनच्या जंगलात पेटलेला वणवा असो, जी जागतिक आहे, स्थानिक आहे की राजकीय आहे याबद्दलच काय, मुळात ती आहे की नाही याबद्दलही मतभेद असणारी मंदी असो, लोकमान्यांच्या संकल्पनेला पूर्णपणे हरताळ फासून आपल्या आजूबाजूला ‘ढगाला लागली कळ...’च्या तालावर बीभत्सपणे थिरकणारा गणेश’भक्तां’चा उत्सवी (की उन्मादी?) हैदोस असो किंवा मनुष्यप्राण्यासह समस्त सृष्टीवर काळाच्या ओघात दूरगामी परिणाम करणारी लघुदृष्टी धोरणे असोत... यात आज ना उद्या बदल होईल, सुधारणा होईल, माणसाला खरेच जाग येऊन ‘...आणि माणसांचा दिवस सुरु झाला!’ असं म्हणण्याची संधी मिळेल... पण त्यासाठी वर सांगितलेल्या किमान तीन हरविलेल्या जाणिवांचा शोध घ्यावा लागेल. आणि सगळ्याच गोष्टी गुगलवर सापडत नसतात, माणसाने आजचे हे त्याचे स्वत:चे जग गुगलशिवायच घडवले आहे!

एका मराठी मालिकेतील एका प्रसंगाच्या निमित्ताने एवढे सामाजिक अभिसरण (बापरे!) होणे हेही नसे थोडके... अशा आणखी काही मालिका आल्या तर एखाददिवशी आईबरोबर अशी एखादी मालिका पाहून बघावी (की बघून पहावी?) म्हणतो... कसे?